पुस्तकांच्या पलीकडील गृहपाठ

गृहपाठाची संकल्पना व व्याप्तीला नव्याने सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. कल्पकतेला वाव देणारे गृहपाठ हवेत. गृहपाठ यांत्रिक क्रिया नको. पारंपरिक गृहपाठाला छेद देऊन गृहपाठाची व्याप्ती शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मताने व्हॉट्सअपच्या माध्यमातून आदानप्रदान करावी व गृहपाठाची क्वेश्चन बँक अमुक एका कालावधीत सर्वांच्या सूचना मागून वर्गनिहाय गृहपाठ कसे असावेत हे ठरवावे.



गृहपाठाची संकल्पना व व्याप्तीला नव्याने सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. कल्पकतेला वाव देणारे गृहपाठ हवेत. गृहपाठ यांत्रिक क्रिया नको. पारंपरिक गृहपाठाला छेद देऊन गृहपाठाची व्याप्ती शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मताने व्हॉट्सअपच्या माध्यमातून आदानप्रदान करावी व गृहपाठाची क्वेश्चन बँक अमुक एका कालावधीत सर्वांच्या सूचना मागून वर्गनिहाय गृहपाठ कसे असावेत हे ठरवावे.

‘एकदा काय झालं’ चित्रपटात लहान मुलांना रोल प्ले मेथडच्या माध्यमातून शिक्षण कसे परिणामकारक होते हे दाखवले आहे. गोष्टीच्या माध्यमातून केलेले अध्यापन मुलांच्या कसे लक्षात राहाते हे दाखविले आहे. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी गृहपाठाचा सहसंबंध जोडता आला पाहिजे. गृहपाठ वेगळा नाही तो अभ्यासाचाच भाग आहे. शिकविलेला अभ्यास समजावा व त्याचे चिंतन, मनन व्हावे म्हणून तो दिलेला असतो. तसेच व्यवहारात गृहपाठाचे उपयोजन करण्यासाठीसुद्धा व्यवहारातील उदाहरणे पुस्तकाशिवायची देणे आवश्यक ठरते. पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम हे मार्गदर्शक म्हणून आवश्यक आहेतच, पण त्याच्याहीबाहेर खूप काही, मुलं शिकतात, तो गृहपाठच गृहीत धरायला हवा. गृहपाठात कोणकोणत्या बाबी अंतर्भूत करता येतील. पुस्तकाव्यतिरिक्त याचा विचार शिक्षक, पालक यांनी करायला हवा. एकंदर शिक्षणतज्ज्ञांचा सूर असा आहे की गृहपाठ बंद न करता, गृहपाठाची पुनर्रचना करण्यात यावी. जेणेकरून तो आनंददायी होईल. मुळात गृहपाठाची संकल्पना बदलायला हवी. पारंपरिक गृहपाठात वर्गपाठातलंच कार्य पुन्हा घरी सांगण्यात येतं व ते पक्व व्हावं, विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावं, हा त्याच्या मागचा उद्देश असतो.

प्रत्येक क्षणाला मूल शिकतं आणि मूल स्वतःहून बऱ्याच गोष्टी निरीक्षणातून, अनुकरणातून शिकतं.

सध्याच्या गृहपाठाची स्थिती म्हणजे पाट्या टाकण्यासारखं झालं आहे. शिक्षक तो देतात. कारण आदेश व परिपत्रक या चौकटीतच त्यांना काम करावं लागतं आणि विद्यार्थी ते निमूटपणाने स्वतः किंवा पालकाकडून सादर करतात, हे चित्र बदलायला हवे.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात मुलांनी खरंतर गृहपाठच केला. त्याच्या माध्यमातूनच त्यांनी जे काही शिक्षण मिळवलं, त्याचं आकलन केलं व त्याचा दैनंदिन जीवनात वापर केला, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. मुलांनी हळूहळू एखादी गोष्ट सातत्याने केली तर त्यातील कौशल्य ते प्राप्त करू शकतात. पण त्या गोष्टीचा सराव त्यांना होण्यासाठी वेळ हवा. आपण मुलाला निरीक्षणाच्या संधीच देत नाही, विचार करायची संधीच देत नाही. सध्याचा गृहपाठ दळण गिरणीत टाकल्याप्रमाणे आहे. सुप्त गुणांची नोंद आम्ही कधी करणार?

आम्ही नोंदीच करत नाही. आमची मुलं अभ्यासक्रमाच्याबाहेरच खूप गोष्टी शिकतात; पण त्याची नोंदच होत नाही. मुलाने गृहपाठ एखाद्या वेळेस केलाही नसेल; पण आपल्याला जे आवडतं त्याच्यामध्ये आवड घेऊन एखादं कौशल्य विद्यार्थी जर जोपासत असतील तर तो त्यांचा गृहपाठच होय. पण आजच्या विद्यार्थ्यांना वर्गपाठ, गृहपाठ, शिकवणीचा लादलेला गृहपाठ नको, तर आनंदाने ओथंबलेला गृहपाठ हवा. गृहपाठ पाठ्यपुस्तकातून न देता अवतीभोवती असलेल्या सुंदर गोष्टीच्या आकलनासाठी देण्यात यावा.
शिक्षणाचे संदर्भ बदललेले तसे शिक्षणातील काही संकल्पनांना नव्याने सामोरे जावे लागेल. चाकोरीबाहेरचे विचारच नावीन्याला जन्म देतात.

Author