उकीडवे ( हिंदी मे उकुडू बैठकर ) बसून मलविसर्जन केल्यामुळे मल सहजपणे बाहेर पडायला मदत होते. दोन्ही मांड्या पोटावर विशेषतः पोटाच्या खालच्या भागावर दाबल्या गेल्याने पक्वाशय, मलाशय अधिक कार्यरत होतात. पोटऱ्या दाबल्या जातात. त्यामुळे मलविसर्जनाची सर्वात आदर्श पद्धत म्हणजे उकीडवे बसण्याची आहे, असे संशोधन आंग्ल भाषेतील पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकामधे नमूद केलेले आहे.
February 15, 2018
एक काळ असा होता, की पाश्चात्यांना पोट कसे भरावे याची चिंता होती. संस्कृती, संस्कार हे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. लज्जारक्षण कसे करावे, हे त्यांना माहित नव्हते. अर्थात अजून तरी कुठे कळले आहे म्हणा ! लज्जारक्षण करण्यासाठी चांगले कपडे घालायचे असतात, हा उद्देश नाहीच आहे. शरीर आणखी आकर्षक कसे दिसेल यासाठीच आज ते कपडे घालतात. त्यातूनच रॅम्पवाॅक कॅट वाॅक, फॅशनशो आणि स्त्री शरीराचा बाजार इ. प्रकार पुढे येत गेले.
February 5, 2018
आरोग्याच्या बाबतीत अमुक एक नियम करून चालत नाही. मागे अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे देश, प्रकृती, सवय, मनाची अवस्था, आवडनिवड, उपलब्धता इ. अनेक गोष्टींवर आरोग्याचे मापदंड बदलत असतात. प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणारे नसते. एखाद्याच्या प्रकृतीतला नेमकेपणा, आवश्यकता, गरज, योग्य पथ्यापथ्य हा जाणकार वैद्यच सांगू शकतो. त्याहीपेक्षा अचूकपणे फॅमिली डाॅक्टर / वैद्य सांगू शकेल. कारण त्या वैद्याला जन्मापासूनच त्याची सर्व माहिती असते. त्यामुळे निदान करायला किंवा अपथ्य, चिकित्सा सांगायला सोपे होते.
मी असं सांगतो, एकच नियम पाळावा, की (वैश्विक नियम सोडून) कोणताच नियम पाळू नये. वैश्विक म्हणजे युनिव्हर्सली अॅक्सेप्टेड. जगन्मान्य !
आपण आता सर्वसामान्य जगन्मान्य नियम काय असतात ते पाहू.
1. पाणी कधी प्यावे ?
तहान लागेल तेव्हा. गरज असेल तेव्हा.
2. पाणी किती प्यावे ?
तहान भागेपर्यंत. गरजेपुरते.
याला म्हणतात, वैश्विक नियम. जगात कुठेही जा. हाच नियम पाळायचा. म्हणजे कोणताही शास्त्राधार शोधण्याची आवश्यकताच पडणार नाही.
एवढे साधे प्रश्न आणि एवढी साधी उत्तरे असताना, आपण नियम करून खूप गोंधळ निर्माण करून ठेवतो. जे सोप्पं आहे ते, अवघड करून सांगितले, तरच ते शास्त्र आणि ते जाणणारा कोणीतरी मोठ्ठा विद्वान वगैरे वाटतं. असं काही जणांना वाटतं म्हणून जरा अघळपघळ करून सांगितले तर ऐकणाऱ्यालाही जरा बरे वाटते ना !
ताप आहे असं सांगण्याऐवजी पायरेक्झिया ऑफ अननोन ओरीजीन, वगैरे भाषेत सांगितले तर रूग्णालापण आपणाला कोणता तरी मस्त मोठा आजार झालाय असे वाटते. मग नंतर बिल भरताना फार कटकट वाटत नाही. असो.
पाणी पिण्याचे हे दोन नियम मोडले नाहीत, तर पाण्यापासून होणारे रोग निकाली निघतील. (आणि हे एवढ्या पटकन, समजले तर ही लेखमाला पण लवकर बंद होईल.)
याला शास्त्राधार काय ? असंही कोणाच्या तरी मनात येईल. त्यालाही उत्तर देतो.
ही गरज कोण ठरवणार ?
तहान लागली की नाही, हे कसं समजणार ?
सोप्प आहे.
यासाठी त्याला काही काळ गृहीत धरावा लागेल. उत्तर मिळेपर्यंत वाट पहावी लागेल. नंतर वाटलं तर विसरून जायचं. गणितामध्ये नाही का आपण एक्स गृहीत धरंत. तसं. एक्सचं उत्तर मिळालं, की त्याला विसरून जायचं.
आपली तहान भूक, झोप, ढेकर,जांभई, अश्रु, मलमूत्र विसर्जन इ. क्रियांची जाणीव आपणाला कोण करून देतो ? जर त्याने ही जाणीव करून दिली नसतीच तर ? म्हणजे तो आतून काहीतरी सांगतोय, हे असं कर. हे तू असं केलंस तर बरं वाटेल, वगैरे.
कोण आहे तो?
तोच तो निर्गुण निराकार...... आत्मा !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
09.12.2016
December 9, 2016
अग्नि महत्वाचा !
'अग्निमिळे' या ऋचेनेच संहिता ग्रंथाची सुरवात झाली आहे. एवढं अग्निचं महत्व !
पाणी शुद्ध करण्यासाठी जो अग्नि वापरला जातो, तो देखील शुद्धीकरणासाठी महत्वाचा मदतनीस आहे.तोही तसाच शुद्ध हवा.
हो. अग्निमध्ये देखील थोडे सूक्ष्म फरक आहेत.
सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पण प्रकटीकरणाची वेळ ठरलेली. त्यामुळे रात्रौच्या वेळी पाणी शुद्ध करायचे झाल्यास त्याचा उपयोग नाही. (आणि तसं पाणी सूर्यास्तानंतर प्यायचेच नाही, अगदी उकळून गार झालेले पाणी देखील परत गरम करायचे नाही आणि रात्र उलटून गेली तर निषिध्दच ! )
सूर्याखेरीज आणखी कोणते अग्नि वापरले जातात. मोठ्या यज्ञामधे जी अग्निची स्थापना करतात, त्यासाठी लाकडी रवि लाकडी उखळात घर्षण करून अग्नि निर्माण केला जातो. स्वयमग्नि ! हा अग्नि अत्यंत शुद्ध असतो.
नंतर त्याची स्थापना करून इतर समिधा, लाकडे वगैरे इंधन वापरून वाढविला जातो.
एक अग्नि विवाहाच्या वेदीवर सप्तपदी करत असताना प्रज्वलीत केला जातो. या अग्निचे रक्षण पुढे समंत्र आयुष्यभर करायचे असते, जो मृत्युनंतर उरलेलं शरीर परत ईश्वरापर्यंत पोचवण्यासाठी, म्हणजेच दहन करण्यासाठी वापरला जातो. हा अग्नि अत्यंत पवित्र असतो. म्हणून अग्निला पावक असेही म्हणतात.
गारगोटीचा दगड वापरून अग्नि प्रज्वलीत केला जातो, तोही अग्निच, पण गरज म्हणून तयार केलेला. मंत्राशिवाय केवळ तंत्र वापरून.
एक अग्नी चुल पेटवण्यासाठी वापरतात. सध्याच्या जमान्यातील काडेपेटी वापरून म्हणजे गंधकाचा वापर करून. किंवा लायटर मधली चकमक वापरून ठिणगी तयार केली जाते. अशा प्रकारे तयार केलेला अग्नि हा दुय्यम दर्जाचा मानला जातो.
अग्नि रक्षणासाठी जे इंधन वापरले जाते, तेही महत्वाचे. जसे तेल, तूप, राॅकेल, कापूर, स्पिरीट, जसे इंधन तशी काजळी, तशी अग्निची तीव्रता !
विडी किंवा सिगरेट पेटवायची असेल तर देवघरातल्या निरांजनावर पेटवली जात नाही. जसे काम तसा अग्नि. जसे काम तशी पवित्रता.
अग्नि कोणत्या कारणासाठी हवाय, त्याप्रमाणे अन्य साधने. आयुर्वेदात काही भस्म बनवताना भट्टी वापरायला लागते. ही भट्टी विशिष्ट लाकडे वापरून, विशिष्ट संख्येमध्ये रानशेणी वापरून बनवायला सांगितली आहे. रानशेणींची संख्या बदलली की पुटाचे नाव बदलले. त्या औषधावर होणारा परिणाम बदलला. हे सगळं अग्निवरच अवलंबून आहे ना !
घरात जी चुल पेटवली जाते, त्या चुलीमागे एक उपचुल असते. तिला वाईल, वैल असे म्हणतात. त्यावर मातीचे मडके ठेवून त्यात पाणी ठेवून दिले जाई. पुढे मुख्य चुलीवर काम करत असताना मागे जाणारा अग्नि फुकट दवडू न देता, त्यावर मडक्यात पाणी तापवून घेतले जाई. आमटी भाजीत जर पाणी हवे असेल तर हेच गरम पाणी वापरले जाई. हे पाणी दिवसभर त्या वैलावरच. चुल प्रत्यक्षात थंड झाली तरी देखील चुलीचे दगड गरम असत, तेवढी उष्णता हे पाणी धगधगीत ठेवायला पुरेसे असे. या पाण्याला एक मस्त वास येतो. धुराचा वास. स्मोक फ्लेवर ! जो वास तयार अन्नाला आपोआपच येत असे. (आमच्याघरी आजही चुल आहे. आम्हाला पेज अजूनही चुलीवरची मिळते.) हे वैलावरचे पाणी सतत कोमट असल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचे काही कारणच नाही.
काळ बदलत गेला, तसे अग्नि निर्माण करण्याची पद्धत बदलत गेली. ओव्हन आला. विद्युत उर्जा वापरून हा अग्नि तयार केला गेला.
आतातर चुंबकीय पद्धतीने अग्नि मिळतो म्हणे. मायक्रोवेव्ह !! आणि इंडक्शन प्लेट. !!! अग्निचे तेज हे हे रूप दिसतच नाही. केवळ तापणे.
एका अग्निवर एका पद्धतीने शुद्ध करून घेतलेले पाणी परत दुसऱ्या अग्नीच्या संपर्काने शुद्ध करायचे नाही. गुण बदलतात.
वेळ नाही, या सबबीखाली अन्न शिळं करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि गरम करायला सुद्धा सवड नाही, म्हणून मायक्रोवेव्ह मधे ठेवून परत गरम करून खायचं. अशी ही पाश्चात्य पद्धत !
मायक्रोवेव्हमधे गरम केलेलं पाणी आणि चुलीच्या अग्निवर केलेलं पाणी यावर तौलनिक अभ्यास झाला. दोन वेगवेगळ्या कुंडीतील एकाच वयाच्या, एकाच प्रकारच्या रोपट्यांना विशिष्ट दिवस या दोन्ही प्रकारानी गरम करून गार झालेले पाणी घातले. काही दिवसांनी असे लक्षात आले, की मायक्रोवेव्ह मधील अग्निचे जे तरंग निर्माण होतात, ते घातक असतात, त्यांनी गरम केलेले "शुद्ध" पाणी पिऊन रोपटे मरून गेले.
आज पाश्चात्य तंत्र आमच्या स्वयंपाकघरात येऊन पोचले आहे. ज्याच्या निर्धोक उपयोगिते विषयी अजून मोठे प्रश्नचिन्हच आहे. तरी आम्हाला जाग येत नाहीये. एका बाजूने तंत्रज्ञान वाढते आहे, तर एका बाजूने रोग वाढताहेत. नवनवीन रोग अक्राळविक्राळ स्वरूपात समोर येताहेत. आणि अजून आम्हाला जाग येत नाही.
याला काय अर्थ आहे ?
आमचं वैलावरचं पाणी मात्र त्यासाठी समर्थ आहे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
January 8, 2017
ज्यांना जमिनीवर बसताच येत नाही, त्यांनी काय करावे ?
आधी ज्यांना जमिनीवर बसता येतंय, त्यांनी जमिनीवर बसायची सवय अजिबात मोडू नका.
आज जमिनीवर मांडी घालून बसूच नका, असा पाश्चात्य बुद्धीचा ऊफराटा सल्ला सर्वच अस्थिरोगतज्ञ देत असतात. असा मांडी न घालण्याचा सल्ला कदाचित बरोबर असेलही, पण, अगदी क्वचित हाताच्या बोटावर मोजायच्या अवस्थेत ! म्हणून सर्वांनीच जमिनीवर मांडी घालून बसणे सोडावे, असे थोडेच आहे ?
जशी संस्कृति तसे आचरण. पाश्चात्य संस्कृतीमधे मांडी घालून बसणे हा संस्कार त्यांच्या लहानपणापासूनच नाही, मग अगदी कितीही उच्चविद्याविभूषित झाले तरी, खाली बसायचे असते, हे त्यांना माहीतच नसते.
पाश्चात्यांचे एकवेळ समजू शकतो, पण ज्यांच्या आयुष्याची निम्मी वर्ष जमिनीवर, पाय दुमडून जेवण्यात आणि उकीडवे बसून मलविसर्जन करण्यात गेली, अश्या आमच्या भारतीय वैद्यक तज्ञांनी, असे सल्ले आपल्या फाईल्सवर छापील स्वरूपात आणल्यावर, बदललेल्या शिक्षणपद्धतीने, भारतीय संस्कृतीचे किती नुकसान झाले, हे लक्षात येते.
भारत हा माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत ...
माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन....
या प्रतिज्ञेचा एवढ्या लवकर विसर पडावा, याचेही आश्चर्य वाटते. या आमच्या भारतीय परंपरा हळुहळू आमच्या जीवनपद्धतीतून नाहीश्या होत चालल्या आहेत. एवढे पाश्चात्य विचारांचे आपण होत चाललो आहोत, हे आमच्या लक्षातही येत नाहीये.
सहज या परंपरांचा हिशोब करीत बसलो असताना असे लक्षात आले की, सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किमान एकशे सत्तावीस ठिकाणी आपण अभारतीय पद्धतीने वागतोय, ज्यांचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध आहे.
पण आमची विचारसरणीच अशी काही बदलली गेली आहे, की अश्या एकशे सत्तावीस गोष्टी, मूलतः भारतीय नाहीत, हे आमच्या अस्सल भारतीय मनालादेखील पटत नाही.
त्यातीलच एक म्हणजे जमिनीवर बसणे.
जमिनीशी, या मातीशी थोडा तरी संपर्क हवाच ना ? !
वैज्ञानिक भाषेत बोलायचे तर "अर्थिंग" हवेच ! अनेक विचारांची, माणसे आपल्याला दररोज भेटत असतात. आपल्याला नको असलेले विचार ते आपल्याला बोलून दाखवतात. काही विचार आपल्याला, आपल्या अंतर्मनातून काढून टाकायचे असतात, पण ठरवले तरी काढता येत नाहीत, अशावेळी हे "अर्थिंग" उपयोगी होते, असा माझा अनुभव आहे.
आकाशात कितीही भरारी घेतली तरी आपले पाय मात्र जमिनीवरच हवेत, असे म्हटले जाते, ते काही अगदीच शब्दशः घ्यायचे नसते, असे नसते. पाय शक्यतो जमिनीवरच हवेत, म्हणजे "शाॅक" लागण्याची भीती नसते.
असो.
जमिनीशी असलेली ही भारतीय नाळ, जेवताना जर जुळली तर फार बरे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
20.09.2016
September 20, 2016
योगरत्नाकर या ग्रंथामधील हा आणखी एक श्लोक पहा.
सायं प्रातर्मनुष्यानां अशनं श्रुतिचोदितम्।
नान्तरा भोजनं कुर्यात् अग्निहोत्र समो विधि:।।
शास्त्रात इतक्या स्पष्ट शब्दात लिहिले आहे.
सायंकाळी आणि सकाळी या दोन वेळा जेवले पाहिजे. जसे सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र चुकत नाही, तसंच भोजन हे पण एक प्रकारचे अग्निहोत्रच आहे. या वेळेला जेवण्याचा नियम अजिबात चुकवू नये.
"काल भोजनम् आरोग्य कराणाम् श्रेष्ठः। "
म्हणजे योग्य वेळी घेतलेले भोजन हे आरोग्य मिळवण्यासाठी योग्य असते. आपण काय जेवतोय, यापेक्षा किती वाजता खातोय, या वेळेला महत्त्व आहे.
हे सगळं ठीक आहे हो, पण आजच्या काळात हे तर्कसंगत वाटत नाही. पूर्वीच्या गोष्टी सांगून हे असं स्वप्नरंजनात जाणं आणि तिथे रमणं, हे वय वाढल्याचं लक्षण वाटते. असं काहीजण म्हणतात. विशेषतः वैद्यांनी म्हटले की यांच्या पराभूत मानसिकतेला काय म्हणावं कळत नाही.
आयुर्वेद समजून घेण्याच्या प्रक्रियेत चुक झाली की अश्या शंका निर्माण होतात. आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेताना रंजक आणि रोचक भाषेत न शिकवल्यामुळे शिक्षणाबद्दलचे प्रेम वाढत तर नाहीच उलट कमी होते, एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी वेगवेगळी रूपके वापरायची असतात, हे अजूनही शिक्षकांच्या लक्षात येत नाहीये. आपली जेवणाची वेळ सकाळ आणि सायंकाळ असावी हे एकच वाक्य आपण कितीतरी वर्षापासून तसे ऐकतंच आलोय, पण बदल झाला का ?
नाही. पण कालचक्राची गती फिरल्यामुळे हेच वाक्य पुनः पुनः पटवून द्यावे लागत आहे. आणि हे सांगण्यासाठी जर भारतीय संस्कृती प्रमाण मानली तर आपला गौरवशाली इतिहास देखील लक्षात येईल आणि मुख्य म्हणजे आयुर्वेद समजून घेतला जाईल ना ! पण पटतच नाही.
समजा आपण एका रस्त्यानं जातोय, आणि काळाच्या ओघात रस्ता चुकलो. आणि अगदी एकशे ऐशी अंशात चुकलो, तर काय करायचं ?
आता एवढं आलोच आहोत तर पुढेच जायला पाहिजे ना. असा विचार करून चालेल का ?
जिथून रस्ता चुकला आहे, तिथपर्यंत मागे आलंच पाहिजे. आणि परत योग्य दिशेने प्रवास सुरू केला पाहिजे. तरच आपण आपल्या ध्येयाच्या दिशेकडे वाटचाल करू.
'काळ खूप पुढे गेला आहे. आता परत मागे फिरता येणे शक्यच नाही, प्रवाहाच्या दिशेत गेलंच पाहिजे,' अशी नकारात्मक मानसिकता असेल तर काऽही शक्य नाही. जिवंत मासेच प्रवाहाच्या विरोधात पोहू शकतात, आणि मेलेले प्रवाहात वाहात जातात.
आणि आपला आपल्या शास्त्रावर, आपल्या स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर, अशक्य ते शक्य करतील स्वामी या उक्तीप्रमाणे, जे रोग कधीही बरे न होणारे असे पाश्चात्य मानसिकतेचे लेबल लावलेले रोग आपण मुळातून उखडून टाकू शकतो.
आरोग्यटीप लिहिण्याचा मुळ उद्देश भारतीय आयुर्वेद आणि त्यातील आरोग्य समजून घेणे हा असल्याने ते मी करणारच. त्याच पद्धतीने तो समजून घ्यावा लागेल. जी चुक आधीच्या पिढीने केली ती आता परत करायची नाही.
आता या टीपेमधे स्वामी समर्थांना आणि अग्निहोत्राला कशाला आणलं ? असा प्रश्न विचारू नका.
रुग्ण बदलायला तयार असतात. वैद्यांनी सांगितलेले सर्व मनापासून करतात, विश्वास ठेवून केले की परिणाम दिसतात. असा माझा अनुभव आहे. अर्थात त्या विश्वासाने वैद्यांनी पण सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यांनी आपल्यामधे सकारात्मक बदल केले पाहिजेत, असे वाटते. मी सांगतो म्हणून अजिबात नको. शास्त्रात काय सांगितले आहे, ते तरी परत एकदा अभ्यासूया.
अर्थात गरज आहे ती, आपलं चुकलंय, हे समजण्याची. आणि मान्य करायची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
03.03.2017
March 3, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 7
नंतरचा उपाय अर्घ्य.सुगंधीत पाण्याने हात धुवायला अर्घ्य वापरले जाते. पाण्यात चंदन, अक्षता, दुर्वा, इ. वस्तू घालून हे पाणी देवाला हात धुण्यासाठी दिले जाते.
काही खाण्यापिण्यापूर्वी हात पाय धुवायचे असतात, एवढे समजले तरी पुरेसे आहे. नंतरचा उपचार आचमन. ज्याविषयी आधी लिहून झालेले आहे.
स्नान आणि अभिषेक केल्याशिवाय पूर्ण शुद्धी होतच नाही. गंगा आदि सप्त नद्यांचे पवित्र पाणी आंघोळीकरीता आहे, अशी कल्पना करून आपणही स्नान करावे. स्नानाने शरीराची शुद्धी तर होतेच पण मनाची शुद्धी देखील होते. स्नान करीत असताना लक्ष स्नानाकडेच असावे, तरच स्नानाने मानसिक शुद्धी होईल.
पंचामृत स्नान, भस्म स्नान, इ. प्रकारावरील सविस्तर आरोग्यटीपा यापूर्वी आपण वाचलेल्याच असतील.
स्नान करीत असताना काही सूक्ते म्हणायला सांगितलेली आहेत. मंत्राचे विशिष्ट स्वरामधे उच्चारण केले असता, त्यातून निर्माण होणारी स्पंदने, लहरी यांनी वातावरण सात्विक बनते. घंटा, शंख इ. मुळे निर्माण केल्या नादामुळे काही जंतु मरतात, असेदेखील वाचल्याचे स्मरते. मंत्र स्वतः म्हटले तर उत्तमच, पण केवळ ऐकले तरी आरोग्याची प्राप्ती होते, असाही एक संदर्भ मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीचा मिळतो. गायत्री मंत्राच्या योग्य उच्चाराने, कॅन्सर सारख्या रोगाच्या पेशींची वाढ थांबते, असेही लक्षात येत आहे. मात्र मंत्राचे उच्चारण निर्दोष हवे, स्पष्ट हवे, जीभेला पहिल्यापासूनच तशी सवय हवी तरच ते उच्चार जमतात, नाहीतर अर्थाचे अनर्थ होऊ शकतात, म्हणूनच समाजातील काहीजणांनाच ते काम नेमून दिलेले होते. जर उच्चारात जरा चुक झाली तरी निर्माण होणाऱ्या लहरींची स्पंदने बदलतात, आणि अर्थ चुकतो. चिता आणि चिंता, खून आणि खूण, जहाज, चमचा, श आणि ष यातील उच्चारात फरक पडून चालत नाही.
काही वेळा शब्द उच्चारणाऱ्याला त्या शब्दांचा अर्थ माहिती असत नाही, पण ज्याला तो अर्थ समजला पाहिजे, त्याला जर योग्य उच्चारात एखादे वाक्य ऐकवले तर, या वाक्यातून जे समजायला हवे होते ते त्याला सहज कळते.
जसे, "आज सांच्याक तुका चाराक सावतांथुय च्यॅयक बोल्लयला आसा" हे मालवणी वाक्य, मालवणी न कळणाऱ्या माणसाला काहीच अर्थबोध घडवणार नाही. पण ज्याला अर्थ कळणार नाही त्याने, जर हे वाक्य नीट उच्चारासह पाठ केले, आणि ज्याला मालवणी भाषा समजते, त्याच्यासमोर जाऊन उच्चारले तर ? ....
........त्या मालवणी माणसाला कळेल की, " मला सायंकाळी चार वाजता सावंत यांच्याकडे चहा प्यायला बोलावले आहे."
कळले का मंत्रामधील उच्चाराचे महत्त्व ?
जे जे देवासाठी, ते ते देहासाठी.
जरा जरी फरक झाला तरी नुकसान हे ठरलेले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.06.2017
June 1, 2017
हि भाजी सर्व महाराष्ट्रभर आवडीने खातात व हि भाजी पथ्याची म्हणून देखील प्रसिद्ध आहे.ह्याचे रोप हातभर उंच असते.
हि चवीला गोड खारट व थंड असते.त्यामुळे ही शरीरातील वात व पित्त कमी करते.
आता आपण ह्याचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहूयात.
१)ताप उतरल्यावर ह्या भाजीचे सूप त्या व्यक्तीला दिल्यास त्याची भूक वाढते.
२)मुळव्याध असणार्या व्यक्तिंने हि भाजी गव्हाचे फुल्के व कारल्याच्या चटणी सह खावी त्यामुळे संडास साफ व मऊ होतो.
३)लघ्वीची जळजळ होत असल्यास धणे,जीरे घालून चाकवत भाजीचे सुप करून प्यावे.
४)कावीळ झालेल्या व्यक्तीला ही भाजी खायला देतात त्यामुळे संडास वाटे खराब व वाढलेले पित्त पडून जाते व कावीळ उतरायला मदत होते.
५)विद्यार्थी किंवा बुद्धिजीवी लोक ज्यांच्या बुद्धीवर प्रचंड ताण असतो त्यांनी लक्षात नीट रहाण्यासाठी रात्री झोपण्या आधी १/४ कप चाकवताचा ताजी रस+ १ चमचा मध हे मिश्रण १५ दिवस सलग घ्यावे फायदा होतो.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 19, 2016
आपण घेतलेल्या अन्नाला शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वरूपात बदलवणे आणि पुढे ढकलणे हे तोंडाचे काम. त्यासाठी जीभ, पडजीभ, दात, दाढा, गाल, टाळू हे अवयव मदत करीत असतात.
बत्तीस दातांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरते. सावकाश जेवा, याचा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे, "नीट चावून चावून गिळा." यासाठी दात कणखर, बळकट असणे आवश्यक आहेत.
हल्ली लहान मुलांचे दात लवकर किडतात, दोन वेळा ब्रश करूनदेखील दात किडतात, यासाठी प्लॅस्टिकच्या ब्रशऐवजी बोटांचा वापर करणे, किंवा कडूनिंबाच्या काड्यांचे टोक चावून ब्रश तयार करून वापरणे आणि टूथपेस्ट ऐवजी दंतमंजन वापरणे योग्य ठरेल. दात दोन वेळा घासले पाहिजेत. तसेच चुळादेखील नीट भरल्या पाहिजेत, म्हणजे दात लवकर किडत नाहीत. दंतमंजन गोड नको, फेस येणारे नको आणि नुसती पांढरी पावडर नको. किंचीत कडू, किंचीत तिखट किंचित तुरट असावे.
प्रत्येकाच्या दातांची ठेवण वेगळी असते. पण काम एकच असते. अन्नाचे बारीक चूर्ण करणे. वरची किंवा खालची एक दाढ जरी पडली तरी त्या दाढेखाली येणारे अन्न भरडले जात नाही आणि तो तुकडा तसाच रहातो गिळला जातो आणि अपचन सुरू होते. त्यामुळे पचनाशी दातांचा संबंध देखील असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.
किडलेल्या दात आणि दाढांवर वेळीच उपचार करून घ्यावेत. शक्यतो दात काढू नये. रूट कॅनाॅल सारखी पद्धत वापरून जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवावं. गडग्यातला एक दगड काढला तर बाजूचे दगड हलू लागतात आणि सर्व गडगा ढेपाळतो. (गडगा म्हणजे दगडाची भिंत जी, कुंपण म्हणून केली जाते.) किडलेला, हलणारा दात अथवा दाढ ही अपचनाची सुरवात असते. ती जास्तीत जास्त वाचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
त्याने जी बत्तीशी दिलीय, ते काही तरी कारण असेल म्हणूनच दिलीय ना ! त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी विशिष्ट हेतू असतो, ते ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे म्हणजे खरे शिक्षण.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.03.2017
March 21, 2017
निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार.
माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि ती पूर्ण करण्यासाठी कर्मेंद्रियाकरवी सुखाने काम करवून घेतं. त्याला जेव्हा या पूर्तीचा आनंद होतो, तेव्हा आपणाला खरे समाधान मिळते.
हो. पाणी पिण्याशीच याचा संबंध आहे. तहान हा एक वेग म्हणून आयुर्वेदात वर्णन केला आहे.
त्याला ज्याची खरज वाटते, त्या गोष्टी तो आपल्याशी आतून बोलत असतो, त्याला मी वेग असे समजतो. हे वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. त्याचा फक्त माझ्याशी आतून होत असलेला संवाद.
हा संवाद इतर कोणालाही कळत नाही.
कसा कळणार ?
मलमूत्र संवेदना, ढेकर, शिंक, अश्रू, भूक तशीच तहान लागली की नाही हे फक्त माझं मलाच कळेल ना.
आपुला संवाद आपणासी.....
अशी ही अवस्था ओळखता यायला हवी. यासाठी कधीतरी अंतर्मुख व्हायला हवं. आतमधे काय हवंय, हे बाहेरून जरा चाचपून बघायला हवं, की समजतं.
पाणी किती प्यायला हवं, कधी प्यायला हवं हे तो सांगतो, त्यासाठी तो *तृष्णा म्हणजे तहान, हे लक्षण निर्माण करतो. आपल्याला समजते, मला तहान लागली, आता पाणी प्यायला हवे, आतला आवाज ओळखून तेवढेच पाणी प्यायलो की, आणखी एक लक्षण तो निर्माण करतो, ते म्हणजे तृप्ती - समाधान.
म्हणजेच तृष्णा आणि तृप्तीच्यामध्ये तो आहे.
त्याला विसरून कसे चालेल ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
10.12.2016
December 10, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti