वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गवती चहास कोठें कोठें हिरवा किंवा ओला चहा म्हणतात. बंगालीत या चहास बंधबेन व हिंदुस्तानींत गंधतृण म्हणतात. संस्कृतांत यास भूस्तृण असें नांव आहे. इंग्लिश मध्ये lemon grass असे म्हणतात. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हें गवत हिरवेंगार असून खरबरीत असतें. पूर्वेकडील आर्चिपिलेगोंतल्य पुष्कळ बेटांत, सिलोनांत व हिंदुस्थानांत गवती चहा मुद्दाम बागांत लावितात. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. या गवतास क्वचित फूल येतें. गवती चहा हे बहुवार्षिक गवत असून, ते दोन मीटरपर्यंत उंच वाढते. त्याला भरपूर फुटवे येतात. पाने केसाळ असून ८० ते १२५ सें.मी. लांब असतात. पानांना लिंबासारखा वास येतो. सिंगापूर व सिलोन येथें सुवासिक तेल काढण्याकरितां गवती चहा पुष्कळ लावितात. अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. मग त्यात गवती चहाच्या काही पाती मिसळा. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. हा चहा चवीला उत्तम आणि आरोग्याला हितकारी आहे. यामुळे शरीर स्वच्छ होते, अवयवांचे कार्य सुधारते. मात्र लहान मुलांना गवती चहा देण्यापूर्वी अवश्य सल्ला घ्यावा. या गवताचा सुवासिक तेल काढण्याकडेच विशेष उपयोग होतो. 'कोलन वॉटर' तयार करण्यांत या तेलाचा फार खप होतो. तापांत घाम येण्यासाठीं गवती चहाचा काढा करून पाजतात. ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो. कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात. कपभर गवती चहा घेतल्याने किंवा त्याची वाफ घेतल्याने चोंदलेले नाक व छाती मोकळी होण्यास मदत होते. त्यातील अॅंन्टीबॅक्टेरियल घटक संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव करते. गवती चहाचे तेल डोकेदुखीची समस्या कमी करते. किडनी आणि यकृताचे कार्य सुधारते. गवती चहामुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच सतत मुत्र विसर्जन झाल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते व पचनही सुधारते. गवती चहातील 'अॅतन्टीमायक्रोबाईल' घटक पचनसंस्थेचा मार्ग सुधारण्यास मदत करतो. त्यातील अॅसन्टीसेप्टीक घटक बॅक्टेरियांचा नाश करून बद्धकोष्ठता, छातीत होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते. वाताचा त्रास असलेल्या रुग़्णांनी गवती चहाचे तेल लावणे हितदायी आहे. त्यातील दाहशामक घटक सांधेदुखी कमी करतात. यासाठी गवती चहाचे तेल खोबरेल तेलात मिसळून गुडघ्यांवर लावावे. तसेच गवती चहा पिणेदेखील संधीवाताच्या रुग्णांसाठी हितावह आहे. गवती चहामुळे कर्करोगापासून बचाव होतो. त्वचेचा तसेच स्तनांच्या कर्करोगापासून बचावण्यासाठी गवती चहा फायदेशीर आहे. गवती चहा मधील व्हिटामिन ए त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यातील अॅसन्टीसेप्टिक घटक आणि अॅलस्ट्रिंजंट घटक पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. गवती चहा प्यायल्याने त्वचा आणि शरीर दोन्ही स्वच्छ राहण्यास मदत होते. गवती चहाचे तेल नेहमीच्या तेलात मिसळून लावल्यास शरीराची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. खरा `ग्रीन टी' प्यायचा असल्यास, `गवती चहा' (चहा पत्ती) आणि `पुदिना' ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या. या गवती चहा पासून पाण्याच्या वाफेच्या साह्याने उर्ध्वपातन (डिस्टिलेशन) करून तेल काढण्यात येते. तेल हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगते. तेलात ७० ते ८५ टक्के सिट्रॉल असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
February 28, 2017
श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्राचे दिवशी करावयाच्या वैदिक विधीला श्रावणी म्हणतात. यालाच उपाकर्म असेही म्हणतात. श्रवण नक्षत्र श्रावण पौर्णिमेच्या जवळपास येते, त्या दिवशी किंवा पंचमीला, हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी श्रावणी करावी. श्रावण पौर्णिमा यजुर्वेद्यांचा मुख्य काळ, भाद्रपद महिन्यातले हस्त नक्षत्रावर सामवेदी श्रावणी करावी. हे सामान्य नियम आहेत. यांत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा धर्मशास्त्रानुसार निर्णय करावा लागतो.
श्रावणी कशाकरिता करावी? सांप्रत या दिवशी यज्ञोपवित फक्त बदलतात. हे योग्य नाही. यज्ञोपवित (जानवे) बदलल्याने श्रावणी होत नाही. जे वेदांचे अध्ययन केले आहे त्याचा शिळेपणा नष्ट करणे, तसेच म्हणताना काही दोष झाले असतील तर ते नाहीसे करण्यासाठी हा विधी आहे. नूतन उपनयन झालेल्यांची प्रथम श्रावणी गुरु-शुक्रास्त, सिंहस्थ गुरु असता, करू नये असा शास्त्र संकेत आहे.
-- विद्याधर करंदीकर
August 3, 2016
ग्रॅन्ड ओल्ड मॅन ऑफ इंग्लिश क्रिकेट किंवा ‘पोंद्या’ या नावाने ओळखल्या जाणार्या सर पेलहॅम फ्रान्सिस वॉर्नरचा जन्म २ ऑक्टोबर १८७३ रोजी त्रिनिदादमध्ये झाला. २ ऑक्टोबर १९३९ रोजी कर्नाटकातील मंगलोरजवळील मल्कीत बुधिसागर कृष्णाप्पा कुंदरन यांचा जन्म झाला.
September 28, 2010
प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९१ वर्ष होत आहेत. प्रभातचा महिमा आणि जादू इतकी जबरदस्त होती की, देशभरात गावोगावी ‘प्रभात’ नावाची अनेक सिनेमा थिएटर्स अस्तित्वात आली. आजही प्रत्येक मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘प्रभात’ मधील ‘लख लख चंदेरी’ गाण्याने होते’.
June 1, 2021
स्वदेशी’ हा शब्द ऐकला की, आपल्या देशात तयार केलेली वस्तू खरेदी करणे, हा विचार मनात येतो. काही लोक तर स्वदेशी म्हणजे एवढेच असे समजतात.
November 29, 2023
सध्या थंडीचा पाठशिवणीचा खेळ यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे अशा विकारांना सामोरं जावं लागत आहे. अॅीलर्जी किंवा अस्थमा असलेले लोक बेजार झाले आहेत. जरासं हवामान बदललं की कित्येक जणांना सर्दीला सामोरं जावं लागतं. सध्या तर सतत ऊन आणि थंडीचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कित्येक जण या त्रासाचे बळी ठरत आहेत. म्हणून या मोसमात आपलं घरदेखील किटाणूमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण अॅलर्जीचं मूळ घरातच असतं.
अॅलर्जी किंवा अस्थमाचा त्रास असलेल्यांना थंडीच्या दिवसांत या त्रासाला सामोरं जावं लागतं. कोणाचं नाक वाहतं, तर कोणाला एका मागून एक शिंका येतात. कोणाला कफ होतो तर कोणाला घशात खवखव. कित्येकांना तर तापही येतो. ताप लवकर जातो म्हणा मात्र अॅलर्जीचा त्रास दीर्घकाळ सतावत राहतो. यात डोळ्यांनाही त्रास होतो. डोळ्यांमध्ये जळजळ, खाज येणे, लाल होणे असेही विकार संभवतात.
असं का होतं?
धूळ-माती, जनावरांचे केस, परफ्युम आदी कारणं अॅलर्जीला कारणीभूत ठरतात. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी वर्षभर असतात. मात्र थंडीच्या दिवसांत या गोष्टी डोकं वर काढतात. कारण थंडीत या गोष्टींना वातावण अनुकूल असतं. याचं कारण असं की थंड हवेमुळे कित्येक जण दरवाजे आणि खिडक्या बंद करून ठेवतात. गरम कपडे घालतात. ब्लँकेट किंवा रजाईचा वापर केला जातो. त्यात हिटरचा प्रयोग केला जातो. या सगळ्या कारणांमुळेही अॅलर्जीची समस्या वाढते. थोडक्यात घरातलं वातावरण अॅलर्जीक लोकांसाठी पोषक असतं. म्हणून सर्दी, ताप, खोकला असे त्रास उद्भवातात.
बचाव कसा कराल?
घरात हवा खेळती राहील, असं करावं. ब्लँकेट, गरम कपडे, कार्पेट्स किंवा सॉफ्ट टॉयज उन्हात वाळत घाला.
घरात सूर्यप्रकाश येईल याकडे लक्ष द्या. खिडक्या, दरवाजे सताड उघडय़ा ठेवाव्यात. सूर्यप्रकाशामुळे किटाणूंना लपायला वाव मिळत नाही.
सोफा, कार्पेट्स, स्वेटर, कोट, गाडीचे सीट कव्हर्स, सॉफ्ट टॉईज याची नियमित सफाई करा. ते देखील उन्हात वाळत घाला. म्हणजे त्यात लपलेले किटाणू नष्ट होतील.
एसीसारख्या घरातल्या उपकरणाची स्वच्छता करा. बरेच दिवस न लावल्याने त्यात घाण किंवा धूळ साचण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या दिवसांत पंख्यांचा वापर होत नाही. त्यावर धूळ साचते. तसंच पडद्याचे कानेकोपरे स्वच्छ कसे राहतील याकडे लक्ष द्या.
घरात असलेली शोभेची झाडं देखील अॅलर्जीला कारणीभूत ठरतात. अशी झाडं ठेवण्यापेक्षा खोटी झाडं ठेवावीत.
अस्थमा असलेल्या लोकांनी कार्पेट किंवा पाळीव प्राण्यांपासून लांब राहावं.
घरात धूम्रपान, सुगंधी उदबत्त्या, उग्र वासाचं परफ्युम्स याचा वापर कमीच करावा. छत, बेसमेंट आणि जिन्याचीदेखील नियमित स्वच्छता राखावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
January 18, 2017
आपल्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवताना, थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, योग्य शिक्षण आणि अनुभवाची शिदोरी उपयुक्त पडते. उल्लेख करता येतील असे अनेक नामवंत कलाकार मंडळी मराठी मनोरंजन विश्वाला लाभले ज्यांनी मराठी वाङमय कृतीचं अक्षरश: सोनं केलं.
March 4, 2013
काँग्रेस पक्ष हा या देशातील सर्वात जुना पक्ष आहे, त्याला राजकीय परिपक्वतेची खुप मोठी पार्श्वभूमि आहे परंतू या पक्षाला काही कालावधीचा अपवाद वगळला तर सक्षम प्रतिस्पर्धी कोणीही भेटला नाही. त्यामुळे या पक्षाची वैचारीक पातळी सातत्याने हेलकावत राहिली व म्हणूनच हा पक्ष नेहमीच टिकेचे लक्ष्य तर बनलाच परंतू त्यातील वैचारिक दिवाळखोरीही चव्हाट्यावर येवू लागली परिणामी लोकांच्या विश्वासाला नेहमीच तडा गेला हे कटू सत्य.
-- अतुल तांदळीकर
December 11, 2010
पांघरुणात गुरफटून ठेवणारी ,झोपेच्या मोहात गुंतविणारी थंडी हळुहळु आपला निरोप घेऊ लागली आहे. ऊबदार वाटणाऱ्या ऊन्हाचा प्रवास आता तापणाऱ्या उन्हाच्या दिशेनं सुरु झाला आहे.
साहित्यात हा वसन्त ऋतू कितीही आल्हाददायक सांगितला असला तरीही व्यवहारात मात्र केवळ डॉक्टरांसाठीच आल्हाददायक दिसून येतो.याच वसंत ऋतूच्या काळात सर्दी ,खोकला,दमा tonsillitis,bronchitis,flue, अनेक साथीचे आजार,त्वचाविकार अश्या अनेक तकारींना जन्म देतो.भूक मंदावते, पचनशक्ती कमी होते,थोडक्यात वेगवेगळ्या आजारांची सुगी जोमात असते.थंडीत साठलेला कफ दोष ऊन्हाने पातळ होऊन हे सगळं रामायण घडवत असतो.
आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या या सगळ्या रामायणाचा त्रास आपल्या चिमुरड्यांना होत असतो.त्यातच परीक्षांचा काळ दत्त म्हणून ऊभा राहिलेला असतो एकूणच परिस्थिती आणीबाणीची असते.या सगळ्या घडामोडींपासून आपल्या कुटुंबाला 'सुरक्षा कवच'आयुर्वेदाच्या माध्यमातुन देण्याचा प्रयत्न म्हणजेच या लेखाचा खटाटोप .
आयुर्वेदाचं नाव ऐकून "अरे बापरे ,आता काय कडू काढे ?असा प्रश्न मोठे मोठे डोळे करून विचारणाऱ्या माझ्या समस्त मित्रमैत्रिणींसाठी वसंत ऋतूसाठी खास आयुर्वेदाचा हटके अंदाज!
जाता खायचा खाऊ म्हणून फुटण्याचा समावेश करून कफाला bye bye म्हणता येईल.
दुधात थोडीशी सुंठ घालून या वसंत ऋतुसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवता येईल.
नाष्ट्यामध्ये भाजणीची थालीपीठ,खाकरा,ज्वारीची ऊकडपेंडी,बाजरीचा शिरा,हुलग्याच्या शेंगोळ्या,लाह्यांच्या पिठाचा उपमा यासारखे पदार्थ खाण्यात आले तर या ऋतूतील आजारपणं खूप खूप लांब राहतील.
दुपारच्या snacks साठी वेगवेगळ्या लाह्या,popcorn,राजगिरा वडी, गोपाळकाला,लाह्यांचा चिवडा अशी variety तर सोन्याहून पिवळे.
कढण, कोबीचे सूप,दुधीभोळ्याचे सूप,शेवग्याचे सूप यांचा वापर केला तर साठलेला कफ पडून जाईल.
ज्वारी, बाजरी यांची भाकरी हा आपल्या main course चा भाग या दिवसांसाठी ठरवून करूयात.
शेवग्याची भाजी,शेवग्याचे सांबार,दुधीभोपळा,मेथी,गवार, कुळीथाची ऊसळ म्हणजे औषधांना पर्याय ठरेल.
सीताफळ,द्राक्षे, आईस्क्रीम पासून सध्या चार हातांचे अंतरच बरे.
नाक वहात असल्यास झोपताना हळदीचा धूर आणि नाक बंद झाल्यास ओव्यांचा धूर घेऊन Vicks,nasal drops यांना bye म्हणूयात.
समप्रमाणात एकत्र केलेली पूड छातीला व पाठीला talcum powder प्रमाणे लावून prevention is better than cure याची प्रचिती घेता येईल.
थोडक्यात वसन्त ऋतूचे हे Do's and Don'ts लक्षात ठेऊयात आणि 'हृदयी वसन्त फुलताना' चा आनन्द घेऊयात
March 31, 2017
१०४ उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची अफाट कामगिरी केल्याबद्दल इस्रो च्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके कमी आहे. इस्रो असू दे किंवा डी आर डी ओ यात काम करणारी शास्त्रज्ञ मंडळी म्हणजे आधुनिक ऋषी आहेत आणि सुदैवाने आजपर्यंतच्या सरकारांनी त्यांची हि स्वायतत्ता कायम राखली आहे. बहुसंख्य मंडळी दक्षिण भारतीय, बहुसंख्य मंडळी ब्राह्मण आणि अत्यंत धार्मिक. खऱ्या अर्थाने ज्ञानी आहेत आणि त्यामुळे मानवी ज्ञानाच्या कक्षा सुद्धा त्यांना ज्ञात आहेत. कर्मयोगी आहेत आणि त्यातूनच नकळत अध्यात्मिक प्रगती सुद्धा साधली गेली आहे आणि म्हणूनच मी फक्त निम्मित्तमात्र आहे, कर्ताकरविता तो ईश्वर आहे आणि म्हणून माझी प्रत्येक रचना त्याच्या चरणी अर्पण करून मी पुढे जातो आहे हि अस्सल योग्याच्या हृदयात असणारी भावना, आपल्या हृदयात बाळगून हि मंडळी कार्यरत असतात. काम करण्यासाठी मिळणारा अत्यल्प निधी, सरकारी खाक्यातूनच मिळणारे श्रेणीनिहाय वेतन जे तुलना केली असल्यास पाश्चात्य देशातील शास्त्रज्ञांच्या वेतनाच्या फक्त १० % भरेल त्यात सुद्धा समाधानी राहून, इतर केंद्रीय कर्मचारी ओव्हर टाईम सारख्या सगळ्या सुविधा घेत असताना घड्याळ्याच्या काट्याकडे न पाहता काम करणारे हे आधुनिक ऋषी पहिले कि आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव होते.
केंद्र आणि राज्य सरकार चालवत असणाऱ्या इतर कोणत्याही संशोधन संस्थाना टार्गेट नसते. तेथील मंडळी अक्षरशः पाट्या टाकत असतात. हे मी पाहून पूर्ण जबाबदारीने सांगतो आहे. मध्यंतरी औरंगाबाद मधील बाजरी संशोधन संस्थेच्या एका शास्त्रज्ञाच्या भेटीचा योग आला. मी त्यांना विचारले तुम्ही काय करता ? बाजारीवर संशोधन करतो. मग एखादे नवीन वाण विकसित करत आहात का ? नाही आम्ही संशोधन करतो. उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी संकरीत वाण तयार करत आहात का ? नाही आम्ही संशोधन करतो . इतकेच उत्तर ते देत होते. मी त्यांना विचारले तुम्हाला काही टार्गेट नसते का ? त्यावर त्यांनी नाही हे उत्तर दिले. आपल्या देशातील कृषीक्षेत्राची वाट लागण्यास असल्या कृषी संस्था आणि विद्यापीठे जबाबदार आहेत आणि या उलट इस्रो हि सतत नासाशी स्पर्धा करण्याच्या आणि त्यांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात असते. डी आर डी ओ ला तर सतत चीन आणि अमेरिकेवर नजर ठेवून त्यांच्या तोडीची शस्त्रात्रे विकसित करावी लागतात आणि ती सुद्धा इंडियन प्राईस मध्ये. परंतु हि मंडळी जिद्दीने आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन हे कार्य निरलसपणे करत असतात.
मंगलयान प्रकल्पावर मध्यंतरी डिस्कव्हरी च्यानेलने एक सुंदर वृत्तांत दाखवला. त्यात त्यांनी दाखवले कि ज्यावेळी मंगलयान हे मंगल ग्रहाच्या कक्षेत जाणार होते त्यावेळी काही काळ अश्या लोकेशन ला असणार होते कि त्या यानाला सूर्य अथवा पृथ्वी काहीही दिसणार नाही आणि तरीसुद्धा त्याला त्याचे को ordinate पृथ्वीशी सेट करावे लागतील. या टप्प्यावर जाऊनच यापूर्वीच्या मंगलयानांच्या मोहिमा अपयशी झालेल्या होत्या. इस्रो ने या साठी प्राचीन भारतीय ऋषींच्या ज्ञानाची मदत घेतली. वराहमिहीर हा प्राचीन astro फिजिशियन होता त्याने या परिस्थितीत तुम्ही तुमचे लोकेशन इतर ग्रहांच्या अभ्यासाने कसे ठरवावे याचे मार्गदर्शनपर लेखन केलेले आहे. ( त्याच्यामते तो देहातीत अवस्थेत या पद्धतीने अंतराळात संचार करू शकत असे आणि ते इतर ऋषींना सुद्धा साध्य होते ) त्याच्या गणितीय माहितीचा आधार घेऊन इस्रो मध्ये कार्यरत असणाऱ्या astro फिजिशियन शास्त्रज्ञांनी मंगलयानाचे परिभ्रमण ठरवले आणि त्यांचे ज्ञान किती परिपूर्ण असेल कि पहिल्याच प्रयत्नात भारताने हि मोहीम यशस्वी केली. हा संपूर्ण प्रकल्प अत्यल्प खर्चात पूर्ण करणे साध्य व्हावे म्हणून या मंडळीनी गोफणीच्या तत्वाचा वापर करून मंगलयान पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यावर अंतराळात अक्षरशः भिरकावून दिले. आणि तब्बल ३०० दिवस कोणत्याही इंधनाचा वापर न करता इंजिन बंद करून हे मंगलयान मंगळाजवळ दाखल झाले. या शास्त्रज्ञांच्या बुद्धीचे कौतुक करावे तितके थोडे आहे. भोवताली नकारात्मक वातावरण असताना सुद्धा सकारात्मक वृत्तीने प्रत्येक संकटाला प्रत्येक अल्प साधनांना एक संधी समजून आपल्या बुद्धीला आव्हान समजून त्यातून काही तरी असे अफाट घडवणाऱ्या या शास्त्रज्ञ मंडळीना आपण सामान्य भारतीयांनी लाख वेळा शीरसाष्टांग वंदन केले तरी सुद्धा ते कमीच असेल. या अश्या तमाम अग्नीदिव्यातून जाऊन हि मंडळी प्रकल्प पूर्ण करतात आणि कृष्णार्पणमस्तु भावनेतून त्याची प्रतिकृती ईश्वराला अर्पण करतात आणि नवीन जबाबदारी स्वीकारतात.
दुर्दैवाने आपल्या देशात पुरोगामी नावाची एक अत्यंत मनोविक्रृत जमात अस्तित्वात आहे त्यांना प्रतिकृती मंदिरात अर्पण करणे सुद्धा त्यांच्या पुरोगामी पणाचा अपमान वाटतो आणि ते या शास्त्रज्ञ मंडळीना अंधश्रद्धा पसरवत आहेत म्हणून फैलावर घेतात. यांच्या विद्वत्तेच्या आणि ज्ञानाच्या एक शतांश पातळीवर नसणारी अर्धवट अक्कल असणारी मंडळी अशी टीका करताना पाहून मन खरच विदीर्ण होते.
असो. परत एकदा आधुनिक ऋषी मंडळींचे हार्दिक अभिनंदन आणि आम्हाला विश्वास आहे असे अभिमानाचे क्षण या राष्ट्राच्या नशिबी तुमच्यामुळे वारंवार येणार आहेत .
(अतिशय सुंदर असलेल्या या लेकाचे लेखक कोण आहेत ते माहित नाही. Whatsapp वरुन आलेला हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत)
March 3, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti