त्रीभाव युक्त जीवन, सत्व रज तमो गुण
स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती...१,
कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी,
काही मध्ये तमोगुणी निराळ्या प्रमाणीं दिसे....२,
प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती
सत्वगुण लक्षणें ती, कांहींत दिसून येई....३,
राग, लोभ, अहंकार, षडरिपू हेच विकार
त्यांतच तो जगणार, तमोगुण वाढवून....४
सत्व तमोगुणी पूर्ण, मिळणे फार कठीण
दोन्ही गुणांचे मिश्रण, रजो गुणी म्हणे त्याला.....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 15, 2018
करा सर्वस्व प्रभूसी अर्पण
त्यांतच मिळेल समाधान
जीवन अग्नी पेटत राही
उर्जा निघे त्याचे ठायीं
उर्जेचे होते रुपांतरण
साधत असे कार्य त्यातून
भावनेचा आविष्कार
देई जीवना आकार
व्यक्त करण्या भावना
उर्जा लागे त्यांना
एकाग्र करा मना
सोडूनी सारी भावना
एकाग्र चित्त हेच ध्यान
प्रभू मिळण्याचे साधन
सारी उर्जा ध्यानांत जाई
तीच प्रभूसी अर्पण होई
डॉ भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 23, 2020
त्या दिवशी मला ती भेटली
म्हणण्यापेक्षा तिला पाहिले
पस्तीस वर्षाने.....
आम्ही एकमेकाकडे पाहिले
जरा जाड झाली होती
पण चांगली दिसत होती..
गळ्यात मंगळसूत्र दिसले नाही..
जरा चरकलो...
तिने पाहिले..
तिची नजर गोधळली..
मी जरा हसलो...
ती पण हसली..
कॉलेजचे नाव घेतले
ते सुद्धा मी..
दोन मिनिटे बोललो
म्हणाली आत्ता इथेच असते
मी पण म्हणालो इथेच..
बाकी काही विचारले नाही..
दोनचार जणाची नावे घेतली
परत भेटू म्हणून वेगळे झालो...
आत्ता मी नेहमीचा घराकडचा रस्ता
सोडून याच लांबच्या
रस्त्याने यायला
सुरवात केली आहे.....
-- सतीश चाफेकर
January 5, 2020
आजच्या जगात यशस्वी होण्याची व्याख्या आणि अर्थ ह्यामध्ये व्यक्तिनुसार फरक असू शकतो. शरीराने आपण रोजच्या अत्यंत तणावग्रस्त अशा रहाटगाडग्यात अडकलेले असतो. पण व्यक्तीच्या मनात स्वत:ची अशी अनेक स्वप्नं तरळत असतात.
August 6, 2022
जीवन असावं पिकल्या आंब्यागत
मोहकगोड, रसाळ, सतेज रसरशीत
जीवन असावं चंदनाच्या खोडागत
ललाटं रेखून अनेकांची रहावं दरवळत
जीवन असावं देवाजीचा देव्हारा
पावित्र्याच्या ज्योतीने उजळावा गाभारा
आयुष्याच्या ढालीने सग्यासोयऱ्यांना जपावं
उकळत्या दुधावर कसं सायीगत पसरावं
जीवन असावं स्वच्छ अंगण मोकळं
सर्वांसाठी एैसपैस मध्ये तुळशीचं खळं
जीवन असावा एक आधारवृक्ष
विशाल, समृद्ध, शीतल सावलीछत्र
जीवन असावं टवटवीत नित जिवंत
मोह व्हावा मृत्यूसही स्पर्शण्या हरक्षणात
जीवन आहे देवाचं देणं, वांछिल तो तेव्हा ते समर्पण
तोवर सजवावं, तोऱ्यात मिरवावं, समाधानी लेवून तृप्तीचं लेणं
जीवन व्हावं असंख्य कणांचं, सुगंधी नि रंगीबेरंगी क्षणांचं
उत्कटतेने, उदंडतेने, उधळत वहावं, जुळून नातं मनामनाचं
-- यतीन सामंत
ऋणानुबंध या कवितासंग्रहातून
June 5, 2022
विस्तीर्ण समुद्र किनारी,
फिरत फिरत निघाले,
वाळूत चालताना ठसे,
पावलांचे उमटलेले, --!!!
दूर क्षितिजी सूर्यबिंब,
घाईत होते चालले,
रंगांची आरास पाहून,
अचंबित की झाले,--!!!
ढगांमागून निघाला,
संधिप्रकाश आता,
दिसू लागला धरणीवर,
पखरुन घातलेला, --!!!
याच ढगांवर स्वार होऊन,
निघाला सोन्याचा गोळा, आभाळाला सप्तरंगी,
आज साज चढवलेला,--!!!
किती रंगांची रासक्रीडा,
गगनी होती चाललेली,
चकित होऊनी धरा,
कशी रंगात रंगलेली,--!!!
उन म्हणावे तर थोडे,
काढता पाय घेतलेले,
तमाने पुढे येऊन,
पाऊल आत टाकले, --!!!
चांदण्यांचे पुंज,
दिसू लागले जागोजागी,
आकाशाचा निळा गालिचा,
भरून गेला पदोपदी,--!!!
लांबवर दूरस्थ किनारा,
दिसत होता तटस्थ उभा,
केव्हाच सारी उडून गेली,
येथील पक्ष्यांची सभा, --!!!
पार लांबवर उंच उंच,---
बुडू लागला सोन्याचा गोळा, समुद्रात तो, का समुद्र त्यात,
बघूनही कळेना मला,--!!?
लाटेवर लाट वरचढ ठरुनी,
निघाली कशी पुढे ,
निरोप द्याया सज्ज,
नाराज वातावरण केवढे,--!!!
गगनी उगवला तोच आपला, लाडका चंदामामा,
सारे विसरून गेले प्रकाशा,
अंधाराची त्याला आभा,--!!!
पांढरी,तांबडी,केशरी,करडी,
जांभळी राखाडी, सोनेरी,
सूर्यबाप्पाची मिरवणूक निघाली,
सप्तरंगी मस्त रथांतुनी,--!!!
स्तिमित होऊनी धरा,
बघत राहिली किती,
त्या रंगांची रासक्रीडा,--!!!
सूर्यदेव मध्ये उभे तसे,
गोकुळी खेळे हरी,जसा,
भोवती नाचताना गोपिका,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 27, 2019
उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला
भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला ।।१।।
कथा किर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले
माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले ।।२।।
वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं
फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं ।।३।।
जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे
प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे ।।४।।
मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले जीवनाचे
कांहीं न मिळाले हातीं, व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे ।।५।।
संसारातील प्रेम व राग, ह्यातच मन गुरफटले
कर्तव्यातील एक भाग, प्रभू भक्तीसी संबोधले ।।६।।
परमार्थ आणि संसार, भिन्न नाहींत दोन
प्रभूचाच आहे संसार, मनी तूं हे जाण ।।७।।
कर्म फळ आशा, बाळगूं नको मनीं
तेंव्हा न येईल निराशा, कर्म करिता क्षणीं ।।८।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 12, 2019
जे जे मजला हवेच होते, मिळवित गेलो यत्न करूनी
चालत असता जेव्हा पडलो, उठलो होतो धीर धरूनी
आतंरिक ती शक्ती माझी, पून्हा पून्हा तो मार्ग दाखवी
शरिराला ती जोम देवूनी, वाटेवरती चालत ठेवी,
निराश मन हे कंपीत राही, विश्वालासा तडे देवूनी
दु:ख भावना उचंबळता, देह जाई तेथे हादरूनी
परि विवेक हा जागृत होता, विश्लेषन जो करित राही
सुख, दु:खाचा अर्थ लावूनी, मनास तेव्हा धीरच देयी
गीळून घेता अपयश सारे, खंत वाटली कधी न त्याची
समज आली मनास ही की, चूक असावी मार्ग निवडीची.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 23, 2020
मुक्तछंद हा काव्यप्रकार मला खुप आवडतो.
यमक साधता साधता काव्य सहज प्रभावी व प्रवाही होतं,नाही का?
*काव्य*
काही अर्थपुर्ण मुळाक्षरं गुंफित जावी
अर्थपुर्ण शब्दांची तळी उचलावी
त्या शब्दांतून अलंकृत रचना साधावी
नटली ,सजली की तिला काव्य मैफिलीत सादर करावी
दर्दी रसिकांची दाद मिळवावी
दाद मिळताच मी कवी म्हणून प्रौढी मिरवावी
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
February 18, 2020
"प्रेम कुणावर करावं?
प्रेम कुणावरही करावं..
ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
प्रेम..
योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं.."
प्रेम कुणावरही करावं..
सजीवांवर करावं..,निर्जीवांवर करावं हे सांगणाऱी आपली संस्कृती..!
असेही आपल्या देशात वर्षाचे दिवस ३६५ असले तरी 'दिन' पांच-सहाशे तरी असतील..त्यात आणखी एका अनावश्यक 'डे'ची काय गरज आहे?
आपल्याला गरज आहे ती आपली उदात्त संस्कृती जाणून घ्यायची..त्यातील प्रेमाची महती समजण्याची
कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कॄतीचा सारांश..
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि..
भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची एकमेव आशा..!
-- गणेश साळुंखे
February 14, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti