(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आल्हाददायक व आरोग्यदायक टॉमेटो

    लालबुंद दिसणारा टोमॅटो हा मनाला आल्हाददायक व शरीरासही आरोग्यदायक आहे.

    टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे. टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. संपूर्ण जगात बटाटय़ाखालोखाल जास्त पिकवले जाणारे टोमॅटो हे लोकप्रिय पीक आहे.

    औषधी गुणधर्म
    कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर आम्ल गुणात्मक, रुचकर, हृदय, लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.

    उपयोग
    ० आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.
    ० टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कबरेदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.
    ० अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
    ० टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. तसेच टोमॅटोची मूठभर पाने कुस्करून १ लिटर पाण्यात उकळावीत व हे पाणी दिवसातून तीन वेळा जेवण्यापूर्वी अर्धा कप प्यावे. यामुळे दृष्टीला तेज प्राप्त होते.
    ० रक्ताची कमतरता (अॅयनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
    ० टोमॅटोच्या १ कप रसामध्ये ‘क’ जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.
    ० टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अॅयसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.
    ० पिकलेल्या टोमॅटोचा ताजा रस लहान मुलांना २ ते ३ वेळा दिल्यास मुले निरोगी, बलवान व सुदृढ होतात.
    टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.

    सावधानता
    टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. शारदा महांडुळे

      March 14, 2017


  • अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग १

    ग्रामीण, निमग्रामीण भागातल्या लोकांचा आणि निसर्गाचा जवळचा संबंध असावा यात काही नवल नाही. या निसर्गाच्या सान्निध्यातूनच पाळीव तसंच वन्य पशु-पक्षी जगत हे या जीवनाचं एक महत्वाचा घटक बनून गेलेले असतं. कृषीउद्योग आणि पशु संवर्धन हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे, ग्रामीण जगतामधे पशु संवर्धनाला मानाचं स्थान असावं हे उघडच आहे. परंतु एकंदरीतच अमेरिकन जीवन प्रणालीमधे निसर्गाला आणि त्या अनुशंगाने पशु पक्षांच्या संवर्धनाला खूपच महत्व आहे. या संवर्धित नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कॅंपिंग, हायकिंग, हंटिंग, फिशिंग अशा विविध छंदांसाठी करून घेऊन, लक्षावधी अमेरिकन्स आपलं जीवन निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करून समृद्ध करून घेत असतात.

    या लोकांचं शिकार, मासेमारी आणि एकंदरीतच वन्यप्राणी जीवनासंबंधित छंदांचं (फोटोग्राफी, वन्यप्राणी अवलोकन वगैरे) वेड किती जबरदस्त आहे याची कल्पना २००६ च्या एका अहवालावरून येते. त्या साली ८७.५ दशलक्ष अमेरिकन्सनी या छंदापायी १२,२०० कोटी (१२२ बिलीयन) डॉलर्स खर्च केले. यापैकी ३० दशलक्ष लोकांनी आपला मासेमारीचा शौक पुरा केला, १२.५ दशलक्ष लोकांनी आपली शिकारीची हौस भागवून घेतली तर ७१.१ दशलक्ष लोकांनी वन्यप्राणी जीवनाचं अवलोकन, फोटोग्राफी असले छंद पुरे करून घेतले.

    शिकारीच्या आकारमानानुसार अमेरिकेतल्या शिकारीचे तीन प्रकार होतात.

    मोठ्या प्राण्य़ांची शिकार – यात मुख्यत: हरीण, एल्क (आपल्याकडच्या बारशिंग्यासारखं हरीण), अस्वल आणि जंगली टर्कीचा समावेश होतो. यात हरणांची शिकार करणारे १०.१ दशलक्ष, आणि टर्कीची शिकार करणारे २.६ दशलक्ष हे संख्येने सर्वाधिक.

    लहान प्राण्यांची शिकार – यात ससे, खारी, फेसंट्स (जंगली कोंबड्या) आणि क्वेल (छोट्या रानकोंबड्यांचा प्रकार) हे मुख्यत्वे येतात.

    स्थलांतरित पक्षांची शिकार – यात प्रामुख्याने ऋतुमानानुसार स्थलांतर करणार्‍या बदकं, गीज, कबुतर अशा पक्षांचा समावेश होतो.

    गावाकडल्या बर्‍याच लोकांसाठी शिकार हा निव्वळ एक छंद न रहाता दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भागच असतो. गावातल्या फार्मस्‌वर जावं तर बंदुका म्हणजे आयुष्याचा एक घटकच वाटायला लागतात. जनावरांच्या गोठ्याच्या दरवाज्याआड, गॅरेजमधे, पिक-अप ट्रकच्या मागच्या अंगाला, बंदुका कायमच पडलेल्या असतात. उभ्या पिकात घुसणारी हरणं, शेळ्या-मेंढ्या किंवा वासरांनाच ठार करणारे कायोटी किंवा क्वचित लांडगे, परसदारात येऊन घरातल्या कुत्र्या मांजरांवर हल्ले करणारी अस्वलं किंवा बागेतल्या भाजी पाल्याची नासधूस करणारे ससे किंवा रकून्स बघितले की या बंदुकांचा उपयोग ठायी ठायी कसा होत असेल, हे जाणवल्याशिवाय रहात नाही. उगाच नाही आज अमेरिकेत २५० दशलक्ष बंदुका आहेत.

    या सार्‍या शिकार, मासेमारी आणि एकंदरीतच वन्यजीवनाच्या सान्निध्याच्या ओढीचं मूळ, सतराव्या- अठराव्या शतकातील, अमेरिकेचा गोर्‍या लोकांना अनभिज्ञ असा अफाट विस्तार धुंडाळून, हा खंडप्राय देश पायतळी घालणार्‍या धाडशी बहाद्दरांमधे सापडतं.

    क्रमशः ....

    -- डॉ. संजीव चौबळ

      October 17, 2016


  • लालदिवा नव्हे, माज उतरायला हवा !

    लालदिव्याचं आकर्षण, वलय आणि दरारा आपल्या नेत्यांनाही चांगलाच समजला. त्याचं अनुकरण सरकारी बाबूंनी केले. अधिका-यांनीही आपल्यासाठीही लाल दिव्याची विशेष सोय करून घेतली. लाल दिव्याचं स्वप्न पाहून अनेक मुलं स्पर्धा परिक्षेच्या स्पर्धेत उतरली. सामान्य माणसांपेक्षा वेगळे अधिकार, नव्हे तर जगण्याचा खराखुरा अधिकार म्हणून लाल दिव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बनला.

      April 23, 2017


  • गुणकारी वनस्पती जेष्ठमध !!

    प्राचीन भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये लाखो वनस्पतींचा वापर होत आला, परंतु पाश्चात्य एलोपेथिक औषधांच्या भडीमाराने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला गेला. भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे, भारताची अर्थव्यवस्था ही शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. पारंपारिक पद्धतीने केला जाणारा कृषिव्यवसाय आज आधुनिकतेकडे झुकलेला दिसतो. यांत्रिक शेती-अवजारांच्या वापराबरोबरच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भारतीय शेतीत उत्पन्नाचे प्रमाण वाढत असले तरी, जागतिक मुक्त अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने व्यावसायिक स्वरूप देणे आवश्यक आहे.

    विज्ञानाच्या प्रगतीबरोबर आजारांचेही प्रमाण वाढले, त्यामुळे औषधांची मागणी वाढली. आवश्यकते ऐवढे औषधी-वनस्पतींचे उत्पादन होत नसल्याने औषधांचा मोठ्या प्रमाणत काळाबाजार होत आहे. पर्यायाने ग्राहकांची फसवणूक होते. ह्या सर्व बाबींचा विचार केल्यास औषधी-वनस्पतींच्या शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

    औषधी निर्मितीमध्ये जेष्ठमध या वनस्पतीची, भारतातील मागणी उत्पादनापेक्षा जास्त असल्याने दर वर्षाला दहा ते बारा हजार टन जेष्ठमध आयात करावा लागतो. जेष्ठमधाचे उत्पादन वाढविल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता लाभेल तसेच परकीय चलनही वाचविता येईल. जेष्ठमधासंदर्भात प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पुढील उल्लेख आढळतात -

    १) " यष्टी हिमा गुरुः स्वाव्दी,चक्षुष्या बलवर्णकृत् |
    सुस्रीग्धा शुकला केश्या स् वर्या पित्तानिलास्राजित् ||
    ब्रणशोथविषच्छर्दी तृष्णाग्लानिक्षयापहा | " (भावप्रकाश)

    २) " या वेदना शश्त्रानिपातजाता त्रीव्र शरीरं प्रदुनोतिजन्तोहः |
    घृतेन स शान्ति मुपैति सिक्ता कोष्णेन यष्टीमधुकान्वितेन् || " (सुश्रत)

    असे विविध उल्लेख असलेल्या ह्या वनस्पतीची नवे पुढीलप्रमाणे आहेत -

    कुळनाव - Papilionaceae,

    शास्त्रीय नाव / Latin Name - Glycyrrhiza Glabra Linn,

    संस्कृतनाव - मधुयष्टिका, यष्टीमधु, मधुक, मधुरस

    मराठी नाव - जेष्ठमध, जेष्ठीमध

    हिंदी नाव - मुलेठी, मधुयष्टिका

    English Name - Liquorice root

    पाच ते सात फुट वाढणारे जेष्ठामधाचे वृक्ष बहुवर्षीय असून, दोन ते तीन वर्षे उत्पादण देते. ह्याच्या मुळांचा औषधी निर्मितीत उपयोग होतो, जास्तीत-जास्त वनस्पती विदेशातून आयात केली जाते. ह्या वनस्पतीला उष्ण व समशीतोष्ण हवामान उपयुक्त असते, फेब्रुवारी किवा जुलै महिन्यात जेष्ठमधाची लागवड केली जाते.

    रासायनिक घटक - जेष्ठमधाच्या मुळांमध्ये ग्लेसराईझिन व ग्लीसराईजीक एसिड असते, तसेच सुक्रोज, ग्लुकोज, स्टार्च, वसा, प्रोटीन, डेक्स्ट्रोज, रेझिन, अस्पराईजीन, इस्ट्रोजेन आणि एक उडनशील तेल असते.

    गुणधर्म - वात-पित्तशामक, कंडूघ्न, चर्मरोग नाशक, केश्य, शोथहर, कंठ्य, चक्षुष्य, शुक्रवर्धक, बल्य, ज्वरघ्न, आदी गुणांनी युक्त.

    उपयोग - डोकेदुखी, नेत्रविकार, स्वरभंग, सर्दी, खोकला, अल्सर, घसा व घशाचे रोग, पोटाचेविकार, श्वासनलिका विकार, तृष्णा विकार, हृदयरोग, अपस्मार, दुग्धवर्धन (दुध वाढीसाठी), यकृत विकार, शुक्र वाढीसाठी, हिचकी (उचकी), रक्त वमन, लघवीचे विकार, उन्हाळी, रक्त विकार, प्रदर, रक्ताची कमतरता (अनिमिया), पार्किनसन्स, मज्जातंतू विकार, क्षय, रक्तमुळव्याध, जखम, फोडे फुन्सी अशा विविध आजारांवरील औषधी निर्मितीत जेष्ठमधाचा वापर होतो.

    याशिवाय अन्नपदार्थ, पानमसाला, तंबाखू, चाकलेट व तत्सम पदार्थ तसेच बियर ह्यांना गोडी निर्माण करून स्वादिष्ट बनविण्यासाठी जेष्ठमधाचा वापर होतो.

    अशी बहुउपयोगी असलेले ही वनस्पती शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी वरदान ठरणारी आहे. सावलीत वाळवलेल्या जेष्ठाधाच्या मुळ्या १०० ते १५० रुपये प्रती किलो दराने बाजारात विकल्या जातात, ह्या वनस्पतीचे दर एकरी २० ते २५ क्विंटल एवढे उत्पादन मिळते. लागवड करण्यासाठी ' हरियाणा मुलहटी नंबर-१, एम.एच.-१, इसी-२१९५० ह्या जाती उपयुक्त आहेत.

    आयुर्वेदाची अशी अप्रतिम देणगी असलेली ही वनस्पती भारतीय शेतकऱ्यांना नवसंजीवनी ठरू शकते.

    प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, 'भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत. महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे. प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करायोगच ठरेल.

    -- नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

      December 26, 2015


  • अमेरिकेतील राष्ट्रीय हॉट फज संडे दिवस

    आज दिनांक २५ जुलै ! आज युनायटेड स्टेट्स (US) मध्ये National Hot Fudge Sundae Day हा दिवस साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊ ह्या आगळ्यावेगळ्या दिवसाचा इतिहास!

      July 25, 2020


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सोळा

    या अन्नपचनातून आणखी एक स्फोटक पदार्थ तयार होतो. जो दिसत नाही, पण आपले अस्तित्व सतत दाखवत असतो,

    ज्याच्यामुळे दवाखान्यात येणारे नव्वद टक्के रूग्ण हैराण झालेले असतात,

    जो आजपर्यंत कोणत्याही पॅथाॅलाॅजी लॅबला दिसलेला नाही, कंप्युटरला समजलेला नाही, एम आर आय ला उमजलेला नाही. स्कॅनमशीन शोधू शकली नाही.

    जो आपले कर्तृत्व तर दाखवतो, पण स्वतः मात्र नामानिराळा रहातो.

    ज्याच्या दबावाखाली भले भले अवयव गुपचूप बसून रहातात. आपले कामही करू शकत नाही, असा दरारा असणारा,

    ग्रंथात, ज्याच्या नावावर, ऐशी रोगांची भलीमोठी लिस्ट लागलेली आहे असा,

    वाॅन्टेड असे फर्मान येऊनही त्याला कोणीही पकडू न शकलेला,

    जो स्वतः विकृत होऊन, कफाला पित्ताला हलवून टाकण्याची क्षमता असलेला,

    स्वतःची वेगळी स्रोतस यंत्रणा नसतानाही, इतर प्रस्थापित यंत्रणेचा वापर करत, सर्व स्रोतसांमधे भरून रहाणारा,

    विकृत झालेल्या पित्तामुळे बिघडलेला अग्नि हा ज्याचा पितामह म्हणजे आजोबा, आणि त्यामुळेच विकृत झालेल्या कफाचा परिणाम म्हणून जन्माला आलेले 'आमजन्य अपचन' हा ज्याचा पिता आहे, ज्याच्यामुळे अनेक अन्य रोगांना जन्म मिळालेला असतो, किंवा जो त्यांचा जन्मदाता असतो,

    शोषून घेऊन सुकवून टाकणे हा दुर्गुण असलेला, अत्यंत चंचल स्वभावाची जोड मिळाली की, समोरच्यातला स्नेह आटवून टाकणारा,

    पाण्यामुळे वाढणारा, पाण्यात काम करण्याऱ्या मंडळींना लवकर पकडणारा, थंड गुणाचा जवळचा मित्र असणारा,

    ज्याच्या अस्तित्वामुळे पोटाला चारी बाजूला सारखीच तडस लागते, हा भौतिकशास्त्रातील नियम सिद्ध करणारा,

    ज्याच्याकडे स्त्री पुरूष वृद्ध बालक असा भेद नाही, कोणताही वांशिक, जातीय, धार्मिक भेदभाव न मानणारा,

    हाडे ठिसूळ करण्यात एक नंबर, चरबी एका जागी साठवून ठेवण्यात एक नंबर, मळाला सुकवून टाकून विबंध निर्माण करण्यात एक नंबर, मनात आलं तर अग्निला भडकवून टाकून, एका ठिकाणी लागलेली आग दुसऱ्या ठिकाणी नेऊन, लावालावी करण्यात एक नंबर असलेला,

    श्रम केले नाही, पोट हलवले नाही, पोट दाबले गेले नाही, पोट पिळले गेले नाही, तर जिथे आहे तिथे, तस्साच पडून रहाणारा,

    बहुतेक वेळा आभासी ह्रदयरोगाची लक्षणे दाखवणारा, आणि प्रचंड भीती उत्पन्न करणारा,

    क्षणात इथे तर क्षणात तिथे असा लपाछपीचा खेळ खेळत स्नायुंना कमजोर करून टाकणारा,

    काय खाल्लेतर बरे होईल, काय नाय खाल्लेतर बरे होईल, या द्वंद्वात कायम ठेवणारा, काहीही खाल्लेतरी आणि काही नाही खाल्लेतरी जे करायचंय ते करणारा,

    एवढं असूनही स्वतंत्रपणे शास्त्रीय नावाचं बारसं न झालेला, त्यामुळे स्वतंत्र व्याधी म्हणावा की नाही, इथपर्यंत वैद्यांची चर्चासत्रे घडवणारा

    वन अॅण्ड ओन्ली वन
    गॅस
    गॅस
    आणि
    गॅस

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    31.03.2017

      March 31, 2017


  • श्री दत्तसंप्रदाय – विविध पंथ आणि परंपरा

    श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपराही मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

    श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत.

    श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे.

    निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे.

    दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. ‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच दत्त संप्रदायाची भूमिका मांडण्यात आली आहे.

    श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. या परंपरांची या माध्यमातून आपण माहिती घेऊ या.

    श्रीपाद श्रीवल्लभ, पीठापूर, आंध्रप्रदेश

    कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.

    श्रीनृसिंह सरस्वती स्वामी

    हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानला जातो. कारंजा (लाड) जि. अकोला या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते.

    गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे - त्यांनी जन्मत:च ॐकाराचा उच्चार केला. परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्णसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिद्धसरस्वती. या सर्वानी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्रीनृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.

    श्री स्वामी समर्थ

    श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य श्री यशवंत महाराज देवमामलेदार, कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.

    श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री

    ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्रीदत्तात्रेयांची प्रेमभक्ती हे या परंपरेचे मुख्य सूत्र आहे. श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. या परंपरेबाबत ‘अनादिसिद्ध श्रृतीसंमत संप्रदाय’ असा उल्लेख श्रीपंतमहाराजांनी केला आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. विषयवैराग्य, सहजानुभव, बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग, नि:स्वार्थ कर्म, संचित, अहंकारनाश, समरसता, सद्गुरुप्रीती, अद्वैतभक्ती इ. अवधूतपंथाची मुख्य वैशिष्टय़े आहेत. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.

    टेंबेस्वामी

    श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुन:स्र्थापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये २४ चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला. आणि त्यांचे पुनज्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते. त्यांच्याजवळ एक दत्तमूर्ती होती आणि ती त्यांच्याशी बोलत असे, असे सांगितले जाते. आचरणशुद्धता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. कारंजा, कुरवपूर, पिठापूर अशी अत्यंत महत्त्वाची श्रीदत्तक्षेत्रे त्यांनी प्रकाशात आणली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला. दत्त माहात्म्य, दत्तपुराण इ. अनेक मौलिक ग्रंथांबरोबर त्यांनी सर्वाना आणि विशेषत: महिलांना पारायण करण्यासाठी ‘द्विसाहस्त्री गुरुचरित्र’ आणि ‘सप्तशती गुरुचरित्र’ असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. आबालवृद्धांना प्रापंचिक संकटातून सोडवणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना त्यांनी केली आहे. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. दीक्षित स्वामी, गांडामहाराज, गुळवणी महाराज, नानामहाराज तराणेकर, सीताराम महाराज इ. अनेक शिष्यांनी टेंबे स्वामींची परंपरा फार मोठय़ा प्रमाणामध्ये वाढवली आहे. श्रीरंगावधूत महाराज या त्यांच्या शिष्याने गुजरात राज्यामध्ये दत्त संप्रदायाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणावर केला आहे.

    श्रीमाणिकप्रभू

    बिदरजवळील हुमनाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला ‘सकलमत’ परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगितकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर येत असतात. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्रीमाणिकप्रभू महाराजांकडे येऊन राहिल्याचे उल्लेख आहेत. श्रीमाणिक प्रभूचे कार्य अत्यंत अलौकिक असे होते. त्यांच्यानंतर श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमरतड माणिकप्रभू यांनी या संप्रदायाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. दक्षिण भारतामध्ये मुख्यत: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये ही परंपरा मोठय़ा प्रमाणावर पसरली आहे. श्रीदत्तात्रेय यांच्यासमवेत त्यांची शक्ती म्हणजे मधुमती नावाची शक्ती हे या परंपरेचे उपास्य दैवत आहे. ही एक अतिशय समृद्ध अशी दत्त परंपरा आहे.

    दत्तनाथ

    उज्जयिनी येथील दत्तनाथ ही मध्य प्रदेशातील श्रीदत्त परंपरा आहे. निरंजन - विष्णू - हसकमलासन - अत्री - दत्तगोपाळ - वेडा नागनाथ - निबंजनाथ - जनार्दन – एकनाथ - दत्तभाऊ - केशवबुवा - अंतोबादादा - दत्तनाथ अशी ही परंपरा आहे. याचे मूळ नाथसंप्रदायातील महिपतीनाथांकडे जाते. या परंपरेचे उपास्य दैवत श्रीदत्तात्रेय असून त्यांनी मध्य भारतामध्ये दत्तभक्तीचा प्रचार-प्रसार केला आहे.

    श्रीनवनाथ

    नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ‘ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया’ असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.

    श्रीरामदासी आणि श्रीधर स्वामी परंपरा

    समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. यामध्ये श्रीदत्तात्रेय हे सिद्ध पुरुष मानले गेले असून ते विश्वगुरू, सर्वत्र संचारी आणि सिद्धिदाता आहेत असे मानले आहे. श्रीदत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना अवधूतगीता हा ग्रंथ प्रदान केला असे श्रीरामदास स्वामींनी म्हटले आहे. श्रीदत्तात्रेय हे सर्व प्रिय आणि सर्वाना आवडणारे दैवत आहे अशी रामदासी परंपरेची श्रद्धा आहे. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांनी मलंगरूपात दर्शन दिले होते. समर्थ रामदास आणि दत्तसंप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूर गडावर गेले होते तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थाच्या घराण्यातील हनुमंत-स्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले दत्तावतार होऊन गेले, असे मानले जाते. त्यांनी पहिल्यांदा कर्दळीवनाची परिक्रमा केली. त्यांचेच शिष्य श्रीरामस्वामी यांनी पीठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या तेहतिसाव्या पिढीतील मल्लादी गोविंद दीक्षितलू यांनी काही वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रकाशात आणले असून त्यांच्या विलक्षण अनुभूती असल्याचे दत्तभक्त सांगतात.

    श्रीमहानुभव

    महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे पाच ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहुरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले. वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण’ असे चक्रधरस्वामीनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा हीसुद्धा विविध दत्तपरंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे.

    वारकरी

    भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुंरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावता माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना ‘मेरू शिखरी एक योगी निराकारी’ असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तउपासक होते. तुकाराम महाराजांनी ‘तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत’ अशी दत्तात्रेयांची स्तुती गायली आहे. संत गुलाबराव महाराज यांनी त्यांच्या ‘प्रियलीला महोत्सव’ या ग्रंथामध्ये श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य वर्णन केले आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीपांडुरंग हे असले तरी त्यांनी श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य तितकेच मानलेले आहे असे दिसून येते.

    आनंदसंप्रदाय

    सदानंद नावाच्या ऋषींनी आनंद संप्रदाय सुरू केला आहे. ते दत्तात्रेयांचे शिष्य होते. त्यांचा जन्म जनमेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञातून झाला होता, असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करीत असताना प्रत्येकी शंभर पावले टाकल्यावर ‘श्रीदत्त’असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बसवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू-विधी-अत्री-दत्त-सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण विश्वामध्ये आनंद आणि प्रेमभाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वाबरोबर व्यवहार करावा आणि संपूर्ण विश्व आनंदमय करावे ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रद्धा आहे.

    अन्य परंपरा

    याशिवाय नृसिंहसरस्वती (आळंदी) परंपरा, विदर्भातील देवनाथ परंपरा, श्रीगुरुचरित्राचे लिखाण करणारे सायंदेव परंपरा, निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा इ. अनेक समृद्ध आणि भव्य परंपरा आणि उपसंप्रदाय श्रीदत्तसंप्रदायामध्ये दिसून येतात. विविध नावांनी प्रसिद्ध असलेले आणि विभिन्न प्रकारच्या उपासना पद्धती असलेले हे संप्रदाय आणि परंपरा मूळ दत्त संप्रदायाशी निगडित आहेत.

      January 2, 2017


  • पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना

    ६ ऑगस्ट १९२० साली पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना झाली. याच बरोबर कलकत्ता, मद्रास, व रंगून स्थानिक सेन्सॉर बोर्डची स्थापना केली गेली.

    पहिले सेन्सॉर प्रमाण पत्र गोउमुंट कंपनी ला देण्यात आले.

    अमेरिकेत हॉलीवूडमध्ये चलचित्राच्या सेन्सॉरशिपची पहिली घटना घडली १८९७ मध्ये जेव्हा जेम्स कॉर्बेट व रॉबर्ट फिट्झसिमन्स यांच्यातील हेवीवेट वजनी गटातील सामना दाखवायला बंदी घातली गेली होती. १९१५ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्युच्युअल फिल्म कॉर्पोरेशन वि. इंडस्ट्रिअल कमिशन ऑफ ओहायो यांच्यातील खटल्यात सिनेमा हा तद्दन व्यवसाय असल्याने त्यावर सेन्सॉरशिपला विरोध दर्शविला होता. मात्र, १९१५ ते १९५२ या काळात स्थानिक, राज्य व केंद्र सरकारी पातळीवर सेन्सॉरशिप लागू करण्याचे बरेच प्रयोग झाले. अमेरिकन शासनाने सेन्सॉर बोर्ड स्थापन करू नये यासाठी १९२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाचा वकील व वजनदार अशा विल हेज याच्या नेतृत्वाखाली प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन (PDA) ही संघटना स्थापन झाली जिने शासनाने हस्तक्षेप करण्याआधी स्वतःच काही बंधने घालून घेतली. १९३४ साली जोसेफ ब्रीनच्या नेतृत्वाखाली प्रॉडक्शन कोड अॅडमिनिस्ट्रेशन (PCA) या संघटनेने १ जुलै, १९३४ पासून पुढे येणाऱ्या सर्व सिनेमांना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले. ब्रीनने हा कायदा अतिशय कडक व त्रासदायक केला.

    तथाकथित नैतिकता व धार्मिकता पाळणे हे अक्षरशः बंधनकारक केले. पुढे १९५२ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात PCA चा अधिकार खूपच कमी केला. हा निर्णय 'मिरॅकल' या सिनेमाशी संदर्भित खटल्याशी संबंधित असल्याने त्याला 'मिरॅकल डिसीजन' (जादुई निर्णय!) म्हटले जाते. यानंतर 'द मून इज ब्ल्यू' या १९५३ च्या सिनेमात Virgin, Seduce इ. शब्दांचा प्रथमच वापर करण्यात आला. जगभरातील बहुतांश देशांत चित्रपटाच्या सेन्सॉरशिपशी संबंधित कायदे व बोर्ड अस्तित्वात आहेत. भारतात पहिला सिनेमा १९१३ साली आला आणि सेन्सॉर बोर्डाची स्थापना १९२० साली झाली.

    सिनेमेटोग्राफ एक्टच्या खाली सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेन्सॉर ची १९५२ मधे स्थापना झाली. कालांतराने त्यात काही नवे बदल घडवून १९८३ मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ़ सर्टिफिकेशन असं नामकरण करण्यात आलं. आधी फक्त ‘यु’आणि ‘ए’अशी दोनच प्रमाण पत्रे दिली जायची..नंतर ती ‘यु’, ’यु/ए’, ’ए’ आणि ‘एस’ अशी विविध वयोगटानुसार,प्रेक्षकवर्गानुसार देण्यात येतात.मात्र हे देण्यासोबतच काही सीन्स, शब्द, वाक्यांना सेन्सॉर बोर्ड बिनबोभाटपणे कात्री लावते.प्रदर्शनाला बंदी घालते.

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 6, 2021


  • मुंबईतील प्रार्थना समाजाची स्थापना

    १८६५ मध्ये अमेरिकेतील सिव्हिल वॉर संपले. कापसाच्या किमती गडगडल्या व शेकडो व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाले. आर्थिक संकटांनी हाहाकार उडाला. सांपत्तिक स्थितीतील हा चढउतार पाहिल्यावर परमहंस सभेतील जुनीमंडळी पुन्हा उत्साहाने कामाला लागली. १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या घरी बाळ मंगेश वागळे, भास्कर हरी भागवत, नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद, सर्वोत्तम सखाराम मानकर, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे इत्यादी मंडळी उपस्थित राहिली. ह्या बैठकीमध्ये सामाजिक सुधारणेच्याच विषयाचा ऊहापोह झाला व विधवाविवाह, स्त्री-शिक्षण या कार्यास उत्तेजन द्यावे; बालविवाहाची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावा, जातिभेदाची चाल वाईट असल्याचे उघडपणे प्रतिपादावे इत्यादी विचार झाला. परंतु ह्यासंबंधी झालेल्या नंतरच्या सभांमध्ये ऐहिक कल्याणावर विशेष दृष्टी ठेवून ही कार्ये हाती घेण्यापेक्षा मनुष्याचे ह्या जन्मी मुख्य कर्तव्य जे परमार्थसाधन त्याकडे विशेष दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार कायम प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा निश्चय करण्यात आला.

      March 31, 2022


  • जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ४

    लाळघोटेपणाचे पालन (किंवा हलकीसलकी कामे करण्याची रीत), सततचा खोटारडेपणा, सदैव वितंडवादाची सवय, इतरांबद्दल नित्य वाईट विचार, अशा माझ्या गुणसमुच्चयाची ख्याती ऐकून ऐकून तू सोडून दुसरे कोणी क्षणभर तरी माझे तोंड पाहील काय?

      February 27, 2020