मनोरथ जैसे गोकुळींच्या जना | पुरवावी वासना तयापरी ||१||
रिण फेडावया अवतार केला | अविनाश आला आकारासी ||२||
शीण झाला वासुदेवदेवकीस | वधी बाळे कंस दुराचारी ||३||
दुराचारीयांसी नाही भूतदया | आप पर तया पाप पुण्य ||४||
पुण्यकाळ त्यांचा राहिलासे उभा | देवकीच्या गर्भा देव आले ||५||
गर्भासी तयांच्या आले नारायण | तुटलीं बंधने आपोआप ||६||
आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा | बंदाच्या आर्गळा कुलुपें कोंडे ||७||
कोंडमारा केला होता बहु दिस | सोडवी निमिष न लागतां ||८||
न कळे तो तया सांगितला भाव | आपणासी ठाव नंदाघरी ||९||
नंदाघरी जातां येतां वसुदेवा | नाहीं झाला गोवा सवें देव ||१०||
सवें देव तया आड नये काही | तुका म्हणे नाहीं भय चिंता ||११||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
बाळक्रीडा अभंग क्र.२
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.