February 1, 2022
https://youtu.be/akw4ciQSbtg
June 26, 2018
तू पहाटेचा सोहळा
तिमिरातील किरण..
घंटेचा निनाद
आभाळाच तोरणं..
तू सागराची गाज
शांततेची लाट..
क्षितीजाच टोक
नदीवरचा घाट..
तू वाऱ्याचा वेग
समतोल पृथा..
निसर्गाचे दान
नियमांची प्रथा
तू अग्नीच्या ज्वाळा
ऊर्जेचे वरदान..
जल पृथ्वी वायू
अग्नी आकाशाची खाण..
तू यत्र तंत्र सर्वत्र
भविष्य भूत वर्तमान
सखोल अंतर्मनातले
समाधानाचे मूळ ज्ञान..
तू गतीची परिक्रमा
परमोच्च बिंदू अमृत
आत्मकेंद्रित क्षूद्रांचे
परिघ वलय छेदीत
-- काव्य प्रतिभा
सौ. प्रतिभा महादेव चौगले
कोल्हापूर
December 27, 2025
नाही ग मी राजा
पण तू आहेस माझी राणी
आपल्या प्रेमाची नाही
वेगळी अशी कहाणी...
सांग मला एकदा
काय आहे तुझ्या मनी ?
जुन्या त्या आठवणींनी
नको डोळ्यात पाणी
नको होऊस तू दूःखी
थोड्याश्या विरहानी
प्रेम नाही होणार कमी
जरी ढळेल जवानी
आपल्या प्रेमाची नाही
वेगळी अशी कहाणी...
आपण फक्त जवळ बसावं
धुंद करेल रातराणी
आयुष्य असंच फूलत रहावं
कायम प्रेमाच्या फुलांनी
नाजुकशा कोमल शब्दांना
रंगवावं तू प्रेमानी
मीही गाईन तुझ्यासाठी
सुंदर प्रणयाची गाणी
आपल्या प्रेमाची नाही
वेगळी अशी कहाणी...
प्रेमाला नको ओहोटी
अगदी कोणत्याही क्षणी
भिजवत राहीन सदैव
तुला प्रेमाच्या लाटांनी
बांधला सुंदर ताजमहाल
मुमताजसाठी शहाजहाननी
प्रेम कसं व्यक्त करू माझं
नाही कोणतीही निशाणी
आपल्या प्रेमाची नाही
वेगळी अशी कहाणी
- डॉ. सुभाष कटकदौंड
August 25, 2018
चोविस तासहि विठ्ठलमंदिर राहिल हें उघडें
ना भक्तांना दर्शन घेण्यां आतां कष्ट पडे ।। १
जेव्हां जेव्हां विठ्ठल झोपे
मूर्ती दारामागुती लपे
भलीथोरली वारकर्यांची दारीं रांग अडे ।। २
पांडुरंग अन् भक्तांमधलें
हवें कशाला अंतर असलें ?
दार उघडुनी बडवे करती पुण्यकार्य तगडें ।। ३
आतां विठुला निद्रा नाहीं
अष्टप्रहर तो दर्शन देई
आतां त्याला भेटायाला होतिल ना झगडे ।। ४
वारकर्यांनो, भक्तांनो, या
वैकुंठाचा लाभ लुटाया
दिठी मारतां विठुस मिठी, मनिं चिदानंद लगडे ।। ५
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
July 10, 2016
अंगणात उतरल्या चांदण्याच्या गावास आता मी परका
काळजात झिरपल्या डोहाच्याही थेंबास आता मी परका
बेसुमार साऱ्या स्वप्नांना शब्दात जखडती माझ्या राती
फुलणाऱ्या कळ्यांच्या काट्याच्या दिशानाही आता मी परका
श्वासातच माझ्या शोधीत फिरतो कुठल्या नक्षत्राचे गाणे
मनातले गाणे गाणाऱ्या शिवारातल्या वाऱ्यास आता मी परका
स्वप्नांना साऱ्या बांधून मी शब्दाची रचितो अवघी कवने
बोरुत गिरवल्या गुरुजींच्या वचनास आता मी परका
दोन श्वासामधल्या माझ्या अंतऱ्याचे मग उगाच सलणे
मातीच्या गावाकडल्या तुटल्या नाळेस आता मी परका
देव मला जरी कधी भेटला असेल माझे एकच मागणे
दे चिमणीच्या दातांना फिरुनी ज्यांना आता मी परका
-- रजनीकान्त
March 31, 2018
घन आषाढी, गगन सावळे
मीलना आसुसलेली वसुंधरा
चिंबचिंबला पाऊस ओला
स्मृतींच्या झरझरती जलधारा...।।
हिरवळलेली सुंदरा अनुपम
माहोल लोचना दीपविणारा
धुंद क्षण क्षण, मन फुलारू
ऋतुवर्षाचा, सोहळा न्यारा...।।
जीवा जीवाला झुलविणारा
बेधुंद मृदगंधला अवीट वारा
प्रीतभावनांचा स्पर्श अनावर
अधिर, प्रीतासक्ती गंधणारा...।।
शब्दाशब्दातुनी ओढ लाघवी
अंतरात झुळझुळतो प्रीतझरा
घन आषाढी, गगन सावळे
मीलना आसुसलेली वसुंधरा...।।
रचना क्र. ६३
३०/६/२०२३
-वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
July 17, 2023
झोप कधीही घेता येते,
थकल्या मनाला विसावा देता येतो…
पण स्वप्नांना पंख देण्याची वेळ
नेहमीच थांबून राहत नाही.
वयाच्या एका टप्प्यावर
धाडसाची उर्मी कमी होत जाते,
उंच भरारी घ्यायची इच्छा असली
तरी पावलं थोडी थबकतात.
म्हणूनच वेळ हातात असताना
आकाशाला स्पर्श करून घ्या,
कारण झोप तर कधीही घेता येते…
पण झेप घेण्याचं वय
पुन्हा परत येत नाही.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 13, 2026
आई तुझ्या
विरहात
जगते मी
आठवात *१*
गेलीस नां
तू सोडून
बालपणी
रडवून *२*
अनाकाली
मी पोरकी
इथे सारे
हे बेरकी *३*
नाही कुणी
विचारत
संकटे ही
सतावत *४*
मार्ग मला
सापडेना
काही केल्या
उमजेना *५*
प्रयत्न मी
करतेच
ठेवण्याचा
हास्यतेज *६*
आता झाले
अंतर्मुख
जिवनात
शोधे सुख *७*
बाळ तुझी
गुणी पहा
स्वर्गात तू
सुखी रहा *८*
-- सौ.माणिक शुरजोशी
December 1, 2019
तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां
आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना,
शांत जळते केंव्हां तरी, भडकून उठते कधी कधी
फडफड करित मंदावते, इच्छा दाखवी घेण्या समाधी
जगदंबेच्या प्रतिमेवरती, प्रकाश टाकूनी हास्य टिपते
हास्य बघूनी त्या देवीचे, चरण स्पर्शण्या झेपावते
अजाणपणाच्या खेळामधली, स्वप्न तरंगे दिसूनी येती
दिव्यामधले तेल संपता, काजळी धरल्या दिसे वाती
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 10, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti