शतावरी ह्या वनस्पती बाबत आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेल.आपण सर्वांना शतावरी कल्प तर माहितच असेल जो बाळंतीणीला हमखास दुधातून दिला जातो.चला तर आज आपण ह्या शतावरीची थोडी जास्त ओळख करून घेऊ.
शतावरीचे काटेरी झुपकेदार वेल असतो.ह्याच्या फांद्यावर उभ्या रेषा असतात.काण्ड त्रिकोण,स्निग्ध असते.ह्याचे काटे ०.५-१ सेंमी लांब व खालच्या बाजुस वळलेले काहीसे बाकदार असतात.शतावरीचे काण्ड हे पानां सारखे भासते.२-६ ह्या संख्येत गुच्छात उगवते.१.२५-२-५ सेंमी लांब पातळ व विळ्या प्रमाणे भासते.फुले मंजिरी स्वरूपात उगवतात जी २.५-५ सेंमी लांब एकेरी किंवा गुच्छ रूपात असतात हि सुगंधी व पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात.फळ वाटाण्याच्या आकाराचे १-२ बीज युक्त असते.मुळ हे मुल स्तंभापासून जाड लांबट गोल व दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी मुळे फुटतात.
शतावरीचे उपयुक्तांग आहे मुळ.ह्याची चव गोड,कडू असून हि थंड गुणाची व जड,स्निग्ध व मृदू असते.हि वातपित्त नाशक व कफ पोषक आहे पण ओली असताना मात्र कफकर असते.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊ:
१)वातनाशक व बल्य असल्याने शतावरी सिद्ध तेल अभ्यंगासाठी वापरतात.
२)सरक्त मल प्रवृत्तीमध्ये शतावरी सिद्ध घृत चांगले कार्य करते.
३)बाळंतीणीस चांगले व भरपूर स्तन्य उत्पत्ती साठी शतावरी सिद्ध दुध देतात.
४)अधोग रक्तपित्तामध्ये शतावरीचा काढा अथवा स्वरस वापरतात.
५)शतावरी शुक्रधातूची वाढ करते तसेच ती गर्भाशय पोषक देखील आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2017
केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद.
म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते.
भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने चिकित्सा करता येते. भारतीय पद्धतीने पथ्यापथ्य सांगता येते आणि रुग्णाला बरे वाटते. संपूर्णतः भारतीय !
थोडं आणखीन स्पष्ट करून सांगतो. जसे प्रमेह हा आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे. मधुमेह हा त्याच्या वीस प्रकारापैकी एक. हा रोग का होतो, कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे सर्व ग्रंथात वर्णन केलेले आहे. पण या रोगामधे रक्तातील साखरेचा संबंध आयुर्वेदात कुठेही वर्णन केलेला नाही. आणि असा हट्ट पण असता कामा नये. प्रत्येक शास्त्राचा एखाद्या रोगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. शेवटी महत्त्वाचे काय आहे, रुग्णाला बरं वाटणं, पॅथी कोणती का असेना.
हो, आणखी एक. हे माझं वैयक्तिक म्हणणे अजिबात नाही. जे ग्रंथात लिहिलेले आहे ते जसेच्या तसे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एखाद्या रोगाचा माझा आयुर्वेद कसा विचार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का ? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अन्य पॅथी.
त्या पॅथींचा डायबेटीस कडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. तो मान्यच आहे. तो त्यांच्या संशोधनाचा एक भाग असेल. पण त्याला प्रमाण मानून आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा देणे हे मला योग्य वाटत नाही.यात कुणा पॅथीला दुखावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना अॅलोपॅथीचा अगदी कळवळा येतोय, त्या आयुर्वेद पदवीधारकांनी खुशाल तसा विचार करावा. आम्ही किती वैचारिक गुलामगिरीत वागत आहोत, याचा हा उत्तम नमुना आहे.
आयुर्वेदातून उत्तरे कशी शोधायची ? आयुर्वेदाची जी पद्धत आहे, त्याचा पूर्णपणे भारतीय पद्धतीनेच विचार केला तर उत्तर मिळेल.
तर सांगायचेय काय, माझ्या अभ्यासानुसार, प्रमेह म्हणजे डायबेटीस नाही. आणि मधुमेहामधे रक्तातल्या साखरेचा संबंध तपासावा, असे कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले नाही. ( पुढील वाक्य वैद्यांसाठी आहे - "असल्यास त्याचा पुरावा दाखवावा.")
त्याच्या तपासणीचे निकष हे पूर्णपणे आयुर्वेदाचेच आहेत. ते तसेच अभ्यासले पाहिजेत.आयुर्वेदिय पद्धतिने रोगनिदान करुन आयुर्वेदिय चिकित्सापद्धति वापरणे,
यालाच म्हणतात,
चिकित्सेमागील आयुर्वेदीय दृष्टीकोन.
भारतीय आयुर्वेदातील भारतीय दृष्टीकोन.
माझे काही चुकलंय का ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.02.2017
February 22, 2017
नागपूर ह्या फळा करीता जगभरात प्रसिध्द आहे.संत्री हे फळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळच असेल.ह्याचा रस देखील आपण आवडीने पितो.तसेच केक,बिस्कीट,जाम,मध्ये देखील ह्याच्या रसाचा वापर करतात असे म्हणतात तरी कारण अाॅरेंज फ्लेवर हा भारी फेमस आहे बुवा.
ह्याचे झाड हे लिंबाच्या झाडा समान असते.ह्याची फळेचवीलाआंबट,उष्ण,रूचीवर्धक,वातनाशक,
व सारक म्हणजेच मोठ्या आतड्यातील मळ पुढे सरकवणारी असतात.तसेच हे फळ पचायला जड असते.
ह्याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत ते आता आपण पाहूयात:
१)संत्राच्या रसात थोडे सैंधव मीठ घालून प्यायल्यास अति ताण पडून आलेला थकवा नष्ट होऊन तरतरी येते.
२)शरीरातून होणारा रक्तस्राव थांबवायला १ कप संत्र्याचा रस १ चमचा साखर व ४ चमचे आवळ्याचा रस घालून प्यावा.
३)संत्र्याची ताजी साल कोरड्या इसबावर १५-२० मिनिटे चोळावी फायदा होतो.
४)संत्र्याच्या सालीची चटणी गरम करून गळूवर बांधावी म्हणजे ते पिकून फुटते.
५)पोटात भूक असून देखील तोंडाला चव नसेल तर संत्र्याचा रस+ओवा+जीरे+हिंग हे मिश्रण घोट घोट प्यावे.
पण संत्री अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 17, 2016
ऐकलेले आणि बघितलेले यात चार बोटांचे अंतर असते, तसे नियम आणि वास्तव यात एक हाताचे अंतर असते.
April 12, 2017
नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.अगदी शुभ कार्य असो,श्राद्ध असो,स्वयंपाक असो,औषधी निर्माण असो अशा वेगवेगळ्या विभागात ह्याचा महत्त्वाचा वापर आढळतो.नारळाच्या झाडाला आपण माड म्हणतो तसेच ह्याला कल्पवृक्ष असे देखील आदराने संबोधले जाते.माडाला कल्पवृक्ष म्हणण्याचे कारण म्हणजे हा एकमेव वृक्ष असा आहे कि त्याच्या प्रत्येक भागाचाआपल्याला कुठे ना कुठे तरी वापर करता येतो.
माडाचा बुंधा वासे करायला वापरतात,चुडीत झावळे,केरसुण्या करायला वापरतात,फुलांचा उपयोग औषधामध्ये होतो,तसेच नारळाचा उपयोग स्वयंपाक,औषधी व सौंदर्य प्रसाधने निर्माण करायला होतोच पण त्यात हि नारळाचे वरचे आवरण हे राजू,पायपुसण्या करायला वापरतात,तसेच करवंटीचे तेल काढतात कोळसे करतात तसेच घर सजावटीच्या वस्तू त्या पासून बनवितात.
आता नारळाचे म्हणाल तर कोवळा नारळ किंवा शहाळे हे त्यातील पाणी पिण्याकरिता वापरतात
तसेच आतील मलई खातात.तसेच नारळाचा उपयोग आपण स्वयंपाकात भाजी,आमटी,चटणी इ पदार्थ करतो.कारण कोकण,गोवा,कारवार,केरळ,ओडीशा ह्या प्रांता मध्ये जेवणाची कल्पना नारळा शिवाय होऊच शकत नाही.
नारळाचे वृक्ष हे १०-७० फूट उंचीचे असतात व त्याच्या खोडांवर लोंबणाऱ्या गडद हिरव्या रंगाच्या झावळ्या असतात ज्या पिकल्यावर पिवळ्या होतात.झावळ्यांच्या मुळाशी पिवंळी गर्द सोनेरी फळे लागतात जी सुरूवातीला फुलांच्या स्वरूपात असतात.फळे म्हणजे नारळ जे प्रथमप् पिवळे,कोवळे असताना हिरवे व पिकल्यावर राखाडी रंगाचे होतात.
नारळ कोवळा असताना त्याला शहाळे असे म्हणतात व तेव्हा त्यात भरपूर पाणी व थोडी पातळ मलई असते.जेव्हा त्याचे रूपांतर नारंळामध्ये होते तेव्हा त्या मलईचे रूपांतर खोबऱ्या मध्ये होते व आत मध्ये थोडे पाणी रहाते.
तसे पाहता सध्या डायटींग ह्या गोंडस नावा खाली पुष्कळ मंडळी शहाळ्याचे भरपुर पांणी दिवस भर पितात काही जण तर नित्य नेमाने दिवसाला १-२ शहाळ्याचे पाणी पितात.पण हे पुर्णत: चुकीचे आहे कारण आयुर्वेद सांगतो कि कुठले ही फळ हे पिकल्यावरच खावे मग नारळ त्याला अपवाद कसा असेल.आणी हे असे शहाळ्याचे पाणी आपण आजारी असताना पथ्य म्हणून वापरणे ठिक आहे पण त्याचा अतिरेक हा शरीरातील वात व कफ विकार वाढवून त्याचे आजार हमखास निर्माण करणार ह्यात वाद नाही.सांगायचेच झाल्यास आपल्याकडे गरोदर बायकांनी नारळाचे पाणी प्यावे असे सांगितलेले आहे पण प्रत्यक्षात मात्र गरोदर बायका पितात शहाळ्याचे पाणी आणी होते काय तर त्याचा दुष्परिणाम त्या बिचाऱ्या चिमूकल्या जीवला जन्मानंतर भोगावा लागतो.आपण पाहिलेच असेल कि काही मुलांना जनमत:च सर्दि,दमा,न्यूमोनिया किंवा अन्य श्वसन संस्थानाचे विकार जडतात तर त्याच्या मुळाशी कारण असते बरेचदा आईने गरोदर असताना केलेला शहाळे पिण्याचा अतिरेक.आयी ना बात अब समझमे!
चला मग शहाळे व नारळ ह्या दोघांचे गुण धर्म ह्या लेखात पाहुयात:
शहाळे हे चवीला गोड पचायला जड व थंड असून ते पित्तशामक व वात कफ वाढविंणारे आहे.
नारळ हा चवीला गोड,थंड,पचायला जड असला तरी शहाळ्या पेक्षा हल्का असतो व वात पित्त शामक व कफ वाढविणारा आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 23, 2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौवीस
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आळस मोठ्ठा देऊ नये
"आलस्यंही मनुष्याणां महारिपु" सर्वात मोठा शत्रू आळस आहे. कारण तो दिसत नाही. जो आपल्या आतमधेच आहे तो बाहेरून कसा दिसणार ? हाच मधुमेहाचा सर्वात फास्ट फ्रेंड आहे.
आपण कुठे कुठे आणि कधी आळशी होतो, ते एकदा तपासून पहावे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या यंत्रांनी आपल्याला एवढे आळशी बनवले आहे, हे कधी लक्षातही आले नाही. स्कूटरच्या जमान्यात गाडीला कीक मारून ती स्टार्ट करणे हा मोठाच व्यायाम होता. त्यात ती बजाजची स्कूटर सुरू असली तर वेगळ्या व्यायामाची गरजच नव्हती. कारण बजाज स्कूटर सकाळी सुरू करणे हे सगळा आळस घालवायचे मस्त साधन होते. तिला अगदी जमिनीवर आडवी पडून पुनः उभी केल्याशिवाय सुरुच होत नव्हती. तसंही करून सुरू झाली नाही तर चढावावर उलटी ढकलत न्यायची, आणि उतारावरून सेकंड गियर मधे गडगडत सोडून द्यायची. आणि गाडी सुरू झाल्याचा सगळ्यात जास्ती आनंद, ती ढकलण्यात घामाघूम होईपर्यंत, मदत करणाऱ्याला व्हायचा. (म्हणजे ढकलण्याऱ्याच्या कॅलरीज जाळायला देखील बजाज किती मदत करीत होते ना ! केवढा व्यायाम व्हायचा ? आता हा व्यायाम देखील संपला.
एक बटन दाबले की चक्क गाडी सुरू होते.
एक बटन दाबले की घरात विहीरीचे पाणी येते.
एक बटन दाबले की धान्याचे चक्क पीठ होते.
एक बटन दाबले की देवाकडे दिवा पण लागतो आणि
एक बटन दाबले तर चटणी वाटून तयार.
एक बटन दाबले की ताकावर लोणी पसरते.
एक बटन दाबले की कणिक तिंबून मिळते.
एक बटन दाबले की मेसेज सेंड.
एक बटन दाबले की पैसे ट्रान्स्फर
आणि एवढे श्रम वाचवून उरलेला वेळ जिममधे खर्च करायचा, त्यासाठी परत पैसे मोजायचे.
पूर्वी दहा रूपये वाचवण्यासाठी दहा मिनीटे चालायचे श्रम घेतले जायचे. एक स्टाॅप अगोदर उतरायचे. आता दहा मिनिटे वाचविण्यासाठी दहाच काय शंभर रूपये सुद्धा खर्च करायची तयारी !
किती बदललो ना आपण ?
कधी बदलत गेलो कळलं देखील नाही.
आळस द्यायचाच नाही का ? द्यावा.
चारचौघात आळस दिला की आई ओरडणारच.
तोंडाचा आऽ करू नको असंही आई म्हणायची. तोंडात माशी जाईल असंही सांगायची.
आळस द्यायचाच झाला तर तोंडावर हात ठेवून आळस द्यावा. जांभई द्यावी. आपल्या तोंडातील सर्व जीवजंतु आपल्याच तोंडातील दुर्गंधीसह बाहेर पसरतात. जशी जांभई तशीच ढेकर, तशीच शिंक. शिंकेचा वेग तर जबरदस्त असतो. तो हाॅर्स पाॅवरमधे देखील मोजला जातो. एवढ्या जोरात खोकलो, शिंकलो तर केवढा जंतुसंसर्ग आपण करत असतो ना !
तसं जांभई देणं ही शरीराकडून निर्माण होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आयुर्वेदानुसार एक वेग आहे. आणि वेगाचा अवरोध कधी करू नये हा नियम. वेग निर्माण झाला की पूर्तता करायचीच. म्हणजे जांभई आली तर ती द्यायचीच. पण तोंडावर हात, रुमाल ठेवून द्यावी. अगदी पाश्चात्य पद्धतीने साॅरी असे देखील म्हणावे.
पण मोठ्ठा आऽऽ करून सर्वांसमक्ष आपले किडक्या बत्तीशी दातांचे समग्र दर्शन बाहेरच्या विश्वाला कशाला द्यायचे ना ?
एक तो कान्हा होता, ज्याने मुखकमल उघडल्यावर यशोदेला विश्वरूप दर्शन झाले होते. ......
आपण "तो" कान्हा नाही एवढे लक्षात ठेवले तरी पुरे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
August 19, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 32
नैवेद्यम् समर्पयामी-भाग सहा
देवासाठी पान वाढले. देवासमोर ठेवले. पान बाजूला सरकवून पानाखाली पाण्याने एक मंडल (भरीव वर्तुळाकार जागा ) काढले. पुनः मंडल काढलेल्या जागेवर पान सरकवून ठेवले. आता पान पुनः हलवायचे नाही. वाढलेल्या पानाला स्थिर करून घेतले. आता जेवून पूर्ण होईपर्यंत आसन सोडायचे नाही किंवा पान सोडायचे नाही. हा दंडक.
कशासाठी?
वाढलेल्या पानावरून उठून जाणे, हा अन्नदेवतेचा साक्षात अपमान असतो. ( हे समजावणे आस्तिकांसाठी ! नास्तिक उघडपणे देवच मानत नाहीत, त्यांना अन्न ही देवता असते हे पटणारेच नाही. त्यांच्या दृष्टीने अन्न म्हणजे प्रोटीन्स, व्हिटामिन्स, फॅटस आणि कारबोहाड्रेटस ! बाकी अंधश्रद्धा, विषय संपला. )
एकदा वाढलेल्या पानावरून उठल्यानंतर त्या पानावरचा आपला हक्क संपला, आता उरलेले अन्न कृमी किटकांना सोडले.
असे करू नये. आपण वाढलेल्या पानासमोर बसलेलो असताना, आपले लक्ष पूर्णपणे पानावरच असते. ( तसे असावे. ) म्हणजे पानामधे जमिनीवरुन येणारे काही किडामुंगींसारखे किटक, किंवा आकाशमार्गे पानामध्ये उतरु शकणारे कोळ्यासारखे विषारी किटक, अन्नामधे पडू नयेत, ही घेतलेली दक्षता म्हणा हवंतर ! ( हे समजावणे नास्तिकांसाठी ! )
सांगायचं काय तर, कोणत्याही कारणाने एकदा जेवायला सुरवात केली की, पान किंवा आसन हलू नये. एवढा संयम मनावर हवाच. आजकाल तर जेवायला सुरवात केली की, दहा वेळा उठणार. मोबाईल दुसरीकडे राहिला, दरवाज्याची बेल वाजली, बेसिनचा नळ सुरू राहिला, टीव्ही चा रिमोट घ्यायला... अश्या कारणानी जेवत असताना सतरा वेळा उष्ट्या हातानी उठतो. असे मध्येच उठल्यामुळे आपल्या हाताला लागलेले आपले उष्टे दुसऱ्याच्या पानात पडू शकते, किंवा आपल्या अंगाखांद्यावरील सूक्ष्म जीवजंतु, कचरा इकडे तिकडे दुसऱ्याच्या पानातही जाऊ शकतो. ही कृती जंतुसंसर्ग पसरवणारी असते. आणि किती डिसगस्टींग वाटते ना !
अन्न हे कोणत्याही कारणांनी दूषित होऊ नये, यासाठी घेतलेली ही काळजी आहे.
काय चुकीचे सांगितलेले ? आता ज्यांना हे मनुवादी विचार वाटतात, त्यांना खुशाल म्हणू देत. पण जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, ते योग्यच आहे. हेच नियम जर एखाद्या मॅकडो ने अथवा डाॅन्कीडोने किंवा नाचोपाचो ने सांगितले असते तर ? डोक्यावर घेऊन नाचले असते. "पण हे आमच्याच भारतीय ग्रंथात सांगितलेले आहे, फक्त आता पुनः एकदा लक्षात आणून देतोय" असे म्हटले तरी काही जणांना ते अन्नाचे "भगवेकरण" वाटेल. कोणाला काय कश्या शंका येतील सांगता येत नाही. अशा शंकासूरांची संख्या हल्ली वाढते आहे. यांच्यापासून सावधान !
बाहेरचा किटक वाढलेल्या पानात येऊ नये म्हणून पानाभोवती देखील पाणी वर्तुळाकार फिरवायचे असते. आणि या किडा मुंगीसाठी, आपण जेवायला सुरवात करण्या अगोदर, अन्न उष्टे करण्यापूर्वी, पाच सहा अन्नाचे कण ताटाबाहेर काढून ठेवायचे. याला काय म्हणायचे ? "भूतदया" म्हणू !
काही महाभाग तर वाढलेले पान जणुकाही कुशीत घेऊन जेवतात ! वाढलेले ताट मांडीवर, अंगावर घेऊन जेवणे ही तर राक्षसी कृती आहे. वाढलेले पान हलवत हलवत फिरत फिरत खाल्ले तर नकळतपणे चंचलपणा निर्माण होतो.
चंचलपणा म्हणजे साक्षात वाताचा प्रकोप. मुलांमधला चंचलपणा, आपल्या विचारातील चंचलपणा, कमी होण्यासाठी, जेवण पूर्ण होईपर्यंत, आपले आसन पृथ्वीला धरून ठेवणारे, दृढ हवे. स्थिर हवे. तरच खाल्लेल्या अन्नाने शरीराची पुष्टी होईल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.06.2017
June 25, 2017
असे का ?
मांस खाण्याविषयी दोन माणसांमधे तरी एकमत कुठे होते. ? प्रत्येकाच्या धारणा वेगवेगळ्या. प्रत्येकाची मते वेगळी. परस्पर अगदी विरूद्ध.
भारतातील हिंदु गाईला माता मानतात, ते गोमांस खात नाहीत, तर इतर देशा धर्मातील नव्हे तर भारतातील मुसलमान गोमांस खातात. ते माता बिता काही मानत नाहीत. पण मुसलमानांना डुकराचे मांस पूर्णतः निषिध्द. नाव सुद्धा चालत नाही. बाकी दोघांनाही शेळ्या मेंढ्या बकऱ्या चालतात. असे का ?
भारतातील जाऊ देत, जपानमधे कच्च्या मांसाचे लोणचे चटणी आवडीने खाल्ली जाते, तर इंग्लंडमधे मात्र कच्चे मांस खाणे अशिष्टपणाचे समजले जाते. असे का ?
चीन तैवान मधे कुत्र्याचे मास खाल्ले जाते, पण युरोपीयन देशात कुत्र्याचे मांस हा शब्द उच्चारला तरी ए, कुत्र्या म्हणून शिवी ऐकायला येईल. असे का ?
अरब देशात घोड्याचे आणि उंटाचे मांस प्रिय आहे, ऑस्ट्रेलियातून घोड्याचे मांस अरबांना विकले जाते, म्हणून अमेरीका, ऑस्ट्रेलियावर बंदी घालायची मागणी करते. असे का ?
डुकराचे साॅस खाणारे जर्मन, म्हणून इंग्रज लोक त्यांची टिंगल करतात, तर मासेमारीसाठी विनाकारण वेळ फुकट घालवणारे म्हणून इंग्रजांची जर्मनीमधे चेष्टा होते. असे का ?
अर्जेंटिना, मेक्सिको येथे हाॅटेलमधे जिवंत प्राणी तुमच्यासमोर आणून त्यातील कोणता अवयव तुम्हाला आहे, असे विचारून तुमच्या समोरच त्याला कापून तो अवयव तुम्हाला देतात, हे पाहून युरोपीयन माणूस चक्कर येऊनच पडतो. असे का ?
मध्यपूर्वेमधले देश प्राण्यांची हत्या करताना त्यांचा गळा चिरतात आणि वाहाणारे रक्त गर्दी करून गटागटा पितात, हे वाचताना देखील अस्सल मांसाहारींच्या अंगावर काटे येतात. असे का ?
भारतातील अस्सल मांस खाणारा जेव्हा अमेरीकेत किंवा युरोपमधे जातो, तेव्हा तेथील स्टेक म्हणजे नुसत्या वाफवलेल्या मांसाच्या तुकड्याला घश्याखाली घालवताना यांचा जीवच जातो. असे का ?
भारतातील बंगाली माणूस माशाचे डोकेपण आवडीने खातो, पण बिहारी लोकांना, साधे मासे पण खाता येत नाहीत, म्हणून बंगाली बाबु चिडवतात. असे का ?
भारतातील शीख लोक एका झटक्यात मारलेला प्राणीच खाण्यासाठी वापरणार पण मुसलमान मात्र प्राण्यांचा गळा अर्धा चिरून सारे रक्त वाहून गेल्यावर, हाल हाल होऊन मेल्यानंतरचे हलाल मांस खातात. दोघांनाही दुसऱ्या प्रकारचे मांस अजिबात चालत नाही. असे का ?
हे सर्व बारकाईने पाहिले असता असे लक्षात येते, की मूळ संस्कार, तेथील नैसर्गिक उपलब्धता, धर्म भावना, जमिनीची कृषी उत्पादनांची सकसता आणि स्वाभाविक ओघ इथपर्यंत आपण पोचतो.
जिथे अन्नधान्यांचे उत्पादनच न के बराबर आहे तिथे जगण्यासाठी मांस खाण्यावाचून पर्यायच नव्हता. पण आता तसे नाही. काळ बदललाय, संसाधने बदलली आहेत. मेहनत केली तर, अन्नधान्याचा तुटवडा कधीही पडणार नाही एवढी उपजाऊ जमिन शिल्लक आहे, अशा देशात आता शेतीमधे बदलाचे वारे वाहू लागले आहेत....
गरज आहे आपल्या मानसिकतेमधे बदल करण्याची.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
7.10.2016
October 7, 2016
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 6
एकदा दवाखान्यात एक जोडपे आले. बायको एकामागून एक तक्रारी सांगत होती.
माझे डोके दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते, डोळ्यासमोर काळोख येतो, छातीत धडधडते, घशाला कोरड पडते, पोटात ढवळते, हात पाय वळतात, झोप लागत नाही. पायाची बोटे सुन्न होतात....... इ.इ. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांच्या तक्रारी एकामागून एक सांगत गेली. म्हटलं, सर्व शरीर तपासून घेऊया. एक कागद फाडून दिला. माझं काम संपलं.
.......रुग्णांना पण हौस खूप असते, असल्या तपासण्या करून घेण्याची. आणि काहीवेळा काहीजण तर इतके अतिहुशार असतात आणि डाॅ. गुगुल यांच्याकडून मिळवून, "हे घ्या एम आर आय पर्यंतचे सर्व रिपोर्टस्." असं म्हणून टेबलावर आपटतात.
एखाद्या नवविवाहितेला तिच्या दागिन्यांचे एवढे कौतुक नसेल, तेवढे हे केलेले मेडीकलचे रिपोर्टस् दाखवण्यात काही जणांना असते.
असो.
.......तर त्या बायकोला कोण आनंद झाला, तपासणी करण्याचा. म्हणाली, "बरं झालं, एकदा कळेल, काय झालं आहे मला ते ! "
नवरा बिचारा गप्प होता. म्हणाला, "मला पण तो रिपोर्ट काढायचा कागद द्या. कंपनीकडून तपासणीसाठीचे पैसे मिळणार आहेत, घेतो तपासून !" त्याला दुसरा कागद फाडून दिला, माझं काय जात होतं ?
संध्याकाळी दोघंही परत आली, वहिनींचा चेहरा पडलेला, "काय हो झालं ? काही रिपोर्ट मधे काही गंभीर गडबड कळली का ? " मी सहजपणे (पण चेहेऱ्यावर तेवढाच गंभीर भाव आणून) विचारलं.
ती तोंड एवढंस करत म्हणाली, " कशातच दोष मिळाला नाही."
"बरं झालं ना मग."
"एवढे पैसे खर्च केले पण कुठेच दोष मिळाला नाही, असं कसं ?" आता मात्र मला हसू आले, "अहो, चांगलंच आहे. त्यात वाईट काय ? "
म्हणाली,
"मला हे एवढे ढीगानी आजार. पण रिपोर्ट सगळे नाॅर्मल. पण ह्यांना काय सुद्धा होत नाय्ये, पण यांचे सगळे रिपोर्ट अॅबनाॅर्मल. असं कसं ?"
बघितलं तर खरंच नवऱ्याचे जवळपास सर्व रिपोर्ट अॅबनाॅर्मल होते. त्रास काहीही नव्हता, सहज म्हणून रिपोर्ट केलेले, ते अॅबनाॅर्मल.
आता माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न होता,
औषधे कोणाला द्यायची ?
जिला त्रास आहे पण रिपोर्ट नाॅर्मल आहेत तिला, की ज्याला काहीही त्रास नाही, पण रिपोर्ट नाॅर्मल नाहीत, त्याला ?????
शेवटी लॅबवरील रिपोर्ट वरूनच खरं उत्तर मिळाले. त्यावर तीन शब्द लिहिले होते..
Please correlate clinically.
कृपया जुळवून बघा क्लिनिकली.
म्हणजे रुग्ण सांगतोय त्या तक्रारीशी जर लॅबचा रिपोर्ट जुळला तर औषध. नाहीतर नको.
म्हणजे यंत्र काहीही सांगूदेत, जर त्याचा त्रास रुग्णाला जाणवत नसला किंवा तशी शंका नसली तर यंत्र काय सांगतेय, ते महत्त्वाचे नाही. शरीर काय सांगते ते जास्त महत्वाचे !
सुटले कोडे मिळाले उत्तर!
आणि फक्त वहिनींनाच औषध दिले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.02.2017
February 20, 2017
तुळशीला प्रदक्षिणा घालून तीर्थ म्हणून तुळशीचे पान घातलेले पळीभर पाणी पिणे ही आणखी एक लुप्त होत चाललेली भारतीय परंपरा आहे. आमच्या पिढीने निदान तुळशी वृंदावन तरी पाहिले आहे. नातवाची तिसरी पिढी ते पाहील की नाही याचीच शंका आहे. अर्थात ग्रामीण भारतात अजूनही अंगणात तुळशी वृंदावने आहेत.
March 3, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti