ते देखणे मंदिर होतं. सुशोभीत केलेलं… चकचकीत… बऱ्याच जणांची तिथे गर्दी झालेली… कुणाला कशासाठी न्याय हवा होता, कुणाला कशासाठी… कुणावर अत्याचार झाला होता, कुणी अन्यायाची शिकार झालेलं… प्रत्येकाची बाजू वेगवेगळी… न्याय मिळवून घेण्याची प्रत्येकाची घालमेलही वेगवेगळी… सगळेच फिरत होते… कोट घातलेल्या व्यक्तींच्या मागे… इकडून तिकडे… गरजवंताला आणि शोषीतांना काही कळत नाही… सांगतील तसे वाकतात ते… बिचारे.
अचानक हातात कागदाचे भेंडोळे घेऊन कोटवाल्यांची धावपळ सुरू झाली… तिकडे बिचाऱ्यांची पळापळ झाली… आता न्याय मिळेल असे बिचाऱ्यांना वाटू लागले होते… पण… झाले मात्र वेगळेच… न्यायाचे दान काही पदरात पडले नाही… सत्य काही समोर आलं नाही… बिचारे हताश झाले… उदास झाले… डोळ्यात पाणी दाटलं… तसेच निघाले होते माघारी… डोळ्यात पाणी दाटलेलं.. समोरचं चित्र धुकेलं… काही दिसेनासे झालेलं… त्याचवेळी एका बिचाऱ्याचा पाय लागला… तिथे पडलेल्या एका गाठोड्याला… तसे ते गाठोडं हललं… बिचारा भयंकीत झाला… हादरला.. भ्यालाही… तसं ते गाठोड उभं राहिलं… म्हणालंही ‘कुणी लाथ मारली’ म्हणून. बिचाऱ्याची बोलती बंद झालेली… न्याय न मिळाल्याने ग्लानी आलेला तो बिचारा. झाल्या प्रसंगाने पुन्हा गांगरला.. काय बोलावे सुचेना… तरीही हिंमत एकवटुन म्हणाला… ‘माझाच पाय लागला तुम्हाला… माफी द्या… पण… तुम्ही कोण? इथे कसे? का पडलात इथे?’ एका दमात त्यानं विचारून टाकलं सारं…. तसे ते गाठोडं थोडं मोकळं झालं… म्हणालं… ‘जेव्हा पासुन तुम्ही हे मंदिर बांधलं ना, तेव्हा पासुन मी इथेच आलोय रहायला… पुर्वी आत रहायचो… पण अलिकडे आत मला जागा मिळेनाशी झाली… तेव्हा मी माझं बस्तान हलवलं… बाहेर पडलो… मग इथे असतो पडुन… गपगुमान…’.
गाठोड्याच्या उत्तरानं बिचारा अधिकच गांगरला… काही कळेना काय होतयं… मी कोणाचा शोध घ्यायला आलो होतो मंदिरात … काय हवं होतं मला… न्याय की सत्य… मला न्याय हवा होता… समाजाला सत्य हवं होतं… सत्य ही न्यायाची देवता… म्हणजे या मंदिरात न्यायदेवता नाही… सत्य नाही… असा त्याचा अर्थ लावायचा का? बिचाऱ्याची मती गुंग झाली… काही केल्या त्याला काही कळेना… तसं गाठोडं म्हणालं… ‘हे मंदिर बांधलय खुप छान. दिमाखदार इमारत आहे त्याची. पण त्यात माझी किमत शुन्य झालीय, पैशांची मात्र वाढलीय. मंदिरात सत्याची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ लागली… तसतशी माझी अवस्था खराब होऊ लागली… मंदिरातून मी बाहेर पडलो आणि इथेच पडुन असतो पडुन…’. आता कुठे बिचाऱ्याच्या डोक्यात प्रकाश पडला… म्हणजे मंदिरात मी जे शोधायला आलो होतो, जे मिळवायला आलो होतो, ते सत्य इथे बाहेर पडलयं…. गाठोडं होऊन… सत्याची ही अवस्था झालीयं.. कुणी केलीय… कशासाठी केलीयं… एक ना अनेक प्रश्न बिचाऱ्याच्या मनात उसळू लागले… तसा निर्धाराने त्याने गाठोड्याचा हात धरला म्हणाला, मी सामान्य माणुस आहे… साधारण आहे… पण सत्य बोलण्याची ताकद माझ्यात आहे… चल माझ्याबरोबर मी सांभाळीन तुला प्राणपणाने… असे बोलून बिचारा आणि गाठोड्यातलं सत्य दोघेही चालू लागले…!
दिनेश दीक्षित जळगाव.
May 10, 2019
सरिता ही एक पुण्यप्रदा
अखंडित समांतर किनारा
ध्यास सागरी समर्पणाचा
मोक्षदायीनी ती जलधारा...
झुळझुळते संथ अविरत
प्रवाह निश्चिंती वाहणारा
घेते कवेत, सुखदुःखांना
पापक्षालनी ती जलधारा...
तमा न पर्वा तिला कशाची
फुलवीते, दुतर्फा वसुंधरा
नदिकाठ तो सर्वांगी सुंदर
राऊळमंदिर गोपुर गाभारा...
अध्यात्मी,भक्तीभावरंगला
श्रध्येय, मुक्ती गंगाकिनारा...
भगीरथाच्या गंगेचे गंगोदक
जन्मी आत्मशांतीचा निवारा...
--वि.ग.सातपुते .( भावकवी )
9766544908
रचना क्र.२३५
१५ /९/२०२२
September 20, 2022
दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे ।
परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे ।।१
आपण कर्म केलेले आपणचि भोगतो ।
फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो ।।२
आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना ।
खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना ।।३
इतरांसाठीं आहे ती भावना उदरीं ।
सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी ।।४
शोक भावना दाखवी तुझ्या दुःखाची ।
नसतां तुज निर्दयी ठरवी हीच भीति जनाची ।।५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 19, 2020
ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।
संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।
खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।
विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।
संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।
वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।
एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।
हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।
ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।
मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।
आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।
हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 7, 2017
नको चिंता
नको क्रोध
मोह माया
नको लोभ
सारे काही
दुर सारा
ताटी काढा
ज्ञानेश्वरा
अपराध
हा जनाचा
साही आता
मुखी ऋचा
विश्व कोपे
पेटे वन्ही
बंधू राया
व्हावे पाणी
उणे-दुणे
खुपे बोल
संत बोधा
आहे मोल
पुर्ण ब्रम्ह
आहे घर
नको कुढू
जगा तार
ब्रम्हा सम
विश्व सारे
जनलोक
थोर की रे
आवरावे
क्रोधाग्नीस
जाणारच
एक दिस
मारुनिया
मनाला या
उद्धरण्या
जगाला या
बहिणाई
मी तुमची
विनवणी
जगताची
ज्ञानदिप
पाजळावा
ज्ञान वाटा
ज्ञानदेवा
उठा उठा
झडकरी
ताबा ठेवा
क्रोधावरी
ताटी ऐका
मुक्ताईची
शिकवण
बहिणीची
-- सौ.माणिक शुरजोशी
January 2, 2019
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 9, 2012
कोमल वेलिवर
कळीने उमलावे
फुलुनी फुलावे
गंधुनी गंधाळावे...
प्रसन्न चराचरी
मनमन दरवळावे
नेत्री विठ्ठलविठ्ठलु
भक्तितुनी पाझरावे...
परब्रह्म ते सावळे
गाभारी प्रकट व्हावे
कृतार्थ आत्मरूप
विठ्ठल चरणी रमावे...
विश्वरूप ते गोजीरे
टाळमृदंगात भजावे
दिंडीपताका वैष्णवी
शिरी धरूनी नाचावे...
******
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३००
२१/११/२०२२
November 27, 2022
दोन रिळाचे दोन धागे, एकत्र ते आले
एकमेकांत दोन्हीही, गुंफून परि गेले....१,
गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा
शक्य होईल कसे आता, वेगळे होण्याचा....२,
खेच बसता वाढत गेला, होता गुंता
उकलून सुटणे शक्य नव्हते, त्याला आता.....३,
दोनच पर्याय होते, त्याचे पुढती
तुटणे वा एकत्र राहणे, ह्या जगती....४,
वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे
अवशेष राहतील परि काही, जे न सुटणारे ...५,
दोन मनांचा असाच होतो, गुंता ह्या जीवनी
राग-लोभ प्रेमादी भावना, जाती गुंतूनी.....६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 10, 2017
विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला
रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला
जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी
खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं
नाच गावूनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं
बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी
छोटे होवून गेले काव्य, अमर राहिले आतां ते
प्रसंग जरी तो मरून गेला, कविता जिवंत राहते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 9, 2019
तू भेटलीस की
का बेचैन होते
वेडे मन माझे...
तू भेटलीस की
का होतात डोळे
ओलेचिंब माझे...
तू भेटलीस की
का काळीज होते
कासाविस माझे...
तू भेटलीस की
का व्यर्थच भासे
हे जीवन माझे...
तू भेटलीस की
का बेभान होते
सारेच ग माझे...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 9 मार्च 2016
March 13, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti