वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अकंठेकलंकादनंगेभुजंगाद-
पाणौकपालादफालेऽनलाक्षात् |
अमौलौशशांकादवामेकलत्राद-
हंदेवमन्यं न मन्ये न मन्ये ‖ ३५ ‖
एखाद्या कवीच्या प्रतिभेला अचानक बहर येतो. एखादी सुंदरतम कल्पना साकार होते. ही कल्पना इतकी रम्य असते ती स्वतः कवीच तिच्या प्रेमात पडतो. पुन्हा तशीच रचना करण्याची स्वाभाविक ऊर्मी जागृत होते. या सिद्धांतानुसार तयार झालेला हा श्लोक.
आचार्यश्री म्हणतात,
अकंठेकलंकात्- ज्यांच्या गळ्याला कलंक म्हणजे डाग नाही,
अनंगेभुजंगात्- ज्यांच्या हातामध्ये दंडामध्ये सर्प बांधलेले नाहीत,
अपाणौकपालात् - ज्यांच्या हातामध्ये कपाल म्हणजे भगवान ब्रह्मदेवांच्या कापलेल्या मस्तकाच्या कवटीचा भाग नाही,
अफालेऽनलाक्षात् - ज्यांच्या मस्तकावरील नेत्रातून अग्नी उसळत नाही,
अमौलौशशांकात् - ज्यांच्या मौली वर अर्थात मस्तकावर चंद्र विलसत नाही,
अवामेकलत्रात्- ज्यांच्या डाव्या अंगावर पत्नी विराजमान नाही,
अहं देवमन्यं न मन्ये न मन्ये - अशा अन्य कोणालाही मी देव मानतच नाही.
मागील श्लोकातील गुणवैशिष्ट्यामध्ये भर घालत हलाहल विष प्राशन केल्यामुळे आलेले नीलकंठत्व आणि ब्रह्मदेवांच्या मस्तकाचे हाती धरलेले कपाल या भगवान शंकरांच्या दोन गुणवैशिष्ट्यांचे वर्णन त्याच शैलीत आचार्यश्री करतात.
हे नसेल तर तो देवच नाही यातून त्यांच्या अविभाज्य लक्षणांचे वर्णन केले. कारण यांच्याशिवाय भगवान शंकरांचे स्वरूप पूर्ण होत नाही. तसेच या गोष्टी भगवान शंकरां शिवाय अन्य कोणतीच देवता बाळगतही नाही.
त्यामुळेच या गोष्टींचे आणि याशिवाय मी देवाला मानत नाही या उच्चारातून आचार्य श्री स्वतःच्या एकनिष्ठेची घोषणा करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
महादेव शंभो गिरीश त्रिशूलिंस्त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् |
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३६ ‖
भक्तीचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे एकनिष्ठता. जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीशिवाय अन्य कोणाचाही विचार करीत नाही तशी पूर्ण समर्पित वृत्ती भक्तीच्या क्षेत्रात अभिप्रेत असते.
आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात तेच वर्णन सादर करीत आहेत. त्यांची शब्दकळा आहे,
महादेव - हे महादेवा ! आपण सर्व देवांचे ही देव आहात.
शंभो - हे शंभो आपण सर्वांचे कल्याण करणारे आहात.
गिरीश-हे गिरिजापती ! त्रिशूलि: - हे त्रिशूलधारी ! या त्रिशुला च्या स्वरूपात आपण सत्व,रज,तम या तीनही गुणांचे संचालक आहात.
त्वदीयं समस्तं विभातीति यस्मात् - आपल्याच अधिष्ठानावर हे संपूर्ण विश्व प्रकाशित होत आहे. त्यात आपल्या चैतन्याचे प्रतिबिंब विलसत आहे.
शिवादन्यथा दैवतं नाभिजाने- भगवान शंकरांना सोडूनी अन्य कोणतेही दैवत जाणत नाही.
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् - मी शिव आहे.मी शिव आहे.मी शिव आहे.
हा शेवटचा उल्लेख फार महत्वाचा आहे. केवळ भगवान कसे आहेत? याचे वर्णन करून उपयोग नाही. त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी मी देखील तसाच असायला हवे. मी स्वतःला भगवंता पेक्षा वेगळा समजत असेल तर ईश्वरीय परमानंदाची प्राप्ती मला कदापि होणार नाही. मी त्याच ईश्वरी शक्तीचा अंश आहे ही वास्तव अनुभूतीच सर्व साधनेचे ध्येय आहे.
आचार्यश्री स्वतःच्या त्या भूमिकेचे वर्णन करून आपल्याला त्यासाठी प्रेरणा देत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
गुणधर्म म्हणजे आपल्यातलीच एक विशेषता…….मानवाचा खरा गुणधर्म म्हणजे मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, ही मानवियता … जसे जलाचा धर्म आहे तहान भागवणे व्याकुळता दुर करणे, सुर्याचा धर्म आहे सुष्टीला प्रकाश देणे. सजीवांकरीता जीवनसत्त्व निर्माण करणे. वायुचा धर्म आहे प्राण़वायु देणे, अग्निचा धर्म आहे उष्णता देणे.
यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं
स्थितिं याति यस्मिन्यदेकांतमंते |
स कर्मादिहीनः स्वयंज्योतिरात्मा
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३७ ‖
जगद्गुरू स्वरूपात कृपाळू असल्याने जरी भक्तांच्या साधन रूपात आचार्य श्री विविध देवतांच्या अत्यंत रसाळ स्तोत्रांची निर्मिती करीत असले तरी त्यांचा मूळ पिंड निर्गुण निराकार उपासक वेदांती असाच आहे.
प्रत्येक देवतेकडे देखील ते तसेच पाहतात.
मागील श्लोकात शिवोऽहम् चा उल्लेख आल्यावर आचार्य श्रींची ती मूळ वेदांतनिष्ठा जागृत झाली.
त्याआधारे परब्रह्म स्वरूपात भगवान शंकरांचे वर्णन करताना ते म्हणतात,
यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं - ज्याच्या पासून हा विचित्र प्रपंच निर्माण होतो. अर्थात खरेतर ज्याच्या अधिष्ठानावर या चित्रविचित्र पदार्थ आणि घटनांनी भरलेल्या प्रपंचाचा भास होतो,
स्थितिं याति - ज्याच्या अधिष्ठानावर या संसाराचे कार्य चालते, यस्मिन्यदेकांतमंते - शेवटी तो सर्व प्रपंच त्याच्यातच लय पावतो,
स कर्मादिहीनः - अशा त्या कर्मविहीन, अर्थात या सगळ्याचे अधिष्ठान असले तरी स्वतः कोणतेच कर्म न करणारे,
स्वयंज्योतिरात्मा - आत्म ज्योती स्वरूप असणारे, जे भगवान श्री शंकर तेच माझे मूळ वास्तव स्वरूप आहे.
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् - मी शिव आहे. मी शिव आहे. मी शिव आहे.
अर्थात या विश्वाची निर्मिती,स्थिती आणि लयाला कारणीभूत असणारे, खरेतर आधारभूत असणारे जे परम निर्गुण-निराकार स्वरूप तेच माझे मूळ रूप आहे. त्यात विलय पावणे, एकरूप होणे हे माझे ध्येय आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
किरीटे निशेशो ललाटे हुताशो
भुजे भोगिराजो गले कालिमा च |
तनौ कामिनी यस्य तत्तुल्यदेवं
न जाने न जाने न जाने न जाने ‖ ३८ ‖
विवेचनाच्या ओघात शिवोऽहम् ही आत्म स्वरूपाची जाणीव झाली आणि क्षणात समाधिस्थ झालेले आचार्य त्या अनुभूतीचे वर्णन करून गेले.
प्रारब्धवशात पुनश्च देह भानावर आले. जसा झोपेतून उठलेला माणूस झोपण्यापूर्वीच्या विचारांना पुन्हा प्राप्त होतो तसे आचार्यश्री पुन्हा स्तोत्रातील सुरू असलेल्या विषयावर आले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन श्लोका पूर्वीची रचना पहावयास मिळते.
पुनरुक्ती चे हे कारण पाहिले म्हणजे हे वर्णन योग्य वाटते. आचार्यश्री म्हणतात,
किरीटे निशेशो - ज्यांनी मस्तकावर निशेचा म्हणजे रात्रीचा ईश म्हणजे स्वामी असणारा चंद्र धारण केलेला आहे,
मस्तकावर चंद्र असणे हे मस्तकाच्या अर्थात विचारांच्या उज्ज्वलतेचे आणि शीतलतेचे प्रतीक आहे. भगवान भालचंद्र शंकर या स्वरूपातील आहेत.
ललाटे हुताशो- ज्यांच्या कपाळावर असणाऱ्या तृतीय नेत्रामध्ये विश्व विनाशकारी अग्नी विराजित आहे,
भुजे भोगिराजो - ज्यांच्या हातावर वासुकी तक्षक इत्यादी सर्प रुळत आहेत,
गले कालिमा च - ज्यांच्या कंठात हलाहल विष धारण केले असल्याने ज्यांचा गळा काळा पडलेला आहे.
दुसरा सुंदरतम अर्थ म्हणजे ज्यांच्या कंठातून कायम राम नामाचा उच्चार निघतो त्या रामाच्या घनश्याम अशा रंगाचा ज्यांचा गळा झालेला आहे,
तनौ कामिनी यस्य - ज्यांच्या अंगावर म्हणजे मांडीवर देवी पार्वती विराजमान आहे,
तत्तुल्यदेवं - त्यांच्यासारखा अन्य कोणीही देव,
न जाने न जाने न जाने न जाने - मी जाणत नाही. मी जाणत नाही. मी जाणत नाही .मी जाणत नाही.
शेवटी चार वेळा सांगणे याचा अर्थ अगदी ठासून सांगणे असा आहे. यात कोणतीच शंका नाही असे निर्विवाद कथन आहे.
उपासना करतांना आपली उपास्य दैवत हेच परमश्रेष्ठ तत्व आहे ही साधकाची भूमिका अनिवार्य असते. त्या भूमिकेला सुदृढ करण्यासाठी आचार्यांचे हे वर्णन आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
अनेन स्तवेनादरादंबिकेशं
परां भक्तिमासाद्य यं ये नमंति |
मृतौ निर्भयास्ते जनास्तं भजंते
हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् ‖ ३९ ‖
आता स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती सादर करावीत अशा स्वरूपातील या दोन श्लोकांमध्ये आचार्य श्री प्रस्तुत स्तोत्राच्या पठना चे लाभ व्यक्त करीत आहेत.
आरंभीच्या दोन चरणात या स्तोत्राचा पठनाची पद्धती मांडताना आचार्यश्री म्हणतात,
अनेन स्तवेनादरादंबिकेशं - या स्तवनाच्या द्वारे ची आदरपूर्वक भगवान श्री अंबिकेशांचे स्तवन करतात,
परां भक्तिमासाद्य यं ये नमंति - परम भक्तीने युक्त होऊन जे त्यांना नमस्कार करतात.
अर्थात स्तोत्राचे पठन हे आदरपूर्वक आणि भक्तिपूर्वक असावे हे आचार्य श्री अधोरेखित करीत आहेत. तो केवळ उपचार नसावा किंवा स्वार्थ नसावा हे त्यात गृहीत आहे.
अशा सांगितलेल्या मार्गाने या स्तोत्राचे पाठ करतात त्यांना मिळणारी दोन अद्वितीय लाभ सांगतांना आचार्य म्हणतात,
मृतौ निर्भयास्ते- ते निर्भयपणे मृत्यूला सामोरे जातात. जनास्तं भजंते- लोक त्यांची उपासना करतात.
यात त्याच्या स्वतःच्या जीवनाचे कल्याण होते हे त्याच्या निर्भय मृत्यूतून वर्णन केले. सोबतच तो इतरांच्या जीवनाचे कल्याण करतो. त्यांनाही शिव मार्गाला लावतो हे दुसऱ्या उल्लेखात आचार्य स्पष्ट करीत आहेत.
यासाठी जीवनाचे साफल्य कशात आहे? हे सांगताना आचार्य म्हणतात,
हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् - सदैव आपल्या हृदयकमळात निवास करणाऱ्या भगवान शंकरांचे स्मरण करावे.
तोच आपल्या परम कल्याणाचा मार्ग आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
भुजंगप्रियाकल्प शंभो मयैवं
भुजंगप्रयातेन वृत्तेन क्लृप्तम् |
नरः स्तोत्रमेतत्पठित्वोरुभक्त्या
सुपुत्रायुरारोग्यमैश्वर्यमेति ‖ ४० ‖
या नितांतसुंदर, महनीय अर्थपूर्ण श्री शिवभुजंग स्तोत्राचे समापन करताना आचार्य श्री म्हणतात,
भुजंगप्रिय- हे भुजंग प्रिया ! अर्थात ज्यांनी गळ्यात, हातात भुजंग म्हणजे सर्प धारण केलेली आहे असे,
अकल्प- या दृश्य विश्वाच्या विलयाला कल्प असे म्हणतात. भगवान शंकर त्यानंतरही अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांना अकल्प असे म्हटले. अर्थात त्यांना विनाश नाही.
शंभो - हे भगवान शंकरा ! कल्याणकारका !
मयैवं - मी अशा प्रकारे
भुजंगप्रयातेन वृत्तेन - भुजंगप्रयात या वृत्तामध्ये, एखादा वळवळणारा नागराज पुढे जात असताना त्याची गती ज्या प्रकारची असते त्याप्रकारची लय या वृत्तात असल्याने याला भुजंगप्रयात असे म्हणतात.
क्लृप्तम् - आपले स्तवन रचलेली आहे.
नरः - जो कोणी मानव, स्तोत्रमेतत् - या स्तोत्र रचनेला,
पठित्वोरुभक्त्या - दृढ भक्तीने पठन करील,
सुपुत्र - सद्गुणसंपन्न संतती, सातत्यपूर्ण वंशपरंपरा,
आयु: - प्रदीर्घ आयुष्य,
आरोग्यम् - निरोगी जीवन, जो वेगळ्या आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. याच्याशिवाय अन्य निरर्थक आहे.
ऐश्वर्यम् - विविध प्रकारचे ऐश्वर्य.
एति - प्राप्त करेल.
या एति शब्दामध्ये या सर्व गोष्टींसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागणार नाहीत तर या सर्व गोष्टी भगवान श्री शंकरांचा कृपेने, आपोआपच त्यांच्याकडे चालत येतील असा सुंदर भाव आहे.
अर्थात या स्तोत्राच्या पठनाने त्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतील.
त्याचे सर्वार्थाने कल्याण होईल.
जय भोलेनाथ !
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
बाल्ये दुःखातिरेको मललुलितवपुः स्तन्यपाने पिपासा
नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो भवगुणजनिता जन्तवो मां तुदन्ति ।
नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः शड्करं ना स्मरामि
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥२॥
पूर्वजन्मीच्या कर्मांच्या फलवशात गर्भवास प्राप्त झाला. आरंभीच्या श्लोकात त्याचे वर्णन केल्यानंतर आचार्यश्री पुढे म्हणतात की जन्म प्राप्त झाल्यानंतर देखील ही दुःख परंपरा सुटली नाही.
शैशवावस्थेतील दुःखांचा विचार मांडताना आचार्यश्री म्हणतात,
बाल्ये दुःखातिरेको - बालपणात मला अनेक दुःखदायक गोष्टींचा सामना करावा लागला. मललुलितवपुः- माझे शरीर मलाने व्याप्त होते. स्वतःचे मलमूत्र देखील स्वच्छ करता येत नव्हते. मी त्यातच लोळत होतो. आजूबाजूला इतर घाण असली तरी त्यातच लोळावे लागत होते. सरकण्याची देखील क्षमता नव्हती.
स्तन्यपाने पिपासा - सातत्याने स्तनपानाची तृष्णा जागृत होत होती. अर्थात तहान भुकेच्या वेदना त्रस्त करीत होत्या.
नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो- शरीराच्या अवयवांची मध्ये कोणत्याच प्रकारची शक्ती नव्हती. सर्वच बाबतीत पराधीनतेचे दुःख होते. भवगुणजनिता
जन्तवो मां तुदन्ति -
या संसारात जन्माला येणारे विविध जीव-जंतू मला तोडत होते. डास मुंग्या चावत होत्या. त्यांना हाकलण्याचीदेखील ताकद नव्हती.
नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः - नानाविध रोगांनी आणि दुःखांनी परवश झालेला मी केवळ रडत होतो.
शड्करं ना स्मरामि- हे भगवान शंकराच्या वेळी मला आपले स्मरण देखील करता येत नव्हते.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या अपराधांना क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
प्रौढोहं यौवनस्थौ विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्
धौ दष्टो नष्टो विवेकः सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः ।
शैवीचिन्ताविहीनं मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥३॥
मानवी जीवनातील दुःख परंपरेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात की काळाच्या ओघात मी मोठा झालो. बालपणीच्या दुःख कारणांना दूर करण्याचे बळ तर अंगी आले पण तरी दुःख कुठे संपले? तारुण्यात वेगळे दुःख सुरू झाले.
प्रौढोहं यौवनस्थौ - मी थोडा मोठा झाल्यावर यौवन अवस्थेला प्राप्त झालो.
विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्धौ
दष्टो - त्यावेळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयरूपी विषधर म्हणजे सापांनी माझ्या मर्म स्थानांना चावा घेतला.
त्या पाच विषयांचा आस्वाद घेणारी अनुक्रमे कान,त्वचा, डोळे, जीभ आणि नासिका ही पाचही इंद्रिये त्याविषयांच्याच ताब्यात गेली होती. जणु त्यांच्या विषाने बेशुद्ध झाली होती.
नष्टो विवेकः - त्याचा परिणाम म्हणून माझा विवेक नष्ट झाला. काय करावे? आणि काय करू नये? हेच समजत नव्हते. सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः - मुलगा, पैसा, पत्नी यांच्या गोड गोड वाटणाऱ्या सुखात मी आकंठ बुडून गेलो.
शैवीचिन्ताविहीनं - भगवान शंकरांचे चिंतन करण्याचे सोडून,
मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं- माझे हृदय मानसन्मान गर्व यांच्या टोकावर आरूढ झाले होते.
हे सर्व माझे दोष आहेत.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेवा ! शिवशंकरा! माझ्या या अपराधांना क्षमा करा.
मला आपले चिंतन करण्याची बुद्धी प्रदान करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवादितापैः
पापै रोगैर्वियोगैस्त्वनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् ।
मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटेर्ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥४॥
बरे पुढे वय वाढत गेल्यानंतर तरी हे त्रास कमी झाले का? तर नाहीच. उलट त्यात वार्धक्यामुळे आलेल्या नवनवीन त्रासांनी भरच घातली.
कोणते त्रास?तर आचार्य श्री म्हणतात,
वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगति - म्हातारपणामुळे इंद्रियांची गती क्षीण झाली. आता त्यांना हालचाल करणेही कठीण झाले आहे.
मतिश्च- मती अर्थात स्मरणशक्तीची देखील तीच अवस्था आहे. काही वेळापूर्वी केलेले कार्यही आठवत नाही.
आधिदैवादितापैः - आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध प्रकारच्या तापांनी,
पापै - आज वर जीवनात केलेल्या विविध पापांनी,
रोगै:- त्यांचा परिणाम होऊन झालेल्या विविध रोगांनी,
वियोगै:- उपयुक्तता कमी झाल्यामुळे नातलगांनी देखील तोंड फिरवल्यामुळे आलेल्या वियोगानी,
त्वनवसितवपुः- अस्थिर झालेल्या शरीरानी,
प्रौढिहीनं च दीनम् - माझी सगळी प्रौढी गळून गेली आहे. आता मी हीन-दीन अवस्थेला पोहचलो आहे.
मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो- मात्र अद्यापी माझे मन त्या खोट्या मोहांमध्ये,अभिलाषा मध्येच भ्रमण करीत आहे. धूर्जटेर्ध्यानशून्यं - ते मन भगवान शंकरांच्या ध्यानाने अजूनही शून्यच आहे.
भगवंताचे ध्यान करीत नाहीच आहे.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझे हे अपराध क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti