मनें हरिरूपी गुंतल्या वासना । उदास त्या सुना गौळियांच्या ॥१॥
त्यांच्या भ्रतारांची धरूनिया रूपे । त्यांच्या घरी त्यापें भोग करी ॥२॥
करी कवतुक त्यांचे तयापरी । एका दिसे हरि एका लेंक ॥३॥
एक भाव नाही सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीती तैसे रूप ॥४॥
रूप याचे आहे अवघेचि एक । परि कवतुक दाखविले ॥५॥
लेकरू न कळे स्थूळ की लहान । खेळे नारायण कवतुके ॥६॥
कवतुक केले सोंग बहु रूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
बाळक्रीडा अभंग क्र.११
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.