दोघे एका डहाळीवरच झुलू,निसर्गाचे ,देणे किती पाहू,
बघ, रसरशीत खाली फळे,
दोघे मिळून चवीने खाऊ,--!!!
पक्ष्यांची जात आपुली,
निसर्गमेवा"आपुल्याचसाठी,
मानव त्याचा बाजार मांडे,
निसर्गराजा, फिरवी कांडी,
एका वृक्षा,-- किती फळे,
रसाळ,गोड,चविष्ट मधुर,
तुझ्यासमवेत स्वाद वाढे,
फळ बने आणखी रुचिर,
प्रेमसंगत वाढून आपुली,
एकमेकांचे उष्टे' खाऊ,--!!
त्यागातच प्रेम असते,
सखे, दुनियेस दाखवून देऊ,--!!
दोन "सांसारिक" जीव आपुले,
करती मधुर रसपाना,--!!!
निसर्गच लुटून देतो सारे,
शिकवतोही साऱ्या जगतां,--!!!
संसार या कैरीसारखा,--
कच्चा असता चटकदार,
चाखण्यां मिळती सर्व चवी,
आंबट, तुरट, गोडसर फार,--!!
नवीन संसार सुरु होतां,
फळां, जपावे लागते,
करतां-करतां,फळ मग,
कशी संपन्नता आणते,--!!!
हिरवाकंच रंग संपे,
जो असतो तारुण्याचा,
पिवळसर कांतिमान रंग चढे,
पिकल्यावर तो प्रौढत्त्वाचा,--!!!
आंबट, तुरट फळ,
हळूहळू, होई जसे गोड,
तसेच साथीदार होती कृतार्थ,
संसारी मिळतां योग्य जोड,--!!!
फळ संपे दुसऱ्यासाठी,
बघ त्याचे समर्पण,
सूचित होई त्यातून प्रिये,
संसाराचेच उदाहरण,--!!!
हिमगौरी कर्वे.©
April 19, 2019
एक होता कप
एक होती बशी
दोघांची जमली गट्टी खाशी
पांढरा शुभ्र त्यांचा
रंग चमकदार
त्यावर नाजूक फुलांची
नक्षी झोकदार
दिसायचे ऐटदार
आणि आकार डौलदार
सकाळ-संध्याकाळ
गोड किणकिण चालायची फार
कपाने ओतायचा
बशीत चहा सुगंधी
तिने हळूहळू प्यायची
साधायची संधी
एक दिवशी फुटली बशी
झाले तिचे तुकडे
कपाचा ही कान तुटला गेले त्याचे रुपडे
बशीचे तुकडे
दिले फेकून
कपाला ही दिले
अडगळीत भिरकावून
एक दिवस आले
एक पाहुणे
त्यांना दाढीसाठी हवे
गरम पाणी म्हणे
अडगळीतून काढला का
दिले त्यात पाणी भरून
पाहुण्याने केली दाढी घोटून
आरशात पाहिले रूप न्याहाळून
कपाचे जिणे झाले केविलवाणे
कुठे सुगंधी चहा कुठे हे लाजिरवाणी जिणे?
-- विनायक अत्रे.
July 19, 2022
जशा संध्याछाया येती, नयन माझे भिजतात ,
आठवणींचे माणिक-मोती,
सर सर खाली ओघळतात,--!!!
हात तुझा धरुनी हाती,
प्रेमाची केली वाटचाल,
नियतीने पण चाल खेळली, प्रितीची दुधारी वाट,--!!!
निळ्याशार गहिऱ्या लोचनी, वाचली प्रीतीचीच *आंण,--
तनामनात सामावून गेली,
तव ओढीला नच वाण,--!!!
आज कितीदा स्मरली,
प्रीत फुले ती सुगंधी,
परस्परांवर सारी उधळत,
करायचो रे नजरबंदी,--!!!
वाद अबोल्यांच्या त्या क्षणी, तरुणपणाचा सगळा जोश,
शब्द जरी कठोर बोलती,
श्वासात गुंतले सदा श्वास,--!!!
ऋतू सारे सारखे बदलती,
स्मरण यात्रेचा काळ लोटत,
इकडून तिकडे वारे वाहती,
त्यात आठवांचे ओले साद,--!!
किती काळ पुढे जाई,
अजूनही उभे तिथेच आपण,
पाणी पुलाखालून जाई,
हृदयी तरी आठवणी धरून,--!!
© हिमगौरी कर्वे.
February 10, 2020
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये लिहिलेली ही कविता
आली दिवाळी आली दिवाळी
दिव्या दिव्यांच्या लावून ओळी
रंगा रंगाने खुलवु रांगोळी
आली दिवाळी आली दिवाळी... ।। १ ।।
लाडू करंजी ती कडबोळी
शेव चिवडा अन् शंकरपाळी
काटेरी चकलीची मजा निराळी
आली दिवाळी आली दिवाळी... ।। २ ।।
अभ्यंगस्नान पहाटेच्या वेळी
उटण्याचा आलेप गंध दरवळी
सुरसुऱ्या फुलबाजी झाल्या उतावळी
आली दिवाळी आली दिवाळी... ।।३।।
चांदण चुरा सजला आभाळी
दिव्यांची आरास आसमंत उजळी
आकाश कंदिल समृद्धी उधळी
आली दिवाळी आली दिवाळी...।।४।।
आली सोनपावलांनी लक्ष्मी सांजवेळी
सौख्य, समृद्धी हौस ही आगळी
पाडव्याचा सण पतीला ओवाळी
आली दिवाळी आली दिवाळी...।।५।।
भाऊ आला माझा मंगलवेळी
लाविते टीळा चंदन भाळी
स्वप्नांना त्याच्या मिळो यशाची झळाळी
प्रेमाचे नाते जपते ही दिवाळी
आली दिवाळी आली दिवाळी... ॥६॥
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
June 22, 2022
जीवन काय आहे मला जे वाटत असे
ते समजून घ्या तुम्हीं प्रभूमय ते कसे ....१
मृत्यूचा तो विचार कधी न येई मनी
मृत्यू आहे निश्चित माहीत हे असूनी...२
भीती आम्हां देहाची कारण ते नाशवंत
न वाटे मरूत आम्ही आत्मा असूनी भगवंत....३
आत्मा आहेची अमर मरणाची नसे भीती
जी भीती वाटते ती देहाची असती....४
आत्मा नसे कुणी तो तर प्रभूच आहे
साकारलेल्या सर्वत्र बाहेर व अंतरी राहे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 16, 2019
जन्म दान त्या विधात्याचे
दृष्टांत सुखदु:ख वेदनांचा
खेळ जणु उन सावल्यांचा
साराच भोग तो प्राक्तनाचा।।
ऋतुऋतुंचे, खेळ मनोहर
नभी सडा चंदेरी नक्षत्रांचा
नित्य लपंडाव उषानिशाचा
खेळ, जणु उनसावल्यांचा।।
जन्मासंगे मृत्युचीच सावली
हा साक्षात्कार जीवसृष्टिचा
कधी शांतता, कधी तप्तता
खेळ, जणु उनसावल्यांचा।।
जगणे असते आपुल्या हाती
धरूनी हात विवेकी बुद्धिचा
प्रत्येकाच्याच जीवनी असतो
हा खेळ नित्य उनसावल्याचा।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ११७.
१६ - ४ - २०२२
May 1, 2022
कोठे चाललो आम्ही, जसे वाहती वारे,
दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे ।।१।।
धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा,
कोठे चाललास? विचारतां हासत राहतो बावळा ।।२।।
नाही कुणा ध्येय निश्चित असे एक,
परिस्थितीच्या ओघांत, वाहत चालती अनेक ।।३।।
जीवन कशासाठीं कळले नाही कुणां
जन्मलो म्हणून जगावे हेच वाटते सर्वांना ।।४।।
तशातच तरले कांहीं उध्दरुन ही गेले
मार्ग त्यांचे अनुसरुनी तसेंच मिळवा सगळे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 13, 2016
कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची
कां शब्द न सुचतां म्हणू तुजला, ' प्रेमची '
वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी
हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी
जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई
विश्वासाचे दोन शब्द, उभारी त्यासी देई
नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते
ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ तयाची होऊन जाते
रक्ताचे नाते असतां, प्रेम बंधन दिसे ते
काटा रुजतां तुमच्या पायी, डोळ्यांत तिच्या पाणी येते
धन दौलत ही असता हाती, मिळेल तुम्हां सारे कांही
आई तुमची एक बिचारी, पर्याय तिजला जगांत नाहीं
डॉ. भगवान नागापूरक
९००४०७९८५०
November 27, 2020
कुठे जातो हा रस्ता
कुठेच नाही
इथेच पडून असतो नुसता !
कुठे नेतो हा रस्ता
कुठेच नाही
जागचा हलतही नाही नुसता !
अजबच म्हणायचा
हा रस्ता
भुईला म्हणायचा भार नुसता !
रस्ता कुठे जात नसतो
रस्ता कुठे नेत नसतो
रस्ता जागच्या जागीच असतो
प्रवासी मात्र चालत असतो
रस्ता जरी स्वस्थ असतो
तरी त्याला शेवट असतो
प्रवाशाने चालायचे असते
रस्त्यारस्त्याची गोष्टच वेगळी असते
आपला कोणता रस्ता ते
आपण ओळखायचे असते
भलत्याच रस्त्याने जाऊन
खड्ड्यात पडायचे नसते
रस्ता कुठे जात नसतो
रस्ता कुठे नेत नसतो
कुठल्या रस्त्याने चालायचे ते
आपले आपणच ठरवायचे असते
-- विनायक अत्रे
May 24, 2021
सख्या, तुझ्या आठवात
मी, चालते संथ पाऊली
सांजवर्खी या सांजवेळी
ओघळले, काजळ गाली
सोबती तीच वाट निरंतर
तुझ्याच स्पर्शात नाहलेली
पापण्यातील अस्तिव तुझे
खुलवीते या गालीची खळी
ही नित्याची साक्ष अंतरी
उमलते पाकळी पाकळी
अनवट मोहक वाटेवरचा
तूच नटखट माझ्या भाळी
तुज मी स्मरता वेळोवेळी
लोचनी प्रीत गहिवरलेली
तुझा असा असह्य दुरावा
सर्वत्र तुझी स्मृती रंगलेली
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२२७
६/९/२०२२
October 6, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti