May 2, 2022
दोष नव्हता तिचा
अन् वाट ही नव्हती ती चुकली
बदमाशांच्या जाळ्यात
अनाहुतपणे होती फसली
उन्मत्त नशेने माजून
ते सैतान झाले होते
विकृत ओंगळ भावनेला
पूरूषार्थ समजत होते
मनावरच्या आघाताने
जरी नव्हती ती खचली
आत्मसन्मानाची लढाई
जिंकू नव्हती शकली
विधात्यालाही नाही कळले
विकृत हवस ती कसली
नीच त्या नराधमांनी
माणूसकीलाही भोसकली
आंधळ्या त्या न्यायदेवतेला
होते सारे स्पष्ट कळले
अब्रूचे उघडे पंचनामे
तरीही नव्हते टळले
भाग्य होते की दूर्भाग्य
ती एक बातमी होती
वैचारीक उथळपणाला
ती फक्त एक गवसणी होती
हजारो पेटत्या मेणबत्त्या
पाहुन जरी ती सुखावली
काही श्वापदं मोकाट बघून
मनोमनी दुखावली
नराधम फाशी गेले तेंव्हा
किंचीतशी ती हसली
मुक्या निर्भयाच्या शेजारी
गुपचूप जावुन बसली.
- डॉ.सुभाष कटकदौंड
November 2, 2018
मध्य रेल्वे माझं नाव
वय माझं शंभरवर,
काय सांगू बाबांनो आता
कशी लागली मला घरघर…
इंग्रजांच्या काळात
खूप होती माझी बडदास्त
फेऱ्याही होत्या कमी
अन् माणसंही नव्हती जास्त…
रुळावरून धडधडत आले
की लोक मला घाबरायचे
एक भोंगा वाजवताच
दूर दूर पळायचे…
पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
सगळंच तंत्र बदललं
शहरांचा झाला विस्तार
माझं महत्त्व वाढलं…
मी खूप खुशीत होते
दिवसरात्र धावत होते
नोकरदारांच्या प्रवासाची
नित्य काळजी वाहत होते…
पश्चिम उपनगरवासीयांच्या सेवेत
माझी बहीण तत्पर होती
धाकटीची भरधाव प्रगती
सगळ्यांचेच डोळे दीपवत होती…
आम्ही दोघी मुंबईची
लाइफलाइन होऊन गेलो
भावालाही सोबत घेऊन
पनवेलपर्यंत जाऊन पोहोचलो…
पण मरमर राबणाऱ्या,
टार्गेट अचिव्ह करणाऱ्या
अन् इन हँड सॅलरी पाहून
मनात चरफडणाऱ्या
कॉर्पोरेट एम्प्लॉयीगतच माझीही गत झाली
बडी बडी स्वप्नं (बोनस, इन्सेन्टिव्ह, TVP) दाखवून
‘बेसिक’चीच काशी केली…
स्वतंत्र खातं, स्वतंत्र बजेट,
वरवर सगळंच होतं छान,
पण मतांच्या राजकारणात
विकासाला नव्हतं स्थान…
उत्तरेचे मंत्री कुल्हडबाजीत रमले होते,
भाडेवाढीचं नाव काढताच हुल्लडबाजी करत होते
अधिकारीही उत्तरेचेच,
त्यांना मूळ प्रश्नच कळत नव्हते
बुडाखाली कार असल्याने
त्यांचे काहीच अडत नव्हते…
माझी मात्र आता दमछाक होऊ लागली होती,
प्रत्येक स्टेशनावरची गर्दी पाहून धडकी भरू लागली होती…
कधी कर्जत, कधी कसारा
कधी स्लो कधी फास्ट,
अप-डाउन करताना वाटतं
हीच फेरी ठरेल लास्ट…
हाडं खिळखिळी झालीयत, पायही लटपटतात,
चुकून कधी पटरी सुटली तर सगळे जण खवळतात…
तुम्हाला मी लेकरं मानते
चीडचीड तुमची मला कळते
चाकरमान्यांचे हाल पाहून
माझेही मन हळहळते…
त्यांच्या कर्माची फळं
आपल्याला भोगावी लागत आहेत,
भ्रष्टाचाराचा चारा खाऊनही
ते तिकडे चैनीत आहेत…
किती करायची अॅडजस्टमेंट
आता सहन होत नाही,
तुमच्यात अडकलेला जीव
रामही म्हणू देत नाही…
तुम्हीच आहात माझी लाइफ
माझ्यावर नका रे रुसू,
म्हातारी झाले रे पोरांनो
‘मरे’ म्हणून नका हसू…
घरच्या आजी-आजोबांना
तुम्ही देता ना रे औषध,
मग या पणजीला जगवण्यासाठी
काहीतरी करा की झटपट…
तुमच्या सेवेत धावत राहणं
हाच माझा ध्यास आहे
व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना
आता ‘प्रभू’कृपेची आस आहे!
August 7, 2017
पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी ।
चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।।
आजपरी शरीर दुबळे साथ देईना ।
मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।।
आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी ।
भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।।
आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे ।
अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते ।।
चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी ।
फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी ।।
गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी ।
ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी ।।
टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला ।
नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला ।।
विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला ।
देह सोडूनी पांडूरंगी चरणी वैकूंठी गेला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 1, 2018
माझ्या कविता,माझ्या कथा
माझ्या नसतात,त्या तिच्या असतात
त्या जगाला,तिच्या असण्याची
माझ्या आजूबाजूला, आणि माझ्या अस्तित्वातील जगण्यात
तिच्या भूमिकेची जाणीव करून देत असतात...
©कवी - निलेश बामणे
May 27, 2017
अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची ।
मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जीवनाची....१,
वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरीर कुणाला ।
मना मारूनी बसावे लागे, एक जागी सर्वाला....२,
निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन ।
दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून...३,
बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले ।
दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व आज जाणले....४,
जेंव्हां असते स्वत: करीता, स्वार्थी भाव लपला असे ।
दुजासाठी करीता सारे , स्वार्थी भाव राहील कसे ?....५,
शेवटचे सरते जीवन, ईश चरणी समर्पण व्हावे ।
अंतिम विनंती हीच, दुजाच्या सेवेतच निघून जावे...६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 19, 2016
माझ्या स्वप्नातील विमान जमिनीवर स्थिरावताच माझ्यातील माणुसकीही क्षणात मेली होती… © कवी – निलेश बामणे
June 23, 2017
एका बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले. अपेक्षा होती की बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल. पण तसे काही झाले नाही. मग हळू हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले. जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले, आतातरी बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले. पण तसे काही घडेना. शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी त्या बेडकाला जेव्हा उकळत्या पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो बेडूक मेलेला आढळला.
तुम्हाला वाटेल की बेडूक उकळत्या पाण्यामूळे भाजून मेला. पण तसे नव्हते. पाण्याच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान ऍडजेस्ट करायची एक खास देणगी बेडकाला मिळाली आहे. कारण बेडूक ज्या पाण्यात रहातो त्याचे तापमान नेहमीच कमी जास्त होत असते. बेडकाला कोमट पाण्यात टाकल्यावर बेडकाने आपल्या शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानाप्रमाणे ऍडजेस्ट करायला सुरवात केली. पुढे जस जसे पाण्याचे तापमान वाढू लागले बेडकाने तोच प्रयोग चालु ठेवला. पण यामध्ये बेडकाची बरीच ताकद खर्च झाली. ज्यावेळी पाणी उकळू लागले व बेडकावर टुणकन उडी मारून पाण्याबाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा उडी मारायला बेडकाकडे ताकदच शिल्लक राहीली नाही. त्यामूळे बेडकावर मरण ओढवले. जर ज्या वेळी ताकद होती त्यावेळी बेडूक उडी मारून बाहेर पडला असता तर नक्कीच वाचला असता.
आपले पण असेच असते. आपण अनेकवेळा संकटे, अडथळे, अडचणी, दुःख, उदासीनता, स्वप्नभंग, निराशा यामूळे वेढले गेलेलो असतो. तसेच आपल्याला पुष्कळवेळा आपल्याला कमी लेखणारी, आपला अपमान करणारी, आपले शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करणारी माणसे भेटत असतात. अशा परिस्थितीला व माणसांना तोंड देण्यासाठी देवाने आपल्याला एक आगळी वेगळी शक्ती बहाल केली आहे. ती म्हणजे सोशीकता, सहन करण्याची ताकद किंवा सहिष्णुता. आपण नेहमीच आलेल्या परिस्थितीला ऍडजेस्ट व्हायचा प्रयत्न करत असतो. उगीच कशाला वाकड्यात शिरायचे म्हणून आपल्याला जी वेडी वाकडी माणसे भेटत असतात त्यांच्याशी पण आपण ऍडजेस्ट करायचा प्रयत्न करत असतो. खरे म्हणजे यातून लवकर सुटका कशी करून घेता येईल याचे मार्ग आपल्याला दिसत असतात व समजत पण असतात. पण सहिष्णुतेच्या नावाखाली आपण याकडे दुर्लक्ष करत असतो. पण यामध्ये आपली बरीच ताकद खर्च होत असते हे आपल्याला कळत नसते. पण जेव्हा डोक्यावरून पाणी वाहू लागते व यातून आपली सुटका करून घेण्याची वेळ येते तेव्हा सुटका करून घेण्यासाठी लागणारी ‘एनर्जी’ च आपल्याकडे शिल्लक रहात नाही. आपण मग त्यात कायमचे अडकून पडतो व दैवाला दोष देण्यापलीकडे फारसे काही करू शकत नाही.
सहनशिलता किंवा सहिष्णुता हा चांगला गुण आहे पण त्याचा अतीरेक झाला तर तो दुर्गुणच ठरतो. गुणांचे सद्गुण व दर्गुण असे दोन प्रकार आहेत. पण अनेक वेळा दुर्गुण हे सद्गुण ठरत असतात तर सद्गुण हे दुर्गुण ठरत असतात.
तुम्ही कोणालाही तुमचे शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करू देऊ नका.
पाणी गरम होत असताना जोपर्यंत आपल्याकडे उडी मारून बाहेर पडण्याची ताकद आहे तोपर्यंत उडी मारून बाहेर पडणे शहाणपणाचे ठरते.
तुमच्याकडे असलेल्या सहनशीलतेचा किंवा सहिष्णुतेचा उपयोग कसा करायचा हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?
--उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
(सौजन्य- व्हॉट्सअपवर आलेला एक मेसेज)
February 24, 2016
इवलेसे हे फूल तयाची प्रतिमा भासे मोठी
July 12, 2026
कधी या चांदरातींनी तुला हाकारले होते
तुझ्या डोळ्यात चंद्राचे गीत आकारले होते
फुलांची वाट पायाशी फुलांची वेळ ती होती
फुलांनी मी आयुष्याला पूर्ण शाकारले होते
थंड ही आग लावूनी क्षणांनीही गुन्हा केला
चंद्र मागायचे धैर्य फुलांनी दाविले होते
अशा या चंद्रबाधेचा कुणा उपचार मागावा?
सभोती सर्व होते, ते कधीचे भारले होते
आता कित्येक वर्षांनी, चंद्र होऊन मी आले
तमामधले जिणे, तेव्हा तूच स्वीकारले होते !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 19, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti