विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग
चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग
नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते
परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते
अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं
विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी
सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर
आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार
आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच
लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे
कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती
जीवनांतील न्युनता भव्यतेत लय पावती
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 11, 2017
August 9, 2013
"मी सुद्धा चुकलो असेन",
एवढं मनात आणा!
धनुष्य मग हातातलं,
जरा संयमानंच ताणा!
बाणच हळू कानात सांगेल,
'ठेव मला भात्यात!
एवढं ऊन, एवढा पाऊस,
असणारच की नात्यात!'
वादा जवळ गप्प बसून,
संवाद करू, मारू गप्पा!
तुटण्या किंवा उसवण्याचा,
येणारच नाही टप्पा!
तेवढाच क्षण टळल्यावर
आकाश होतं साफ!
दंव होऊन गारवा देते,
तीच गरम गरम वाफ!
एक क्षण आवेगाचा,
फुटण्यापुर्वी अडवा!
डोळे सुद्धा राग बोलतात,
पापण्यांमागे दडवा!
थोडी गुदमर, थोडी घुसमट,
उंबरठ्यावर दाटेल!
राख झाली तरी चालेल,
असं वाटेल, ...पटेल!
दिवस रात्र असणारच,
तेव्हा आपण पूर्व बघू!
प्रकाशाचे वारकरीच की!
आपण उगवतीला निघू!
पहिली ठिणगी पडते तेव्हा,
विचार व्हावा पाणी!
मनात सूर जपतो तेव्हाच,
शब्द होतात गाणी!
कधीकधी आठवण्याहून,
विसरण्यातच मजा!
बेरजेपेक्षा कधीकधी ,
जोडून देते वजा!
बाकी उरणं महत्वाचं,
तेवढीच श्री शिल्लक!
कविता असेल साधी,
पण् विचार मात्र तल्लख!
संदीप खरे
March 2, 2017
ज्याचा त्याचा विठ्ठल, अंतरीचा ध्यास,
नजरेआड तो असे, श्वासामध्ये वास.
विटेवरी उभा तो, म्हणती लोक सारे,
मला भेटे एकांतात, अश्रूंच्या किनारे.
नाही मला गजर, नाही मोठी वारी,
शांततेच्या वाटेवर, चालतो मी भारी.
हरपलो जेव्हा मी, सापडला तो तेव्हा,
“मी”पण गळून गेलं, उरलो फक्त देवा.
ज्याचा त्याचा विठ्ठल, वेगळी त्याची प्रीत,
कोणी गातो नाम,कोणी हरवतो अंतरीत.
दर्शनाची आस नाही, नाही काही मागणं,
तो आहे इतकंच, झालं जीवन जागणं.
आतल्या त्या पोकळीत, उजेड जसा लपलेला,
तसाच माझा विठ्ठल, नि:शब्द सामावलेला.
ज्याचा त्याचा विठ्ठल…
शोधू नको दूर,
डोळे मिटले की दिसतो
अंतरीचा तो नूर.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 4, 2026
वेध गुलाबी थंडीचे
पेटे शेकोटी रात्रीची
फड रंगती गप्पांचे
पार्टी असते हुर्ड्याची....१
पडे चांदणे रात्रीचे
चंद्र निरभ्र आकाशी
गुज सांगते मनीचे
सखी ही प्रियकराशी....२
उब वाढता तनाची
सय घालतो सखीसी
आस असे मिलनाची
आवतण रजईसी.......
३
निशा अंधाऱ्या रात्रीची
साथ मिळे गारव्याची
जादू रती-मदनाची
प्रित खुले युगलांची.......
४
दिस आले प्रणयाचे
रिते चषक मद्याचे
वेध गुलाबी थंडीचे
गौप्य हे आलिंगनाचे......
५
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
November 27, 2019
एऽ येश्वदे, एऽ ममद्या, बाप्ये जमवा समदे
बाया बी गोळा करा समद्या
मारा समद्यांनला जोरात हाका,
आन् ती समदी मेंढरं हाका.
चला आपन बहिनी-भाऊ
मतदानासाठी जाऊ.
देऊ त्याला भलामोट्टा आपल्या मतांचा गठ्ठा.
तो, जो गावीं आल्ता पठ्ठा ज्यानं आपल्या समद्यांनला वाटला हाय पैका.
- सुभाष स. नाईक
August 28, 2018
ग्राहकाला शिलाईचे कपडे देताना टेलर
वारंवार हेच करीत असतो
कुठे टाका, कुठे बटण
तो शिवतच राहतो,
परीक्षक हातातील उत्तरपत्रिका
हिसकावून घेई पर्यंत
काही खरे,कुठे चुकीचे
काही न काही तरी
परीक्षार्थी लिहीतच राहतो,
शेवटचा श्वास आहे तोपर्यंत
चूक-अचूक निशाणा
तो सैनिक साधित
शेवट पर्यंत लढत राहतो,
कोणीही शस्त्र खाली
खाली ठेवत नाही
कोणीही आशा सोडीत नाही
अंतिम श्वास तुटे पर्यंत
*****
मूळ हिंदी कविता- अलका सिन्हा
मराठी अनुवाद- विजय नगरकर
October 21, 2021
वाट कुणाची बघतो आम्हीं,
ठाऊक असते सर्वांना,
मृत्यू हा अटळ असूनी,
केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।
आगमनाचा काळ त्याचा,
कल्पनेनें ठरविला जातो,
अचूक जरी शक्य नसले,
विचार त्यावरी करीता येतो ।।२।।
जीवन म्हणती त्या काळाला,
जगणे आले मृत्यू येई तो,
जगण्यापुढे पर्याय नसतां,
सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।
तन मनाला सुख देऊनी,
जीवन काल वाढविती कांहीं,
सद्उपयोग तो केला जावा,
हीच इच्छा सदैव राही ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
March 14, 2016
आज रात्री पुन्हा एकदा
स्वप्नात माझ्या येशील का?
पुन्हा एकदा तशीच मला
आर्त साद घालशील का?
जीवनाचा एक डाव
माझ्या संगे मांडशील ना!
अमोलिक आसवांना
माझ्यासंगे देशील का?
तुझ्या माझ्या बंधनांना
भावनांत गुंफशील का?
सांग माझ्या वेदनांना
तू दिशा देशील का?
काळजाची स्पंदने
माझ्या तू होशील का?
चांदण्यात वेचलेली
फुले तू नेशील का?
माझ्यासाठी आसवांना
वाट मोकळी देशील का?
ओघळणाऱ्या मोत्यांची त्या
ओंजळ मला देशील का?
थबकणारं पाऊल तुझं
माझ्याचसाठी असेल ना?
वळून पुन्हा पुन्हा मागे
व्याकुळ-व्याकुळ बघशील ना!
प्रिये तरल लाटांवरुन
काव्य माझे होशील का?
उद्या फिरुन पुन्हा एकदा
स्वप्नात माझ्या येशील का?
-- यतीन सामंत
November 3, 2022
November 8, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti