देवा आदिदेवा जगत्रयजीवा | परियेसी केशवा विनंती माझी ||१||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||
कळा तुजपाशी आमुचें जीवन | उचित करून देईं आम्हां ||३||
आम्हां शरणागता तुझाचि आधार | तू तंव सागर कृपासिंधु ||४||
सिंधू पायवाट होय तुझ्या नामें | जळतील कर्में दुस्तरें तीं ||५||
तें फळ उत्तम तुझा निजध्यास | नाहीं गर्भवास सेविलिया ||६||
सेविलिया राम कृष्ण नारायण | नाहीं त्या बंधन संसाराचें ||७||
संसार तो काय तृणवतमय | अग्नि त्यासी खाय क्षणमात्रे ||८||
क्षणमात्रे जाळी दोषांचीया राशी | निंद्य उत्तमासी वंद्य करी ||९||
करी ब्रीद साचें आपलें आपण | पतितपावन दीनानाथा ||१०||
नाथ अनाथांचा पती गोपिकांचा | पुरवी चित्तींचा मनोरथ ||११||
चित्तीं जे धरावे तुका म्हणे दासीं | पुरविता होशी मनोरथ ||१२||
बाळक्रीडा अभंग क्र.१
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.