आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही. भाग पाच
"औषधं न लगे मजला"
औषध "नल" गे मजला.
नलराजाची प्रेयसी दमयंती, आपल्या सख्यांना म्हणजे मैत्रिणींना हे वाक्य सांगत आहे. मला कोणत्याही औषधाची गरज नाही. माझ्या आजारपणासाठी, नल राजा माझा होणे, हेच माझे औषध आहे.
एका मात्रेचा, एका जागेचा, एका उच्चाराचा, फरक पडल्यामुळे काय होते, हे सांगण्यासाठी मराठी भाषेत कोणे एके काळी अशी सुभाषिते शिकवली जायची.
आज त्यातील "औषध" या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले.
माझा प्रियकर हेच माझ्यासाठी मोठ्ठे औषध आहे.
या ठिकाणी "माझा प्रियकर" हे सुद्धा एक औषध असू शकते. फक्त प्रिस्किप्शनवर लिहिता येत नाही. प्रियकर म्हणजे मनापासून प्रेम करणारा जोडीदार. या दमयंतीच्या मनीच्या भावना त्या नलाच्या मनी सहजपणे समजून घेतल्या, की मनाच्याच नाहीत, तर दमयंतीच्या शरीराच्या वेदना पण दूर होतात.
जोडीदार मनातलं समजून घेणारा हवा. विशेषतः मासिक पाळी जातानाच्या वयातील तरल नाजूक भावना दमयंतीला फक्त प्रियकर नलाकडेच मोकळे पणाने बोलता येतात. रजोनिवृत्तीच्या वयातील भावनात्मक बदल हे दोन दोन वर्षे सुद्धा तसेच रहातात. बदलते रहातात. अचानक भीती वाटणे, अचानक रडू येणे, कोणाच्या तरी (म्हणजे नल ) भक्कम आधाराची गरज वाटणे, खूप राग येणे, राग आक्रस्ताळेपणाने व्यक्त होणे, एकटेपणा नकोसा वाटणे, गोंधळ, गोंगाट नकोसा वाटू लागतो. फक्त माझा प्रियकर माझ्या समवेत असावा, असे वाटू लागते. काही गोष्टी न बोलता त्याला समजल्या पाहिजेत, अशी दमयंतीची इच्छा असते. पण ही इच्छा पूर्ण न करण्यातच पुरूषार्थ वाटला की नलाच्या मनात, अहंकार जन्म घेतो.
पुरुषी अहंकार आणि स्त्रीचा हट्टीपणा हे जीवनातले दोन मोठे पैलू, ज्याला सोडवता आले, त्याचे जीवन यशस्वी झालेच, म्हणून समजावे.
प्रत्येक दमयंतीला काय हवंय हे जर नल राजाने समजून घेतलं तर ? निदान या मेनोपाॅजल एज मधेतरी समजून घ्यावंच !
या अवस्थेत कोणतीही औषधे शक्यतो घेऊ नयेत. ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. फक्त मनाचा सहभाग समजून घेऊन दमयंतीला समजून घेणं, तिच्याबरोबर रहाणं, तिला राग येणार नाही, यापेक्षा तिला " मी कायम तुझ्याबरोबरच आहे" असा विश्वास तिला वाटेल अशी कृती नलराजाकडून तिला अपेक्षित असते.
आज जी औषधे दिली जातात, ती हाॅरमोन्स बदलवणारी असतात. मेजर्ड डोस मधे जेव्हा हार्मोन्स दिली जातात, तेव्हा मनातून आपोआप निर्माण होणारे स्पंद बदलतात. मनोशारिरीक संबंधाची ही साखळी, एकदा बदलली की पुढील सर्व शारीरिक क्रिया देखील बदलतात. यातूनच फायब्राॅईड सारख्या ग्रंथीची वाढ होत असावी. पुनः त्यावर ऑपरेशन हाच एकमेव पर्याय! हे औषधांचं दुष्ट चक्र आयुष्यभर असंच सुरूच रहाते.
बुद्धीपेक्षा भावना महत्वाच्या असतात. पंचज्ञानेंद्रियांनी त्या तशाच हळुवारपणे समजून घ्यायच्या असतात. तिला बरं वाटेल, असं काहीही करावं.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे "माझ्यासाठी वेळ राखीव ठेवणं" ही भावना ! दमयंतीसाठीचं हे सर्वात मोठ्ठं औषध आहे. पण सगळे नलराजे "तेवढं सोडून दुसरं काहीही मागावे," अशी मागणी करतात, मग इतर भौतिक औषधं सुरू होतात.
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.04.2017
April 23, 2017
पुरूषांनी दोन्ही पाय दुमडून जेवायला बसायचे. तर महिलांनी ?
त्यांनी जेवायला बसताना दोन्ही पाय दुमडून उकीडवे बसायचे नाही. तर उजवा पाय गुडघ्यातून आडवा दुमडून घेत, जमिनीला समांतर ठेवत, त्याच्यावर डावा पाय उभा दुमडून पोटाकडे घेत जेवायला बसावे.
आजही अनेक घरातील आज्ज्या याच पद्धतीने बसतात. केवळ जेवायलाच नव्हे तर केव्हाही. बसायचं म्हटलं की, उजव्या पायाची मांडी घालून डावा पाय गुडघ्यातून दुडुन काटकोनात सरळ. आणि पुनः डाव्या हाताने डावा उभा पाय घट्ट आवळून धरायचा.
मग ते वाती वळायला असो, किंवा दळण दळायला, तांदुळ निवडायला असो वा भाजी नीट करायला, मुलांचा अभ्यास घ्यायला असो वा नामजप करायला, धार्मिक कार्य असो वा वो चार दिन !
आसन मांडी एकच.
आज वागणंच एवढं सैल झालं आहे की,
" बसणं जरा सैल केलं, तर काय एवढं बिघडलं ? " असं, फक्त मांड्या घट्ट आवळून घेणारी (काही वेळा तर पायाकडील रक्तपुरवठाच कमी करणारी ) टाईट्ट जीन्स घालून, खुर्चीवर बसून, पाय अधांतरी हलवत, शरीराला झुलवत विचारणार्या, काही कमी नाहीत.
स्त्री पुरूष समानतेच्या काळात असं लिहिणं आणि विचार करणं देखील समस्त स्त्री वर्गावर अन्याय्य आहे, समस्त स्त्री वर्गाला आणि पुरोगामी महाराष्ट्राला हे अपमानास्पद आहे. तीव्र शब्दात आम्ही याचा निषेध करतो. असं म्हणणाऱ्यांनी फक्त एक दोन गोष्टींचा जरूर विचार करावा, की,
गेल्या तीस चाळीस वर्षांत स्त्रीयांची जाडी, पुरूषांच्या तुलनेत, वाढली की कमी झाली ? आणि,
स्त्रीविशिष्ट आजार वाढले की कमी झाले ?
......नक्कीच वाढलेले आहेत.
.....जाडी वाढलेली आहे.
... .वागण्यातला सैलपणा ( की सैराटपणा ? ) वाढलेला आहे.
आसन मांडी बदलणे, हे त्यातील एक कारण असावे.
असं घट्ट बसल्याने गर्भाशय, मूत्राशय, पक्वाशय, डावी किडनी, डिसेंडींग कोलोन, स्वादुपिंड, प्लीहा, आमाशय, ह्रदय, डावे फुफ्फुस आणि पूर्ण पाठीचा कणा हे सगळं पोट, आतून एवढं आवळून घेतलं जाई, की, पोटाची काय हिम्मत होईल, .... बाहेर यायची ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
18.09.2016
September 18, 2016
जे जे देवासाठी ते ते देवासाठी या न्यायाने देवाला जी फुले वाहिली जातात, ती दुसऱ्या दिवशी तशीच टाकून देण्यापेक्षा औषधी म्हणून वापरली गेली तर ? आणि कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता, या निर्माल्याचे पूर्ण पावित्र्य जपून वापरवी गेली तर फुलांचे औषधी गुण पण मिळतील आणि दैवी गुण सुद्धा !
June 9, 2017
आपल्या पैकी ब-याच मंडळींना कच्च्या केळ्याची भाजी व केळफूलाची भाजी नक्कीच आवडत असणार.कच्च्या केळीचे काप,भाजी,भजी,चिप्स अगदी छान लागतात तर केळफूलाची भाजी,कटलेट देखील रूचकर लागतात बरं का.
जसे ह्या दोघांचा स्वयंपाकात उपयोग होतो तसाच ह्याचा युक्तीपुर्वक वापर केल्यास आपण ह्याचा घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो.
कच्चे केळे हे तुरट गोड थंड गुणाचे असून शरीरातील कफ पित्त कमी करते तर केळफूल हे चवीला कडू तुरट असून उष्ण असते व हे शरीरातील वात कफ हे दोष कमी करते.
आता ह्यांचे औषधी उपयोग पाहूयात:
१)जुलाब होत असल्यास कच्च्या केळीचा चीक तांदुळाच्या पेजेसह प्यावा.
२)संडासमधून आव पडत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून द्यावा.
३)अपचन,अम्लपित्त ह्यात कच्च्या केळीच्या पिठाच्या चपात्या कोरड्याच खाव्यात
४)मधुमेही रूग्णांना कच्च्या केळीची व केळफूलाची भाजी पथ्यकर आहे.
५)कच्च्या केळीच्या सालीची राख एरंडेल तेलात मिसळून पायाला पडणा-या कात्र्यांवर लावावे.
६)मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून खायला द्यावा.
कच्ची केळी व केळीचे बोंड खायचा अतिरेक केल्यास संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
उघड्यावर शौच करू नये. हे भारतीय संस्कृती सांगतेय. केवळ शौचच नाही तर स्नान सुद्धा उघड्यावर करू नये, असं आपल्या संस्कृतीमधे सांगितलेलं आहे. जिथे जिथे जंतुसंसर्ग होऊ शकतो अशा ठिकाणी कमीत कमी वेळ असावं, ही दृष्टी यामागे दिसते.
February 17, 2018
आपल्या आहारातील काही अत्यंत महत्वाच्या पदार्थाविषयी किंवा प्रमुख सूत्राविषयी आपण आता चर्चा करूया.
आहार हेच औषध आहे. हा आहार जर युक्ती वापरून बनवला तर वेगळ्या औषधांची आपल्याला गरजच पडू नये. शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्तीतजास्त व्यावहारिक स्तरावरून आहार अभ्यासला पाहिजे.
देशानुसार आहार विचार करावा. म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहातो, त्या प्रदेशात उगवणारे अन्नधान्य आपल्याला हितकर असते. उगाचच कोणत्या तरी कंपनीच्या अहवालानुसार, कोणत्या तरी प्रयोगशाळेचा दाखला देऊन, काही अन्न पदार्थ आपल्या पोटी मारले जातात. आपणही कोणताही विचार न करता ते पदार्थ जणुकाही आपल्यासाठीच बनवले आहेत, अशारितीने त्यांना अंगिकारतो.
एवढं सांगताहेत, ते आधी वापरून तर बघू, पासून सुरू होत जाणारी आमची गुलामगिरी आमच्या रक्तात एवढी भिनते की नंतर ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून जातात, मग त्या पदार्थातील दोष दिसेनासे होतात. पण ते पदार्थ मात्र आपला प्रभाव आतून दाखवतच असतात.
जसे सोयाबीन. मुळात डुकरांना माजवण्यासाठी पाश्चात्य देशात या सोयाचा वापर केला जायचा. याची तशी काही आवश्यकता आहे, असे अजिबात नाही. पण भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावरून केला जाऊ लागला. आणि भारतातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कुपोषितांच्या सोईसाठी या सोयाची आयात केली गेली. त्याच्या शेतीसाठी अनुदान देणे सुरू झाले. जिथे सोयाची शेती केली जाते, तिथे अन्य पिके कुपोषित राहातात. तेथील जमिनीतील पाण्याचा स्तर इतर जमिनीपेक्षा अधिक खाली जातो. पण लक्षात घेतो कोण ?
मुळात अभारतीय असलेला हा धान्य प्रकार आमच्या स्वयंपाकघरात असा काही घुसवला गेला आहे, की आमचे पूर्वजांनी हे सोयाबीन आम्हाला न दिल्यामुळे आमचे अतोनात नुकसान झाले आहे, असे काही वेळा वाटते. नेहमीच्या पोळीच्या पीठात एक मुठ करता करता सोयाच्या दुधापर्यंत, आणि चंक्सच्या रूपात, गरीबांचे चिकन इथपर्यंत त्याची घुसखोरी झालेली आहे.
त्याला सक्षमपणे पर्याय असणारे उडीद, मसूर, चवळी, राजमा सारखे भारतीय पर्याय उपलब्ध असताना या सोयाचे मिडीयाने एवढे कौतुक केले की, स्वतःच्या पोटच्या गोळ्यापेक्षा, सवतीचे पोर आम्हाला आमचेच वाटू लागले.
सोयाबीन हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अश्या कितीतरी अभारतीय गोष्टी आम्ही सहजपणे स्विकारल्या आहेत.
मुळात मेकाॅलेच्या विचारसरणीचा आमच्यावर एवढा प्रभाव पडत चालला आहे, की भल्या भल्यांना देखील आपण दिवसेंदिवस अभारतीय होत चाललो आहोत, हे लक्षातही येत नाही. आमच्या मनातील भारतीयत्व पद्धतशीरपणे विसरायला भाग पाडणारा तो दुष्ट मेकाॅले आमच्या शिक्षणपद्धतीतून अजुनही जिवंत आहे.
स्वत्व गमावल्यामुळे सर्वस्व जाण्याची वेळ लवकरच येते, या न्यायाने आपण जर वेळीच जागे होऊन भारतीय पद्धतीने विचार करणे सुरू केले नाही तर आपण कृतीच्या स्तरावर पण अभारतीय होत जाऊ, अशी प्रामाणिक भीती वाटते.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.01.2017
January 17, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सहा
आज काल काय झालंय.
दिवसाची कष्टाची कामे झालीत कमी,
जी कामं आहेत ती फक्त आरामखुर्चीत बसून बसून आणि बसून !
आणि सोफ्यावर झोपून खाणं झालंय जास्ती.
रात्रीची झोप झालीय कमी आणि जागरणं झालीत जास्ती !
वेळ पडतोय कमी आणि टीव्ही चॅनेल्स झालीत जास्ती !
पैशांची किंमत झाली कमी आणि पैसे झाले जास्ती !
मनमोकळ्या गप्पा झाल्यात कमी आणि चॅटींगसाठी वेळ झालाय जास्ती !
टीव्ही वरील सर्व चॅनेल्सवरचे एकुणएक पिक्चर्स जणु काही आपल्यासाठीच बनवले आहेत. फुकट बघता येतात, म्हणून आयपीएल पण झाल्या. याच्या जोडीला "मनोरंजन" म्हणून काहीतरी हवेच ना, म्हणून दिमतीला हाय फाय सिरीयल्स आहेतच !
सिरीयल्सच्या मधल्या जाहिरातींच काय करणार ? विचारांना एका ठिकाणी स्थिर बसू न देणाऱ्या रिमोटने दुसरी चॅनेल्स बदलली तरी तिथेही जाहिरातीच ! एकुणच काय, तुमच्या खिशातले पैसे आमच्या खिशात, आमच्यातचे तुमच्यात ! म्हणून भारतात एकवेळ थंडीची लाट येईल, पण मंदीची लाट कधीच येणार नाही.
95 % जनतेला सिरीयल्स मधला झामझौल मोहक वाटतो. मोह निर्माण झाल्यावर त्यातून इर्षा जन्माला येते. माझ्याकडे पण हा सगळा ताकझाक हवा, असे वाटू लागते, त्यासाठी खिशात असलेले पैसे पुरणारे नसतात. म्हणून अधिकाधिक प्रयत्न सुरू होतात. ज्या झोपेसाठी रात्र आहे, त्या झोपेच्या वेळी अशा सिरीयल्स पाहून आपल्या झोपेचं खोबरं तर करतोच, पण नको ते मानस रोग पाठी लागतात. आणि दिवस पण खराब करून टाकतो.
म्हणजे रात्रही गेली आणि दिवसही गेला.
एवढंही पुरत नाही, म्हणून हायफाय वायफाय सुरू करून घेतलं. नको ते चॅटींग, रात्री अपरात्री सुरू झालं. डोक्यावरून पांघरुण पांघरून गप्पा रंगू लागल्या. या मॅच्युअर गप्पा अजाण पालकांना समजू नये, याचा ताण सुरू झाला. नेहमीच्या गप्पागोष्टी नकोश्या वाटू लागल्या. वेळ कसा जातोय, ते लक्षात येईनासं झालं. अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडून पडू लागलं. हुशार मुलांची आणि बुद्धिमान मुलींची बुद्धी गहाण पडू लागली. जागरणं घडू लागली आणि नको ती स्वप्न पडू लागली.
रात्रीचर्या बिघडू लागली.
तरूण तरूणींच्या चेहेऱ्यावरील चर्या बिघडू लागली.
दिवस आणि रात्रीची कामं पुरती बदलून गेली आणि समाजाची घडी सगळी विस्कटून गेली.
यम नियम न पाळता, अनावश्यक आरोग्य नियम, यम बनू लागला आणि "यम" आपला पाश आवळू लागला.
जगण्याची भीती वाटू लागली आणि मरण येऊ नये म्हणून औषधे ही गरज बनली.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.05.2017
May 21, 2017
।।गुहाग्रजाय नम:
अपामर्गपत्रंसमर्पयामि।।
ह्याचे ०.३३-१ मिटर उंचीचे क्षुप असते.काण्ड सरळ किंवा शाखायुक्त असतात.पाने २.५-१२ सेंमी लांब व रोमयुक्त,खरखरीत,मोठी व वाकलेली असतात.फुले पांढरी/ हिरवी असतात.फळ बारीक,लांबट धुरकट व त्यातून तांदळासारखे दाणे येतात.
ह्याचे उपयुक्त अंग आहेत मुळ,पाने,पंचांग,तंण्डूल /बिया.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहूयात:
ह्याची चव तिखट,कडू असून हे उष्ण असते.गुणाने हल्के,रूक्ष,तीक्ष्ण असते.
कफ व वात दोष कमी करते व पित्त वाढविते.
आता ह्याचे उपयोग थोडक्यात जाणून घेऊयात:
अंगास खाज येत असल्यास आघाड्याचा काढ्याने स्नान करावा.
आघाड्याच्या क्षाराचा लेप हा किरल्या/ कुरूप पायांवर येणारे कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
दंतरोग अर्थात दातांच्या दुखण्यात आघाड्याच्या काढ्याच्या गुळण्या करतात.
आघाड्याचा क्षार हा अम्लपित्त कमी करतो.
मार लागुन सुज आल्यास आघाड्याच्या पानांचा लेप लावतात.
अति भुक लागत असल्यास ज्याला आपण भस्मक रोग म्हणतो त्यात आघाड्याच्या बियांची खार उपयुक्त आहे.
सर्दी,खोकला,दमा ह्यात आघाड्याचे चुर्ण मधासोबत चांगले काम करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 2, 2017
नमस्कारानंतर करायची प्रार्थना. या पूजेमधे माझे काही चुकले असेल तर देवा मला क्षमा कर. क्षमा मागण्यात कोणताही कमीपणा नाही. प्रत्येक धर्मात या प्रार्थना आहेत. प्रार्थनेमधे मोठी शक्ती आहे. सामुहिक प्रार्थनेत तर आणखी जास्त शक्ती मिळते. येथे शक्ती हा शब्द शब्दशः अर्थाने वापरायचा नाही.
July 23, 2017
अंजीर हे फळ ओले अथवा सुक्यामेव्यात जगभर प्रसिध्द आहे.तसेच बऱ्याच लोकांचे हे आवडते फळ आहे.ह्याचे काळे व लाल असे दोन प्रकार आहेत.आता तर ड्रायफ्रूट मिठाई मध्ये अंजीर हमखास वापरतात,तसेच सुक्या अंजिराचे शेक देखील केले जाते.
अंजिराचे १२-१५ फुट झाड असते व त्याला वसंत ऋतुमध्ये फळे लागतात व ग्रीष्म ऋतुमध्ये ती पिकतात.ह्याची पाने आकाराने मोठी व काळपट हिरवी असतात.
अंजीर चवीला गोड,थंड व वात पित्तनाशक आहे व थोड्या प्रमाणात कफ वाढवितो.
आता आपण त्याचे घरगुती उपयोग पाहूयात:
१)तोंडातील जीभ,दात,हिरड्या ह्यांचे आरोग्य टिकवायला अंजीर चावून खावे.
२)लघ्वीची जळजळ,उग्रवास,खरपडणे ह्यात अंजीर खावा फायदा होतो.
३)लहान मुलांचे पोट फुगून संडासला खडा होतो कारण पोटात मळ सुकतो अशा वेळेस सुका अंजीर पाण्यात कोळून ते पाणी त्याला पाजावे.
४)अशक्तपणा,वजन कमी होणे,सुका खोकला,संध्याकाळी बारीक ताप येणे,ह्यात २ अंजीर +१ चमचा ज्येष्ठमध चुर्ण हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी त्या व्यक्तीला द्यावे व नंतर २ तास काही खायला व प्यायला देऊ नये.असे ३ आठवडे करावे.
५)बऱ्याच लहान मुलांना जेवणामध्ये काही तरी गोड लागते अशा वेळी त्यांना जेवणात अंजीराचा पाक करून द्यावा ह्याने त्यांचे पोषण देखील होते.
अंजीर खायचा अतिरेक केल्यास भुकमंदावणे,जुलाब होणे अशा तक्रारी उद्भवतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti