शिळा स्फटिकची न पालटे भेदें । दाउनिया छंदे जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी माय बाप ॥३॥
मायबापा सोडविले बंदीहुनी । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥
आधिक नाही देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥
मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठें राहे हरि आठविता । भक्ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशी पूर्वील कर्माच्या । बांधला सेवेच्या ऋणी देव ॥८॥
देव भोळा धांवे भक्ता पाठोवाटी । उच्चारितां कंठी मागेमागें ॥९॥
मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धावे तो घरासीं भाविकांच्या ॥१०॥
बाळक्रीडा अभंग क्र.५
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.