November 20, 2021
(काव्य, १५ ऑगस्ट २०१८ स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )
आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
जागतीकरण मारी देशी उद्योगाला
इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’
शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
उघडलें दार आम्हिच, सार्या उगाच बाता
बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
‘जयकार’ झाकतो की - जन फोडतात टाहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
ठरवूं या - हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
- - -
लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
(अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )
-
- सुभाष स. नाईक
( M- 9869002126).
August 16, 2018
आभाळ आपल आपणच पेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
कुणाची काठी हवी कशाला
मनगटातली ताकद दिसू दे जगाला
बसतील कधीतरी उन्हाच्या झळा
अन् वाहेल मध्येच बेभान वारा
सावली तेंव्हा तू शोधु नकोस
आडोशाला जाऊन बसु नकोस
उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा
बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा
सोन नाही का विस्तावात चमकत
सुगंध नाही का वाऱ्याने पसरत
निर्भीड छातीने सगळ झेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
सूर्य झालास तर अतिउत्तम पण
काजवा मात्र नक्कीच व्हायच..!
आपल आभाळ...
-- धनराज साळवे (Dhanraj Salve)
dhanrajasalve@gmail.com
October 27, 2016
महाराष्ट्राची मराठी संस्कृती
आहे थोर किती
घंटानाद आणि काकड आरतीने
होते प्रभातीची सुरुवात नामस्मरणाने
सडासारवण,सुबक रांगोळी छान
दारी अगत्याचे झुले तोरण छान
येता वासुदेव दारी
पसाभर धान्य देती नारी
जात्यावरच्या ओवीने
आयुष्याचे वस्त्र विणले
दारोदारी गुढी उभारूनी
नववर्ष स्वागत घरोघरी
झुलला पाळणा रामनवमीसी
हनुमंताची जयंती अंजनेरीसी
भांडले-तंटले परी व्रतवैकल्य केले
वडपोर्णिमे सवे हरतालिका पुजन केले
घरोघरी येता गणपती
गौराई नटून आली
दुर्गापुजन,शस्त्रपुजन
दिवाळीत केले लक्ष्मीपुजन
दिवाळी-दसरा,
हात-पाय पसरा
सुगी कापणीच्या राशी
घेती घरात आसरा
संक्रातीचा सण सरता
होळी अंगणी पेटते
मराठी संस्कृतीत
संतमहिम्याची पोत नाचते
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 17, 2020
श्री विठ्ठल अवतार श्री विठ्ठलाचे चरणीं विनम्र होऊनी दर्शन घेई मागुनी मी तुझा भक्त १ पुंडलीकास देई दर्शन नसूनी भक्ती तव चरण सेवा माता-पित्यांची करुनी तुजसी पावन केले २ सेवा आई-वडीलांची करीसी परी प्रभू पावन झालासी ही भक्तिची रित कैसी समज न येई कुणा ३ तपाचे मार्ग वेगवेगळे सर्व प्रभू चरणी मिळे हे कुणास न कळे प्रभूविना ४ असोत ती गुरुसेवा माता पिता वा मानव सेवा कुणी करी प्राणी सेवा अर्पण होई प्रभूते ५
June 13, 2012
वासुदेव आला दारी, वासुदेव आला
चिमणा वासुदेव आला ।।धृ ।।
टोपीवर मोरपिसांना
खोवोनि येथें आला,
काही दान करा त्याला ।
दारी वासुदेव आला. ।।१।।
बांधुनिया घुंगुर पायी
थय थय थय नाचत येई
सुखवी गाऊनि तुम्हाला ।
दारी वासुदेव आला ।।२।।
“द्याल जरी पैसा एक,
देव तुम्हां देईल लाख,
माई धर्म करा याला' ।
दारी वासुदेव आला ।।३॥)।
“वडिलांच्या तुमच्या नावे
पैशाचे दान करावे,
माई, पुण्य मिळविण्याला ।
दारी वासुदेव आला ।।४॥।
नाचुनिया आता थकला
द्या एकच पैसा त्याला
खाऊ गोड घ्यावयाला ।
वासुदेव दारी आला ।।५।।
June 25, 2026
सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार
कोण देई हा आकार ?
तूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे ?
कोण हे घडवित असे ?
प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष
कोण देई ह्यांत लक्ष ?
त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत
ही किमया असे कुणांत ?
तोच वृक्ष वाढूनी फळे देतो, फळांत असते बीज
फिरवी कोण चक्र सहज ?
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 8, 2017
(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें)
(१) मराठी-भाषा-दिवस करूं या साजरा
माय मराठीला करूं मानाचा मुजरा
चला, आज मराठीचे गोडवे गाऊं
उद्या तिच्या उन्नतीचें विसरून जाऊं ।।
-
(२) भेटला ज्ञानया जसा ‘देश्य’ भाषेला
भेटला शिवाजी काल महाराष्ट्राला
करील पुनरुत्थान, हरील हताशा
कोण असा, पाहील मराठी भाषा ?
-
(३) संकर झाला, होऊं द्या की , मराठी मरणार नाहीं
इंग्लिश-हिंदी-संगणकाच्या-भाषेला डरणार नाहीं
सहस्त्रकें दो , आक्रमणांतुन तगली मराठ-भाषा जी,
तिच्या भविष्याची कोणीही करूं नका काळजी ।।
-
(४) दोन हजार वर्षांत मराठी बदलली नाहीं कां ?
मूळ रूपापासुन थोडीही ढळली नाहीं कां ?
मग आतां शब्दांचा संकर हा कसला अनर्थ आहे ?
मर्हाट-भाषा स्वत: काळजी घेण्यां समर्थ आहे ।।
-
(५) हिची अनवती करील, असा
तुम्हांम्हांविण आहेच कोण ?
तुमचीआमची उदासीनता
हीच तिच्या र्हासाला कारण ।।
बाहेरचे एल्गार परतवूं
मराठीचा हात धरून
कांहीं शुद्धता-आग्रह धरून
कांहीं संकर मान्य करून ।।
करूं नका जयकार हिचा
एकच दिवस , अरे
मराठभाषा अमुची माता
हिला ज़पूं सारे ।।
- - -
सुभाष स. नाईक मुंबई
M – 9869002126 . eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com ; www.snehalatanaik.com
February 28, 2018
बड्या धेंड्याचा देहान्त जाहला,
राजकारणी खुर्च्याचा त्राता निवर्तला,
जनसागर अवघा शोकसागरात बुडाला
अश्रूंचा (कोरड्या) अन् पूर लोटला
का कोण जाणे कुणास कसला
पत्ताच नव्हता शोक कशाला?
शोकग्रस्त जीवांनी गच्च भरले
तरीही राजमहाल अपुरे पडले
हार वाहिले, पुष्पचक्र अर्पिले
तरी बरेच काहीसे अजूनी उरले
एकाकी तू असा निजलास का रे
कुणी न तुजला वारस का रे
शोक न कुणाचा, पाठिंब्याचा
हुद्याचा वा मुद्याचा
एकही न कसले फूल बिचारे
तुजवर पडले; काय अरेरे!!
अहा रे त्याचे जीवनही प्यारे, मरणही न्यारे
तूच अभागी मग असा कसा रे
तुला सजविले, मरणही बिचारे
प्रमाद एकच घडला तवहाती रे
असशील वेचले, देशासाठी प्राणा रे
कधी न इच्छिलेस तू अभाग्या
मोल तुझे अधिकार हुद्यात रे
हो जागाही नगण्य तुझ्या चिरनिद्रेतून
हसतमुखाने; आश्चर्य लपवून
हो सामील या मिरवणुकीत
जबरदस्तीच्या तीनतेराच्या दुखवट्यात
हा दोष न कुणाच्या माथी रे
देश अपुला हुद्दासत्ताक रे
तुला न मिळावा हा मान उपेक्षिता
फुका खपलास भूमिसाठी या करंट्या
जरी न केले त्याने काही देशासाठी रे
हुद्दा त्याचा होता फार मोठा रे
असता जर तो तुझ्याही जवळी
तो मान मग तुलाही मिळता रे
अनमोल तुझ्या कार्यापेक्षा
होता विचार हुद्याचा तुझ्या रे
हुद्याचा तो मान वेड्या रे
तुझा न् माझा नव्हता रे
घडले दोन मृत्यू: मात्र एक फरकाचा
होता एक व्यक्तीचा दुसरा मात्र हुद्याचा
-यतीन सामंत
September 18, 2022
December 2, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti