आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे.
यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हणावे, बीएस्सी करून काय होणारे, बीएस्सी करत असलेल्यांनी म्हणावे आर्टस् शिकण्याची काही आवश्यकताच नाही. हे योग्य नव्हे.
मधुमेहा सारख्या आजारात रुग्णाला नेमकेपणाने काय होते आहे, त्याला काय हवेय हे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. भविष्यात अमुक होईल म्हणून आत्ता असे वागले पाहिजे ही भीती अवाजवी आहे.
नखाला भविष्यात चुकुन होणारे नखुर्डे हे कॅन्सरमधे रूपांतरीत होऊ शकते, हो किंवा नाही. या दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायला सांगितला तर दुर्दैवाने याचे उत्तर हो असेच द्यावे लागते, असे आजचे वैद्यक शास्त्र सांगते. नियमावर बोट ठेवले तर भविष्यात होणारा नखाचा कॅन्सर टाळण्यासाठी आपण नखच काढून टाकूया, असा विचार करणे योग्य होईल का ? जे अस्तित्वातच नाही, त्याची भीती निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची ? प्रत्येकाची आळीमिळी गुपचिळी. प्रत्येकाचा बिझनेस. प्रत्येकाला स्वतःची काळजी.
रक्तातली साखर वाढली तर किडनी, डोळे इ. अवयवांवर विपरीत परिणाम होतात, असे एक वैद्यक शाखा म्हणते. अवयवांवर विपरीत परिणाम होतो तो, रक्तातली साखर वाढली म्हणून की, त्यासाठी कायमस्वरूपी घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे ते दुष्परिणाम आहेत, यावर अजूनही संशोधन सुरूच आहे. शिवाय मनात निर्माण झालेली भीती देखील हाॅर्मोन्स मधे बदल घडवित असतेच.
मधुमेहामधे रक्तातली साखर तपासणी, किंवा तत्सम रासायनिक तपासण्या करणे, हाच एकमेव योग्य निकष आहे, असे म्हणण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या वैद्यकामधे अजूनही संशोधन सुरूच आहे. त्याचे निकष अजूनही बदलत आहेत.
आणि रक्तातल्या साखरेचा निकष खरं सांगायचं तर आयुर्वेदात सांगितलेलाच नाही. त्यामुळे मधुमेहामधे रक्तातली साखर नाॅर्मल करणे हा आयुर्वेदीय चिकित्सेचा उद्देश असूच शकत नाही. हे वैद्यांच्याच अजून ध्यानात येत नाही तर सामान्य लोकांनी तशी अपेक्षा करणे चुक नव्हे.
हा विचार समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने निदान केले जाते, त्याच पद्धतीने चिकित्सा, पथ्य अपथ्य, योग, प्राणायाम यांचा विचार केला तर चिकित्सा पूर्णत्वाला जाईल. जे सिद्धांत आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, ते अन्य पॅथीमधे कसे बसवता येतील ? असे करणे म्हणजे गोल भोकात चौकोनी पाचर ठोकण्यासारखे आहे. कृपया असा विचार सुद्धा करू नये. नाहीतर जे पाहिजे ते (आरोग्य ) आपल्याला कधीही पूर्णत्वाने मिळणार नाही. आणि औषधे मात्र कायमस्वरूपी पूर्णपणे घ्यावी लागतील.
जर आपल्याला घोडा बनवायचा असेल तर त्याचे डोके, पोट, आयाळ तोंड आणि अगदी शेपूट देखील घोड्याचीच बनवली पाहिजे. तरच त्या कलाकृतीला घोडा असे म्हणता येईल. नाहीतर तोंड करायचे घोड्याचे, आयाळ करायची सिंहाची, पोट करायचे वाघाचे, आणि शेपूट लावायचे शेळीचे. कसा दिसेल हा प्राणी ? त्याला पूर्णत्व येणार नाही.
प्रत्येक शास्त्राची स्वतःची एक परिभाषा असते. त्याच परिभाषेत ते सिद्धांत समजून घ्यावे लागतात. तसे केले नाही तर आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण स्वास्थ्य कदापि मिळणार नाही.
निदान करायचे अॅलोपॅथीनुसार, तपासण्या करून घ्यायच्या रसायनशास्त्राप्रमाणे, चिकित्सा ठरवायची आयुर्वेदानुसार, पथ्य करायचे निसर्गोपचारानुसार, आणि औषध घ्यायचे होमियो पद्धतीनुसारच्या !
याशिवाय पुष्पादिदिचे सल्ले, स्वामीजीनी सांगितलेले उपाय, वाॅटसप महाराजांचे नुस्खे आहेतच.
अशा भीतीच्या पायावर उभारलेल्या विचारसरणीने रोग कसा बरा होईल ? हे रुग्णांनी लक्षात ठेवले पाहिजे.
.....आणि वैद्यांनी सुद्धा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.02.2017
February 14, 2017
घुसळण्याची' प्रक्रिया महत्वाची. दही 'घुसळण्याच्या' प्रक्रियेमधे आत तयार झालेला वायु बाहेर पडतो, नंतर त्यातील लोणी बाहेर येते.
या प्रक्रियेमधे थोड्याफार प्रमाणात अग्निचा संचार होतो. घर्षण झाले की अग्नि तयार होतो.
जसे खूप बोलल्यामुळे घसा गरम होतो, तळहात एकमेकांना घासले की हात गरम होतात, कपालभाती केली की छाती गरम होते, भ्रामरी केली की कपाळ गरम होते, खूप धावले की पाय गरम होतात, विचार खूप झाले तर डोस्कंही गरम होते, वृक्ष एकमेकांना घासले की प्रत्यक्ष वडवानलच तयार होतो. घर्षणाचा अग्निशी अगदी जवळचा संबंध असतो, हे तर आपण व्यवहारातही बघतो.
हा अग्निच रूपांतरणाची प्रक्रिया घडवण्यासाठीचे मुख्य कारण आहे. जेवढा अग्नी जास्ती, तेवढे रूपांतरण जास्ती.
रूपांतरण म्हणजे बदल. किंवा आपण असेही म्हणू शकतो, की जिथे जिथे बदल होतो तिथे तिथे अग्निचे कार्य सुरू असते. बदल म्हणजे अग्नी.
तांदुळ आणि पाणी एकत्र करून बदल होत नाही, तर त्याला योग्य अग्नी दिला तर त्याचे रूपांतर भातामधे होते, नाहीतर एकतर मऊभात अन्यथा खरपूस खमंग !
कुठेही गेलात तरी अग्नीचे कार्य लक्षात घ्यावेच लागते.
हा अग्नी प्रमेहामधे विचारात घ्यावा लागतो. क्लेद कमी करण्यामधे अग्नी महत्वाचा. म्हणजे प्रमेहाचा मुख्य शत्रु जो क्लेद, तो नष्ट करणारा अग्नी, हा प्रमेहाचा शत्रू ठरतो. प्रमेहाचा शत्रू तो आपला मित्र !
दही घुसळण्याच्या प्रक्रियेत अशीच अप्रत्यक्ष उर्जा तयार होते.
आता दही घुसळणे कसे करतो यावर त्यातील क्लेदाचे रूपांतरण होणे अवलंबून आहे. ही युक्ती आहे.
हाताने लाकडी रविने दही घुसळणे, ताकमेढीला दोरी गुंडाळून दोन्ही हाताने उलटसुलट रवि घुमवणे, आणि मिक्सरमधून दही फिरवणे, आणि चमच्याने दही ढवळणे, या कृतीवर तयार होणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता ठरत असते. चमच्याने दही कालवण्यामुळे केवळ त्यातील वायु बाहेर पडेल, त्याची वडी मोडेल, एवढेच काम होईल, पण 'क्लेद' कमी होणार नाही. क्लेद कमी होण्यासाठी आणखी उष्णतेची गरज असते.
हो. हो. हो. दही गरम करता येईल का असं अजिबात मनातही आणू नका. ओहोऽऽऽ.
दही गरम करायचे नाही. कधीही नाही. अगदी पंजाबी ग्रेव्हीमधे पण नाही.
कोणत्याही गोष्टीत इन्स्टंट, शाॅर्टकट उपयोगी नाही. ज्या गोष्टीला जेवढा वेळ जाणं अपेक्षित असते, तेवढा वेळ देणं अपेक्षितच असते. नाहीतर एक वर्षाच्या पोरग्यानं बाबांचा शर्ट घातला आणि बूटात पाय घातले तरी तो 'बाप' होत नाही ना !
तसंच दह्याचंही आहे. त्याचे रूपांतर ताकात करताना काही काळ जाणं अपेक्षित असतं. सावकाश आणि सतत घुसळणं,
हो, हातानं रवीनं घुसळणं वेगळं, रवी दोरीला बांधून घुसळणे वेगळे, मिक्सरमधून फिरवण्याची तऱ्हा वेगळीच ! आणि लस्सी करणं वेगळं. प्रत्येकावर होणारी अग्नीची प्रक्रिया वेगळी !
इथं प्रत्येकाचं वेगळेपण वेगळं....
त्याचंच नाव आयुर्वेद !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.01.2017
January 29, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 18-पुष्प सहावे
आपल्याकडे सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम असला की तोरणं बांधायची पद्धत आहे. आंब्याची पाने, नारळाच्या झावळ्या, भेडलेमाडाची कातरी पाने, केळीची झाडे, गोंड्याच्या माळा, नारळाचे तोरण, भाताच्या लोंब्या, इ.इ. नी अंगण, दरवाजे, प्रवेशद्वार सजवले जातात. याचं आयुर्वेदात काही महत्त्व असेल का ?
आंब्याच्या पानाला एवढे महत्व का दिले असेल ? दरवाज्याच्या तोरणासाठी तेच, गुढीसाठी तेच, कलशस्थापना करण्यासाठी आंब्याचा टाळ हवाच. अभिषेक करताना देखील आंब्याची पाने हवीत, हळद चढवायला देखील आंब्याचीच पाने. इतकंच काय तर विवाह होमाच्या वेळी विस्तव आणताना देखील ताज्या आंब्याच्या पानानी हा विस्तव झाकून आणला जातो.
उत्तम जंतुनाशक गुण आंब्याच्या पानात दडलेले आहेत. प्रमेहामधे आंब्याची पाने वापरली जातात. आंब्याच्या पानातून येणारा चीक आणि वास देखील औषधी आहे. म्हणून तर आंब्याच्या लोणच्यामधे देठाचा भाग असलेल्या फोडी आवर्जून घातल्या जातात. त्यातील औषधी चीक आणि वास यावा यासाठी आणि जंतुसंसर्ग न होता लोणचे वर्षभर टिकावे यासाठीच !
हे आम्रपल्लव जसे आध्यात्मिक कर्मकांडामधे आहेत, आंबा, वड, पिंपळ, पायर (म्हणजे प्लक्ष किंवा पिंपुरणी,) औदुंबर याना अध्यात्मामधे विशेष महत्व आहे, तसेच पंचपल्लव आयुर्वेदात सांगितलेले आहेत.
(आम्र जंबु कपित्थानाम् बीजपुरक बिल्वयो: ।।)
जी गोष्ट आंब्याची तीच झेंडू किंवा गोंड्याची. गुढी तोरणामधून सर्वत्र सूक्ष्मातून जंतुनाश व्हावा, साथीचे रोग येऊ नयेत यासाठी केलेल्या या आध्यात्मिक उपाययोजना तर नसतील ?
हे सामाजिक आरोग्य सांभाळण्यासाठी केले जाणारे सार्वजनिक उपचार असू शकतात का ? असा दावा नाही, पण काहीतरी तथ्य असणारच. आपण ते एकतर डोळस बुद्धीने म्हणजे ज्ञानयोग वापरून, किंवा सांगितलेले कर्म, रूढी परंपरा म्हणून करत रहावे, म्हणजे कर्ममार्गी व्हावे किंवा विकल्प मनात न आणता साध्या सोप्या भक्ती मार्गाने जावे. पण काहीच करणार नाही, आणि फक्त विरोधाला विरोध करीत रहायचे असे मात्र नको.
गुढी उभारली जाते. सगळ्यांकडे एकाच वेळी एकाच पद्धतीने उभारली जाते. एकाच पद्धतीने गोंड्याची माळ, आंब्याची कडूलिंबाची पाने, तांब्याचा कलश, दरवर्षी ओला नवीन बांबू, दरवाज्यामधे स्थापना, कढीलिंबाची चटणी खाऊन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरवात करायची. हे सर्व का केले जाते ? केवळ भक्ती ? केवळ धर्म ? केवळ कर्मकांड ? केवळ रूढी परंपरा ? केवळ वार्षिक उत्सव ? केवळ दिखावा ?
नक्कीच नाही. नीट डोळे उघडून पाहिले तर त्यात दडलेले सार्वजनिक आरोग्य दिसेल.
सहस्त्र तुलसीदले, सहस्त्र दुर्वा, सहस्त्र बेल सहस्त्र नामानी कशासाठी वाहिले जातात ? एकीकडे सांगायचे सगळे देव एकच आहेत. कोणत्याही देवाला हाक मारा, ती एकाच ईश्वरापर्यंत पोचते, मग हजारदा त्याचेच नाव का उच्चारायचे ? एकदा हाक मारून पुरणार नाही का ? असे असंख्य प्रश्न आज केवळ अज्ञानामुळे अनुत्तरीत रहातात आणि धर्माकडे पहाण्याचा दृष्टीकोन विकृत होऊ लागतो.
काही ना काही निमित्त करून ही कर्म कांडे पुनरावृत्त करण्यामागे "बूस्टर डोस" देण्यासारखा हेतू तर नसेल ?
या सर्व कर्मकांडामागे लपलेले आरोग्य शोधायचे कुणी ? निदान विचार तरी सुरू करूया.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.06.2017
June 11, 2017
नमस्कार करताना आणखी एक उपचार केला जातो, तो म्हणजे प्रदक्षिणा. नामस्मरण करीत देवाला, गाभाऱ्याला, किंवा संपूर्ण देवळाला प्रदक्षिणा घातल्या जातात. या प्रदक्षिणा केंद्रानुवर्ती असतात. म्हणजे देवाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती फिरायचे. काय असेल याचा उद्देश? केवळ पुण्यप्राप्ती ? चालणं आणि प्रदक्षिणा मारणं यात फरक आहे !
July 17, 2017
दिवस हा देवांचा आणि रात्र ही राक्षसांची, जंतुंची... सर्व शुभकार्ये दिवसा आणि सर्व निषिध्द कामे रात्रीची. कारण ?
..... त्यांचा रात्रीस खेळ चाले...
काही भारतीय धारणा अश्या आहेत, ज्याचा पुरावा दाखवता येत नाही. पण त्यांचे अस्तित्त्व भारतीय संस्कृतीला मान्य आहे. आता "अणु" कुठे दाखवता येतो ? ती धारणा आहे. दाखवता येणार नाही. गृहीत धरून विज्ञानातला अख्खा परमाणुवाद त्यावर सिद्ध झालाय. केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा यावर संशोधन सुरू आहे. गाॅडस पार्टीकल ही त्यातूनच जन्माला आलेली संकल्पना होती. विज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी सिद्ध करायच्या आहेत, त्यातीलच एक म्हणजे रात्रीस खेळ चाले.
अदृश्य शक्तींचे प्राबल्य सूर्यास्तानंतर वाढते. सूर्यास्त झाल्यावरच वनस्पती आपले श्वसन बदलवतात.
सूर्यास्तानंतरच पक्षी आपले खानपान थांबवतात.
सर्व प्रकारची शुभकार्ये सूर्यास्तानंतर वर्ज्य सांगितलेली आहेत. ही अंधश्रद्धा नाही. ही धारणा आहे. म्हणून लग्न, मुंज, बारसे, वास्तुशांत, होम, या सारख्या कर्मकांडापासून अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या अग्नियानाच्या प्रक्षेपणाची वेळ देखील सूर्यावर अवलंबून आहे. याला मुहुर्त असा शब्द आहे. पण या शब्दाची सुद्धा काहीजणांना अॅलर्जी आहे. भारतीय परंपरांना छेद देणारी विधान करणं म्हणजे बुद्धीवाद असे काहीजणांना वाटते, म्हणून फक्त सांगितले. असो.
तर रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यावर, तापमानात घट झाल्यावर, दमट वातावरणात, जंतुंचे प्राबल्य जास्ती असते. जे आपल्या स्थूल डोळ्यांना दिसू शकत नाहीत, असे अतिसूक्ष्म जंतु सूर्यास्तानंतर वाढतात. आपण प्रत्येक वेळी सूक्ष्मदर्शी यंत्र घेऊन जंतुंना शोधू शकत तर नाही ना. पण त्यांच्या उत्पत्तीच्या विशिष्ट जागा असतात. जंतुंची वाढ होण्यासाठी विशिष्ट तापमान लागते, विशिष्ट जंतुंना विशिष्ट जागा आणि विशिष्ट हवामानच लागते. हे सर्व वैज्ञानिक सिद्धांत भारतीय संस्कृतीला मान्यच आहेत, किंबहुना भारत हीच या विचारांची जन्मभूमी आहे. म्हणून तर आपल्याकडे शौच अशौच सिद्धांत सांगितला गेलाय.
घरामधल्या कोणत्याही खोलीपेक्षा संडासमधे अनेक प्रकारचे जंतु असतात, वाढतात, हे ओळखूनच मलविसर्जन घरापासून लांब, बाहेर करावे. मल विसर्जन करताना उकीडवे बसावे म्हणजे जंतुसंसर्ग कमी होतो. मलविसर्जन झाल्यानंतर केवळ मलद्वार आणि डावा हातच नाहीत तर दोन्ही पाय, चेहेरा, डोळे सुद्धा पाण्याने धुवावेत, त्यासाठीचे पाणी अगोदरच काढून तयार ठेवावे, ही शुद्धीकरणाची, अंगावरील जंतुसंसर्ग घालवण्याची शास्त्रीय पद्धत नव्हती काय ? पण आज छोट्या मोठ्या शहरात अॅडजेस्ट म्हणून संडास घरातच बांधले जातात, ( पूर्वी घरात खायचे आणि मागे परसाकडे जायचे, आता बाहेर खायचे आणि घरामध्ये येऊन मलविसर्जन करायचे. सुधारणा आणि विकास.)
मलविसर्जन करायला पुनः त्या भांड्यावरच फतकल मारून बसतात, कमोडवर सर्वात जास्त जंतु असतात, हे विज्ञानाने वारंवार सांगून देखील काटकोनात बसून मलविसर्जन. नंतर पाणी सुद्धा वापरत नाहीत. (काही ठिकाणी तर हात धुवायला सुद्धा !!) काहीजणांनी त्यातूनही पळवाट शोधत, आम्ही स्वच्छता करायला डावा हात सुद्धा घाण करत नाही, म्हणून भांड्यालाच जेट स्प्रे बसवलेले असतात.
संडासमधेच ब्रश देखील करतात, तिथेच वर्तमानपत्र, पुस्तक देखील वाचतात.... तिथला सगळा जंतुसंसर्ग परत सर्व घरात आणतोय ? याकडे या बुद्धीवादी वैज्ञानिक लोकांचे लक्ष जात नाही काय ?
पण कसं आहे, ते जे जे करतात, त्यावर काहीही विचार न करता, अनुकरण केले तरी चालते. असं लिहिलं तरी आम्ही (संस्कृतीरक्षक) पुराणमतवादी ठरतो. आहोतच. त्याचा राग न येता, उलट ते भूषणच वाटते.
या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
असो.
कोणतीही शुभकार्ये करताना पंचांगानुसार अग्निचे स्थान बघून केली जातात. तिथी, नक्षत्र, दिन, रास हे सर्व सूर्याच्या उदयानुसार बदलते. एवढे अनन्य साधारण महत्त्व सूर्याला असताना, केवळ वेळ होत नाही, सवडच नाही असल्या फुसक्या कारणांसाठी.....
...........जाणिजे यज्ञकर्म....... एवढे महत्त्वाचे कर्मकांड सूर्यास्त झाल्यावर करायचे ?
आता याला काय म्हणावे ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.03.2017
March 15, 2017
।।गणधिपाय नम: भृंगराजपत्रं समर्पयामि।।
भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का!हा माका आहे माका. ह्याचे बहुवर्षायू अर्थात बरीच वर्षे जाणारे क्षुप असते.
औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो.
आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात :
जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो.
केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.
केस व हाडांचा आयुर्वेदा मध्ये जवळचा संबंध आहे. केस हा अस्थिधातूचा मल मानला जातो. त्यामुळे जर माका केस बळकट करतो तर त्याचे कार्य हे आपल्या हाडांची बळकटी करायला देखील होणारच ना!
माका हा यकृत, प्लिहा ह्या अवयवांचे कार्य सुधारतो त्यामुळे रक्ताची कमतरता, भुक न लागणे, अजीर्ण, ह्यात ह्याचा चांगला उपयोग होतो.
त्वचा रोगात ज्या मध्ये स्त्राव येतो जसे गजकर्ण, इसब, ह्यात देखील ह्याच्या सेवनाने लाभ होतो.
ज्यांची दृष्टी क्षीण आहे त्यांनी ह्याचे नियमीत सेवन केल्यास दृष्टी सुधारते. त्यामुळेच ह्याला नेत्र्य असे म्हटले आहे.
माक्याचे बीज हे वाजीकर आहे अर्थात कामशक्ती वाढविते.
असा हा माका आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९६०६९९७०४
August 4, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्व-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 10
वस्त्र अर्पण केल्यावर यज्ञोपवित किंवा उपवस्त्र घालावे. यज्ञोपवित म्हणजे जानवे . आणि उपवस्त्र म्हणजे मुख्य वस्त्राला पूरक असलेले. सर्वसाधारणपणे खांद्यावरून खाली येणारे उपवस्त्र मानावे. जसे शाल, उपरणे, ओढणी, पदर ज्याने शरीराचा वरील भाग झाकला जाईल. वपु म्हणतात, त्याप्रमाणे बाईला साडी जेवढी भरजरी घ्यावी, तेवढा ब्लाऊजपीस हलक्या प्रतीचा घ्यावा, म्हणजे तो झाकण्यासाठी तरी खांद्यावरून अंगभरून पदर घेतला जातो.
देव देवतांना या वस्त्रांची गरजच काय , या तर निर्जीव मुर्ती ! यांना हे सर्व उपचार कशाला ? हीच तर खरी मेख आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हेच तर शिकायचं आहे.
वस्त्रांबरोबर वेगवेगळे अलंकारदेखील घातले जातात. आता देवताना अलंकार प्रत्यक्ष घालण्याऐवजी अक्षताम् समर्पयामी... असे म्हणून खरंतर भागवलं जातं. पण देहासाठी भागवाभागवी नाही. खरं अलंकार घातले पाहिजेत.
सोने, चांदी, तांबे, पंचधातु इ. तसेच मोती, हिरा, प्रवाळ, पाचू, माणिक इ. रत्ने तसेच काच, स्फटीक यापासून बनविलेले दागिने परिधान करावेत. अंगठी, वाकी, कंठहार, बांगड्या, पाटल्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बिलवर, नथ इ. सर्व अलंकार जसे स्त्रिया परिधान करतात, तसे पुरूष देखील गळ्यात वैजयंती किंवा मोत्याच्या माळा, छातीवर कवच, कानात कुंडले, हातामधे कडी, डोक्यावर मुकुट, असे अलंकार धारण करत असत.
या रत्नांचा शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. सूर्य चंद्र अनेक ग्रह यांच्यापासून येणारे किरण या रत्नांवर पडून त्वचेला स्पर्श केल्यावर रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो. म्हणून हातातील प्रत्येक बोटामधे वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या घालत असतात. प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट रत्नांशी संबंध सांगितलेला आहे. तसेच विशिष्ट रत्नांचा शरीरातील वात पित्त कफ या तीन दोषांवर आणि सातही धातुंवर सूक्ष्म परिणाम होत असतो.
आजकाल तरूणांच्या हातात प्लॅस्टिकच्या बांगड्या, रबराची कडी, फ्रेंडशिपचे बेल्ट दिसतात, ज्याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्ती होताना दिसतात.
मला वाटलं म्हणून, मला आवडलं म्हणून, मी हे रत्न हातात घातले, असे करू नये. ग्रहशास्त्रानुसार जे योग्य असेल ते, त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावेत. नाहीतर त्रासही होऊ शकतो.
ज्याला इफेक्ट आहे, त्याला साईड इफेक्ट असणारच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.06.2017
June 4, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4
कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प "आत" कळतो आणि तशी तयारी सुरू होते.
देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.
सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
देव अशानी पावायचा नाऽही रं
देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !
देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे "अतिथी" म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे "युजर्स फ्रेंडली" होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.
अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.
श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.
पूजा करण्याच्या निमित्ताने,
"हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !"
असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन "तो" येईल.
माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.05.2017
May 29, 2017
काही वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या “मेडिकल इमेजिंग” या मराठी पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला. या विषयावरील ते पहिलेच मराठी पुस्तक होते. मात्र छापील पुस्तकाच्या मर्यादांपासुन दुर होउन जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी या पुस्तकाला लेखमालेच्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इंटरनेटचा मोठा उपयोग होईल हे पटल्यामुळे ही लेखमाला सुरु करत आहे. “मराठीसृष्टी”सारख्या लोकप्रिय पोर्टलवरुन या लेखमालेतील लेख इंटरनेटशी जोडलेल्या हजारो मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यास उपयोग होणार आहे.
August 24, 2010
काळ बदलला. तश्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. नियमाला अपवाद असलेल्यांची संख्या पण वाढू लागली.
जंगली कुत्रे फक्त मांसाहारी होते, पण कुत्र्यांना माणसाने पाळण्यास सुरवात केली आणि कुत्रा भाकरी पोळी दूध भात खाऊ लागला. मांजर पण तसेच. लहानपणापासून आयते अन्न खायची सवय लावल्याने ते हा आहार निमूटपणे घेतात, एवढेच ! याऊलट पाळलेली शेळी किंवा गाय कितीही ऊपाशी ठेवली तरी मांसाहारी पदार्थांकडे ढुंकूनही पाहत नाही. आणि सर्कशीतल्या पाळलेल्या वाघ सिंहाला कितीही उपाशी ठेवा, ते गवताला तोंडही लावणार नाहीत.
जे फक्त शाकाहारी होते ते पाणघोडेदेखील मांसाहार करू लागले आहेत म्हणे. कदाचित त्यांचे नैसर्गिक अधिवासातील अन्न संपल्यामुळे काही माकडेसुद्धा मांसाहारी बनू लागली आहेत.
पण शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमधेच निसर्गदत्त मूलभूत फरक असतो असे लक्षात येते.
शाकाहारी प्राणी स्वभावतः शांत असतात. त्यांच्या जवळ जावे, अंगावरून हात फिरवावा, असे वाटते. अगदीच माजावर आलेला बैल किंवा हत्ती सोडला तर इतर प्राण्यांची भीती वाटत नाही.
जन्म घेतल्यावर लगेचच या शाकाहारी मंडळीचे डोळे उघडलेले असतात. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे अकरा दिवसांची वाट पहावी लागत नाही. गाईचे पाडस असो, किंवा हरणाचे, जन्मल्यानंतर लगेच अकरा सेकंदात डोळे ऊघडून या नव्या जगाकडे बघू लागतात.
कुतुहल असते, नव्या दुनियेचे आणि भीती देखील पुनः मृत्युची. आधीचा मृत्यु आठवत असतो. जन्म आणि मृत्यु च्या या फेऱ्यातून मुक्त होण्याची धडपड अव्याहतपणे चालू असते. आधीच्या जन्मातला, जगण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक संस्कार, इथे लक्षात ठेवला जातो. आचरणात आणला जातो. मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी !
मातेच्या स्तनात पय निर्माण "तो" करतो. आणि त्या पयापर्यंत कसे पोचायचे हे सुद्धा तोच शिकवतो. नुसते पोचणेच नाही तर स्तनापर्यत पोचल्यावर दूध कसे आचूषण करायचे आणि कसे गिळायचे, हे आई शिकवत नाही. ते जन्माआधीपासूनच शिकलेले असते. दूध कसे आणि कुठुन मिळवायचे, हा आधीच्या जन्मी झालेला संस्कार या जन्मातदेखील लक्षात राहील्यामुळे पोट कसे आणि कुठुन भरायचे याची आठवण ठेवलेली असते.
जगण्यासाठी, भूक भागवण्यासाठी खायचे प्यायचे असते, ही आठवण जर त्याने ठेवलीच नसती तर काय झाले असते ?
जगणेच संपले असते.
जगणे आहे म्हणजे निदान गिळले तर पाहिजे ही भावना जन्मापासूनच जागृत असते, ती अगदी मृत्युपर्यंत.....
पुढच्या जन्मात लक्षात ठेवण्यासाठी !
अनंताच्या प्रवासातील, अनंत आठवणींचा ठेवा फक्त आपल्यासाठी !!
"HE" is simply great !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
29.09.2016
September 29, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti