चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले संस्कार, चांगलं वळण हे विद्यार्थ्यांचं पुढील आयुष्य मनोहर करतं. केवळ भौतिक बाबतीत मनोहर नको, तर मानसिकतेतही मनोहर हवं. नाती जपणं ही मनोहरी अवस्था आहे. नाती दुरावली की मन उदास होतं. आपली मुलं परदेशात पैसा कमविण्यासाठी जातात हे मनोहर चित्र असलं तरीही पालकांना आपल्यापासून मुलं दुरावल्याची जाणीव उदास करते.
‘आहे मनोहर तरी गमते उदास’ ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनात येते. उदास वाटले की, आठवणीच्या प्रदेशात स्वैर भटकंती करावी पाखरांसारखी. आपल्याला भेटलेली माणसे आपल्या मनावर ठसा उमटवतात. कुणाचा तरी ठसा आपल्या मनावर उमटणं म्हणजे ते आपलं संचित असतं. भवतालच्या मनोहर गोष्टीमुळेच आपण घडतो व भवतालच्या काही गोष्टीमुळेच आपल्याला उदास वाटतं. भवताल मनोहर होण्यासाठी माणसे अविरत धडपडतात; पण स्वतःलाच विसरतात. कुटुंबाचं वैभव वाढविण्यासाठी माणसं झटतात व आपल्याच माणसांना वेळ देत नाहीत. मुलांना आई-वडील हवे असतात, त्यांचा वेळ हवा असतो, त्यांचा सहवास हवा असतो. आई-वडील व नाती नसण्याची निर्वात पोकळी मुलांना असह्य होते. सजीवांचा गोतावळा सभोवताली असणं हेच मुलांसाठी मनोहर असतं. कुटुंबातील नातीगोती यांची जागा निर्जीव खेळ पूर्ण करू शकत नाही व शेवटी येतं ते उदासपण. आजची घरे भौतिक वस्तुंनी भरलेली आहेत. घरात औषधालाही नातं व नातेवाईक नसतात. बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी घरात माणसेच नसतील तर उदासपण येतं, कसं वाटणार मनोहर?
प्रत्येक माणसाचे बहराचे क्षण वेगळे आहेत, सुखाचे क्षण वेगळे आहेत, एखाद्याचं भेटणं मनोहरी असतं, एखाद्याचं भेटणं उदास करतं. आठवणींचा लेप आपण चेहऱ्यावर जसा लेपतो तसं रूप चेहरा धारण करतो. सुखद आठवणीने चेहरा उजळतो व दुःखद आठवणीने चेहरा उदास भासतो.
चेहऱ्यावर मुखवटे चढवणं आपल्याच हातात असतं. आपण चेहऱ्यावर मुखवटे चढवायचे ते आपल्याच आनंदासाठी दुसऱ्याला फसवण्यासाठी नव्हे.
सूर्योदय रोजच होतो, सूर्यास्तही रोजच होतो. विचारही रोज येतात आणि अस्तंगत होतात, या सातत्यांनी चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. त्या त्या क्षणाला त्या त्या क्षणाचं प्राबल्य असतं.
क्षण हे मनावर राज्य करतात. क्षणांना जगता आलं पाहिजे, क्षणांना जपलं पाहिजे, क्षणावर प्रेम करता आलं पाहिजे. क्षण दवबिंदूसारखे असतात. क्षणांशी झिम्मा खेळताना आनंद घ्यायचा असतो. क्षणांना जिंकणारेच जीवन जिंकतात. क्षणांना शरण जाणारे आयुष्य संपवतात. जीवन आहे तोपर्यंत विचार असतातच. मृत्यूबरोबर विचारांची मालिका खुंटते, विचार संपतात; पण आधीचे विचार सुरक्षित असतात. व्यक्तीचे विचार ही मुदतीची ठेव असते. विचारांच्या व्याजावरच माणसे जगतात. विचारांचं संचित सगळ्यांनाच मिळत नाही. चांगले विचार पिढ्यान्पिढ्या राज्य करतात.
विचार इतके स्फोटक असतात की, विचार माणसे मारतात. काही विचार इतके प्रेमळ असतात, इतके प्रगल्भ असतात की, माणसे कोमेजलेली असली तरीही फुलतात. सगळा इतिहास विचारांचाच आहे.
चांगले विचार लोहचुंबकाचं काम करतो. तो माणसाला आकृष्ट करतो. विचारांचा पगडा फार जबरदस्त असतो. एखाद्या विचाराच्या अधिपत्याखाली जगणं माणसं आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतात. विचारासाठी माणसे जीव देतात, माणसे जीव घेतात.
इतिहास न वाचता, नको ते विचार बोलून प्रसिद्धीच्या झोतात असलेली माणसंही स्वतःचं अस्तित्व हरवून बसतात, स्वतःला हास्यास्पद करून बसतात. जीवन जगण्यासाठी व स्वतःची जीवनशैली बदलण्यासाठी कोणाची तरी प्रेरणा व साथ हवी असते. माणसे कोठेतरी नतमस्तक होण्यासाठी पाय शोधत असतात. जीवन मनोहरी होण्यासाठी जाणिवा प्रगल्भ व समृद्ध हव्यात. यश, पैसा यांच्यामागे न लागता समाधानाचं बोट धरलं की, उदासपण मागे पडतं. समाधानी वृत्ती बाळगली की सर्व भवताल मनोहर वाटायला लागतं.
‘घरात असता तारे मी पाहून कशाला नभाकडे’ ही अवस्था घराघरांतून दिसायला हवी. मनाची समृद्धी असली की सर्वच मनोहर भासायला लागतं. मनोहर वाटणं आणि उदास वाटणं हे आपल्या मनावरच अवलंबून असतं. ज्याचं त्याचं मन हे शेवटी त्याच्याच हातात असतं. अशा ठिकाणी मन गुंतवावं जिथे मनोहर वाटेल; पण उदास वाटणार नाही.
