(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शब्द संवाद

    केंव्हातरी शब्द संवाद होतो
    पडतात, बोल तेव्हडे कानी
    केवळ खुशाली मात्र कळते
    अव्यक्त मनीचे ओठी थबकते

    हेच आता अंगवळणी पडले
    सुख! जणू चाटण मधासारखे
    अवीट तो आनंद देऊनी जाते
    अव्यक्त मनीचे ओठी थबकते

    बोलती निरपेक्ष अधीर लोचने
    अंतरी झरझरते निष्पाप प्रीती
    मनभावनांचे विशुद्ध गंगाजल
    ओंजळीत अर्ध्य म्हणुनी येते

    मौनात! अंतरीच्या प्रीतभावनां
    सोज्वळ सात्विकतेच्या बंधनात
    जन्म सारा, निस्वार्थी समर्पणात
    तरी प्रीतभावनां अंतरी ओघळते

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २०.

    २० - १ - २०२२.

      February 1, 2022


  • प्रीतफुलां, रे प्रीतफुलां

    प्रीतफुलां, रे प्रीतफुलां, सुगंध तुझा घमघमला,
    भरभरून ओंजळीतला,
    दरवळ हृदयाने सामावला,--!!!

    तन-मन सुगंधित होता,
    कायापालट पाहता पाहता,
    क्षण -क्षण आनंदात विचरला,--- पाकळी पाकळी तुझी फुलतां,--!!!

    उत्साही लहरी उफाळता,
    अणू रेणू सारे रोमांचता,
    लाजून गेली रुपगर्विता,
    तरल भावना-कल्लोळ उठला,-!

    आठवण त्यांची येता,
    मन मोर थुईथुई नाचला,
    अशा भावविभोर चित्ता,
    जीव कुरवाळीत राहिला,---!!!

    आजमितीस काळ न आला,
    सुवर्णकणांनी दिवस मढला,
    जणू स्वप्नांच्या दुनियेतला,
    राजकुमारच दौडत आला,--!!!

    पाहून त्यांना स्तब्ध होता,
    नजरेचा तीरही खिळला,
    शिकारीस शिकारी आला,
    मात्र स्वतःच शिकार जाहला,--!

    © हिमगौरी कर्वे

      January 24, 2020


  • कल्लोळ

    जगी भेटली माणसे
    अनभिज्ञ ती सारी...

    जोडली नाती
    निराशाच पदरी...

    नव्हता जिव्हाळा
    भावशून्य सारी...

    नाही कुणी कुणाचे
    छळे सत्य जिव्हारी...

    जखमांचे झिरपणे
    नि:शब्द वाहते अंतरी...

    असले कसले जगणे
    प्रीत उदास हृदयांतरी...

    हा कल्लोळ असह्य
    भावनांचे रुदन भीतरी...

    रचना क्र ७०

    १०/७/२०२३

    वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

      July 19, 2023


  • आई

    आईबरोबर भांडल्याशिवाय मला
    चैन नाही पडायची
    आणि तिच्या कुशीशिवाय मला
    निज नाही यायची ||१||

    कारण मी होते मुलगी आणि
    ती होती आई
    मी चांगली घडावे म्हणून
    तीची सारखी घाई ||२||

    आता मी झाले आई तेव्हा
    कळून चुकलं सारं
    आई म्हणजे झूळूक होती
    नव्हतं नुस्त वारं ||३||

    आईबरोबर भांडायला मला
    मुळी आवडत नाही
    पण तीची कुस मला आता
    कुठं दिसतच नाही ||४||

      July 24, 2015


  • कोजागर

    हा चंद्रमा शारदीय पौर्णिमेचा
    शीतल चंदेरी प्रीतचांदण्यांचा
    साक्ष कोजागरती कोजागरती
    स्वर्गीयस्पर्श अश्विनी पौर्णिमेचा ।।१।।

    गवाक्षातूनी खुणावतो चंद्रमा
    मनआभाळी चांदणे नक्षत्रांचे
    धुंद बेधुंद, दरवळते रातराणी
    प्रीतगंधाळ तो अवीट सुगंधाचा ।।२।।

    तनमनी रमती गतस्मृतींचे रावे
    निरवतेत अबोली रात्र धुंदवेडी
    बरसते, शुभ्र चंदेरी कोजागिरी
    जागर! पुनरुपी प्रीतभावनांचा ।।३।।

    दुग्धपान!अमृती मनोमिलनाचे
    सौख्यानंदी पुण्यपावन सोहळा
    ज्येष्ठत्वाचे हृद्य स्मरण संस्कारी
    आदर्श हाच भावनिक परंपरेचा ।।४।।

    हा चंद्रमाच,शारदीय पौर्णिमेचा
    शीतल शुभ्रचंदेरी प्रीतचांदण्यांचा.....

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १३६

    १९ - १० - २०२१.

      October 19, 2021


  • संशयाचे भूत

    हे भूत संशयाचे छळते कसे मनाला ।

    करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला ।।

    एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे ।

    डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते ।।

    गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा ।

    कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा ।।

    येता मनी संशय आपलाच ज्या घडीला ।

    शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 19, 2020


  • मायेचा हात

    पहाटे जाग येते तेव्हा
    खिडकीतून चंद्रप्रकाश
    अंगभर पसरलेला असतो
    जणू आईच्या मायेची
    अंगभर चादर पसरतो

    शीतल शांत निराकार
    आईची कुशी उबदार
    जावेसे वाटते फार चंद्रा
    तिच्या मायेच्या मांडीवर

    चंद्रा तुझ्या शितल
    चांदण्याचा स्पर्श
    जणू मायेने तोंडावर
    फिरतोय आईचा हस्त

    आहे ना रे आई माझी
    तुझ्या संगे देवापाशी?
    तिच्या मायेचा हात
    असेच येऊ दे तुझ्या किरणात!

    -- विनायक अत्रे.

      July 15, 2022


  • नि:शब्द वैखरी

    मनभावनांही , मौन आता
    सत्यत्व , अंतरीचे कोंडलेले
    वैखरीही , जाहली निःशब्द
    सूरही संवादांचे कोमेजलेले..।।१।।

    बेचैनी घुसमट जीवाजीवांची
    नेत्री पाझर ,विरही आसवांचे
    सांत्वन कुणी , कुणाचे करावे..
    हताश ! हात हे उरी बांधलेले..।।२।।

    उध्वस्त मनी , भय वास्तवाचे..
    जिथेतीथे , भीतीपोटी राक्षस..
    आज अस्वस्थ , बेजार स्पंदने..
    क्षण ! भेटीचेही धास्तावलेले..।।३।।

    दृष्टांत ! हा या कालियुगाचा..
    बेभरोसी सारीपाट जीवनाचा..
    जाणतो सारे , एक अनामिक..
    सत्य शाश्वती ! जीवन भंगलेले..।।४।।

    ©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908

    रचना क्र. ७० / २६ - ५ - २०२१

      May 28, 2021


  • श्रावणमास

    श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
    क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे

    वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
    मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे

    झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे
    तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

    उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
    सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रुप महा

    बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,
    उतररुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

    फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
    सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

    खिल्लारे ही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे
    मंजुळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एकसुरे

    सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
    पारिजातही बघता भामारोष मनीचा मावळला!

    सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
    सुंदर बाळा या फुलमाला रम्य फुले-पत्री खुडती

    देवदर्शना निघती ललना, हर्ष माहीना हृदयात,
    वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत !

      June 11, 2026


  • शांततेचे स्वप्न

    जिथे नसावा गलबला, गलका, कोलाहल काही
    काळालाही शाप नसावा, लगबग वा घिसाडघाई
    मनस्ताप वा कसली चिंता, गोंगाटही नाही
    शांततेला मग धीर यावा, नीरवता जिवंत व्हावी ॥

    असावी शांततेला एक वात्सल्याची झाक
    काळालाही नसावा वेळेचा काही धाक
    ऐकू यावी अंतरीची केवळ हळूवार हाक
    समाधि लागावी या जगाची न उरे जाग ।।

    जिथे विहरावा वारा मुक्त आपुलकीचा आज
    जिथे सागरा उधाण यावे चैतन्याचा हो स्पर्श
    जिथे व्हावे मोकळे आकाश, विसरुनी सारे पाश
    गर्भरेशमी हिरव्यापानी, लेवून लवावी लाज ॥

    जिथे नसावी घरांना द्वारे मोकळे व्हावे कोंडले श्वास
    संकोचाचे संदर्भ सुटावे आकारुनी यावे अपूर्ण ध्यास
    स्वर्गाचा तो तोल ढळूनी, तादात्म्याचे ताल जुळावे
    द्वैताचे मग भान हरपूनी, धरिणीमध्ये आभाळ मिळावे ॥

    जिथे नसावी जुनी जळमटे, उमेदीला वा भगदाडे
    ममत्वाच्या भासाने खुलावी, मनामनाची हळू कवाडे
    शांत सनातन शांतीच्या मग कुशीत होऊन अधीन
    आसमंतात विरघळत जावे, व्हावे निसर्गाशी तल्लीन ॥

    (जगभरच्या वाढत्या कोलाहलात, गर्दीत दुर्मिळ झालेल्या शांततेचा कधी अनिवार ध्यास लागतो. काही नको फक्त आपण व आपली शांतता एवढंच हवं असं वाटू लागतं)

    -यतीन सामंत

      June 19, 2022