काय आम्हां चाळविसी वायाविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥
लावूनिया डोळे नव्हतो दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥
होती दृष्टि आत उघडी आमची । बाहेरी ते वाया चि कुंची झाकू ॥३॥
जालासि थोरला थोरल्या तोडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥
आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदे नाचती भोवताली ॥५॥
भोवती आपणा मेळविली देवे । तुका म्हणे ठावे नाही ज्ञान ॥६॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
बाळक्रीडा अभंग क्र.३०
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.