पाण्याची प्रशंसता भाग एक
पाणी म्हणजे जीवन जर योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य मात्रेमधे प्यायले तर !
हे विश्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे. प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. असे पाणी न मिळाल्यास तोंडाला कोरड पडते, शरीर चैतन्यहीन होते. अवयव शिथील होतात, आणि शेवटी मृत्यु येतो. पाण्याशिवाय कोणत्याही प्राण्यांचे कार्य चालूच शकत नाही, मग तो रोगी असो वा निरोगी, पाणी हेच जीवन आहे.
निरोगी राहाण्यासाठी वाग्भटजी म्हणतात,
जेवणाच्या आरंभी पाणी प्यायल्याने मनुष्य बारीक होतो.
जेवणाच्या नंतर पाणी प्यायले असता, माणूस स्थूल होतो.
तर जेवताना पाणी प्यायले असता मनुष्य सडसडीत राहातो.
तो मूळ संदर्भ असा आहे.
समस्थूलकृशा भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपा : ।
भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशांगताम् ।
अंते करोति स्थूलत्वं ऊर्ध्व चामाशयात्कफम
मध्ये मध्यांगतां साम्यं धातूनां जरणं सुखम् ।।
जेवताना देवाचे स्मरण करून पहिली आपोषणी घेतात. घसा ओला होण्यापुरतेच हे पाणी सांगितले आहे. नंतरचा घास अडकू नये, म्हणून घसा थोडा ओला करून घेणे. एक पळी पाणी उजव्या हाताची तर्जनी आंगठ्याच्या मुळाशी लावून तळहातावर छोटा खळगा करून त्यात एकच पळी पाणी घेतात......
देवपूजे मधेदेखील कोणत्याही कार्याच्या सुरवातीला आपोषणी घेतात.
केशवाय... नारायणाय....माधवाय नमः।
इथेपण तीनच पळ्या पाणी सांगितले आहे....
पाणी भरपूर प्यायचा नियम जर आपल्या संस्कृती मधे असला असता तर तिथे एक पळीभर ऐवजी, एकेक पेलाभर किंवा एकेक तांब्याभर पाणी प्यायला का सांगितले जात नाही?
"कारणाशिवाय पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, पाणी प्यायचे असल्यास एक पळीभरच पाणी प्यावे" हा संदेश यातून मिळतो.
जेवणापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पाचक स्राव कमी होतात.भूक मारली जाते. जेवण कमी जाते, त्यामुळे बारीक व्हायला होते. शरीर कृश होते, म्हणून असे करू नये.
हो. हे आधी ठरवले पाहिजे की, आपण सडसडीत असले पाहिजे. जाड पण नको. आणि बारीक पण नको. केवळ बारीक दिसण्यासाठी, डाएटींगच्या नावाखाली, पाणी पित रहाणे हा रानटी क्रूरपणा आहे. कृपया असे करू नये. आम्ही आमच्या विचारधाराच बदलून टाकल्या आहेत. आम्ही आमचे आदर्शच बदलून टाकले आहेत.
आमचे आदर्श जर दीपिका नि कॅटरीना असतील तर जीवनात वादळं आल्याशिवाय राहाणार नाही. काय दीपक लावायचे आहेत, ते कर्तृत्वात दाखवा. नुसते 'फिगर फिगर' करण्यात काही अर्थ नाही. शरीर अगदी नाजूक आखीव रेखीव, पण जरा काम सांगितले की कंबर जाते मोडून !
तरूणांचा आदर्श सुद्धा संजय दत्त नको, तर बटुकेश्वर दत्त हवा. पाश्चात्य विचारांचे पाणी जोखणारा आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळवणारा !!
कृश होणे, बारीक होणे हे, 'अशक्त होणे' या अर्थी आहे, हे लक्षात घ्यावे. म्हणून शहाण्या माणसानी जेवणापूर्वी पाणी पिऊ नये.
तोंडातील लाळ औषधी असते, पण सकाळी सकाळी तोंड धुवायच्या अगोदरची नाही. रात्रभर तोंडात तयार झालेली, किडलेल्या दाढांमधे भरून राहिलेली, लाळ औषधी कशी असेल ? राजा भोज यानी लिहिलेल्या एका ग्रंथातील संदर्भ असं सांगतो, पण वाग्भटजी असं कुठेही सांगत नाहीत.
आपले राजे केवळ युद्धच करत नव्हते तर ग्रंथ देखील लिहित होते. आमच्या छत्रपती शंभुराजांच्या संस्कृतमधे लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचे नाव तरी आठवत असेल. हे सर्व प्राचीन ग्रंथ खरंतर शालेय अभ्यासक्रमात असायला हवेत. असो.
गोऱ्या कातडीचे लोक काय सांगतात, यापेक्षा आपल्या परंपरा आणि आमचे आप्त काय सांगतात, ते जास्त महत्वाचे. त्यांनी नक्कीच चार पावसाळे जास्त बघितलेले आहेत.
थोडा विश्वास दाखवूया, आमच्या आप्तांवर !
त्यांनी आखून दिलेल्या चालीरीती वर !!
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.01.2017
January 12, 2017
आता जगण्यासाठी सुद्धा नियम करावे लागतील का ?
हो.
कसे जगावे, यासाठी जे नियम चुकीच्या पद्धतीने प्रस्थापित होत आहेत, झालेलेच आहेत, त्यातील दोष काढून त्यांना पुनर्स्थापित करावे लागणार आहे. शास्त्र न सोडता, आणि परंपराचा आदर राखून हे नियम बनवता आले तर जगणे सोपे होईल.
"मला असे वाटते" या सदराखालीच हे नियम बनवावे लागणार आहेत. कारण या नियमांना कोणताही ठोस आधार नाही.
हे नियम स्पष्टपणे कुठेही वर्णन केलेले नाहीत, पण नियम असल्याशिवाय इथे पानही हलत नाही, कुठे आहे रेफरन्स दाखवा पाहू, असे विचारले तर उत्तर देणे, पुरावा दाखवणे कठीण होईल, हे आधीच नमूद करतो.
नियम असतात ते अंदाज बांधण्यासाठी असतात. तेच खरं असंही काही नसतं. आरोग्याचे नियम म्हणजे कायदा नव्हे, आणि कायद्याने सर्व मिळतेच असे तरी कुठे आहे ना ?
एवढ्या उंचीला एवढे वजन असावे, असलेच पाहिजे असे नाही, रक्तदाब एकशेवीस बाय ऐशी असावा. तो तेवढाच असावा असे नाही. नियम केला की, एकशेवीस चे एकशे एकवीस झाले की रक्तदाब वाढला की नाही ? से येस ऑर नो. उत्तर द्यावे लागेल. हो. पण तारतम्याने आपण ठरवतो, एकने वाढ म्हणजे लगेच एक गोळी वाढवावी, असे नसते ना ! शेवटी तारतम्य आणि होणारा त्रास, दिसणारी लक्षणे, आणि नियम यांची योग्य सांगड घालता येणे महत्त्वाचे!
पण नियम म्हणून काही हवेत की नकोत ? म्हणून काही नियमांची क्रमशः चर्चा करू.
नियम एक.
पहिलाच नियम असा करू की, कोणताही नियम पाळू नये.
प्रत्येकाचे शरीर वेगळे, प्रत्येकाचे हातापायांच्या बोटांचे ठसे वेगळे, केसांची संरचना वेगळी, प्रत्येकाच्या डोळ्याची ठेवण वेगळी, प्रत्येकाचा आत्मा वेगळा, प्रत्येकाचे मन वेगळे, प्रत्येकाच्या इंद्रियांची क्षमता वेगळी, प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाची भूक वेगळी, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी, प्रत्येकाचा कोठा वेगळा, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे, प्रत्येकाचे कामाचे स्वरूप वेगळे, प्रत्येकाची धारण करण्याची क्षमता वेगळी, प्रत्येकाची शक्ती वेगळी, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी........
एवढी विविधता इथे नांदत असताना, प्रत्येकाला होणारा आजाराचे स्वरूप वेगळे, त्याला होणारे त्रास वेगळे, प्रत्यःकाला बरे वाटण्याची कारणे वेगळी, त्याचे पथ्यापथ्य वेगळे, त्याची औषधे वेगळी......... हे फक्त आयुर्वेद सांगतो.
एवढी विविधता आपल्या अवतीभवती दिसत असताना, प्रत्येकाने पाळायचे नियम एकच कसे असतील ? यासाठी पहिलाच नियम, आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताच नियम नक्की होऊ शकत नाही. अगदी एकाच प्रकृतीची, एकाच वेळी जन्माला आलेली, दोन जुळी माणसे किती भिन्न स्वभावाची असतात ? त्या दोघांमधे बाहेरून आतून थोडेफार साधर्म्य दिसेल पण तेवढ्यापुरतेच असते. कुंडलीशास्त्रानुसार देखील त्यांच्या अंशांश कुंडल्या बदलतात. असंच प्रत्येकाचे असते. त्यामुळे इथे प्रत्येकाचे नियम वेगळे.
हे नियम, थोडे तारतम्य वापरून, थोडा अनुभव वापरून, थोडा विवेक वापरून, थोडा ग्रंथांचा अभ्यास करून, थोडे व्यवहारज्ञान वापरून, थोडे थोरामोठ्यांनी सांगितलेले ऐकून, बदलायचे असतात.
जसे, दूध दही हा प्रमेहाचा हेतू म्हणजे मधुमेह होण्याच्या अनेक कारणातील एक कारण सांगितले आहे. याचा अर्थ लगेचच दूध दही कायमचे बंद करण्याची आवश्यकता नाही. आपल्या प्रकृतीला, आजच्या भाषेत काय "सुट" होते ते पहावे. अतिरेक नक्की टाळावा. चहामधे दूध चालेल, पण दुधाचाच चहा नसावा. गरज असेल तरच दूध घ्यावे. औषध म्हणून नको. अनुपान म्हणून दुध प्यावे, पण नियम म्हणून बोर्नव्हीटा खपवण्यासाठी दूध नको. म्हणजे बोर्नव्हीटा खाल्ला नाहीतर ताकद कशी येणार म्हणून दूध पाजवायचे, किंवा दुधामधे पूर्ण शक्ती असते, म्हणून दूध प्यायलाच हवे, पण दुधाचा वास चव आवडत नाही म्हणून त्यात काहीतरी टाॅनिकच्या नावाने विरघळून टाळूत ओतायचे, हा नियम नको.
इथे तारतम्य हवे, माझ्या मुलाला खरोखरच या सर्वाची गरज आहे का, हे एखाद्या जाणकार वैद्याला विचारून घ्यावे आणि नंतरच निर्णय घ्यावा. उगाचच कोणीतरी हिरो, खेळाडू, आपले खोटेनाटे सिक्रेट ओपन करत असतील तर भुलून जाऊ नये, इतकेच.
सांगायचा मुद्दा असा की, स्वतः ठरवून काहीही करू नये. सहजपणाने एखादी गोष्ट घडून जावी, नको त्या ठिकाणी असलेली बुद्धी संपवून टाकली तर हवी तिथे ती वापरता येत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.04.2017
April 10, 2017
ऐकलेले आणि बघितलेले यात चार बोटांचे अंतर असते, तसे नियम आणि वास्तव यात एक हाताचे अंतर असते.
April 12, 2017
नेहमीच्या वापरातील मसाल्याच्या तिखट पदार्थांच्या यादीतील एक प्रमुख औषधी घटक म्हणजे मिरी.
जिथे मिरची वापरता येणार नाही, अशा ठिकाणी मिरी वापरावी, एवढी तिखट. हिच्या तिखटपणापेक्षा भगभगीतपणा लक्षात रहातो. तोंडाची, जीभेची हायहुय करत, सर्वांना हाऽय् हाऽय् म्हणायला लावणारी, डोळ्यातून पाणी वाहायला भाग पाडणारी ही काळी मिरी आता जगप्रसिद्ध झाली आहे. सूप असो वा सॅलेड, मिरीशिवाय चवच नाही.
दिसायला बारीक सुरकुतलेली जरी दिसली, तरी जिभेवर चुरूचुर निर्माण करणारी चव काही औरच असते.
त्रिकटू या आयुर्वेदीय प्रक्षेप द्रव्यातील सुंठ आणि पिंपळीच्या मधे बसलेली ही मिरी कच्चीच वापरली जाते, हे बहुधा पाश्चात्य मंडळींनी पाहिले, तेव्हापासून ते काळी मिरीची पावडर सूप सॅलेडमधे वापरू लागले. मिरची वापरण्याएवढी आपली योग्य प्रकृती नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा मिरचीची तहान त्यांनी मिरीवर भागवली बहुतेक !
आजारपणातून उठल्यावर पहिला घासाच्या तूपभातावर मिरी हवीच. सकाळी दात घासण्याच्या दंतमंजनापासून, पापड आणि ऊसळीपर्यंत तर असतेच. पण अगदी आमरसाच्या वाटीत जावून तुपाच्या बरोबरीने विराजमान होणारी ही मिरी.
सणसणीत उष्ण तीक्ष्ण गुणाची, उत्तम दीपक म्हणजे भूक वाढवणारी, पाचक म्हणजे पचन घडवणारी, घाम आणून ताप कमी करणारी, ह्रदयाला हितकर, उत्तम जंतुघ्न, कृमींचा नाश करणारी, स्रोतसांमध्ये असलेला आमाचा चिकट अडथळा स्वशक्तीने दूर करणारी, आतून जखम स्वच्छ करणारी, सर्दी खोकल्यापासून डायबेटीस आणि ह्रदयरोगापर्यंत अप्रतिम रिझल्ट देणारी, वात कफावर विजय मिळवणारी आणि पित्ताला वाढवणारी असते. सर्व रोगांचे मूळ असलेल्या, मंद अग्निला वाढविणारी असल्यामुळे, वैद्यप्रिया बनलेली आहे.
जिथे पाणी, आंबटपणा, गोडपणा जास्त असतो, तिथे मिरी वापरली जाते. म्हणून कदाचित कोकणात जास्त वापरली जाते. कोकणात उत्पन्न होत असल्याने कोकणी प्रकृतीला सहजपणे मानवणारी, तसाच स्वभाव बनवणारी, पण अंतिमतः सुखकर ठरणारी, ही मिरी म्हणजे अगदी कोकणप्रिया. कोकणी महिलेला आपल्या गळ्यामधील मंगळसूत्रातील जणु काळे मणीच वाटावेत, एवढी प्रिय.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
18.11.2016
November 18, 2016
गणपती बाप्पाचा सकाळच्या महापूजेचा नैवेद्य पंचपक्वान्नाचे भरलेले ताट असते. पण सायंपूजेचा नैवेद्य काय असतो ? तर वाटीभर पंचखाद्य किंवा एखादा लाडू.
कशासाठी ?
जे जे देवासाठी, ते ते देहासाठी. या न्यायाने देवाच्या भोजनाचा नियम आपल्यालादेखील तसाच लागू होतो. सकाळचे भोजन आणि सायंकाळचे भोजन याच प्रमाणात घ्यावे, असे आपली संस्कृती पण सुचवते.
कमळ कधी उमलते ?
कमळ कधी मावळते ?
सूर्योदय झाला की उमलते, आणि सूर्यास्त झाला की मावळते. सूर्यफुलाचे नावच मुळी सूर्यावरून ठेवले आहे. त्यांच्याकडे कोणतेही घड्याळ नाही, तरीदेखील त्याला बरोबर कळते, दिवस आणि रात्र. कधी कसे वागायचे, कधी कसे फुलायचे, कधी कसे वळायचे ते !
सूर्योदयाला सुरू झालेला आपला दिवस सूर्यास्ताला संपतो. (निशाचर प्राणी अपवाद आहेत.)
मनुस्मृतिमधील निद्रा प्रकरणामधे देखील "सूर्यामुळे दिवस होतो आणि सूर्यामुळे रात्रही होते, असे सांगितलेले आहे. रात्र ही झोपण्यासाठी, विश्रांतिसाठी. तर दिवस हा दैनंदिन कामे करण्यासाठी आहे.
केवळ आपली पृथ्वीच नव्हे तर सर्व ग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सूर्यापासूनच शक्ती, उर्जा मिळवित असतात. सूर्याच्या अस्तित्वामुळेच आपले अस्तित्व आहे, याचे ज्ञान आमच्या ऋषीमुनीना होते. आणि ते त्यांनी लिहूनदेखील ठेवले आहे.
सगुणरूपातील एकमेव देवता म्हणजे सूर्य. रामदास स्वामीनी सर्व तरूणांना सूर्यनमस्काराचे, व्यायामाचे महत्व पटवून दिलेलेच होते.ते स्वतः दररोज शेकडो समंत्र सूर्यनमस्कार घालीत असत.
भोजनाच्या संदर्भात आणखी एक श्लोकात सांगितले आहे,
सायंकृते प्रभाते जीर्यती,
प्रभातकृते सायं जीर्यती.
सकाळी जेवलेले अन्न सायंकाळी पचते, तर सायंकाळी घेतलेले अन्न सकाळी पचते.
सायंकाळी आणि सकाळी असेच शब्द या श्लोकामधे आहेत. दुपार आणि माध्यान्ह असे शब्द नाहीत. याचा अर्थ जेवायचे कधी तर सकाळी आणि सायंकाळी.
काही जण म्हणतील, या जेवायच्या वेळा त्याकाळात ठीक होत्या. आजच्या काळात त्या सुसंगत नाहीत. काळ बदलला आहे, त्यानुसार आपण बदलायला नको का ?
ज्या ठिकाणी सूर्य सहा सहा महिन्यात दिसतंच नाही, अशा ठिकाणी रहाणाऱ्या लोकांनी कोणता नियम पाळायचा ?
जिथे सूर्य नाहीच दिसत त्याठिकाणी अन्य नियम वापरू शकतो. पण जिथे सूर्य दिसतोय तिथे तर या जेवणाच्या वेळा पाळायला सुरवात करूया. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आम्ही पहिल्यांदा शंका घेणार. "कसं शक्य होणार ? हे असं लवकर जेवणं जमणारच नाही." सुरवातीलाच नकारघंटा वाजवली की पुढे सगळं चुकतंच जात ना. मग काही करावसं वाटत नाही.
या वेळा पाळणे तर्कसंगत नाही, व्यवहार्य नाहीत. हे एकवेळ मान्य करूया. पण पचन होण्यासाठी लागणारी उर्जा कुठुन आणणार ?
विज्ञानाने बाकी सगळी सोंग आणता येतील पण सूर्याचा प्रकाश आणि त्याची शक्ती तर आणू शकणार नाही ना. शेवटी कुठेतरी निसर्गाला शरण जायलाच हवं ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.03.2017
March 15, 2017
डाळींबाच्या द्राक्ष्यांप्रमाणे लालचुटूक ओठ अशी उपमा सुंदर स्त्रीयांच्या ओठांना दिली जाते.खरोखरच हे डाळींबाचे दाणे जणू काही रूबीच्या रत्नाप्रमाणेच दिसतात.ह्या दाण्यांचा रस पिण्यासाठी वापरतात तसेच मुंबई दाबेली मध्ये चव यायला हे डाळींब दाणे घातले जातात.
काही म्हणा पण हे डाळींब जसे सुरेख लागते तसेच ते खाल्ल्यावर शरीरात तरतरी येते.ह्या डाळींबाचे १०-१५ फुट उंच वृक्ष असतो जो मध्यम आकाराचा असतो.ह्याची फुले नारंगी लाल रंगांची असतात तर फळे गोल लालसर व टपोरे दाणे युक्त असतात.
ह्याचे गोड फळ हे थंड व त्रिदोष शामक असून गोड आंबट चवीचे फळ हे किंचीत पित्तकर असते तर आंबट फळ हे कफवातनाशक असून पित्तकर असते.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:
१)लहान मुलांना होणाऱ्या जुलाबात फळाची साल पाण्यात उगाळून मधासह त्याचे चाटण द्यावे.
२)पित्ताचा त्रास,आंबट ढेकर,जळजळ ह्यात १/२ डाळींब रस+१ चमचा खडीसाखर घ्यावी.
३)तापामध्ये तहान लागत असल्यास थोड्या थोड्या वेळाने डाळींबाचा रस प्यावा.
४)डाळींबाची साल सुकवून त्याची पूड करावी व त्याने दात घासावे ह्याने दात व हिरड्या बळकट होतात,रक्त स्त्राव होत असल्यास कमी होतो.
५)घसा बसणे,दुखणे,टाॅन्सील्स वाढणे ह्यात डाळींबाच्या ताज्या सालीचा काढा+चिमूटभर हळद घालून गुळण्या कराव्यात.
डाळींब अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब,सर्दी असे त्रास होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 18, 2016

खदिराचा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. खदिर चवीला कडू, तुरट असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कडू, तुरट व थंड असल्याने पित्तशामक व थंड सोडुन अन्य गुणांनी कफशामक आहे.
January 2, 2018
जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही.
वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे.
मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे.
पाश्चात्य लोकांच्या उंचीला साजेशी म्हणजे कमोडवर बसल्यावर सहजपणे पाय टेकतील अशी उंच कमोडची भांडी त्यानी बनवली. पण त्याच उंचीची भांडी, भारतातही बनवली जाऊ लागली. कमोडवर बसल्यावर, जमिनीला पाय टेकतच नसल्याने, कितीतरी भारतीयांना अक्षरशः लोंबकळत बसावे लागते, हे सत्य आहे. पाश्चात्य अनुकरणाची आणखी किती लाचारी करायची ?
असो. ! पाय जमिनीवर, जमिनीला टेकलेले हवेत हे महत्वाचे.
( हो ! माझ्या काॅम्प्लेक्स मधील चिकित्सालयात, मी तपासणीकक्षातील जमिन शेण मातीचीच ठेवली आहे. आणि तपासणीसाठी बैठकपण भारतीयच ठेवली आहे. मस्त खाली बसून रूग्णांना तपासतो. त्यात लाज कसली ? ) मनापासून ठरवलं तर काहीच अशक्य नाही.
दुसरा काही पर्यायच नसेल,आणि जिथे जेवायला टेबलखुर्चीचाच वापर करायचा असेल, तिथे न लाजता, खुशाल खुर्चीवर मांडी ठोकून बसावे.
कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर पाय अधांतरी रहाता नयेत. टेकलेलेच हवेत. नाहीतर पुढे पाठीला बाक येणे, पीआयडी, चकती सरकणे, असे प्रकार सुरू होतात. हे व्यवहारात दिसते. म्हणून तर पुर्वीच्या मुख्याध्यापकांच्या लाकडी खुर्चीखाली पाय टेकायला, पायपेटीला असते तशी तिरपी फळी ठोकलेली असायची. आता ती पण गेली........
........आणि कंबरेला बांधून ठेवणारे बेल्ट मात्र आले.
जेवताना पण या गोष्टीचे भान हवे.
पायांना भक्कम आधार हवा,
पोट आणि ताटात सुरक्षित अंतर ठेवा
हे वाक्य विसरले जाऊ नये की झाले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
21.09.2016
September 21, 2016
।।उमापुत्राय नम: बिल्वपत्रं समर्पयामि।।
शंकराला प्रिय अशी हि वनस्पती त्यांचे पुत्र गजानन ह्यांना देखील पत्री म्हणून वाहिली जाते कारण तिच्यात बरेच औषधी गुणधर्म दडलेले आहेत म्हणूनच हे आपणा सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नाही.
बेलाचे झाड हे ८-१० मीटर उंच असते व ह्याच्या बुंध्याचा घेर १-१.२५ मीटर एवढा असतो.हा वृक्ष काटेरी असतो व ह्याची पाने त्रिदल युक्त अर्थातच तीन छोटी पाने मिळून हे पान बनते.फुले हिरवट पांढरी सुगंधी व ४-५ पाकळ्यांची असतात.
फळ मोठे गोल किंवा अंडाकार धुरकट पिवळे असून पिकल्यावर त्यावर नारंगी झाक दिसते.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
कच्चे फळ हे चवीला तिखट,कडू,तुरट असते व उष्ण गुणाचे हल्के व स्निग्ध असते.
तर पिकलेले फळ हे चवीलातिखट,कडू,तुरट,
गोड असते व उष्ण पचायला जड व रूक्ष असते.
हे शरीरातील वात व कफ दोष कमी करायला मदत करते.
आता ह्या बेलाच्या वृक्षाचा उपयोग कुठे केला जातो ते थोडक्यात पाहूयात:
कच्चे फळ हे भुक वाढविणारे,पचनक्रिया सुधारणारे,मल बांधुन ठेवणारे कृमिनाशक आहे म्हणूनच ह्याचा उपयोग जुलाब,आव पडणे,भुक मंदावणे ह्यात केला जातो.
पिकलेले फळ हे सौम्य रेचन करते म्हणून पोट साफ होत नसल्यास ह्याचा उपयोग होतो.
बेलफळाची साल हि काढा करून वारंवार उल्टी होत असल्यास उपयुक्त आहे.
बेलाच्या वृक्षाचे मुळ हे हृदयाला हितकर असल्याने हृदयविकारात उपयोगी आहे.
बेलाची पाने ही अंगावरील सूज कमी करतात,तसेच ती वेदनाशामक म्हणून उपयोगी आहेत.डायबेटीस मध्ये लघ्वीतून साखर जाणे व वारंवार लघ्वी होणे ह्यात देखील बेलाची पाने उपयुक्त आहेत.
तर आपण पाहीलेच असेल की बेलाचा वृक्ष किती औषधी गुणांनी युक्त आहे तो आणी म्हणूनच ह्याला गणपती प्रिय पत्रीमध्ये मानाचे स्थान आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 1, 2017
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे छापन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग चौदा
पंधरा दिवसातून तीन वेळा म्हणजे दर पाच दिवसांनी डोक्याचे केस, दाढी, नखे, आदि कापावेत. त्यानंतर स्नान अवश्य करावे. मात्र स्वतःच्या हातानी विशेषतः केस कापू नयेत. ते नाभिकाकडून कापून घ्यावेत. दातानी नखे खाऊ नयेत.
स्वतःचे स्वतः केस कापले तर नाभिकाचा रोजगार बुडेल हा व्यवहार सोडला तरी, स्वतःचे केस नीट कापता येत नाहीत. लहानपणी हळुच केस कापून पहाण्याचा अनुभव प्रत्येकालाच असेल.
डोके, दाढी या ठिकाणी जे केस वाढतात, त्यांच्यावर बसलेली धुळ, जीवजंतु साफ होण्यासाठी ते दर पाच दिवसांनी कापावेत, असे ग्रंथकार म्हणतात. आजच्या युगानुसार, दाढी दर दिवशी किंवा एक दिवसाआड केली तरी चालेल, आणि केस दर महिन्याला तरी कापावेत.
कोणत्याही प्रकारची धार्मिक कार्ये करायची असल्यास किंवा एखाद्याच्या मृत्युपश्चात धर्मशास्त्रानुसार मुंडन करायला सांगितले आहे. यामधेही शुद्धी क्रिया अपेक्षित आहे.
पण डोळ्यांच्या पापण्या, भुवया, मिशी आणि छाती या ठिकाणी असलेल्या केसांना अजिबात कापू नये. त्याने नुकसान होते.
छातीवरील केसांमुळे ह्रदय आणि फुफ्फुसे यांना संरक्षण मिळत असते. केसांमधून काही प्रमाणात मलद्रव्ये देखील बाहेर पडत असतात आणि घाम निर्माण व्हायला पण मदत होते. ज्यामुळे रक्ताची शुद्धी होते.
डोळ्यावरील भुवयांचे केस हे डोक्यावरून येणारा घाम डोळ्यात जाऊ नये यासाठी संरक्षक म्हणून काम करत असतात. त्या उगाचच कोरत राहू नये.
जशा भुवया तशा मिशा. नाकातील स्राव वा उच्छवास तोंडात जाऊ नये, यासाठी मिशांचे केस संरक्षण देतात. पिळदार मिशा व्यक्तीमत्व आणखी खुलवतात, हा भाग वेगळा !
डोळ्यांच्या पापण्यांचे केस तर अतिशय नाजुक असतात. डोळ्यांच्या आतील सर्व स्तरांचे संरक्षण होण्यासाठी या पापण्या तत्पर असतात. आपल्या इच्छेविरुद्ध शरीराच्या फायद्यासाठी काही अवयव काम करत असतात. त्यात जसे ह्रदय, यकृत, किडनी, मेंदू हे आतील अवयव आहेत, तसे डोळ्यांच्या पापणीवर आपला ताबा बहुतेक वेळा नसतो. आपल्या नकळत काही धुळ, धूर, सूक्ष्म किटक जर डोळ्यांत जात असतील तर त्यांना अडवण्यासाठी एक सक्षम यंत्रणा असते, त्यात या पापण्यांचा समावेश असतो.
जननेंद्रिये आणि कक्षा प्रदेशी असलेले रोम नियमितपणे काढावेतच. इथे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
सर्व अंगावर असलेले केस हे जणुकाही शरीरावर असलेली पिसे आहेत. त्वचेचे संरक्षण करणे, घाम येणारी छिद्रे बाहेरील धुळीने बुजुन जाऊ नयेत यासाठी या बारीक लवीचा उपयोग होत असतो. सूक्ष्म स्पर्श संवेदना होण्यासाठी, समजण्यासाठी या छोट्या केसांचा उपयोग होत असतो. त्वचेची कांती चमकदार रहावी, यासाठी देखील हे रोम काम करीत असतात.
डोक्यावरचे केस खूप कमी ठेवावेत आणि शेंडी राखल्यास उत्तम. शेंडी ठेवणे म्हणजे ब्रह्मरंध्राचे संरक्षण करणे. आणि विश्वातील सकारात्मक उर्जा थेट शरीरात. अर्थात ज्यांचा विश्वास असेल त्यांना पटेल. हा अनुभव घेऊन पाहण्याचा विषय आहे. शेंडी ही "डिश अँटीना" प्रमाणे काम करते, असा माझा अनुभव आहे. आणि फक्त ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्यानीच ठेवावी असं काही नाही. अन्य जातीमधे देखील शिखा ठेवतात. असो. ज्याची त्याची शेंडी, ज्याची त्याची मर्जी !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१४.०९.२०१७
September 14, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti