मंडळी हा जो फोटो दिसत आहे तो फोटो आहे ज्येष्ठ कवी गीतकार जगदीश खेबुडकर यांचा. इतका मोठा माणूस कोणाला ओळखणार नाही अशी ही महान वल्ली. साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना मोठी माणसे भेटतात. त्यांचं वर्णन करणार अवघड होऊन जाते साहित्य कला कवी गीतकार ही नाती उत्तुंग अशी मोठी असतात. परंतु अशी मोठी माणसं फार थोड्या लोकांना भेटतात यापैकी हे जगदीश खेबुडकर होय.
June 12, 2023
आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर
आजीला म्हणती चल जाऊया, फिरायला खूप दूर
काठी सोडून हाती घेतला
तिचा सुरकुतलेला हात
तिच्या इश्श मध्ये कळली, तिची अंतरीची साथ
नाना-नानी पार्क सोडून
धरली चौपाटीची वाट
जूने दिवस आठवले, पाहून झेपावणारी लाट
ओलसर वाळूचा बसायला घेतला पाट
दुखत नव्हते आता, कंबर-ढोपे-पाठ
अहो दात नाहीत तरी घेतले
चणे-दाणे चघळायला
गजराही घेतला आजोबांनी
तिच्या ईवल्या आंबाडयांत माळायला
आजूबाजूच्या तरुणाईची दखल कुठली दोघांना?
निसटून नव्हत दयायच नं ह्या मोरपंखी क्षणांना
बोलता बोलता क्षितीजावर
चढू लागली लाली
आणि साक्षीला चंद्राची स्वारी देखील आली
आता खट्याळपणाला रंग चढला
आजोबांच्या रोमरोमात
आजीला म्हणती नभीचा चंद्र , दिसतोय तुझ्या डोळ्यात
अहो आज नाही तुमचा माझा
वा वाढदिवस लग्नाचा
मग शिळ्या कढीला म्हणते मी
एवढा ऊत आलाय कशाचा?
अग, फार दिवसाची इच्छा होती
तुला माहीत नसेल वेडे
जाण्यापूर्वी वाटल, आपणही साजरा करावा कि
एखादा व्हॅलेंटाईन डे, एखादा व्हॅलेंटाईन डे
-- सौ. अलका वढावकर
February 13, 2016
हवे तेच बोलता मी
जमाया लागले लोक
सत्य सांगू लागताचि
उठू लागे एक एक।
...मी मानसी
May 16, 2020
शोधत होतो रुप प्रभूचे, एक चित्त लावूनी ।
अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी ।।
शांत झाले चंचल चित्त, शांत झाला श्वास ।
ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश ।।
पचन शक्ती हलकी झाली, जठराग्नीची ।
शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्याची ।।
देहक्रियांतील प्राणबिंदू , असे ईश्वर ।
समरस होतां त्याच शक्तिशीं, होई स्थिर ।।
शोधामध्यें चिंतन करतां, ध्यान परी लागते ।
समाधी स्थितीत येतां प्राण, अनंतात मिसळते ।।
नाही दिसले रुप ईश्वरीं, आगळे एकटे ।
विश्वमंडळ तोच असतां, शोधू तयास कोठे ? ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 19, 2017
जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले
जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१।
सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची
श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२।
शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे
शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३।
रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे
सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४।
ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक ठिकाणी असे
प्रसन्न करण्या धन लक्ष्मीला, अडचण येत नसे ।५।
शक्ति, युक्ति, बुद्धी एकटवूनी, परिश्रम केले
धनराशीचे अल्प भांडार, त्याने जमविले ।६।
तेज चमकले त्याच्या जीवनीं, धन लक्ष्मीचे
समजूं लागला फार सुखी, क्षण कर्तृत्वाचे ।७।
माहीत नव्हते लक्ष्मी असते, चंचल स्वभावी
केव्हां येईल जाईल कशी, भंरवसा तो नाहीं ।८।
चालत असतो खेळ नियतीचा, गमतीनें सदा
कुणाचे फांस कसे पडतील, कळेना अनेकदां ।९।
कमाईस त्याच्या ओहोटी लागली, व्यवहारामध्यें ती
प्रयत्न सारे फोल ठरूनी, अपयश येती ।१०।
निराश बनले जीवन सारे, अंध:कार झाला
दु:खाच्या त्या चटक्यामध्यें, जीव होरपळला ।११।
मार्ग बदलले पूर्ण तयानें, आपल्या जीवनाचे
धन कमविणें लक्ष नव्हते, त्याच्या प्रयत्नांचे ।१२।
वाचन करूनी चिंतन केले, मन रमविण्या चित्ताला
ध्यान साधना देवूं लागली, आनंद त्याला ।१३।
विसरूनी गेला हलके हलके, दु:ख निर्धनतेचे
काव्य लेखनानें उघडले द्वार, नव जीवनाचे ।१४।
चकीत झाला एके दिवशीं, बघूनी तसबिरीला
श्री लक्ष्मीचे ठिकाणी सरस्वतीचा, बदल कुणी केला ? ।१५।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 2, 2017
आजकाल होळीला मी तिच्या आठवणींच्या
रंगा व्यतिरीक्त दुसर्याआ रंगात रंगत नाही
तिने तिच्या प्रेमाने माझ्या चेहर्यातवर चढविलेला
रंग आजही कशाने फुसला जात नाही
त्या रंगावर आता कोणीही कितीही प्रेमाणे रंग
लावला तरी तो आता चढतच नाही.
का कोणास जाणे आता मला निसर्गातील कोणत्याच
रंगाबद्दल आकर्षण वाटत नाही.
आता होळी रे होळी ! ओरडत कोणावर प्रेमाने पाणी
ओतावे असे मनापासून वाटतच नाही.
रंगात रंगून विद्रूप झालेल्या पण तरीही उत्साही
दिसणार्या चेहर्यांाकडे हल्ली पाहवतच नाही.
होळीला मी हल्ली कोणाच्याही आग्रहाखातर घरातून
पाऊल बाहेर ठेवतच नाही.
हल्ली माझ्या घरात घुसून मला रंगविण्याची
हिंमत कोणी करीतच नाही
ती एकटीच होती मला रंग लावणारी जिला मी
कधीच नाही म्ह्णालो नाही.
माझ्या जीवनातील होळी तिच होती
तिच्या शिवाय आता जीवनात रंगच उरले नाही.
-- निलेश बामणे
March 15, 2014
भटकत जातो वाटसरू ,
जंगलामधील अज्ञात स्थळी,
आंस लागते जाण्याकरिता,
दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।
मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी,
निराशेने वेळ दवडितो,
ध्येय दिसत असून देखील,
मार्गामुळे अडून पडतो ।।२।।
अज्ञानाच्या अंधारात ,
शोधत असतो असेच त्याला
मार्गदर्शन सद्गुरुचे,
न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।
वाट दाखवी सद्गुरु ,
प्रभूचरणी जाण्याचा,
दुवा साधतो आमच्यामध्ये,
त्यात एकरूप होण्याचा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 21, 2021
सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला
खेळ चालतो त्याचा, चकविणे मनाला ...१,
बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक असते,
मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते...२,
खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी,
चुकीचा हा हिशोब, निराशा करी...३,
अंतरातील सुख, नितांत असते
एकाच अनुभवाने, जग विसरविते...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 25, 2020
पाऊस चिंब चिंबलेला
July 3, 2021
"अव्यक्त"
जे व्यक्त होतात
ती मते
कदाचित मनात,हृदयात
पोहचत नसतील
तरी ती कानावर पडली पाहिजेत,
वाद विवाद संवाद
कोलाहलात सुद्धा
शोधले पाहिजेत,
जे व्यक्त होत नाहीत
त्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा
आदर करुयात,
इथे फक्त माझे अस्तित्वच
मोलाचे नाही,
या यात्रेत
सहवास ,सह अस्तित्व सुद्धा
मोलाचे आहे,
तुझ्या,माझ्या व त्यांच्या
जगण्याचे मोल
सदैव समजले पाहिजे.
~ विजय नगरकर
September 26, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti