भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भय पोंटी ||१||
पोटी होतें मागें जीव द्यावा ऐसे । बोलिल्या सरिसें न करवे ||२||
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ||३||
अंतरला बहू बोलतां वाउगें । अंतरिच्या त्यागेंविण गोष्टी ||४||
गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोणा भावें रडती तीं ||५||
तीं गेली घरासी आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ||६||
मायबापांची तों ऐसी झाली गति । तुका म्हणे अंती कळो आलें ||७||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
बाळक्रीडा अभंग क्र.४०
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.