बाळक्रीडा अभंग क्र.१९

बाळक्रीडा अभंग क्र.१९

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.



जियेवेळीं चोरूनियां नेली वत्से । तयालागी तैसें होणें लागे ॥१॥
लागे दोहों ठायी करावे पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥
माय जाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरी वत्से जीची तैसा झाला ॥३॥
झाला तैसा जैसे घरिचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पावे ॥४॥
मोहरी पावे सिंगे वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रम्हादिकी ॥५॥
ब्रम्हादिका सुख स्वप्‍नी तेंही नाही । तैसे दोही ठायी वोसंडले ॥६॥
वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आई तैसा जाला ॥७॥
लाघव कळले ब्रम्हयासी याचे । परब्रम्ह साचे अवतरले ॥८॥
तरले हे जन सकळ ही आता । ऐसे तो विधाता बोलियेला ॥९॥
लागला हे स्तुती करू अनंताची । चतुर्मुखें वाची भक्ती स्तोत्रे ॥१०॥
भक्तिकाजे देवे केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥
पृथिवी दाटीली होती या असुरी । न साहावे वरी भार तये ॥१२॥
तया काकुलती आपल्या दासांची । तयालागी वेची सर्वस्व ही ॥१३॥
स्वहित दासांचे करावया लागी । अव्यक्त हे जगी व्यक्ती आले ॥१४॥
लेखा कोण करी याचिया पुण्याचा । जया सवे वाचा बोले हरि ॥१५॥
हरि नाममात्रे पातकांच्या राशी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥
गौळिये अवघी जाली कृष्णमय । नामे लोकत्रय तरतील ॥१७॥
तरतील नामे कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशी होइल पाप ॥१८॥
पाप ऐसे नाही कृष्णनामे राहे । धन्य तो चि पाहे कृष्णमुख ॥१९॥
मुख माझे काय जो मी वर्णू पार । मग नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥
ब्रम्हा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हा चि देव ॥२१॥
देव चि अवघा जालासे सकळ । गाई हा गोपाळ वत्से तेथे ॥२२॥
तेथे पाहाणे जे आणीक दुसरे । मूर्ख त्या अंतरे दुजा नाही ॥२३॥
दुजा भाव तुका म्हणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

Author