न चुकणारी घटना
रोजची नवी पहाट
पण आजची विशेष
वाटे मज प्रभावळ
तेज फाकले दशदिशात
चैतन्य सळसळले चराचरात
पक्षी कलरव करिते झाले
गरुड झेप घेत ,स्वप्न माझे नभात विहरले
फुलली वनराणी,
हलकेच आली फुलराणी
कुपी उघडता सुगंधाची
परिमल वाटत फिरली प्रभाराणी
ही एक नवी पहाट
न ठरो जगरहाट
या वर्षात दिसो नवा थाट
वाहू दे चराचरात
समृद्धिचा पाट
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 1, 2020
कौशल ईनामदार एक प्रसिद्ध संगीतकार म्हणतात..
एकदा एक विचार मनात आला.
कुणाला वायफळही वाटू शकतो. गायक आणि पेयांमध्ये साधर्म्य शोधायचा प्रयत्न तर कुठला गायक कुठलं पेय असेल..?
मुकेश हे लिंबू सरबत आहेत.
जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची. पण ताज्या लिंबू सरबताची चव इतर कशालाही येणे केवळ अशक्य..!
मन्ना डे हे दूध आहेत.
पौष्टिक आणि शक्तिवर्धक.
पण ब-याचजणांना नुसते दूध पचत नाही !
गीता दत्त कडक फिल्टर कॉफी आहेत.
येवू घातलेली झोप उडवतात.
आशा भोसले या अतिशय उंची वाइन आहेत. जिभेवर आवाज रेंगाळत ठेवावा आणि फक्त नशा अनुभवावी.
महम्मद रफ़ी हे स्कॉच व्हिस्की आहेत.
सोनेरी, उत्तम दर्जा आणि ...!
तलत मेहमूद...म्हणजे उसाचा रस..!
एकदम गोड आणि थंड पण एक किंवा
जास्तीत जास्त दोन ग्लास बस्स.
जास्त घेवू शकणे अशक्य...!
महेन्द्रकपूर..म्हणजे ताक..!
जमलं तर एकदम फक्कड नाहीतर जावू दे.
किशोर कुमार चहा आहेत.
कधीही, कसाही आणि कितीही अनुभवावा.
दुधात, दुधाशिवाय, तल्ल्फ येते म्हणून,
जाग येते म्हणून, सवय म्हणून, तजेला येतो
म्हणून, कामात, रिकाम्या वेळात, घरचा,
इराण्याचा, टपरीवरचा. कुठल्याही रुपात तो मस्तचं वाटतो.
शिवाय माझंही ते आवडतं पेय आहे..!
आणि शेवटी....
लता मंगेशकर. त्या पाणी आहेत..!
नितळ,पारदर्शक, स्वच्छ,शुद्ध..!
तहान लागली तर ती इतर कुठल्याही पेयाने भागत नाही. प्राण वाचवू शकणारं हे एकमेव पेय..!
धन्यवाद
March 27, 2017
युगानू युगें उभा राही, एका विटेवरी
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी ।।धृ।।
आई वडिलांची सेवा
पुंडलीक भक्तीचा ठेवा
भक्तित होई तल्लीन
जगास गेला विसरुन
उभा करुनी तुजला, गेला निघूनी चंद्रभागेतीरी ।।१।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
विषाचा पेला
मीरेनें प्राशन केला
भजनांत गेली दंग होऊनी
पचविले विष तूं घेऊनी
दुधामधले विष शोषूनी, दाह त्याचा सहन करी ।।२।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
भक्तीत गुंगली राधा
तुमचा होता ध्यास सदा
कष्ट पडता संसारी
विसरुन गेली ती सारी
झेललेस तूंच ते वार पडले तिच्या पाठीवरीं ।।३।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
राहीला नाथाघरीं
आनंदाने पाणी भरी
श्रीखंड्या समजे तुजला
कुणी न जाणी भक्तीला
सुगंधी चंदन घासूनी, सेवा नाथाची करी ।।४।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
सखूसाठीं धावला
देह झिझविला
निवडणे केले, कांडणे केले
राशीभर धान्य दळले
उभा राहूनी पाठीं, सखूचे कामी मदत करी ।।५।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 6, 2016
तुमचं आमचं नातं कधी
एका जन्माचं गुलाम नव्हतं
ऋणं आपली फेडता फेडता
बंध पावले गाढ दृढता ॥ १ ॥
मनाचा कुठला कोपरा काही
जिथे तुमचा ठसा नाही
तुमच्या लावल्या वळणांनी
सरळ झाले मार्ग जीवनी ॥ २ ॥
दुर्धर दुर्गमशा वाटेवरती
काजळलेल्या निराशराती
संस्कारांचा दीप सोबतीला
आशीर्वादाचा कवडसा ओला ॥ ३ ॥
तुम्ही आम्हा दिलं नाही
असं काही उरलं नाही
ज्याने ओतावी कृतार्थ भरपाई
माप शोधून मिळत नाही ॥ ४ ॥
आयुष्यवाट मळता मळता
विराम खचित येणार खरा
मोकळा श्वास घेऊन मांडू
पुन्हा एकदा डाव सारा ॥ ५ ॥
गळ्यात आपले घालून गळे
मनाला करु कणकण मोकळे
छोट्यामोठ्या आठवणींचे
आनंद मोहोळ कल्लोळमळे ॥ ६ ॥
पांग आम्ही फेडावे कसे
ऋणांतून होऊनया उतराई
लिमप्रा जन्म पुढील बदलून पाहू
होऊनिया तुमची आई ॥ ७ ॥
(आईच्या ७२व्या वाढदिवसासाठी लिहिलेली.)
- यतीन सामंत
August 14, 2022
बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं
लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १
चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे
फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २
वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले
भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३
मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणार्या दृष्टीपटाला
स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४
दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे
व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५
प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे
रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६
राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते
अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७
दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला
शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८
तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी
आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९
वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली
दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०
फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता
डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११
आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते
आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
January 25, 2014
हक्क तुझा,हक्क माझा,
हक्क याचा अन त्याचाही.....
पण मला एक सांगा.....
हक्क कधी हक्काचा आहे का हो...?
एकदा आसच चालत आसतांनी....
रस्त्यानं.....!
अविरत पहात व्हतो....
वेगवेगळे रूपं....
ना निरगुण न ही निराकार....
ते तं होते,
आंकुचित....,
अन संकुचितही.....!
व्याख्याच बदलली व्हती
हक्कानं आपली....
सिस्टीममध्ये व्हायरस घुसुनं
फाईल करप्ट व्हावी
तसा करप्ट झालता हक्क....!
अन मंग काय,
हक्कानं आपलीच संस्थानं तय्यार केली.......
आपल्याच
हक्काची......!!!
स्वतःचीच......
स्वतःसाठी
हक्कानं चालवलेली.....!
हक्कालं वावडं व्हतं....
गरीबाच्या घामाच,
भटक्याच्या पालाचं,
श्रमिकाच्या झोपडीचं
अन विद्रोहाच्या चोपडीचं...!!!
हक्क पोचलाच नाही कधी
रंजल्याजवळ बी आन गांजल्याजवळ बी.....
ना पालात,ना रानात,
नाही झोपडीत.....!
तो तं.....
आरामात राबतोय......
संस्थानिकांच्या महालातं.....
हक्कानं....!!!
©गोडाती बबनराव काळे, हाताळा,हिंगोली
9405807079
November 14, 2023
श्रीराम प्रभू माझ्या मनी असे
कंदकृर्ती ग्रामी मज दिसे
एकच मुखी नाम असे
श्री राम जय राम जय जय राम
चैत्र शुद्ध नवमीला यात्रा भरे
रामभक्तांना सुखावह करे
भोगी सुख रामगण सारे
श्री राम जय राम जय जय राम
राम स्वयंभू जागृत स्थान असे
पवित्र गोदाकाठी रममाण दिसे
राम भक्ती शिवाय माझे जीवन कसे
श्री राम जय राम जय जय राम
शेंदूरसेना मध्ये मुर्त्या घडविल्या कसे
खरे स्थान पाटलांच्या स्वप्नी दिसे
श्रीधर महाराजांच्या स्वाधीन करतील जसे
श्रीराम जय राम जय जय राम
सीतारमण हनुमान लक्ष्मण असे
श्रीधर महाराजांकडे निघाले जसे
पावनभूमी मंगलमय ग्राम दिसे
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीधर महाराज श्रीराम भक्त असे
मुर्त्या स्थापनेस साफल्य भासे
नवचैतन्य जनी भाव दिसे
श्री रामजय राम जय जय राम
मंदबुद्धी तोडके बोल असे
मानून घ्यावी माझी सेवा जसे
वर्णन करता भान नसे
श्री राम जय राम जय जय राम
श्री रामचरणी माझे नमन असे
अर्पूनी रचना मनी आनंद दिसे
भाग्यवान मी मनी रामभक्त वसे
श्रीराम जय राम जय जय राम
स्मित✍️...
-सौ. स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर
नांदेड
April 5, 2023
राधे, केवढा केशसंभार,
जीव गुंतला त्यात फार,
का असे ते मोकळे सोडशी,
केसांची जादू मिरवशी, --!!!
रक्षक की मी या विश्वाचा,
दुसरा तिसरा नच" कोणता,
असे असूनही बघ किती,---
केशकलापां पडलो फशीं,--!!!
केस तुझे मानेवरून रुळती,
बटां -बटां वाऱ्यावर खेळती,
बघावे तेव्हा मनसोक्त डुलती, अडके त्यात जीव, हीच भीती--!!!
सुंदर काळेभोर कुंतल,
खूप त्यात खोल गुंतती,
त्यातच सुवासिक तेलगंध, रात्रं-दिन पाडे मोही,--!!!
तुझ्या गोऱ्या मुखड्यावर,
केसांची महिरप काळी,
गोजिरवाणे रूप तुझे,--
येते त्याला मादक झळाळी,--!!
जीवघेणा मदनबाण मारा,
कसे तुझे कुंतल, करिती,
या माऱ्याने सर्वस्व हरलो
तुजसाठी क्षणक्षण झुरलो,
द्वैतातील अद्वैत साधुनी,--
दोन जीव लागले प्रेमापाठी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 19, 2019
रोपाचे बनता झाड,
फांदी अन् फांदी डंवरे,
सडा पडे खाली फुलांचा,
जणू गालिचाच पसरे,
फांद्या फुटण्याआधी कसे,
धुमारे तिथे फुटती,
बघतां बघतां आकार वाढून,
तिज फांदी म्हणती,
किती बहर येई फुलांचा,
ती भरे *नखशिखांत
बघणारा हरखून जाई ,
कुठे फांदी-? याच भ्रमात,
फूल अन् फूल उमले,
जागा नाही कुठे उगवण्या लेकुरवाळ्या फांदीलाही,
अभिमान वाटे मिरवण्यां,
फुले माझी, किती ताजी,
टवटवीत आणि सुरेख ,
जो येतो तो बघत राही,
अगदी अगदी प्रत्येक,
काय ईश्वराने दिले मजला,
वरदानच म्हणते की, --!!!
मुले माझी सारी,---
इतुकी सुंदर वाटती,
या सगळ्या जगालाही,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
May 15, 2019
March 1, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti