आयुर्वेद समजून घेताना
विशाल आयुर्वेद समजून घ्यायला, वृत्तीचा दिलदारपणा, चातकाची तहान, मनाचे मोठेपण, देवावर श्रद्धा, गुरूंवर विश्वास, भिकाऱ्याजवळचा निर्लज्जपणा आणि भावना टिपणारे तरूणीचे ह्रदय हवे. हे गुण नसल्यास ते आत्मसात करावे लागतील.तरच आयुर्वेद म्हणजे काय ते समजायला लागेल. कायद्यावर बोट ठेवून आणि महाविद्यालयात शिकून तीन तासात पेपर लिहून, पाच वर्षानी हातात उत्तीर्ण असे प्रशस्तीपत्र मिळाले तरी, आयुर्वेद समजतोच असे नाही.
अभ्यासासाठी ग्रंथकारांनी याचे तीन भाग केलेत. शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक. जसा रोग तसे त्याचे कारण. जसे कारण तसे औषधी उपाय योजना करणे, म्हणजे चिकित्सा करणे. रोग जर. शारीरिक कारणामुळे झाला असेल, तर उपाय देखील शरीरावर हवा, तिथे आश्वासन देऊन किंवा मानस चिकित्सा करून फरक पडणार नाही. जसे, पायात काटा गेलाय तर उपाय त्याच पायावर, तिथेच, करायला हवा, ज्या पायात काटा घुसलाय. इथे मंत्र म्हणून काटा बाहेर येणार नाही.
पायात काटा गेलाय असे सारखे वाटत रहाणे, तपासण्या केल्या तरी त्यात काहीही व्रण किंवा काटा न दिसणे अशा लक्षणामधे मानसोपचारच उपयोगी पडणारा असतो जो, शंका या रोगाचे समाधान करतो.
आणि सतत एकाच पायात, एकाच ठिकाणी, एकाच कारणानी, वारंवार काटा टोचणे आणि व्रण बरा न होणे, आणि याची सकृतदर्शनी कोणतेही कारणे लक्षात न येणे, यासारखी लक्षणे ही रोगाचे मुळ आत्मदोषापर्यंत नेऊन पोचवतात.
भुवया उंचावून बघण्याची गरज नाही. हो. हा आत्मदोष जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा मान्य केला आहे. आज अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या काही संघटनांच्या विरोधामुळे व्हावे तसे संशोधन या विषयावर होत नाही, ही खंत जरूर आहे. असे होऊ नये, आमचे शास्त्र लेबल बदलून, भाषा बदलून, 'त्यांना' ( म्हणजे पाश्चात्य लोकांना ) हवे तसे अर्थ काढून, आम्हालाच शिकावे लागणार आहे. वेदांचे पण तेच झाले आहे. मॅक्समुल्लरला समजलेला भारताचा इतिहास आज आम्हाला शिकावा लागत आहे. जो अतिशय चुकीचे अर्थ शिकवतो.
शुद्धिकरण मुळापासूनच भारतीय मानसिकतेचा, भावनांचा विचार करून व्हायला हवे. केवळ शब्दाला प्रतिशब्द देणे म्हणजे वेदांचे प्रतिसंस्करण नव्हे. हे आयुर्वेद शिकताना लक्षात घ्यायला हवे.
ही मानसिकता झाल्यावरच आयुर्वेदाचा श्रीगणेशा आरंभ होईल.
आयुर्वेद समजून घ्यायला ती विशिष्ट दृष्टी हवी. जसं भगवान श्रीकृष्णांचे विराट रूप बघण्यासाठी अर्जुनाची सामान्य दृष्टी बदलून, वेगळी विशाल दृष्टी होणे आवश्यक होते, तसे आहे. भगवंत गीतेमधे हेच सांगत आहेत. मोक्ष समजून घ्यायला, कर्तेपण लयाला जायला, मी कोण हे शोधताना ती वेगळी विशाल दृष्टी आवश्यक आहे.
भगवंताची कृपा झाल्यावर संजयाला आणि अर्जुनाला ती दृष्टी प्राप्त झाली. आपण सारे अर्जुन आहोत, या भावनेने जर भगवंताकडे ती दृष्टी मागितली तर तो निश्चितच ती दृष्टी देतो. फक्त भाव अर्जुनाचा हवा.
........आणि भक्तीदेखील !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.02.2017
February 13, 2017
लवण रसाचा युक्तीने वापर केला तर तो प्रिझरवेटीव्ह म्हणून वापरता येतो. म्हणून तर लोणच्यामधे मीठ जास्त घालतात.
मीठाला कधीही कीड लागत नाही. हा त्याचा एक चांगला गुण. मीठाप्रमाणेच खायचा चुना देखील कीटनाशक आहे.
मीठातील हा गुण ओळखून मासे टिकवण्यासाठी, सुकवण्यासाठी मीठाचा वापर होतो. कैरी, लिंबू मिरच्या टिकवण्यासाठी सुद्धा मीठच वापरले जाते.
कोकणात कच्च्या फणसाचे गरे मीठ लावून वाळवतात. काही ठिकाणी हे असे मीठ लावलेले कच्चे गरे नीट गुंडाळून, मातीच्या मडक्यात जमिनीत पुरूनही ठेवतात. ते कुसत नाहीत किंवा किडत नाहीत. आणि आवश्यक वाटतील तेव्हा बाहेर काढून, धुवुन भाजी करतात.
दररोज दात घासण्यासाठी लवणरस हा निषिध्द सांगितला आहे. त्याने दात जास्त क्षरण पावतात, म्हणजे झिजतात, पण युक्ती वापरली तर किडलेल्या दातांपासून मुक्ती मिळते. किडलेल्या दाढांमधे मीठाचा दाणा धरून ठेवल्यास किड मरते.
कशी ?
घरात कोबी अथवा फ्लाॅवर किंवा तत्सम भाजी आणली, तर त्यात लपलेली किड दिसत नाही. ती बाहेर यावी यासाठी सुगृहिणीला, हा फ्लाॅवर मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचा असतो, हे सांगावे लागत नाही, किंवा शिकण्यासाठी शाळेत जावे लागले नाही. फ्लाॅवर मीठाच्या पाण्यात बुडवला की लपलेली कीड आपोआप बाहेर येते, तशी दाढेत लपलेली कीडदेखील आठवड्यातून एकदा मीठाच्या पाण्याचा कवल धरला की झाले काम ! मीठाची गुळणी धरून बसणे म्हणजे कवल. ( कवल टीप यापूर्वी झाली आहे. )
म्हणजे आजच्या भाषेत मीठ जंतुनाशक झाले ना !
कोबी, पालक, पडवळ, दोडका अश्या काही भाज्यामधे मीठ नैसर्गिकरित्या जास्तच आहे. त्या शिजवताना मीठ जरा कमीच घालावे लागते. या भाज्या शिजल्यानंतर आळतात, हे सुगृहिणीला कळते.
मीठ जास्त झाले तर पोटात ढवळत रहाते. म्हणून उलटी नीट होण्यासाठी मीठाचे पाणी प्याले तर उलटी छान होते.
छान होते ? किळसवाण्या उलटीमधे छान होण्यासारखे काय आहे ? ते उलटी करणाऱ्यांना विचारावे, म्हणजे समजेल.
पोटात आतड्यांना चिकटलेला चिक्कट आम सोडवण्यासाठी हे लवणजल वापरले जाते.
ताप कमी होण्यासाठी मीठाच्या पाण्याच्या घड्या डोक्यावर ठेवतात, हा प्रथमोपचार तर सर्वांनाच माहिती आहे.
आणि कुठेतरी लचकून मुरगळून सूज आली, तर गरम पाण्यात मीठ टाकून शेक घेणे हा उपाय पण घरातील ज्येष्ठ नागरीकांना माहिती आहे. शरीरातील पाणी बाहेरून स्वतःकडे शोषून घेणे, या मीठातील गुणामुळे सूज आणि वेदना कमी करण्यासाठी मीठ बाहेरूनच वापरले जाते.
उलट्या जुलाब होत असतील तर मीठ साखर पाण्याचा जगजाहीर उपाय आहेच. पण तो आयुर्वेद मतानुसार सरसकट वापरू नये, अग्नि मंद होतो. यासाठी वैद्य मत जरूर घ्यावे.
केस गळणाऱ्या केसमधे मीठ जरा जपूनच वापरावे, नाहीतर गाॅनकेस व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
06.11.2016
November 6, 2016
जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच.
September 16, 2016
आरोग्यटीप बर्याच जणाकडे फिरते आहे, माझ्या एका **कडे तर सात आठ गटातून येते, तीपण बाकीच्यांना पुढे पाठवते. पण स्वतः न वाचताच ! कृपया असे होऊ नये. पुढे पाठवावीशी वाटली तर स्वतः वाचून नंतरच पुढे पाठवावी. नाहीतर इकडून तिकडून गेले वारे
August 19, 2016
आपले कार्य उत्तम व्हावे असे वाटत असेल तर कल्याणकारी रत्न, गुरु, माता पिता, आदि पूज्य व्यक्ती, यांना वंदन करून, तसेच तूप खाऊन बाहेर पडावे. मुद्दाम हा विषय इथे सांगण्याचे कारण आज तुपाला एवढी नावं ठेवली जातात, इथपर्यंत मजल पोचली आहे, की तुप म्हणजे जणु काही विषच म्हणे ! घोर कलियुग म्हणतात, ते हेच.
September 3, 2017
सर्वसाधारण तरूण वयाची पोटात अन्न सामावून घेण्याची क्षमता जास्तीत जास्त 350 ते 400 ग्रॅम असते. आग्रहाने जरी जेवले तरी यापेक्षा जास्त अन्न पोटात राहू शकत नाही. जर जबरदस्तीने ठूस ठूस के भरण्याचा प्रयत्न केला तर उलटी होईल, नाहीतर जुलाब.
August 13, 2016

ह्याचा १.५-४ मीटर उंचीचे काटेरी गुल्म असते.पाने बळकट व भोवऱ्याच्या आकाराची अखंड व कडेला काटे असलेली असतात.पुष्पमंजिरी ५-८ सेंमी लांब असून फूल पिवळे व मोठे असते.फळ निळ्या तांबड्या रंगाचे व बेदाण्या प्रमाणे दिसणारे असते.काष्ठ गडद पिवळ्या रंगाचे असून पाण्यात उकळल्यावर ही पिवळेपणा टिकून राहतो.
दारूहळदिचे उपयुक्तांग काण्ड,मुळ,फळ व रसांजन आहे.ह्याची चव कडू,तुरट असून ती उष्ण गुणाची व हल्की व रूक्ष असते.ह्याचे काण्ड मुळ चवीला कडू तुरट असल्याने कफ व पित्तनाशक असून फळ पित्त शामक आहे.
चला आता आपण दारूहळदीचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)दारूहळद दीपन,यकृत्तोत्तेजक व पित्तसारक असून मळ बांधून ठेवते म्हणून भुकन लागणे,आव पडणे ह्यात उपयुक्त आहे.
२)कफनाशक असल्याने दारूहळद खोकल्यात वापरतात.
३)त्वचारोग,खाज,स्त्राव कमी करायला दारूहळद लावायला व पोटात घ्यायला देतात.
४)स्त्रियांच्या अंगावर पांढरे जात असल्यास दारूहळदीचा काढा देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©Dr Swati Anvekar
January 15, 2018
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 36
नैवेद्यम् समर्पयामी - भाग दहा
नैवेद्याचे पान कसे वाढावे याचेदेखील एक शास्त्र आहे. हे नैवेद्याचे पान वाढताना मीठ वाढायचे नसते. कारण हे समुद्रातून आलेले असते. बाजारातून आलेले असते. धुतलेले नसते. जंतुसंसर्ग झालेला असतो, म्हणून कदाचित त्याचे मानाचे स्थान गेले असावे. पण समुद्री मीठाऐवजी सैंधव मीठ किंवा सेंदेलोण किंवा उपवासाचे मीठ चालते. हे मीठ खनिज प्रकारातील आणि औषधी गुणांनी भरपूर असते.
शक्यतो केळीच्या पानावर नैवेद्य वाढायचा असतो. आदर्श वाढलेले पान कसे असावे, याचे प्रात्यक्षिक म्हणजे नैवेद्याचे पान होय.
याचे वर्णन मागे एका टीपेमधे केलेले आहे.
सर्वसाधारणपणे आजच्या भाषेत ही राईसप्लेट असते. पण त्यावर वाढलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण तुलनात्मक किती असते, ते महत्त्वाचे आहे. पानाची डावी बाजू उजवी बाजू या संतुलीत असतील तर वेगळे प्रोटीन व्हिटामिन्स मोजत बसण्याची आवश्यकता नाही. लिंबामधे कितीही व्हिटामिन सी असले तरीही, नैवेद्याच्या पानावर, डाव्या बाजूला एका लिंबाच्या आठ फोडींपैकी एकच फोड घ्यायची असते. कोशिंबीरीमधे कितीही फायबर असले तरीही कोशिंबीर फक्त दोन चमचेच. दही पण चमचाभरच असते, पापड पण एकच. लोणच्याची एकच फोड. भजी दोन चिकोडी कुरडया प्रत्येकी एकेक. चटणी चमचाभर. उजवीकडे दोन मूद भात, त्यावर वरण तूप. एक मूद मसालाभात, एखादा गोड पदार्थ, आमटी, उसळ, सुकी भाजी, पुरी किंवा भाकरी,
एवढे आदर्श प्रमाण आपल्याला या नैवेद्याच्या पानातून मिळत असते. खरंतर तेवढीच गरज असते. नंतरचे असतात ते जीभेचे चोचले ! हे जास्त खाल्लेले अन्न पचविण्यासाठी जास्त हालचाली, जास्त श्रम करावे लागतात. नाहीतर हे अन्न तसेच साठून राहते आणि अंगाखांद्यावर नाचू लागते.
हा नैवेद्य सेवन करून म्हणा, आपल्या सर्व देवी देवतांची शरीरयष्टी किती आखीव रेखीव असते ना ! एकही देवता बेढब नाही. (लंबोदराचे उदर लंब आहे कारण त्याने एका दैत्याला पोटात धारण करून ठेवले आहे. मोदक खाऊन नव्हे, किंवा गणेशजी नरमांसभक्षक होते, असा विकृत विद्रोह कुणी करू नये, प्राकृत डोक्यात असं काही येणार नाही, पण आहेत काही टाळकी, त्यांच्यासाठी हा खुळासा खुलासा. )
नैवेद्य प्रोक्षण करण्यासाठी तुळशीची मंजिरी वापरतात. गायत्री मंत्र म्हणत, वाढलेल्या सर्व पानावर तुळशीच्या मंजिरीने पाणी शिंपडून घेतात. हे पान तुळशीचेच का तिथे कडूनिंब किंवा आंब्याचे पान का नाही ? यामागे देखील शास्त्र असेल, फक्त आमचा शास्त्र शोधण्याचा दृष्टीकोन प्राकृत नसल्यामुळे उलगडा होत नाही. देवाच्या षोडशोपचार पूजेमधील स्नानाचे अभिमंत्रित जल आंब्याच्या पानानी उडवले जाते. तिथे तुळस नाही वापरली जात. किंवा औषधी गुणांनी भरलेला असला तरी कडूनिंबाची पाने नाही वापरली जात. कडूनिंब गुढीच्या वेळीच गुढीला बांधावा, तिथे तुळस नाही बांधत. आंब्याची पाने तोरणासाठी, आणि विष्णुला सहस्त्र तुलसीदलेच वाहातात.
या केवळ रूढी परंपरा नाहीत, यामागे विशिष्ट ज्ञान किंवा शास्त्र आहे. आयुर्वेद हा असाच आहे. विज्ञानवादी शास्त्रोक्त !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
29.06.2017
June 29, 2017
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे पन्नास
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग आठ
जनावरांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला ग्रंथकार सांगतात. जे प्राणी शारीरिक दृष्टीने कमजोर झाले आहेत, किंवा भुकेलेले आहेत, व्यंगयुक्त आहेत, अशा प्राण्यांच्या वाटेला जाऊ नये, त्यांच्याशी सावधपणे वागावे.
ज्यांच्या पाठीवर स्वार व्हावे लागते अशा घोडा आदि पशु पासून दक्ष रहावे. विशेषतः कुत्रा, गाय, बैल, गाढव, रेडा, म्हैस या प्राण्यांशी ज्यांचा व्यवसायाने नित्य संबंध येतो, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. नाहीतर या पाळीव प्राण्यांपासून देखील आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सावध तो सुखी अशा अर्थाने हे सांगितलेलं आहे.
ज्यांच्याकडे पाळीव पशु नाहीत, त्यांनी आपल्या वाहानांच्या बाबतीत सावध रहावे. वाहानांच्या डिकीत, मडगार्डच्या आत, स्टेपनीमधे, हेड लाईटच्या मागे, सीटच्या खाली, ज्या मोकळ्या जागा असतात, किंवा काढून ठेवलेल्या पायातील बूटात देखील, सरपटणारे प्राणी आपला निवास करतात, हे आजकाल वाॅटसपवर सचित्र पहायला मिळते. काल काढून ठेवलेला शर्ट आज वापरायचा असेल तर हॅन्गरवरून काढून नीट झटकूनच घ्यावा. नाहीतर त्यामधे एखादा कोळी, मधमाशी असू शकते. रात्रौ झोपण्यापूर्वी अंथरूण झटकून घेणं, वाळलेले कपडे झटकून नंतर घड्या घालणे, बाजारातून आणलेली फ्लाॅवर सारखी भाजी नीट तपासून घेणं, अडगळीत जाताना सावधपणे जाणं, अनोळखी वस्तू हाताळताना काळजी घेणं, वर चढण्यासाठी वापरायची टेबल खुर्ची, शिडी इ. साधने वापर करण्यायोग्य आहेत का हे तपासून घेणं, इ.इ. हे सर्व आपलं आरोग्य नीट राहाण्यासाठी, वेळोवेळी अशी सावधगिरी बाळगणे आपल्याच हिताचं असतं.
समर्थ म्हणतात,
अखंड सावधान असावे,
दुश्चित्त कदापि नसावे ।
ही अखंड सावधानता आपले आयुष्य वाढवणारी असते. नेहेमीच्या व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टी मधे हे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
अपघात हे अपघातानेच होत असतात, त्यासाठीच सावध राहणे महत्त्वाचे असते. कारण वेळ आणि काळ कधी सांगून येत नसतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०८.०९.२०१७
September 8, 2017
अकरावा भाग खास
विशेष आहे अभ्यास ।
धरूनी सर्व शास्त्रास
नैसर्गिक उपवास ।।
August 11, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti