बाळक्रीडा अभंग क्र.४

बाळक्रीडा अभंग क्र.४

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.



त्यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिहीं तो मुरारी खेळविला ॥१॥
खेळविला जिही अंतर्बाहयसुखे । मेळवूनि मुखे चुंबन दिले ॥२॥
दिले त्यासी सुख अंतरीचे देवे । जिही एका भावे जाणितला ॥३॥
जाणितला तिही कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचे ॥४॥
ज्यांचें कृष्णी तन मन झालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥
विष तयां झालें धन मान जन । वसविती वन एकांती त्या ॥६॥
एकांती त्या जाती हरिसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥
वयाच्या संपन्ना तैसा त्या कारणे । अंतरीचा देणें इच्छाभोग ॥८॥
भोग त्याग नाही दोन्ही तयापासीं । तुका म्हणे जैसी स्फटिकशिळा ॥९॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

Author