वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अष्टलक्ष्मीस्तोत्रम् हे स्तोत्र १९७० च्या आसपास श्री श्रीनिवास वरदाचारियर स्वामी यांनी रचलेले आहे. या स्तोत्रात लक्ष्मीची विविध आठ रूपे वर्णन केली आहेत. त्याची रचना दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) (२३अक्षरे) या वृत्तात केली आहे. तथापि ती काही श्लोकात थोडीशी विस्कळित वाटते. काही ओळीत अक्षरांची संख्या कमी जास्त झालेली तसेच लघु-गुरु क्रमही बदललेला दिसतो. शब्दांची आणि कल्पनांची पुनरावृत्ती जाणवते. असे वाटते की हे सर्व श्लोक वेगवेगळ्या वेळी एक एक रचून नंतर ते एका स्तोत्राच्या स्चरूपात गठित केले असावेत.
अष्टलक्ष्मी मंदिरे मुख्यत्त्वे दक्षिण भारतात व परदेशातही अनेक ठिकाणी आहेत.
आदिलक्ष्मी
सुमनसवन्दित सुन्दरि माधवि, चन्द्रसहोदरि हेममये
मुनिगणमण्डितमोक्षप्रदायिनि, मञ्जुळभाषिणि वेदनुते ।
पङ्कजवासिनि देवसुपूजित, सद्गुणवर्षिणि शान्तियुते
जयजय हे मधुसूदनकामिनि, आदिलक्ष्मि परिपालय माम् ।। १ ।।
मराठी- सज्जन लोक जिला नमन करतात, अशा रूपमती, माधवाची पत्नी, चंद्राची बहीण असलेल्या, सुवर्णमयी, मुनिजनांचे जिला कोंदण लाभते, जी (भक्तांना) मोक्ष देते, जिचे बोलणे मृदु आणि सौम्य आहे, वेद जिची स्तुती करतात, जिचे वास्तव्य कमळात आहे, देवगण जिची पूजा करतात, जी (आपल्या भक्तांवर) सद्गुणांचा पाऊस पाडते, शांतीने परिपूर्ण असणार्या मधुसूदनाच्या भार्ये आदिलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
सुजन प्रणाम, सुरेख रमेस, शशीभगिनीस, सदा करिती
कनकमयी, मुनि-कोंदण, मुक्ति प्रदा, मृदु बोल, श्रुती स्तविती ।
कमलनिवास, करी बरसात गुणां सकलांप्रति, शांत अती
हरिसहचारिणि आदिसुधे जय हो तव राख मला जगती ॥०१॥ (सुधा – लक्ष्मी)
धान्यलक्ष्मी
अहिकलिकल्मषनाशिनि कामिनि, वैदिकरूपिणि वेदमये
क्षीरसमुद्भवमङ्गलरूपिणि, मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।
मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि, देवगणाश्रित पादयुते
जयजय हे मधुसूदनकामिनि, धान्यलक्ष्मि परिपालय माम् ।। २ ।।
मराठी- हे कलियुगातील दोषांचा नाश करणार्या, जी वेदस्वरूप आहे, जिने सर्व वेद व्यापून टाकले आहेत, जी क्षीरसागरातून बाहेर आली आहे, जिचे रूप मंगल आहे आणि जी सर्वांचे मंगल करते, जिचा निवास मंत्रात आहे आणि मंत्रच जिची प्रशंसा करतात जी कमळात रहाते आणि जिच्या पायी सर्व देव आश्रय घेतात अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धान्यलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
कलियुग दोष निवारक, वेदस्वरूप, श्रुतीमय, पावन ती
पयधिसुते, घर अम्बुज, मंत्र, तुझीच ऋचा करितात स्तुती ।
सुरगण आश्रय घेत पदी तव, पावन करण्या सक्षम ती
हरिसहचारिणि धान्यसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०२॥
धैर्यलक्ष्मी
जयवरवर्णिनि वैष्णवि भार्गवि, मन्त्रस्वरूपिणि मन्त्रमये
सुरगणपूजित शीघ्रफलप्रद, ज्ञानविकासिनि शास्त्रनुते ।
भवभयहारिणि पापविमोचनि, साधुजनाश्रितपादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, धैर्यलक्ष्मि परिपालय माम् ।। ३ ।।
मराठी- जी (भक्तांना) विजयाचे वरदान देते, जी विष्णूची (भार्या) व भ्रुगु ऋषींची मुलगी आहे, जी मंत्रस्वरूप आणि मंत्रमय आहे, देवगण जिची पूजा करतात, जी केल्या कृत्यांचे तात्काळ फळ देते, जी सर्वांचे ज्ञान वाढविते, (षट) शास्त्रे जिचे गुणगान करतात, सांसारिक जगताची भीती जी हरण करते, संतमहात्मे जिच्या चरणी आश्रय घेतात, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धान्यलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
भृगुतनया, वर दे विजया, करिती सुर पूजन, लाभ तयां
चटकन दे, हरते भवभीति, नि वाटत ज्ञान मुकुंदप्रिया ।
मुनिजन आश्रय घेत पदी, गुणगान सहा नित जे करिती (सहा- षट शास्त्रे)
हरिसहचारिणि धैर्यसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०३॥
टीप- शास्त्र या संज्ञेखाली वेदान्त, सांख्य, न्याय, योग, मीमांसा, व्याकरण, छन्द, निरुक्त, ज्योतिष अशा अनेक विषयांचा समावेश केला जातो. त्यांचा साधारणतः सहा शास्त्रे असा उल्लेख करण्यात येतो.
गजलक्ष्मी
जयजय दुर्गतिनाशिनि कामिनि, सर्वफलप्रद शास्त्रमये
रथगजतुरगपदादिसमावृत, परिजनमण्डितलोकनुते ।
हरिहर-ब्रह्म-सुपूजितसेवित, तापनिवारिणि पादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, गजलक्ष्मि परिपालय माम् ।। ४ ।।
मराठी- सर्व प्रकारच्या हाल अपेष्टांचा नाश करणारी, सर्व इच्छांची पूर्तता करणारी, रथ, हत्ती, घोडे व पायदळ यांनी सर्व बाजूंनी वेढलेली, (साही) शास्त्रांना व्यापून राहिलेली, सेवकांच्या कोंदणात (गराड्यात) असणारी, जनसामान्य तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेशही जिची पूजा करतात, जी सर्व कष्ट समाप्त करते, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये गजलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
सकळ व्यथा हरते, पुरवीत मनोरथ, व्यापुन वेद-स्मृती
रथ-हय-कुंजर पायदळासह, सेवक संघ सवे असती । (हय- घोडा, कुंजर- हत्ती)
शिव-चतुरानन-विष्णु-प्रजाजन पूजित, कष्ट तसे सरती
हरिसहचारिणि हस्तिसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०४॥ (हस्ती - हत्ती)
सन्तानलक्ष्मी
अहिखगवाहिनि मोहिनि चक्रिणि, रागविवर्धिनि ज्ञानमये
गुणगणवारिधि लोकहितैषिणि, स्वरसप्तभूषितगाननुते ।
सकलसुरासुरदेवमुनीश्वरमानववन्दितपादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, सन्ततिलक्ष्मी पालय माम् ।। ५ ।।
मराठी- जिचे वाहन सापाला पकडून उडणारा पक्षी (घुबड) आहे, सर्व जगताला जिचा मोह पडतो, जिच्या हाती चाक आहे, (संगीतातील) विविध रागांच्या द्वारा जिचा महिमा अधिकच वाढतो, जी मूर्तिमंत ज्ञानच आहे, जी विविध गुणांचा सागर आहे, सर्वसामान्य जनांचे जी हितच करते, सात सुरांनी सजलेल्या गाण्यातून जिची स्तुती केली जाते, सर्व देव, दैत्य, मुनी आणि मनुष्य प्राणी जिची पूजा करतात, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये सन्तानलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
विविध स्वरावलि वाढविती महिमा, वलयांकित हात असे
सकल जगा भुलवी, घुबडा निवडून, खरोखर ज्ञान दिसे ।
हित सकलां, गुणसागर, दैत्य मुनी सुर मानवही नमती
हरिसहचारिणि वंशसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०५॥
टीप- येथे लक्ष्मीचा उल्लेख ‘अहि-खग-वाहिनी’ म्हणजे सापाला पकडून उडणारा पक्षी (गरुड) जिचे वाहन आहे असा असला तरी, घुबड हेच तिचे वाहन आहे अशी परंपरागत मान्यता आहे व उल्लेखही आहेत.
विजयलक्ष्मी
जय कमलासनि सद्गतिदायिनि, ज्ञानविकासिनि गानमये
अनुदिनमर्चितकुङ्कुमधूसर-भूषित वासित वाद्यनुते ।
कनकधरास्तुति वैभव वन्दित, शङ्कर देशिक मान्य पदे
जयजय हे मधुसूदन कामिनि, विजयलक्ष्मि परिपालय माम् ।। ६ ।।
मराठी- हे कमळात निवास करणार्या, (आपल्या भक्तांच्या) (ब्रह्म) ज्ञानाचा विकास करून त्यांना सद्गति देणार्या, गायन स्वरूप असणार्या, दररोज पूजा केली गेल्याने सर्वांगावर पसरलेल्या कुंकवाने सुशोभित झालेल्या, सुमधुर वाद्ये वाजवून जिची पूजा केली जाते, श्रीमद शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्रात जिच्या पावलांची प्रशंसा केली आहे, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये विजयलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
कुमुद निकेतन, गानस्वरूप, नि ज्ञानविकास करून गती
सकलजनां, तनु पिंजर पूजित, वाद्य स्वरे मधु गुंजत ती ।
कनकधार स्तवनी गुरु शंकर वंदुन पाय स्तुती करिती
हरिसहचारिणि सिद्धिसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०६॥
विद्यालक्ष्मी
प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि, शोकविनाशिनि रत्नमये
मणिमयभूषित कर्णविभूषण, शान्तिसमावृत हास्यमुखे ।
नवनिधिदायिनि कलिमलहारिणि, कामित फलप्रद हस्तयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, विद्यालक्ष्मि परिपालय माम् ।। ७ ।।
मराठी- देवतांची देवी असलेल्या, भारती, भृगुकन्या भार्गवी, दुःखांचा नाश करणार्या, जिला तर्हे तर्हेची रत्ने शोभा देतात, जिच्या कर्णभूषणांना रत्ने जडवलेली आहेत, जिचा चेहर्यावर शांतता पसरलेली असून ती हसतमुख आहे, जी आपल्या भक्तांना नवनिधी प्रदान करते, कलियुगातील दोष हरण करते, आपल्या वरद हाताने इच्छिलेली फळे देते, (हे भक्तांनो) तिला नमस्कार करा. अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये विद्यालक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
भृगुतनया भवदोष हरी, वर देत, मणी सजले भवती
हसतमुखावर शांति विराजत, कुंडल संग मणी झुलती ।
नवनिधि दान नि दुःख विनाश, प्रणाम करू सुर देविप्रती
हरिसहचारिणि ज्ञानसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०७॥
टीप- धर्मशास्त्रानुसार या श्लोकात उल्लेखलेले नवनिधी खालील प्रमाणे आहेत.
१. पद्म निधि, २. महापद्म निधि,३. नील निधि, ४. मुकुंद निधि, ५. नंद निधि, ६. मकर निधि, ७. कच्छप निधि, ८. शंख निधि आणि ९. खर्व / मिश्र निधि. यातील क्र. १ ते ८ निधी पद्मिनी विद्येने साध्य होतात.
१. पद्म निधिमुळे मनुष्य सात्विक गुण युक्त होतो. त्याची संपदाही सात्विक असून पिढ्या न पिढ्या टिकते.
२. महापद्म निधि - पद्म निधि प्रमाणे सात्विक असतो आणि त्याचा प्रभाव सात पिढ्यांपलिकडे रहात नाही.
३. नील निधि मध्ये सत्व आणि रज गुणांचे मिश्रण असते व त्याची प्राप्ती व्यापारा द्वारे होते.
४. मुकुंद निधि मध्ये रजोगुण अधिक प्रबळ असतो व त्याला राजस स्वभावाचा निधी म्हटले जाते.
५. नंद निधिमध्ये रज आणि तमो गुणांचे मिश्रण असते.
६. मकर निधीला तामसी निधि असे म्हटले जाते. ही व्यक्ती अस्त्रे आणि शस्त्रे यांचा संग्रह करणारी व पराक्रमी असते.
७. कच्छप निधि असणार्या व्यक्ती आपली संपत्ती गव्हाणीतील कुत्र्याप्रमाणे लपवून ठेवतात. त्याचा वापर करीत नाहीत व इतरांनाही करू देत नाहीत.
८. शंख निधि असणार्या व्यक्ती धनाचा वापर फक्त स्वतःसाठीच करतात.
९.खर्व निधि असणार्या व्यक्ती या वरील सर्व प्रकारांचे मिश्रण असतात व त्यांच्याबद्दल अंदाज बांधणे अवघड जाते.
धनलक्ष्मी
धिमिधिमि धिंधिमि धिंधिमि धिंधिमि, दुन्दुभि नाद सुपूर्णमये
घुमघुम घुंघुम घुंघुम घुंघुम शङ्खनिनाद सुवाद्यनुते ।
वेदपुराणेतिहास सुपूजित, वैदिकमार्ग प्रदर्शयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, धनलक्ष्मि परिपालय माम् ।। ८ ।।
मराठी- ढोलाच्या धिमिधिमी अशा आवाजात जी पूर्णपणे गुरफटून गेली आहे, शंखाच्या घुम घुम अशा आवाजाने जिची पूजा होते, वेद पुराणे आणि इतिहास यांद्वारे पूजा होणारी ही देवी भक्तांना वैदिक मार्ग दाखवते, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धनलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
धिमिधिमि धिंधिम ढोल ध्वनी तुज वेढुन टाकत पूर्णपणे
घुमघुम घुंघुम शंख ध्वनी तुज पूजत काय न त्यात उणे ।
श्रुति इतिहास पुराणहि पूजति, ने जन सगळे वेदपथी
हरिसहचारिणि वित्तसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०८॥
फलश्रुती
अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।
विष्णुवक्ष:स्थलारूढ़े भक्तमोक्षप्रदायिनी॥
शंखचक्रगदाहस्ते विश्वरूपिणि ते जय: ।
जगन्मात्रे च मोहिन्यै मंगलम् शुभ मंगलम्॥
मराठी- इच्छा (पूर्ती) स्वरूपात असणार्या, वर देणार्या, श्रीविष्णूच्या वक्षस्थळी विराजमान असलेल्या, भक्तांना मुक्ती देणार्या, हाती शंख चक्र गदा धारण करणार्या, सर्व विश्वाला व्यापून टाकणार्या अष्टलक्ष्मी तुला नमस्कार करतो. तुझा विजय होवो. या जगताची आई असलेल्या मोहिनी तू आमचे कल्याण, मंगल कर.
इच्छापूर्तीस्वरूपी तू, होसी सर्वां वरप्रदा
भुजांतरी हरीच्या तू, होसी भक्तांस मोक्षदा ।
शंख चक्र गदा हाती, जगा सर्वत्र व्यापूनी
सकलांचे भले साधी, माता जगतास मोहिनी ॥
॥ इति श्रीअष्टलक्ष्मी स्तोत्रं सम्पूर्णम् ॥
-- धनंजय बोरकर.
९८३३०७७०९१
September 19, 2022
गेल्या काही दिवसांत आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. धनगर समाजाने अनुसूचित जमातीत आरक्षण मागितले आहे. त्याला आदिवासींनी विरोध केला आहे. वंजारी समाजानेही आरक्षणात तब्बल आठ टक्के वाढ मागितली आहे. म्हणजे सध्याचे दोन मिळवता दहा टक्के आरक्षण त्यांना हवे आहे. नाभिक समाजानेही जळगावात सर्वसमावेश प्रमुख समिती स्थापून अनुसूचित जाती- जमातीत आरक्षण मागितले आहे. या समाजांची आरक्षणाची मागणी वरवर बघता योग्यही आहे.
August 4, 2014
या काळात संख्येने कमी असलेल्या पोलिसांवर प्रचंड दडपण येते. या दडपणापायी बरेच पोलिस आत्महत्या करतात आणि बऱ्याच पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडते. सामान्य नागरिकही त्यातुन सुटत नाहीत.
October 21, 2007
खरतर, साउथ आफ्रिकेसंबंधी लिहायचे म्हणजे थोडक्यात माझेच वर्णन करायचे, असा थोडाफार प्रकार होण्याची शक्यता आहे. अर्थात, मी थोडीफार तठस्थ वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पण, काही ठिकाणी, माझा आणि माझ्या मतांचा उल्लेख अनिवार्य ठरावा. तेंव्हा, तेव्हढी सवलत,तुमच्याकडून अपेक्षित आहे.
August 19, 2018
रामायणातील खलनायक म्हणून रावणाला ओळखले जाते. रावणाची ही एक वेगळीच ओळख वाचा
November 7, 2016
एप्रिल १७, २०१६ च्या लोकसत्ता-लोकरंग मधील मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय ?’ हा स्त्रियांच्या मंदिर-प्रवेशासंबंधीचा लेख वाचला ; व ८ मे, २०१६ च्या लोकरंगमधल्या. त्या लेखावरील प्रतिक्रियाही वाचल्या. आठलेकरांचा लेख उत्तम आहे. मात्र, आठलेकरांचा लेखातील कांहीं विचार वाचून सखेद आश्चर्य वाटलें. तेंच प्रतिक्रियांचेंही. या विषयावर अधिक-खोलवर विचार व्हायला हवा होता, असें मला वाटतें.
आठलेकरांच्या कांहीं वाक्यांना (statements) दुजोरा द्यायलाच हवा. उदा. ‘स्त्रीची दुय्यमता या धर्मशास्त्रांनी वारंवार अधोरेखित केली’ ; ‘लिंगभेदावर आधारित असलेल्या व्यवस्थेला निग्रहानें नकार दिलाच पाहिजे’. अशा स्टेटमेंट्स बद्दल त्यांच्याशी मतभेद असण्याचें कारणच नाहीं. प्रश्न आहे तो, त्यांनी मंदिरप्रवेशाच्या बाबीचा जो अर्थ लावला आहे, त्याबद्दल. मात्र, कांहीं मतभेद असले तरी, मी त्यांना ‘पुरुषधार्जिणी’ असें अभिधान देणार नाहीं.
पुढे जाण्यापूर्वी मी हें स्पष्ट करूं इच्छितो की, मी कर्मकांड मानीत नाहीं, तसेच मी निधर्मी व बेसिकली निरीश्वरवादी आहे, आणि मी स्त्री-पुरुष समानता मानतो. हें स्पष्ट करायचें कारण म्हणजे, मला देव-धर्म-पुजारी वगैरेंची बाजू मांडायची नाहीं , किंवा पुरोगामी-प्रतिगामी या वादातही शिरायचें नाहीं. थोडक्यात म्हणजे, ‘आय् हॅव नो पर्सनल ऍक्स टु ग्राइंड’ . तसेच, हेंही स्पष्ट करायला हवें की, आठलेकर यांनी उल्लेखलेल्या तृप्ती देसाई व केवडकर यांच्याविषयी, त्यांच्या विविध विषयांवरील मतांविषयी, आणि त्यांच्या आपसातील-संबंधांविषयी मला कांहींही माहिती नाहीं. त्याचप्रमाणें, इलेक्ट्रॉनिक मीडियांसंबंधी कांहींही मतप्रदर्शन मला करायचें नाहीं. अशा गोष्टींमध्ये शिरल्यास, मूळ मुद्दा बाजूलाच पडेल. त्यामुळे त्या सगळ्यात न शिरतां, मी सरळ, आणि केवळ, मूलभूत मुद्यालाच स्पर्श करत आहे.
आपण हें ध्यानात ठेवायला हवें की, शनि-शिंगणायुर हें फक्त, एक ‘पूजास्थळ’ आहे ; पण तिथें आहे तशीच स्थिती त्र्यंबकेश्वर, साबरीमाला , हाजी अली वगैरे अनेक ठिकाणीही होती व आहे. अहो, हिंदूधर्मात, एखादी पूजा जर जोडप्यानें करायची असेल, व पत्नी तिथें नसेल, तर पती तिच्या स्थानीं ‘सुपारी’ किंवा अन्य कांहींतरी ठेवून पूजा करूं शकतो (जसें, उत्तररामचरित्रात, रामानें , सीतेची मूर्ती ठेवून केलेलें आहे) . पण हा,अधिकार स्त्रीला नाहीं. मुस्लिमांमध्ये, पुरुष तीनदा ‘तलाक’ असें म्हणून ( हल्ली तर ई-मेल पाठवूनही) पत्नीला डायव्होर्स देऊं शकतो, पण अर्थातच, हा हक्क पत्नीला उपलब्ध नाहीं. खरें तर, स्त्रियांना मंदिर-प्रवेशाचा अधिकार मिळण्याचा मूळ प्रश्न, धर्माशी संबंधित नसून स्री-पुरुष-समानतेशी निगडित आहे. मंदिरात किंवा त्याच्या गर्भागारात प्रवेश मिळण्यासाठी लढणें, किंवा हाजी-अली दर्ग्यात प्रवेशासाठी झगडणें, म्हणजे स्त्री-पुरुष-समानतेसाठी झगडणें . मान्य आहे, अशा अनेक बाबी आहेत, जिथें समानतेसाठी लढा द्यायला हवा . तसा, अनेक-अंगीं, अनेक-पदरी लढा चालूच आहे, असें मला वाटतें. एके काळी, ‘तथाकथित- प्रगत’, अशा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्येसुद्धां महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यासाठी महिलांना लढा द्यावाच लागला. १९३० च्या सुमारास त्यांना तो हक्क प्राप्त झाला. महाराष्ट्रात, स्त्री-शिक्षणासाठी महात्मा फुले, महर्षि कर्वे यांना लढा द्यावा लागला. हल्लीहल्लीच, टेनिसच्या क्षेत्रात, ग्रँड-स्लॅम स्पर्धांमध्ये स्त्रियांना मिळणारी बक्षिसाची रक्कन ही पुरुषांएवढी असायला हवी, या समानतेसाठी, मार्टिना नव्हरातिलोव्हानें लावून धरलें. हाही स्त्री-पुरुष-समानतेच्या लढ्याचाच एक भाग आहे. तसेंच, मंदिरप्रवेश हाही या समानतेच्या लढ्याचा एक भागच आहे. आणि, आपण तसेंच त्याच्याकडे पहायला हवें.
मंदिरप्रवेशासाठी लढणें या गोष्टीचा, ‘देव मानणें’ किंवा ‘धर्म मानणे’ आवश्यक आहे , असें नाहीं. साने गुरुजी हे समाजवादी होते. ही सर्व मंडळी निरीश्वरवादी, निधर्मी असतात. तरीही, साने गुरुजींनी १९४८-१९४९ च्या सुमारास, पंढरपुरच्या विठ्ठल-मंदिरात हरिजनांना (दलितांना) प्रवेश मिळावा म्हणुन लडा दिला, प्राणांतिक उपोषणही केलें. स्पष्ट आहे की, त्यांचा हा लढा सामाजिक-असमानतेशी निगडित होता. आठलेकर यांच्या, ‘हा हक्क नव्हता म्हणून स्त्रिया आयुष्यातल्या कोणत्या मोठ्या संधीपासून वंचित राहिल्या आहेत?’ ; ‘गाभार्यात प्रवेश हवा या मागणीत कोणती धर्मसुधारणा आहे?’ , या स्टेटमेंटस् ‘मिसप्लेस्ड’ आहेत, हें साने गुरुजींच्या उदाहरणावरून स्पष्ट आहे. त्यावर अधिक टिप्पणी करायची आवश्यकता नाहीं.
वैदिक काळात स्त्रियांना यज्ञ करण्याचाही अधिकार होता. त्या काळानंतर, शतकानुशतकें स्त्री पुरुषांमध्ये असमानताच होती, व तें अयोग्यच आहे. मध्य-युगात तर ती दरी भयानकच होती. पण १९ व्या – २०व्या शतकात स्त्री-पुरुष-समानतेच्या हक्कासाठी लढाईची ठिणगी पडली, आणि ती आतां, भिन्नभिन्न ठिकाणीं, विविध प्रश्नांच्या माध्यमांमधून, अनेक अंगांनी, प्रस्फुटित होत आहे ; मग तो लढा मंदिरप्रवेशाचा असो, लोकसभेत किती टक्के जागा स्त्रियांसाठी रिझर्व असाव्यात हा असो, मुलींच्या शिक्षणाचा असो, स्त्री-भ्रूणहत्येचा असो, सुनांवर अत्याचाराचा व सुनांना जाळण्याचा असो, ‘खटना’ ( female circumcision) चा असो, ‘Right to Pee’ चा असो, विनयभंगाचा असो, ‘मॅरिटल रेऽप’ चा असो, तलाकचा असो, पोटगीचा असो, हँडिकॅप्ड व चॅलेंज्ड स्त्रियांच्या संरक्षणाचा असो, किंवा अन्य कांहीं असो. प्रत्येक मुद्दयावर लढा हा व्हायलाच हवा, आणि सुजाण नागरिकांनी त्याला पाठिंबा द्यायलाच हवा. समाजात दुसरे अनेक प्रॉबलेम्स आहेत, म्हणून एखाद्या मुद्दयवर लढा द्यायचा नाहीं, असें शक्य आहे काय ? साने गुरूजींना नक्कीच माहीत होते की विठ्ठल-मंदिरात प्रवेशासाठी लढा देऊन दलितांचे आर्थिक प्रश्न कांहीं संपणार नव्हते. पण, जिथे-जिथें असमानता आहे, तिथें-तिथें लढा द्यायला हवा, या भावनेनेंच त्यांनी विठ्ठलमंदिराचा लढा दिला. ते तो लढा जिंकले ; स्त्रियाही पूजास्थळांचे कांहीं लढे जिंकत आहेत, कांहीं नाही. पण, असेंच असतें. कांहीं कांहीं लढे जिंकले जातात, कांहीं हरले जातात ( उदा. १८५७ चें स्वतंत्र्ययुद्ध). पण ठिणगी पडली की, तिच्या शॉर्ट-टर्म परिणामांबरोबरच, दूरगामी परिणामही असतात, आणि त्यांचाही विचार व्हायला हवा. तरच अशा लढ्यांचें महत्व अधोरेखित होईल. साथ देतां आली तर उत्तमच ; पण तें जमत नसल्यास, किमान, ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ इतपत तरी सपोर्ट करायला हरकत नसावी.
- सुभाष स. नाईक
सांताक्रूझ, मुंबई
M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
May 8, 2016
इंग्लंडमध्ये १९९० साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्याने यजमानांबरोबरच्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक फटकावण्याचा मानही सचिनच्याच नावावर आहे. १९९९ साली सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करत त्याला भेटीसाठी बोलावले होते.
November 15, 2021
साधारणत: सुट्ट्यांचे दिवस जवळ यायला लागले की टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या ऑफिसेसमध्ये गर्दी वाढू लागते. आणि अर्थातच सुनियोजित ट्रॅव्हल ऑपरेटरकडे आपला कल जातो.
January 14, 2023
जरी परिपूर्ण वर्णनाची अडचण असली तरी जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई जगदंबेच्या एकेका गोष्टी चे वर्णन करीत आहेत.
February 7, 2020
या संसारातून तारून नेणाऱ्या भगवंताच्या स्वत:च्या आगळ्यावेगळ्या संसाराचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…
October 10, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti