एका मोठ्या कारखान्याचा मालक,
भासत होता छोट्या विश्वाचा चालक
लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती,
मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण
उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन,
लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती,
खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत
पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे
पण नशीब दुर्दैवी बिचारे,
मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला,
वर्ज्य केल होत साखर व मिठाला
नाचणीची भाकरी व उकडलेल्या अळणी
भाज्यांमधून शोषित होता जीवन सत्व.
जगण्यासाठी आहार नियंत्रण
समजला होता हे तत्व.
वात पित्ताची प्रकृती त्याची.
थंड पाणी थंड हवा यांचे पासून दूर राहण्याची.
लाकडाच्या टणक फळींचा केला होता खास पलंग,
कारण मऊ गादीमुळे ठणकत होते त्याचे अंग,
आणि त्याच पलंगावर बसून नैसर्गिक हवा व प्रकाशामध्ये,
कंपनीच्या लाखो रूपयाच्या Balance Sheets वर
व चेक्सवर स्वाक्षऱ्या करित होता.
पाने मागे पुढे चाळीत होता,
मध्येच मान वर करून बघत होता,
विचारत होता, समजल आहे हे दाखवित होता,
हिशोब तपासनीस, सेक्रेटरी, पर्सनल मॅनेजर
सारे उभे होते सभोवताली.
माना त्यांच्या झुकत होत्या,
शब्द त्याचे ते उचली,
कसला तरी आंतरीक अभिमान अहंकार
चेहऱ्यावर चमकत होता.
आपल्या एका स्वाक्षरीमध्ये लाखो रूपयाच्या
उलाढाली सहजगत्या होण्याची ताकद आहे
या जाणीवेने, मध्येच थांबून सेवकाने टेबलावर ठेवलेले
लिंबू सरबताचे घोट पित होता... सरबत....
स्वच्छ निर्मळ पाणी त्यांत लिंबाचा रस.
साखर मिठ वर्ज्य असलेले,
हा भोगत होता आणि इतर उपभोगात होते,
तरी देखील हे सारे माझे आहे,
हीच खोलवरची जाणीव त्याला जगवीत होती..
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 17, 2018
स्वप्नांच्या वाटेवर मी चालत होतो,
मनात आशेचे दिवे पेटले होते.
निरागस शब्दांनी नाती जोडली,“मनापासून जगण्याची शिक्षा”
भावनांचे धागे अलगद विणले होते.
मनातल्या भावना जपून ठेवल्या,
शब्दांतून त्यांना अर्थ दिला.
नात्यांच्या त्या कोमल धाग्यांना
मी प्रामाणिकपणाचा स्पर्श दिला.
कुणाला दुखवायचा हेतू नव्हता,
मनात फक्त प्रेमच जपले होते.
पण काळाच्या या कठोर वळणावर,
का नियतीनेच माझी साथ सोडली?
नजरेत प्रश्नांचे सावट दाटले,
उत्तर मात्र कुठेच दिसेना.
मनाला समजावत राहिलो तरी,
दुखणे काही कमी होईना.
जगाच्या हिशेबात कदाचित
भावनांना किंमत नसते कधी.
मनापासून जगण्याची शिक्षा
बहुतेक अशीच मिळते कधी.
नजरेत अनेक प्रश्न दाटले,
उत्तर मात्र शांत राहिले.
हृदयाने जे काही दिलं होतं,
तेच का जगाला खटकलं असेल?
आणि मग मनात एकच प्रश्न घुमतो...
*अपराध माझा असा काय झाला?*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 13, 2026
मा.बा भ. बोरकर यांची कविता माझ्या गोव्याच्या भूमीत
माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||
माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फ़ळांचे पाझर
फ़ळी फ़ुलांचे सुवास||
माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||
माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||
माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||
माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||
माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||
माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||
November 30, 2016
-- स्वाती ठोंबरे.
November 30, 2021
तिने कधीतरी विचारलंस,
अरे तुला कुठलं फुल आवडते ?
तेंव्हा मी क्षणात उत्तरलो..
मनात जपायला चाफा आवडेल
आणि ओंजळीत धरायला मोगरा...
वहीत ठेवायला बकुळ आवडेल
आणि धुंद व्हायला केवडा...
बोलायला अबोली आवडेल
आणि फुलवायला सदाफुली...
पण, प्राजक्त मात्र आवडेल तो,
हृदयाशि धरायला..आधारासाठी...
यावर ती थोडीशी नाराज झाली,
मी ते ओळखलं...
पुढे झालो आणि हलकेच हसत म्हणालो,
हे सगळं आवडेल ...... पण कधी
तर निशिगंधा मिठीत दरवळल्यानंतर...!!
तेव्हापासून ती अखंड दरवळत आहेस...
माझ्या मिठीत, मनांत ... हृदयात...!!!
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
May 23, 2021
पूर्वी कसे नवरात्रीला
नऊ दिवस आपण
नऊ रंगाचे कपडे
परिधान करायचो...
तू नाचायचीस मनसोक्त
आणि मी तुझं ते
नाचणं डोळेभरून
पाहत राहायचो...
रंगाच फार काही नाही
पण तू जवळ असल्यावर
मी नेहमीच आनंदात
भरभरून जगायचो...
तुझा आनंद मी माझ्या
हृदयात साठवून तो
साऱ्या जगाला हसत
आनंदाने वाटायचो...
आता फक्त राहतो उभा
तुझी वाट पाहत
तसाच त्या वळणावर
जसा पूर्वी राहायचो...
© कवी - निलेश बामणे
दिनांक - ९ ऑक्टोबर २०२१
October 13, 2021
ध्यानाने काय साधले
ऐका सगळे लक्ष्य देऊनी
हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।।
संसारांत रमलो मोहांत गुंतलो
सुख दुःखात अडकलो
उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।।
हेच साधले ध्यान लावूनी
जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं
समाधानापोटीं
धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।।
हेच साधले ध्यान लावूनी
धानाची समज उपदेशिला मज
ऐक मनाचा आवाज
तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।।
हेच साधले ध्यान लावूनी
एकाग्रतेची स्थिति ही ध्यानाची शक्ति
समाधान मिळविती
शांत करी मन देई चंचला घालवुनी ।।४।।
हेच साधले ध्यान लावूनी
सुख दुःखाची जाण तीव्रता कमी करुन
देऊनी तर्क ज्ञान
करी मनाची समज वाढवूनी ।।५।।
हेच साधले ध्यान लावूनी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 5, 2015
कवितेच्या तलम पडद्याआडून
माझ्या भावना तुला सागतात
माझ्या विरहव्यथा
शकुंतलेची व्यथा सांगावी
दुष्यंताला तिच्या सखींनी तशी
क्वचित दुर्लक्षिल्यासारखं
क्वचित दाद देत तू म्हणतोस
वा ।’
आणि निघून जातोन
कसं सांगू तुला कवितेतून?
माझ्या कविता तुझ्यासाठी असतात!
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
March 29, 2023
काव्याक्ष चारोळी
देवा तुझे द्वार
असे भक्तीचा सागर
येऊन करी स्तुती जागर
तिथे तू असशी का तारणहार?
-- सौ.माणिक शुरजोशी
७/१२/१९
December 15, 2019
आव्हानांना पेलत पेलत
आता फक्त जगत रहावे
कयास सारे कलियुगाचे
ओळखुनी सतर्क जगावे
व्याख्या जगण्याची बदलली
तीच उमजुनी जगत रहावे
भुरळ आता नावीण्याची
जगताना सावध असावे
जुने जे, ते सोने असते
ते मना समजवित रहावे
मन:शांती हेची सुख खरे
याचे सदा स्मरण असावे
*******
--वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१३
२९/११/२०२२
December 11, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti