वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही.
कृपा करून जमेल व झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा.
प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका.
खर्च आटोपशीर ठेवा.
तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा.
कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देते.
स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.
कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा.
तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा.
ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा.
हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही....
त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा.
संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ. चा उपयोग करा.
सुट्टीचा आनंद आपल्या प्रियजनांसोबत लुटा...
सर्वेपि सुखिनः सन्तु।
सर्वे सन्तु निरामयः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चिद दुःख माप्नुयात॥
आज ७ एप्रिल,
जागतिक आरोग्य दिन…
आपण आणि आपल्या प्रियजनांना निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा…!
April 7, 2017
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, हौद यांचे अवशेष त्याचे गत वैभवाची साक्ष देत उभे आहेत, १४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला .
या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे.
या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती. त्या नगरीत इश्वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला वसू, विश्वासू, बृहद्भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.
पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. त्यांना क्रोधाचा पश्चाताप होतो व ते रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला घेऊन जातो नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.
या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर, पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.
-- निखिल आघाडे
October 7, 2016
पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा मध्यावर कॉलरा डोके वर काढतो. गेल्या शतकात ७ वेळा पृथ्वीवर कॉलराने थैमान घातले. प्रत्येक खेपेला हे जिवाणू वेगवेगळ्या स्वरूपात आले. व्हिब्रियो कॉलरा नावाने ओळखले जाणारे हे जिवाणू एखाद्या स्वल्पविरामाप्रमाणे दिसतात. शेपट्यामुळे हे चपळ होतात.
June 28, 2023
ह्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे राजकीय पक्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणू लागले आहेत . त्याचवेळी सर्वच पक्षांच्या बहुतांशी नेत्यांची व अनेक उमेदवारांच्या तोंडची मराठी भाषा कमालीची बिघडू लागली आहे. अनेकांना अशी शंका येते की, आज-काल नेतेमंडळींनी मराठी शिकण्यासाठी गुजराती किंवा उर्दू शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या लावल्या आहेत की काय?
June 14, 2024
प्रास्ताविक :
मागे एकदा माझ्या वाचनात आलें की, कांहीं वर्षांपूर्वी, मराठी साहित्यिक संमेलनात, ‘गझलचें मराठी साहित्यावर आक्रमण’ असा एका परिसंवादाचा विषय होता. त्या परिसंवादात योग्य तो निष्कर्ष काढला गेला, असेंही वाचले. तें कांहींही असो, पण ‘गझलचें आक्रमण’ असा विषय संमेलनात चर्चेला यावा हीच मुळात काळजीची गोष्ट आहे. कोणी जर , ‘आक्रमण झालें आहे’ असें म्हणत असेल तर, तें विधान योग्य आहे काय, यावर विचार व्हायला हवा. म्हणून, आपण ‘मराठी व गझल’ या विषयात डोकावून पाहूं या, ऊहापोह करूं या, आणि बघूं या आपण काय निष्कर्षाला येतो ते.
खरें म्हणजे, ‘आक्रमण’ या शब्दाचें प्रयोजनच काय ? असें चित्र तर मुळीच दिसून येत नाहीं की मराठी गझल ही, मराठी भाषेला व मराठी साहित्यातील अन्य प्रवाहांना झाकोळून टाकते आहे, नामशेष करूं पहाते आहे. तरीसुद्धा, तसें कांहीं घडलें आहे अथवा घडतें आहे काय, किंवा तसें घडण्याची शक्यता आहे काय, या गोष्टीचा आपण धांडोळा घेऊं या.
हा विषय तसा बहुआयामी आहे. गझल व मराठी भाषा, गझल व ओव्हरऑल मराठी साहित्य, गझल व मराठी काव्य , वगैरे अनेक अंगांनी या विषयाकडे बघावें लागेल. तसेंच, त्या अनुषंगानें, मराठी प्रदेशातील संगीत, एकूणच मराठी संस्कृती, यासंबंधीचे पैलूसुद्धा विचारात घ्यावे लागतील.
गझल व मराठी भाषा :
गझल (ग़ज़ल) ही फारसीतून उर्दूत आली, आणि, मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये ती फारसी किंवा उर्दूतून आली. आपण, उर्दू-हिंदुस्तानी-हिदी गझलांचा, हिंदी अथवा अन्य भाषांवर होणार्या परिणामाबद्दल चर्चा नाहीं आहोत ; आपली चर्चा आहे ती मराठी गझलच्या संदर्भात.
मराठी गझला मराठी भाषेचाच वापर करतात. क्वचित् त्यांच्यात उर्दू-फारसी-अरबी शब्द आढळून येतात, पण हें आक्रमण नव्हेंच. आपण मध्ययुगीन मराठी गद्य पाहिलें तर, त्यात अनेक फारसी शब्दांचा भरणा दिसून येईल. अजूनही लावणीसारख्या लोकसाहित्यात व ग्रामीण लोकांच्या बोलीत अशा शब्दांचा उपयोग दिसतो. इतरत्र तो कमी झालेला असला तरी,
आजही अनेक फारसी किंवा अरबी शब्द, किंवा त्यांच्यापासून उद्भवलेले शब्द, आपल्या रोजच्या वापरात आहेत ; आणि त्यांचा उगम परभाषीय आहे याची अनेकांना जराही कल्पना नाहीं.
आजार, बाजार, सजा, रजा, मजा, जादू, बर्फ, जिना, जीन, खुर्द, खुद्द, खुर्ची, दप्तर, बाग, किल्ला, खून, तारीख, तक्रार, पैरण, पायजमा, दवाखाना, मेजवानी, चपाती, चादर, रुमाल, शाल, खरीफ, रबी, जिल्हा, मैफल (महफ़िल), एल्गार (यल्गार), समई (शमअ), जंजीरा (जज़ीरा), नाखवा (नाख़ुदा), संगमरवर (संगेमरमर), मर्दुमकी मधील मर्द व मर्दुमी , पेशवा हा हुद्दा आणि तें आडनांव, डबीर (दबीर : लेखनिक) हें आडनांव, फडणवीस यामधील नवीस (लेखनिक) हा प्रत्यय, चिटणवीस (चिट्ठीनवीस) हें आडनांव, शिवशाही व लोकशाही यांमधील शाह हा शब्द, सरदेसाई-सरदेशमुख-सरदेशपांडे-सरपोतदार-सरनाईक इत्यादी आडनांवांमधील सर (उच्च) हा प्रत्यय, देवरूख या ग्रामनामातील रुख हा शब्द (रु़ख़ : चेहरा) , मलकापुर मधील मलका (मलिका) हा शब्द, जिरेटोप मधील जिर-ए ( ज़िरह : लोखंडाच्या साखळ्यांचें बनवलेलें कवच; ए म्हणजे ‘चा/ची/चें’ ) , ‘व‘ हें अव्यय (मूळ अरबीमधून) , अशी अनेक उदाहरणें देता येतील. मथळा (मत्ला), मक्तेदारी मधील मक्ता, हे तर गझलच्या संदर्भात वारंवार वापरले जाणारे शब्द. असे अनेक शब्द आपल्या भाषेत इतक्या बेमालूमपणें (ह्या बेमालूमचा उगमही परभाषीयच आहे) मिसळून गेले आहेत, की ते मराठी नाहींत अशी आपण कल्पनाही करूं शकणार नाहीं. संत एकनाथांच्या काळातील मराठी गद्य पाहिलें तर, त्यात खूपसे फारसी, किंवा फारसीपासून उभवलेले, बनलेले, शब्द दिसतात. तसेच पेशवेकालीन मराठीतही आहे. त्यामानानें आजची मराठी कमी ‘फार्श्याळलेली’ आहे. ( याचें एक कारण, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची, तसेच माधवराव पटवर्धन, म्हणजेच माधव जूलियन, यांची भाषाशुद्धीची चळवळ, हें आहे).
मराठीनें इंग्रजीतून इस्पितळ, रेल्वे, मोटार, एंजिन, स्टेशन, मोबाइल फोन, हार्ड डिस्क, फ्लॉपी, पेन ड्राइव्ह, डिश अँटेना, इंटरनेट, असे अनेक शब्द सहज स्वीकारले आहेत. इंग्रजीतील ‘ऍ’ ‘ऑ’ सारखे उच्चार मराठीत नव्हते, ते आपण आपलेसे केले., त्यांना लिपी-चिन्हेंही दिली. तसेंच, इंग्रजीतील स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, ‘इनव्हर्टेड कॉमाज्’, वगैरे अवतरणचिन्हें मराठीनें घेतली. आय्. टी. च्या उदयानंतर तर अनेकानेक नवीन शब्द इंग्रजीत निर्माण झाले, व ते मराठीत जसेच्या तसे वापरात आलेले आहेत.
फारसी-अरबी व इंग्रजीव्यतिरिक्त मराठीनें अनेक शब्द संस्कृतमधून, प्राकृतमधून, तसेंच कांहीं तमिळ, कन्नड, गुजराती इत्यादि भाषाभगिनींकडून घेतलेले आहेत. प्रश्न असा आहे की, अशा शब्दांचें मराठीवर आक्रमण होतें आहे कां? की त्यांच्यामुळे आपली भाषा समृद्ध झाली आहे? खरें तर, भाषा ही प्रवाहीच असायला हवी; तशी ती नसली तर नामशेष होईल. इंग्रजी भाषेनें लॅटिन, फ्रेंच वगैरे भाषांमधून, अगदी भारतीय भाषांमधूनही, शब्द घेतलेले आहेत. पण, त्यामुळें ती समृद्धच झाली आहे. हल्ली इंग्रजी वळणाची मराठी लिहिली-बोलली जाते , पण त्यामुळे फारसें कांहीं बिघडत नाहीं.
भाषेचें मुख्य कार्य काय, तर एका व्यक्तीचे विचार शब्दांच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचवणें. तें कार्य योग्य पद्धतीनें होणें महत्वाचें. मान्सून (मौसम) हा शब्द परभाषेतून आला असला, तरी त्याचा वापर आपण मराठीत सर्रास करतो व भारतालील पावसाळा ऋतूला दुसरा योग्य शब्द नाहीं. ‘अग्निरथगमनागमनसंचालकहरितरक्तलौहपट्टिका’ यापेक्षा ‘सिग्नल’ असा उल्लेखच अधिक सोपा आहे. हें परभाषेचें आक्रमण असें आपण मानत नाहीं.
थोडक्यात काय, तर , कांहीं उर्दू-फारसी-अरबी शब्दांचा कांहीं वेळा उपयोग केल्यानें, मराठी गझल मराठी भाषेवर आक्रमण करते आहे, असें मुळीच म्हणतां येत नाहीं.
गझल व एकूणत: (ओव्हरऑल) मराठी सहित्य :
गझलनें एक साहित्यप्रकार म्हणून मराठी साहित्यावर आक्रमण केलें आहे काय, याच आपण आतां विचार करूं या.
श्रवणबेळगोळा येथील शिलालेख व इतर साधनांमुळे मराठी भाषेचा उगम १२००/१३०० वर्षें मागे नेतां येत असला, तरी मराठी भाषेतील सहित्याचा उगम यादवकाळापासूनचा, म्हणजे
मुकुंदराज-ज्ञानेश्वर यांच्या काळापासूनचा आहे. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील ‘टीका’ (म्हणजे, हल्लीच्या भाषेत, ‘समीक्षा’) आहे. भगवद्गीता तर संस्कृतमध्ये आहे. संस्कृत ग्रंथावरील ‘टीका’ म्हणून मराठी ग्रंथरचना करणें, याला आपण ‘संस्कृतचें मराठीवरील आक्रमण’ असें म्हणतो कां? उलट, आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो ! बरें, त्या काळाला ‘मराठी साहित्याचा सुरुवातीचा काळ‘ असें संबोधून आपण जरा वेळ बाजूला ठेवू या. तरीपण, संतकवी व पंडितकवी यांनी नंतरच्या काळातही रामायण-महाभारत-हरिवंश वगैरे संस्कृत ग्रंथांच्या आधारेंच रचना केली. त्याला आपण, ‘संस्कृतचें मराठीवरील आक्रमण’ म्हणूं कां? खरें तर, अशा प्रकारें घेतलेल्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या साहित्यामुळे मराठी साहित्य समृद्धच झालें आहे.
लघुकथा, रहस्यकथा इत्यादि साहित्यप्रकार मराठीनें पाश्चिमात्य वाङ्मयातून घेतले आहेत. कादंबरी या सहित्यप्रकाराचें मूळ कांहीं अंशीं संस्कृत व कांहीं अंशीं पाश्चिमात्य साहित्यात शोधतां येतें. नाटकांची प्रेरणाही मराठीनें अशीच, एकीकडे संस्कृत, व दुसरीकडे इंग्रजीद्वारे ग्रीक , यांच्यापासून घेतलेली आहे.
हें, त्या-त्या परभाषिक साहित्यप्रकारांचें मराठी साहित्यावरील आक्रमण आहे, असें आपण मुळीच मानत नाहीं. उलट, त्यामुळे मराठी साहित्य समृद्धच झालें आहे. अनुवादित साहित्याचेंही तसेंच. मग, गझल हा सहित्यप्रकार आपण उर्दू-फारसीतून घेतला, तर त्याला प्रत्यवाय नसावा, आणि तें मराठी सहित्यावर आक्रमण आहे, असें म्हणणें योग्य ठरणार नाहीं.
गझल व मराठी काव्य :
गझल हा एक काव्यप्रकार आहे. म्हणून गझल व मराठी काव्य, असा विशेष विचार आपण करून पाहूं या.
मराठी काव्य पाहूं गेलें तर, अनेक वृत्तें मराठीनें संस्कृतमधून घेतलेली आहेत, उदा. मंदाक्रांता, शार्दूलविक्रीडित वगैरे. मराठीतील काव्यालंकारसुद्धा (यमक, अनुप्रास इत्यादि) संस्कृतमधून आलेले आहेत. याला संस्कृतचें मराठीवर आक्रमण असें कोणीही खासच म्हणणार नाहीं. समर्थ रामदांच्या ‘मनाचे श्लोकां’मध्ये वापरलेलें वृत्त फारसी आहे, असेंही कांहीं विद्वान म्हणतात. तसें असल्यास, तें फारसीचें आक्रमण मानायचें कारण नाहीं.
केशवसुतांनी इंग्रजी काव्यपरंपरा मराठीत आणली, आणि त्यानंतर मराठी काव्याचा बाजच बदलला. पुढे ‘सॉनेट’ हा इंग्रजी काव्यप्रकार मराठीत ‘सुनीत‘ या नांवानें आला. माधव जूलियन यांनी फारसी व इंग्रजी यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रेमकाव्य मराठीत आणलें. भावगीताची परंपराही त्यानंतरच सुरूं झाली. मुक्तकाव्य या काव्यप्रकाराची प्रेरणाही इंग्रजीतील ‘फ्री व्हर्स’ आहे. मराठीनें ‘हायकू’ हा तीन ओळींचा काव्यप्रकार जपानी भाषेपासून इंग्रजीद्वारे घेतला आहे. ‘रुबाई’ हा चार ओळींचा फारसी काव्यप्रकारसुद्धा मराठीनें बिनतक्रार स्वीकारलेला दिसतो. ‘मुक्तक’ हा चार ओळींचा काव्यप्रकार संस्कृतमधून घेतलेला आहे. वा. वा. ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर यांनी शायरीची उर्दू परंपरा मराठीत पॉप्युलर केली. जसे हे काव्यप्रकार मराठीनें बाहेरून घेतले, तसेंच गझलही उर्दू-फारसीतून घेतली तर बिघडलें कुठे ?
हें कांहीं मराठी काव्यावर आक्रमण म्हणतां येणार नाहीं.
आणि, आकड्यांच्या आधारें बोलायचें झालें तर , शेकडो कवि मुक्तकाव्य लिहीत आहेत, ( खरें म्हणजे, मुक्तकाव्य हीच सध्या मराठीतील प्रमुख काव्यपद्धती झालेली आहे), अनेक कवि गीतें लिहीत आहेत, अन् केवळ कांहीं मूठभर कवीच गझला लिहीत आहेत. म्हणजेच, गझल हा कांहीं मराठीतील प्रमुख काव्यप्रकार म्हणतां येणार नाहीं. याचाच अर्थ असा की, या दृष्टिकोनातूनही, गझलनें मराठी काव्यावर आक्रमण केलें आहे, असें खचितच म्हणतां येणार नाहीं.
गीत या लोकप्रिय काव्यप्रकाराबद्दल जसा पूर्वग्रहयुक्त दृष्टिकोन कांहीं लोकांनी ठेवला होता/आहे, (गीतकारांना कवि समजायचें नाहीं, व त्या काव्यप्रकाराला हिणकस लेखायचें), तसें कांहींसें गझलच्या बाबतीत झालें नाहीं ना ?
गझल व मराठी संगीत :
गझल हा काव्यप्रकार आहेच; पण त्याचबरोबर, गझल हें गेय काव्य आहे, हेंही आपण ध्यानात घ्यायला हवें. जेव्हां मुद्रणकलेची प्रगती झालेली नव्हती, तेव्हां मुशायर्यांमध्ये उर्दू गझल लयीवर (तरन्नुम में) वाचली जायची, किंवा मैफलींमध्ये गायली जायची. त्यामुळे त्या संस्कृतीत गझल लोकप्रिय झाली. आज अनेक पुस्तकें छापली जातात, त्यामुळे छापलेल्या स्वरूपात गझल हजारो रसिकांपर्यत पोचते आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळें हा ट्रेंड वाढतच जातो आहे (उदा. ई-बुक्स, वेब् ). संगीतविषयक पुस्तकें, गाण्यांची-गझलांची पुस्तकें हाही साहित्याचाच एक भाग आहे. म्हणून, गझलचा विचार या अंगानेंही करणें योग्य ठरेल.
लावणी हा प्रकार कांहीं अंशी तरी नक्कीच उत्तर हिंदुस्थानातील संस्कृतीशी संबंधित आहे. बैठकीची लावणी म्हणजे तर ठुमरीच. महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीत उत्तर-हिंदुस्थानीच आहे, त्यातील बंदिशींची भाषा तर हिंदीच आहे. यमनसारखा राग हिंदुस्थानी संगीतानें ‘एमन‘ या फारसी रागावरुन घेतलेला आहे, असें एक मत आहे. तसें असेल तर, हा फारसीचा हिंदुस्तानी व मराठी संगीतावरील परिणाम म्हणायला हरकत नाहीं. हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीतातही मालकंस व शंकराभरणम् हे दोन्ही एकच राग आहेत; कोणी कोणापासून हा राग घेतला? मराठी नाट्यगीतांची प्रेरणा कन्नडमधून घेतलेली आहे. अन् त्याशिवाय, अनेक नाट्यगीतें हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित आहेत. भक्तिगीतांचा स्त्रोत संतकवींची भजनें-पदें आहेत असें म्हणतां येईल, आणि अर्थातच, त्यांची प्रेरणा संस्कृतमधून घेतलेली आहे. भावगीतांचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे. भावगीतांची प्रेरणा स्थानिक आहे असें छातीठोकपणें म्हणतांच येणार नाहीं. भावगीतें आली भावकवितेतून , आणि भावकवितेची प्रेरणा आहे पाश्चिमात्य साहित्य, तर प्रेमाधिष्ठित भावकवितेची आहे फारसी व इंग्रजी.
अशा अनेक गोष्टी मराठीनें बाहेरून घेतलेल्या आहेत, पण तेथें आपण ‘आक्रमण’ हा शब्द वापरत नाहीं. गझलच्या बाबतीतही तसाच दृष्टिकोन योग्य ठरेल, नाहीं कां ?
गझल व मराठी संस्कृती :
संस्कृतीची अनेक अंगें असतात. साहित्य व संगीताबद्दल आपण थोडासा विचार केला. गझल व संस्कृती या संबंधाचा विचार करण्यापूर्वी आपण संस्कृतीच्या इतर अंगांबद्दलही जरा पाहूं या.
कोकणातील ‘दशावतार‘ कर्नाटकातील यक्षगानापासून आले आहेत. महाराष्ट्राचें दैवत पांडुरंग हें कर्नाटकातून आलें आहे. ‘कानडा विठ्ठलु कर्नाटकु’ ही ज्ञानेश्वरांची उक्ति प्रसिद्धच आहे. दक्षिण महाराष्ट्राचा बराच भाग कांहीं शतकांपूर्वी कर्नाटकात सामील होता, (संदर्भ : सेतुमाधवराव पगडींचे लेख), यावरूनही हें उघड आहें. दक्षिण महाराष्ट्रातील कांहीं देवीसुद्धा दाक्षिणात्य आहेत.
महाराष्ट्राचें एक मोठें देवत म्हणजे शिवाजी महाराज. महाराष्ट्राची अस्मिता त्यांनीच तर जागृत केली. त्यांचा मूळ वंश राजस्थानातील सिसोदिया घराणें, असें म्हणतात. एवढेंच काय, तर, बहुतांश महाराष्ट्रीय मंडळींच्या पूर्वजांनी अनेकानेक पिढ्यांपूर्वी, दोनएक सहस्त्रकांपूर्वी, उत्तर हिदुस्थानातून महाराष्ट्रात स्थलांतर केलेलें आहे. (संदर्भ: इतिहासाचार्य राजवाडे यांचा लेख, ‘महाराष्ट्राची वसाहत’). माणसेंच जर बाहेरून महाराष्ट्रात आली, तर मग इतर गोष्टी आल्यास त्याचा बाऊ करायला नको.
सामोसा हा मूळ अरबी पदार्थ. जिलबी, गजक हे फारसी पदार्थ. त्यांना भारतीय रूपात-महाराष्ट्रीय रूपात मराठी संस्कृतीनें आत्मसात केले. फळें, भाज्या, धान्यें, पेयें इत्यादींचा विचार केला तर, भारतीयांनी व मराठी जनांनीही बटाटा, टोमॅटो, नारळ, काजू, सफरचंद, गहू, चहा, कॉफी, जायफळ, तांदूळ, साबुदाणा, टापियोका, इत्यादी परदेशीय गोष्टींचा स्वीकार केला. नुसताच स्वीकार नाहीं, तर महाराष्ट्रात बटाटा-साबुदाण्यासारखे पदार्थ उपासालाही चालतात. नारळ काय, उपासाला तर चालतोच ; पण धार्मिक कार्यक्रमांनाही अत्यावश्यक असतो. झीनिया, डेलिया, बोगनवेल, इत्यादि फुलझाडेंही परदेशीयच. इडली, सांबार, मेदुवडा, वगैरे दाक्षिणात्य पदार्थ व पराठा, नान, तंदूरी रोटी, पंजाबी पद्धतीच्या दाल-भाज्या आपण उत्साहानें खातो. आणि, हल्ली तर पिझ्झा, नूडल्स्, पास्ता, फ्रँकी इत्यादि खाद्यपदार्थ तरुण पिढीनेंच नव्हे, तर मध्यमवयातील लोकांनीही आपलेले केलेले आहेत. चिनी, थाय व इतर पद्धतीच्या रेस्टॉरंटमध्ये व स्टॉलस् वर गर्दी उसळलेली दिसते.
थोडक्यात काय, तर, विविध संस्कृतींमध्ये देवाण-घेवाण होतच असते ; मराठी संस्कृतीनें बर्याचकांहीं गोष्टी बाहेरून घेतलेल्या आहेत, व त्यात कांहींच गैर नाहीं.
गझल व संस्कृती यांचा विचार विविध अंगांनी करतां येईल. रिवायती (पारंपारिक) गझलमध्ये प्रामुख्यानें शृंगार रस असतो. मध्ययुगीन काव्यातील हिंदी-मराठी इत्यादी भाषांमधील शृंगार रस पाहिला तर, त्यात मीलन व विरह ही दोन्ही अंगें प्रेमिकेच्या, म्हणजे स्त्रीच्या, दृष्टिकोनातून वर्णलेली असतात. गझलमध्ये प्रामुख्यानें प्रेमिकाच्या, म्हणजे पुरुषाच्या, दृष्टिकोनातून हें वर्णन केलेलें असतें. म्हणजेंच, प्रेमाची एक बाजू जर इतर काव्य दाखवतें, तर गझल दुसरी बाजू दाखवते. त्यामुळे, गझलमुळे शृंगार रसात समतोल आलेला आहे, असेंच म्हटलें पाहिजे ; आणि त्यासाठी खरें तर रसिकांनी गझलचे आभार मानायला हवेत.
काव्यात संस्कृतीचें व जीवनाचें प्रतिबिंब पडतें. तें जसें इतर काव्यप्रकारांबद्दल खरें आहे, तसेंच गझलबद्दलही आहे. आजची गझल केवळ प्रेमी-प्रेमिका, मीलन-विरह, साकी-मदिरा एवढ्याच विषयांमध्ये मर्यादित राहिलेली नाहीं. अनेक सामाजिक, वास्तववादी विषयही गझलनें समर्थपणें पेललेले आहेत. कांहीं उदाहरणें पुरेशी आहेत.
अरे पुन्हां आयुष्याच्या पेटवा मशाली .
घेउनी देहास अपुल्या लेक बाजारात गेली .
विक्रयाला कायद्याने सूट आहे .
इंद्रियांची सोय झाली पाहिजे .
संस्कृतीची हाव नाही .
भडव्या रे मी तुझी माय आहे .
…..
हातभट्टी झोकल्या बारा जणांनी
रात्रभर मी तुडवलेली गाय आहे.
यातला प्रत्येक शेर वाचून आपल्या अंगावर सर्रकन् काटा येतो; ‘वाह्’ अथवा आह्’ जाऊंच द्या, आपल्या तोंडातून शब्दच फुटत नाहीं, आपण अगदी नि:स्तब्ध होऊन जातो !
गझलनें अनेक प्रकारच्या जीवनानुभवांना समर्थपणें स्पर्श केलेला आहे. तेव्हां , या अंगानेंही विचार करतां, गझलनें संस्कृती समृद्धच केली आहे, असेंच म्हणावें लागेल.
गझल म्हणजे उत्कट अनुभूति , अनपेक्षित कलाटणी :
इतर काव्यप्रकार जसे रसिकांना आनंद देतात, तसेंच गझलचेंही आहे. गझल अत्यल्प शब्दांमध्ये उत्कट भावनांचें दर्शन घडवते. अनपेक्षित कलाटणी नुसताच आश्चर्योद्गार प्रस्फुटित करत नाहीं, तर विचारही करायला भाग पाडते.
खरें तर, वर दिलेली उदाहरणें पुरेसी बोलकी आहेत. तरीही, वानगीदाखल आणखी कांहीं, पण जरा वेगळ्या वळणाची, उदाहरणें पाहूं या. ( प्रेमातील उत्कटतेची वा अनपेक्षित कलाटणीची अनेक उदाहरणें देता येतील ; ती इथें दिलेली नाहीत. मात्र, तशी ती आहेत, हें ध्यानीं घ्यावे).
झोपाळ्यावाचून झुलायचे .
वाटतें जसें फुलाफुलांत चाललो .
मिटले चुकून डोळे, हरवून रात्र गेली .
उगीच कां ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते ?
मी असा की लागती ह्या सावल्यांनाही झळा .
मशहूर ज्ञानया झाला …. गोठ्यातच जगला हेला .
कधीतरी माणसाप्रमाने वाग माणसा .
कुठलाही विषय असो, गझल रसिकाला उत्कट अनुभूति देते, भावविभोर करते. असल्या, थेट हृदयाला हात घालणार्या काव्यप्रकाराला, ‘साहित्यावर आक्रमण’ कसें म्हणतां येईल ?
खरें तर, गझल ही समृद्ध व यशस्वी जीवनासाठी अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे, पण तो अन्य एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याबद्दल पुन्हां केव्हांतरी.
तर मग , ‘गझलनें मराठी साहित्यवर आक्रमण केलें आहे’, असें कोणाला वाटत असल्यास,
त्याचें कारण काय असावें ?
गेल्या दीड शतकात आपण पाश्चात्य संस्कृतींपासून विज्ञान, भाषाशास्त्र (लिंग्विस्टिक्स), संख्याशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, कंप्यूटर सायन्स, इनफरमेशन टेक्नॉलॉजी, इत्यादि अनेक विषयांचें ज्ञान मिळवलें आहे. त्या विषयांवरील, परभाषांमधील पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाले आहेत, होत आहेत ; व परभाषीय पुस्तकांचे संदर्भ घेऊन मराठीत पुस्तकें लिहिली जात आहेत. ही अर्थातच स्तुत्य गोष्ट आहे. परभाषीय शब्द आपण स्वीकारले, परभाषीय विषय स्वीकारले, परभाषीय पुस्तकेंही. इतर भारतीय-अमराठी-संस्कृतींकडून, तसेंच पाश्चिमात्य संस्कृतींकडून, आपण बर्याच कांहीं गोष्टी घेतल्या. इतर भाषांकडून आपण काव्यप्रकारही घेतले आहेत. या सगळ्याला आक्रमण म्हणतां येत नाहीं , व आपण तसें म्हणतही नाहीं .
तर मग, गझलच्या बाबतीत असा आक्रमणाचा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होत असेल, तर तो कां, याचा विचार आपण केला पाहिजे. त्यासाठी गझलच्या इतिहासात जरा डोकावणें आवश्यक आहे.
गझलचा इतिहास म्हणजे, प्रथमत: , हिदुस्थानातील फारसी-उर्दू गझलचा इतिहास, आणि त्यानंतर मराठी गझलचा इतिहास. भारतातील गझलची सुरुवात अमीर खुसरोपासूनची म्हणतां येईल. तो ज्ञानेश्वरांचा समकालीन. त्यानें फारसी व फारसी-हिंदवी मिश्र गझलांची रचना केली. (हिंदवी म्हणजे, ‘हिंदची’. त्या काळातील भारतीय भाषांना, व खास करून दिल्ली व उत्तर हिंदुस्थानातील भाषेस, अफगाणिस्तान-इराण येथून आलेले लोक ‘हिंदवी’ म्हणत.) . नंतरच्या काळात आपल्याला कबीर वगैरेंच्या थोड्या गझल रचना दिसून येतात. पण, आज ज्या तर्हेची उर्दू गझल लिहिली जाते, तिचा प्रणेता आहे वली दकनी हा मध्ययुगीन कवी. हा वली दकनी मूळचा ओरंगाबादचा. (अरे ! म्हणजे, विद्यमान उर्दू गझलचा पिता महाराष्ट्रीय भूभागातलाच की !) . दुसरी गोष्ट अशी की, आज ज्या भाषेला ‘उर्दू‘ म्हणतात, तिच्या पूर्वस्वरूपामध्ये ‘दकनी/दखनी’ म्हणून त्या काळीं ओळखल्या जाणार्या भाषेचा बराच वाटा आहे. (अरे ! इथेंही महाराष्ट्रीय भूभागाचा संबंध आहेच ! थोडक्यात काय, उर्दू ही भाषा व गझल हा साहित्यप्रकार आपल्याला वाटतो तितका परका नाहीं तर ! ). उर्दू गझलला ४००-५०० वर्षांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे, साहित्यात सामावायला व मानाचें स्थान मिळवायला उर्दू गझलला पुरेसा वेळ मिळाला.
मराठी गझलची सुरुवात उत्तर-पेशवाईच्या काळातील आहे. ( मात्र, त्यापूर्वीही, दखनी भाषेद्वारें गझल मराठी जनांना परिचित होती. त्याकाळी राजकारण, युद्ध, मुलकी कारभार जनरल-ऍडमिनिस्ट्रेशन, या व अशा क्षेत्रांशी संबंधित लोकांना फारसी येत असे. अनेक संतांना तसेंच अनेक मराठी सामान्य जनांना दखनी येत असे). अमृतराय व मोरोपंत यांनी प्रथम मराठीत गझलसदृश रचना केल्या. उदा. मोरोपंतांची ‘रसने न राघवाच्या . . ’, ही रचना . (अरेच्चा ! मराठीतील ख्यातनाम मध्ययुगीन कवि, संस्कृतचे पंडित, मोरोपंत हे गझलकारही होते ! कमालच आहे की ! ). अर्थात् , अमृतराय-मोरोपंत यांच्या या रचना म्हणजे गझलसमानच रचना आहेत, असें दाखवून दिलें २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात माधवराव पटवर्धन, म्हणजेच कवि माधव ज्यूलियन, यांनी. माधवरावांना फारसीचें उत्कृष्ट ज्ञान होतें. (ते फारसी शिकवतही, आणि त्यांनी फारसी-मराठी शब्दकोशही तयार केलेला आहे). त्यांनी अनेक गझलरचना केल्या, उदा. त्यांचें ‘गज्जलांजली‘ हें पुस्तक. माधवरावांनी आपली गझलरचना ही (हेतुत:) भावकवितेसारखी केलेली आहे. (आपण आधी भावकवितेचा उल्लेख केलेलाच आहे. भावकविता रविकिरण मंडळापासून सुरूं झाली, असें म्हणतां येईल. अन्, रविकिरण मंडळाचे अध्वर्यू होते माधव जूलियन). कुसुमाग्रज, अनिल, बा.भ. बोरकर, मंगेश पाडगांवकर अशा अनेक प्रथितयश कवींनीही गझला किंवा गझलसदृश रचना लिहिल्या. पण, मराठीत गझल जोमानें पुढे आणणारे कवि म्हणजे सुरेश भट ; आणि, हा काळ १९६० नंतरचा आहे. (हिंदी, गुजराती इत्यादि भाषांमधील गझल त्यापेक्षा बरीच जुनी आहे). यावरून मराठीत गझल किती नवी आहे याचा अंदाज येईल.
म्हणजेच, मराठीत गझल जोमानें वाढूं लागली, त्याला , सुरेश भटांपासूनचा विचार केला तर, फक्त ५० वर्षेंच झालेली आहेत ; आणि माधव ज्यूलियन यांच्यापासूनचा विचार केल्यास, ९०-९५ वर्षेंच झालेली आहेत. पन्नास वर्षांचा काळ काय किंवा ९० वर्षांचा काय, साहित्याच्या संदर्भात तसा फार मोठा नव्हेच. हा अवधी, मराठीत गझल रुळायला व मराठी साहित्यानें तिला आपली म्हणायला, तसा अल्पच. समीक्षकांचें माहीत नाहीं, पण, या अवधीत गझल सामान्यजनांना मात्र प्रिय झाली. कदाचित् त्यामुळेंच, कांहीं लोकांना, ‘गझल मराठी साहित्यावर आक्रमण करते आहे’, अशी धास्ती वाटत असावी. परंतु, वस्तुस्थिती मात्र तशी नाहीं.
समारोप :
आपण अनेक पैलूंमधून, अनेक अँगल्समधून, या ‘आक्रमण’ प्रश्नाकडे पाहिले, आणि प्रत्येक वेळी हेंच दिसून आलें की, गझलनें मराठी साहित्यावर आक्रमण कांहीं केलेलें नाहीं. याउलट, आपला असा निष्कर्ष निघतो की, गझलचा मराठीत प्रवेश ही एक स्वाभाविक सांस्कृतिक प्रक्रिया आहे, आणि, गझल मराठी साहित्याला समृद्धच करते आहे.
गझल ही अशी गोष्ट आहे की, एकदा माणूस तिच्या प्रेमात पडला की जन्मभर तिचा
दिवाणा बनून रहातो. म्हणून, गझलच्या आक्रमणाची धास्ती बाळगणारे जर कांहीं लोक असलेच, तर, ते येणार्या काळात गझलच्या प्रेमात पडतील, व गझलचे दिवाणे बनतील, अशी आपण अपेक्षा करूं या.
-- सुभाष स. नाईक
June 25, 2016
देशात आणि राज्यात स्त्रियांवरील आत्याचार आणि बलात्कार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे देशभरात अनेक वाद नव्याने निर्माण होत आहेत. प्रसारमाध्यमे ही ते वाद चवीने चघळ्त आहेत. या सर्वात मुळ प्रश्न नेहमी सारखाच बाजुला पडत आहे. या सर्व घटनांसाठी पोलीस सुरक्षा सबंधी मंत्री आणि अधिकारी यांच्यासह खुद्द स्त्रियांनाही आरोपीच्या पिंजर्यात उभं करून या समस्या सुटणार नाहीत. देशातील प्रत्येक सुजान नागरिकाने शांतपणे आणि विचारपूर्वक या समस्येकडे पाहायला हवे. देशभरातील स्त्रियांना आता असुरक्षित वाटू लागत असल तरी आपल्या देशात स्त्रियांची सुरक्षितता, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यांच्यावर होणारे बलात्कार या तिन्ही गोष्टींकडे थोड्या वेगवेगळ्या दृष्टीने पाहायला हवे. या तिन्ही प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी एकच मार्ग अवलंबता येणार नाही.
स्त्रियांच्या असुरक्षिततेचा विचार करता देशात फक्त स्त्रियाच असुरक्षित आहेत असं नाही. देशभरात सुरक्षे अभावी कित्येक पुरूषांनाही आपले प्राण गमवावे लागता आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एका घटनेत रस्त्याने चालणार्या एखाद्या स्त्री च्या गळ्यातील दागिना बाईकवरील एका चोराने हिसकावला आणि दुसर्या घटनेत एका पुरूषाने एका स्त्रीवर बलात्कार केला. या दोन्ही घटनात स्त्रीवर अन्याय करणारा पुरूषच असला तरी बलात्काराच्या घटनेत बलात्कार करणारा पुरूष आहे आणि चोरीच्या घटनेत चोरी करणारी एक प्रवृत्ती आहे. या दोन्ही घटना एकाच तराजूत नाही तोलता येणार हे येथे लक्षात घ्यायला हवे. स्त्रियांवर होणार्या कौटुंबिक आत्याचाराला जेवढे पुरूष जबाबदार आहेत तेवढ्याच स्त्रियाही जबाबदार आहेत कारण कायद्याच्याच भाषेत सांगायच झालं तर अन्याय करणार्या इतकाच अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो.
बलात्कार हा एकमेव गुन्हा आहे जो फक्त पुरूषांकडून स्त्रियांच्या बाबतीत केला जातो. या गुन्हयासाठी आपल्या देशात दिली जाणारी शिक्षाही त्यामानाने कठोरातील कठोरच आहे. अस असतानही आपल्या देशात बलात्काराच प्रमाण दिवसेन – दिवस वाढतच आहे याचा अर्थ असा होता की बलात्कारासारखा गुन्हा करणार्याला आता कायद्याचे आणि शिक्षेचे भय उरलेले नाही हे तर अधिकच भयंकर आहे.
स्त्रियांचा पोशाख, वाढता चंगळ्वाद, वाढती अधूनिकता बलात्कारासारख्या घटना घडण्याला कारणीभूत आहेत अस वरवर जरी वाटत असल तरी त्यात तथ्य नाही. पुरूषांची बदलती मानसिकता या सर्व घटनांच्या मुळाशी आहे. पुरूष हा स्त्री पेक्षा श्रेष्ठच आहे ही मानसिकता आपल्या देशातील पुरूष आजही सोडायला तयार नाही आणि हाजोरो वर्षापूर्वीपासूनची पुरूषांची गुलामगिरी पूर्णपणे नाकारायला आपल्या देशातील स्त्रियाही तयार नाहीत. जी प्रसारमाध्यमे स्त्रियांवर अन्याय- अत्याचार झाला की रान पेटवितात. तिच प्रसारमाध्यमे नकळ्त स्त्रियांच्या पुरूषांप्रती गुलामगीरीला काही अंशी खतपाणीच घालतात हे सत्य नाकारता येणार नाही. देशभरात स्त्रियांवरील वाढत्या आत्याचारासाठी सरसकट सर्व पुरूषांना आरोपीच्या पिंजर्यात उभं करण योग्य होणार नाही कारण स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्यावर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्यावर अत्याचार करणार्या अत्याचार्यांचा नाश करण्यासाठी लाखो परूषांनी आपले प्राण संकटात टाकले आहेत हे विसरून चालणार नाही. स्त्रियांवर अत्याचार करणारा एक पुरूष असतानाही आपले संरक्षण करण्याची जबाबदारी दुसर्या पुरूषानेच घ्यायला हवी अशी अपेक्षा स्त्रियांनी करणे ते ही स्त्री- पुरूष समानतेच्या काळात योग्य नाही. आता आपल्या देशातील प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच घ्यायला हवी, देशातील प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षणासाठी सज्ज असायलाच हवं. आपल्या देशात हजारो वर्षात स्त्रीची जी प्रतिमा तयार झालेली आहे ती आता बदलायला हवी. पुरूषांसारखाच आपल्या डोळ्यातील अश्रूंवर ताबा मिळवायला हवा. आपल्या देशातील स्त्रियांवरील आत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातील पुरूषांवी मानसिकता बदलायला हवी. नग्नता अश्लिलता ही प्रत्यक्षात नसते, ती पाहणार्याच्या नजरेत असते. त्यामुळे परूषांनी प्रथम स्त्रियांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीत आणि दृष्टीकोणात बदल करायला हवा. आज स्त्रिया प्रत्येक बाबतीत, प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खाद्याला खांदा लावून चालत असताना जी कामे खास स्त्रियांची म्ह्णून समजली जातात ती सर्वच्या सर्व कामे करण्याची मानसिक तयारी आज आपल्या देशातील किती पुरूषांची असते. आजही आपल्या देशातील सुशिक्षीत मालींना नवरा आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आणि जास्त कमावणारा हवा असतो ही मानसिकता काही अंशी स्त्रियांनी ही बदलायला हवी. पुरूषांनाही धुणी-भांडी करताना आता लाज वाटून चालणार नाही त्यासाठीची मानसिक तयारी आज पुरूषांनी करायलाच हवी. पुरूषार्थ वगैरे गोष्टी काळाच्या ओघात कधीच मागे पडल्या आहेत. आता आपल्या देशातील पुरूषांना संस्कृती आणि संस्कार यांच गाठोड फार काळ वाहता येणार नाही आणि वाहायचच असेल तर त्या गाठोड्यात आणखी भर घालावी लागेल. स्त्रियां एकवेळ पुरूषांची बरोबरी करूही शकतील पुरूष कधीच करू शाकणार नाहीत कारण पुरूषांना जन्माला घालणार्या स्त्रीला मात्र ते कधीच जन्माला घालू शकणार नाहीत. देशभरात स्त्रियांवर होणारे अत्याचारांना आळा घालायचा असेल तर भारतीय पुरूषांच्या मानसिकतेचा नव्याने अभ्यास करून त्यांची पुरूषी मानासिकता बदलण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत.
-- निलेश बामणे
January 9, 2016
जागतिक आर्थिक महासत्तेची चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. वेळप्रसंगी एकाधिकारशाहीच्या जोरावर संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध झिडकारण्यातही ते मागे-पुढे पाहणार नाहीत. नुकत्याच झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेत बँकेच्या मूळ भांडवलापासून ते आकस्मिक निधीपर्यंत जागतिक अर्थकारणात चीनची ‘दादा’ गिरी आता पाहायला मिळणार आहे.
April 8, 2013
’हसणे’ ही एक उपजत, अफ़लातुन कला आहे. ती कुणी कुणाला शिकवत नसते, आणि शिकवता ही येत नसते. नैसर्गिक स्मितहास्यातून व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. आपल्या हास्यशैलीवरून अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक सहज अंदाज समोरच्या व्यक्तीला येत असतो. कोणत्याही प्रसंगात हसणे म्हणजे त्या प्रसंगाला तुमच्याकडून येणारी दाद समजली जाते, तो तुमचा रिस्पॉन्स असतो.
September 20, 2019
आचार्यश्री आई जगदंबे ला प्रार्थना करीत आहेत की, कृपापांगालोकं वितर तरसा साधुचरिते- हे साधुचरिते अर्थात अत्यंत सुयोग्य वर्तन करणाऱ्या आई जगदंबे ! तू तुझ्या कृपारूपी दृष्टिपाताला माझ्यावर तरसा अर्थात अत्यंत शीघ्रपणे वितर अर्थात प्रदान कर.
February 14, 2020
१. पेरुव्हियन सेंट्रल रेल्वे (दक्षिण अमेरिका)
तिबेटिन रेल्वे बांधण्याआधी जगातील सर्वांत उंचावरील रेल्वेमार्ग म्हणून याची गणना होत असे. अँडीज पर्वतराजीत ४७८२ मीटर उंचीवरील हा रेल्वे मार्ग समुद्रसपाटीपासून सुरू होतो. १२ तासांच्या प्रवासात सहा विभागांमध्ये हवामान बदलत राहतं. सर्वांत उंच भागात प्रवाशांना ऑक्सिजन देण्याची सोय डब्यात करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाला 'ढगांतून जाणारा रेल्वे मार्ग' म्हणून ओळखलं जातं. जवळजवळ १०० वर्षांपूर्वी याची बांधणी झालेली आहे. या कामाचे नकाशे १८५१ सालापासून आखण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष कामास १८७० साली सुरुवात झाली व ४० वर्षांनी काम पूर्ण झालं. यासाठी अंदाजे दहा हजार कामगारांची नेमणूक करण्यात आली होती. या मार्गावर ६९ बोगदे, ५८ पूल आणि २१ अतिशय कठीण वळणं आहेत. गलेरा हे सर्वांत उंचावरील स्थानक बोगद्याच्या आतच आहे. १०,२८० फूट उंचीवरील पूल दोन अजस्त्र शिलांमधील बोगद्यांच्या मध्यात असून, त्यांच्या खाली प्रचंड खोल घळ आहे.
२. सैतान वा भुताच्या नाकासारखी बांधलेली रेल्वे (इक्वेडोर - दक्षिण अमेरिका)
हा जगातील सर्वांत कठीण, खडतर रेल्वेमार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गायाक्विल शहर आणि राजधानी क्वीट यांना जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या आखणीस २५ वर्षे लागली आणि १८९९ मध्ये काम सुरू झालं. त्यानंतर २० ते २५ वर्षांनंतर हा मार्ग प्रत्यक्षात सुरू झाला. वाटेतील एका सरळसोट अजस्र शिळेमधून अनेक वळणांचा मार्ग खोदण्यात आला आहे. चढण १:१८ हिशोबाने छाती दडपून टाकणारी आहे. सर्वांत उंच जागेस EI Noriz del Diablo (The Devil's nose) म्हणतात. १२ कि.मीटरचा उतरणीचा रस्ता १९९७ च्या भूकंपात उद्ध्वस्त झाला होता.
३. क्विंगानी तिबेट हेवी रेललाईन
(या मार्गाची माहिती तिबेट रेल्वे प्रकरणात दिलेली आहे.)
४. यिवान रेल लाईन तिबेट (यिचाँग टू चाँगींग-वांझाऊ)
३७७ कि.मी. लांब असलेला हा सर्वांत कठीण व अतिशय महाग रेल्वे प्रकल्प आहे. एक कि. मी. बांधण्यासाठी ९ मिलियन डॉलर्स या हिशोबाने या रेल्वे प्रकल्पाचा खर्च एकूण ३.४१ बिलियन डॉलर्स झाला आहे. ५० हजार कामगार या कामासाठी ७ वर्षं झटत होते. या मार्गावर २५३ पूल व १५९ बोगदे आहेत.
५. आल्प्स ट्रान्झिट रेल (स्वित्झर्लंड)
(न्यू रेल लिंक थ्रू आल्प्स माउंटन्स)
या मार्गाचं काम सन २०१६ पर्यंत पूर्ण होईल अशा वळणावर येऊन पोहोचलं आहे. यासाठी १३ बिलियन डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. सर्व रुळांचं जाळं खोल जमिनीखाली, बोगद्याच्या शेकडो मीटर खाली आहे. हे बोगदे १९१० सालात बांधलेले होते. जगातील सर्वांत लांब बोगदा ५७ कि.मीटर असून, गोथार्ड या नावाने या रेल्वे मार्गावर असणार आहे.
November 11, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti