जेव्हां मी म्हणतो माझे,
सोय माझी असते त्यांत,
देह जगविण्या कामीं,
प्रयत्न हे सारे होतात ।।१।।
देह वाटते साधन,
प्रभूकडे त्या जाण्याचे,
त्यासी ठेवतां चांगले,
होते चिंतन तयाचे ।।२।।
भजन करा प्रभूचे,
सुख देवूनी देहाला
परि केवल सुखासाठीं,
विसरूं नका हो त्याला ।।३।।
देह चांगला म्हणजे,
ऐष आरामीं नसावे,
ती एक सोय असूनी,
त्यांने प्रभू मिळवावे ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 3, 2016
नवा चित्रपट बघण्या गेलो, कुटुंबासह चित्र मंदिरी
चित्रगृह ते भरले असतां, प्रवेश मिळाला कसातरी....१,
चित्रपट तो बघत असतां, आश्चर्य वाटले जल्लोशाचे
टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक, कौतूक करी नटनट्यांचे....२
वास्तवतेला सोडूनी, रटाळपणे वाहत होते,
वैताग येवूनी त्या चित्राचा, सोडून आलो मधेच मी ते....३,
घरी येवूनी शांत जाहलो, आठवू लागलो बालपण
अशीच होती छायाचित्रे, ज्यांत आमचे रमले मन....४
जीवनामधल्या चक्रामध्ये, बदल फारसा होत नसतो
वयातल्या पायरीप्रमाणे, दृष्टीमध्ये फरक घढतो....५
--डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
April 4, 2016
चमकत लपकत आली
कडकडाट करुनी गेली
प्रकाशमान केले जगासी
दूर केले अंधारासी
भयाण होता अंधःकार
लख्ख प्रकाश देई आधार
घेई सर्वांच्या मनाचा ठाव
भिती असूनही प्रसन्न भाव
करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन
निर्माण झाला मनी अभिमान
परि दुःखी होते तीचे मन
'क्षणिक' लाभले तिला जीवन
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
April 5, 2013
तू मला कधी भेटणार...
निर्विकार तुझ्या चेहऱ्यावर
विकार कधी दिसणार...
सुंदर पण कोमेजलेल्या तुझ्या
चेहर्यावर हस्य कधी फुलणार ....
कठोर आवाजात तुझ्या
गोडवा कधी येणार...
गुलाबी गालावर तुझ्या
पुन्हा खळी कधी हसणार...
पुर्वीचे ते चैतन्य
तुझ्या वागण्यात कधी जागणार...
माझ्या आठवणीतील ती
तू मला कधी भेटणार...
© कवी – निलेश बामणे
January 1, 2025
मा.बा भ. बोरकर यांची कविता माझ्या गोव्याच्या भूमीत
माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||
माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फ़ळांचे पाझर
फ़ळी फ़ुलांचे सुवास||
माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||
माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||
माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||
माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||
माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||
माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||
November 30, 2016
ना कुठला dance ना कुठली party
पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू संस्कृती ....
ना कुठला one piece अन two piece, ना कुठला party wear
पाडवा म्हंटल कि फक्त झब्बा-लेंगा-नववारी म्हणजेच traditional wear ...
ना कुठला DJ break ना कुठला rawadi dance ....
पाडवा म्हंटल कि ढोल - तशा - झांज - ध्वज आणि लेझीम नाच
ना कुठल hard drink ना कुठल मद्य
पाडवा म्हंटल कि फक्त फक्त आणि नैवेद्य ....
ना कुठल hotel, ना कुठला beach, ना कुठला कोपरा
पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू नववर्ष शोभा यात्रा ....
ना कुठली बेशुद्धी, ना कसला hangover
पाडवा म्हंटल कि नवचैतन्याचा कहर ...
ना कुठला दिखावा, ना कुठले आकर्षण न घातक ज्ञान
पाडवा म्हणजे आमच्यासाठी आमच हक्काचा सण
ना राग - द्वेष - पश्चात्ताप, ना दगा फटका
पाडवा म्हणजे आपल पथक आणि त्यांच्यावरची निष्ठा ....
ना दुःख - संताप, ना पोकळ चर्चा
पाडवा म्हणजे जल्लोष नववर्षाचा ....
March 27, 2017
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 13, 2012
निराशाग्रस्त माणूस बसला होता
त्याला मी ओळखत नव्हतो,
त्याच्या निराशेला ओळखत होतो,
त्यामुळे मी त्याच्या जवळ गेलो
मी त्याला हात दिला
माझा हात पकडून तो उभा राहिला,
तो मला ओळखत नव्हता
मी पुढे केलेल्या हाताला
तो ओळखत होता
आम्ही दोघे एकसाथ चालू लागलो
आम्ही एकमेकाला ओळखत नव्हतो
दोघे एकसाथ चालण्याला ओळखत होतो
++++
मूळ हिंदी कविता - विनोद कुमार शुक्ल
अनुवाद - विजय नगरकर
January 23, 2024
उठा उठा रे मावळ्यांनो, सिंहनाद करू या,
सह्याद्रीच्या शपथेवर स्वराज्य घडवू या.
छत्रपतींच्या चरणी मस्तक ठेवू या,
छत्रपतींचे विचार अंगी बाणवूया.
*यशवंत हो जयवंत हो*
भवानीच्या कृपेने तेज पेटले छातीत,
धैर्याची तलवार चमके आपल्या हातात.
अन्यायाचा अंधार पळो आपल्या शौर्यात,
छत्रपतींचे विचार प्रत्येक हृदयात.
*यशवंत हो जयवंत हो*
गड-किल्ल्यांचा दिमाख सांगतो इतिहास,
स्वाभिमानाचा मंत्र देतो प्रत्येक श्वास.
कर्तव्याच्या वाटेवर ठेवू अढळ विश्वास,
छत्रपतींच्या विचारांवर अतूट विश्वास.
*यशवंत हो जयवंत हो*
आई जिजाऊंचे संस्कार रक्तात वाहती,
शिवबांचा आदर्श मनामनांत राहती.
सत्य-न्यायासाठी पाऊले पुढे टाकती,
छत्रपतींचे विचार नसानसात वाहती.
*यशवंत हो जयवंत हो*
आजच्या तरुणाईने धरा हा निर्धार,
देशप्रेमाच्या मार्गी राहो अखंड विचार.
शिवरायांच्या स्वप्नांना करू या साकार,
छत्रपतींच्या गडांचे संवर्धन करू निरंतर.
*यशवंत हो जयवंत हो*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
June 9, 2026
घराच्या शांत भिंतींवर
आठवणींची धूळ अलगद बसलेली,
एका आईच्या डोळ्यांत
दोन लेकींचं संपूर्ण आयुष्य साठलेलं.
एक घर…
तीन स्त्रिया…
आणि काळाने टाकलेली
न बोललेल्या शब्दांची लांब सावली.
वेळेच्या एका कठीण वळणावर
स्वाती घर सोडून निघून गेली,
रागाच्या आणि गैरसमजांच्या वादळात
नात्यांची दोरी तुटून गेली.
सारिका मात्र थांबली
आईच्या श्वासांशी नातं जोडून,
स्वतःची स्वप्नं हळूच मिटवून
कर्तव्याच्या शांत अंधारात जगत राहिली.
वर्षे सरली…
घर शांत होत गेलं…
आणि मग अचानक
आजाराच्या कठोर सत्याने
नशिबाने पुन्हा दार ठोठावलं.
स्वाती परतली..
डोळ्यांत अपराधाची ओल,
मनात हरवलेल्या वर्षांची वेदना,
आणि आईच्या प्रेमाची आस.
दोन्ही बहिणी समोर आल्या तेव्हा
शब्द वादळ झाले,
रागाचे ज्वालामुखी फुटले,
दडवलेले अश्रू वाहू लागले.
पण आईच्या क्षीण हसण्यात
एक खोल शांतता होती,
जणू तिला ठाऊक होतं
की वेळ आता फार उरलेली नाही.
मृत्यूच्या सावलीत उभं राहून
त्या तिघींनी जगणं नव्याने पाहिलं,
हसण्यात, अश्रूंमध्ये,
आठवणींच्या उबदार स्पर्शात.
आणि मग उलगडलं
वडिलांच्या अनुपस्थितीचं सत्य,
एक अशी जखम
जी वर्षानुवर्षं शांतपणे जिवंत होती.
पण त्या क्षणी
आईच्या शब्दांत प्रकाश होता.
“जीवन फार मोठं नसतं,
पण प्रेम खूप मोठं असतं.
राग संपतो,
पण नाती जपावी लागतात.”
त्या दिवशी
दोन बहिणी पुन्हा एकमेकींच्या जवळ आल्या,
आणि एक आई
आठवणींच्या आकाशात
ताऱ्यासारखी चमकत राहिली.
ती फक्त तीन स्त्रियांची कथा नाही,
ती आहे वेदना, क्षमा आणि प्रेमाची.
म्हणूनच या कथेला
एक साधं पण खोल नाव आहे…
“तिघी.”
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti