
चकोर पक्षी हा कोवळ्या चंद्रकिरणातील अमृत पिऊन जगतो अशी एक कल्पना आहे. चंद्रकिरणामधे शीतलता, मृदुता आणि संजीवकता असते. तिचा लाभ चकोराला होतो. असे हळुवार चंद्रकिरणांसारखे मृदुत्व योग्याच्या ठिकाणी असते. हे मृदुत्व आणखी कोणासारखे? तर पक्षिणीच्या पंखासारखे असते. आईच्या पंखांचा आश्रय हे पिलांचे सर्वस्व असते. कारण पंखांमुळे त्यांना उबारा मिळतो. पिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. योगी पुरुषांचेही असेच असते. त्यांच्यामुळे सर्वसामान्य माणसाला मानसिक आधार लाभतो..
December 24, 2025
काय म्हणावे स्त्रिला, जादूगार कि किमयागार?
कि आयुष्याच्या रंगभूमिची, चतुरस्त्र कलाकार?
दुर्गा-काली, लक्ष्मी-सरस्वती, रुपे तिची चार
अष्टावधानी चित्ताची ती एक चतूर नार |
ध्यास घेऊनी धैर्यानी ती, लढा देते सार्थ,
तिच्या अंगी करारीपण अन, निर्णयाचे सामर्थ्य |
"झांशिची राणी", "जिजाऊ" ह्या तर, मूर्तिमंत आदर्श
सावित्रीबाई - रमाबाईचे स्तिमित करते कार्य |
जीवन देऊनी जगणे तुमचे, नारी करते कृतार्थ
तिच्याविना घरपणच काय, सारीच नाती व्यर्थ |
कोमल भाऊक मनी तिच्या, कमालिची सोशिकता
दुसरा जीव वाढवण्याची, उदरी देखील क्षमा |
जीवासाठी त्या, तिच्या ह्रदयी, वात्सल्याचा झरा
कुणी न विसरे बुरुजावरुनी, उडी घेणारी "हिरा" |
विविध क्षेत्री आजही "स्त्रिची"
जिद्द धडाडी, योग्यता
"तिच्यासारखी तिच" खरोखर
जाणून आहे विधाता
हे जाणून आहे विधाता |
-- सौ. अलका वढावकर
March 8, 2018
प्रत्येकाचा पाऊस वेगळा,
प्रत्येकाची ओल निराळी.
कुणा सरी या स्वप्नफुलांच्या,
कुणा अश्रूंची रात्र काळी.
कुणा पावसात माती गाते,
दरवळतो ओला गंध.
कुणा विजांच्या तीक्ष्ण रेषा,
लिहितात भयाचे छंद.
कुणा पावसात प्रेम उमलते,
हातामध्ये हात गुंफे.
कुणा पावसात एकटेपण,
निःशब्द अश्रूंमध्ये झुरे.
कुणा पाऊस शेतामधला,
हिरवी स्वप्ने पेरून जाई.
कुणा शहरच्या काचांआड,
ओल मनाची सुकून जाई.
प्रत्येकाचा मेघ वेगळा,
प्रत्येकाचे आभाळ नवे.
ज्याच्या त्याच्या वाटेवरती,
पावसाचे अर्थ वेगळे.
प्रत्येकाच्या हास्यामागे,
दडलेली असते व्यथा.
म्हणून प्रत्येकाच्या पावसाची,
असते एक अबोल कथा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 1, 2026
May 21, 2012
सत्य, दृष्टांत हरिहराचा
शब्द निःशब्द भावनांचे
लोचनीच फक्त साठवावे
रूप, अतर्क्य नियंत्याचे.....
गवाक्षी कवडसे नारायणी
तिमिरीही भाव प्रसन्नतेचे
उघड़ता कवाड़े अंत:चक्षु
ओंजळी शब्द सरस्वतीचे
द्वैत अद्वैताचे मिलन सुंदर
तृप्ततादात्म्य मुग्ध पावरीचे
स्पंदनी झरावी पुण्यपुण्यदा
भाग्य, मंत्रमुग्धी कृतार्थतेचे....
मीत्व व्यर्थची सोडूनी द्यावे
अर्थ ! उमजावे सात्विकतेचे
निर्मोही मैत्रतत्व उरी रुजावे
स्मरावे नित्य नाम भगवंताचे....
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १९६
११/८/२०२२
September 13, 2022
पन्नास वर्षे एकत्र नांदलो
आयुष्यातील मार्गप्रवाही
कसा काळ निघुनी गेला
केव्हांच समजले नाही ।।१।।
काळ विसरलो, वेळ न विसरे
क्षणाक्षणाच्या प्रसंगाची
सुखदुःखानी भरलेल्या
अनेक अशा घटनांची ।।२।।
सैल झाला जीवन गुंता
कधीतो गेला आवळूनी
उकलणार नाही कधीच तो
जाणीव आली मनी ।।३।।
हेच असेल विधी लिखित
जिंकणे वा हारणे
आयुष्याचा मार्ग खडतर
समजुनी त्याला घेणे ।।४।।
सुख अथवा दुःखमय लहरी
विचारांच्या चेतना
मीच करतो, मीच अनुभवतो
हीच दैवी योजना ।।५।।
तुटू न देता आयुष्य दोर
जगणे व्हावे वर्षे शंभर
असेच जगु एकत्र मिळूनी
काळ चालतो भराभर ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 9, 2018
तुझ्या आठवणीत
शब्द विरघळतात
पाझरतात भावनां
हळवा होतो एकांत...
मी आभाळ पहातो
तरळतेस तूच नेत्रात
हाच भास विलक्षण
हळवा होतो एकांत...
ही सुरम्य प्रीत वेडी
तुझेच रुप पापणीत
मी मज भुलुनी जाता
हळवा होतो एकांत...
स्मरण तुझेच लाघवी
नित्य माझ्या अंतरात
तुजविण सुनेच सारे
हळवा होतो एकांत...
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.२०८
१९/८/२०२२
September 21, 2022

जें कांहीं मिळतें कोणाला मदिरापानानें
त्याहुन कैकपटीत फायदा मदिरा-गानानें
मद्यपान अतिरिक्तच होतें, शुद्ध उरत नाहीं
मद्य-गान अतिरिक्त, धुंदवी शुद्धीत राहुनही ।।
”होळीचा सण अन् ‘गटारी अवस’ अमुचे लाडके
रात्र ‘ओली’ ती, कुणीही ना पिण्यां अडवूं शके” ।
”हाय ! दोस्तांनो, तुम्हांला सण कशाला लागती ?
‘भरुन पेला कर रिता’, हें रोजचे क्षण सांगती” ।।
सर्वांपुढे निजदु:खा मिरवीत ल्यायलो मी
क्लेशांबरोबर थोडी मदिराहि प्यायलो मी
झिंगून धुंद झालो, उतरली नशा नंतर
पण, वेदना मनाची राहीच मजबरोबर ।।
हें मद्य म्हणा वा ‘जळजळणारें जल’
अमृत म्हणा हवें तर, किंवा म्हणा हलाहल
कांहीही नाम ठेवा, पण ‘नांवें ठेवुं नका’
हें ‘संजीवन’ जीवनिंचें, त्याविण हा जन्म फुका ।।
रे घेऊं द्या ज़राशी, कां ‘नाट’ लावता रे ?
मद्यालयात जातो, कां वाट अडवतां रे ?
या, बसून माझ्यासंगें थोडीतरि चाखा तुम्ही
रे मान सुरा-राज्ञीचा थोडातरि राखा तुम्ही ।।
हातामधें सुरेचा पेला काठोकाठ आहे
हा पेला म्हणजे स्वर्गसुखाची वाट आहे
या पेल्यामधे सुरेचा झगमगता थाट आहे
ती कंठामधें उतरतां, आनंद-लाट आहे ।।
द्या सुरा मजला ज़रा, ना तर मला मारा सुरा
या सुरेचा मोह पडला यक्ष-गंधर्वां-सुरां
जर सुरा नाहीं मिळाली, काय जगण्यांची मजा ?
द्या सुर्यानें मरण, मदिरेविण असे जीवन सज़ा ।।
सुरा : (१) मदिरा, मद्य ; (२) चाकू .
सुरां : देवांना . नाट लावणें : अपशकुन करणें
अडखळत बोलतो मी, धडपडत चालतो मी
मधुनीच तोल जातां, धरणीस चुंबतो मी
‘वृद्धत्व यास आले’, म्हणती बघून सारे ,
पण, मद्य फार झालें, म्हणुनी असें घडे रे ।।
रोगास माझिया या, मद्यार्क फक्त चाले
खाणें नको, ‘पिणें’ द्या, हें पथ्य सक्त चाले
हा ‘डोस’ रोज मज द्या, ना तर अशक्त होतो
चाटून थेंब-मदिरा, ‘अस्तित्व-मुक्त’ होतो ।।
दारूवर कैसी बंदी ?, की नुसती उगिच प्रसिद्दी ?
चालतोच खुल्ला धंदा, खुर्च्यांना चारुन चंदी
मदधुंदांच्या कुटुंबां आक्रंद कराया बंदी
अधिकारधुंद जे, त्यांना ठेवूं कायम आनंदी ।।
प्राशकहो, तुम्हांसाठी हा सिग्नल लालच असतो
दारूबंदी असतांना, परवाना कोणां नसतो
पण या दारूबंदीची खुर्च्यांना नाहीं पर्वा
त्यांच्यासाठी तर आहे सिग्नल कायमचा हिरवा ।।
प्राशक : पिणारे
-- सुभाष स. नाईक.
December 27, 2024
एक..
वाळली पाते
वावटळीशी नाते
बोडके झाड....
दोन
लाट येणार
नक्की विचारणार
घर कोणाचे ?
तिन
उदास पाने
भरकटत वारा
आनन्दी गाणे.....
-- श्रीकांत पेटकर
March 15, 2019
मनाची शांति । मिळेना कुणा
कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।।
जीवन ध्येय । शांततेसाठीं
प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।।
शांतीचे घर । अंतःकरण
नसे बाहेर । कधीं चूकून ।।
शत्रू शांतीचा । अशांति असे
ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।।
विरोधी दोघे । दूर राहती ।
वाईट बघे । एकमेकाती ।।
अशांत वाटे । मन तुम्हांला ।
बोचती काटे । घेता तिजला ।।
बाह्य असूनि । त्वरित दिसे ।
चंचल मन । तिजला फसे ।।
अशांती मनीं । येता तुमचे ।
घ्या समजूनी । फळ बाह्याचे ।।
बाहेरी मिळे । असे अशांति ।
शोधा सगळे । आंतिल शांती ।।
यत्न सुखाचे । अशांती आणी ।
व्यर्थ तुमचे । श्रम होऊनी ।।
प्रयत्न होतां । अशांति येई ।
सोडून देता । शांतीच राही ।।
शांति ईश्वर । रूप आगळे ।
आनंद फार । कुणा न कळे ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti