माणसांचा व मनाचा वावर कुठे कुठे व कसा कसा होईल हे काहीच सांगता येत नाही. वावर सद्भावनेचा असेल तर ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ ही अनुभूती येतेच.
आपलं भवताल, आपला वावर ठरवतं आपण कोण होणार? ‘Man is known by the company he keeps’. आपल्याभोवती कोणाचा वावर आहे, कुणाची उठबस आहे, यावरूनही आपण ओळखले जातो. घरात मायेचा वावर असला की घरही नंदनवन वाटतं, घरात राहावंसं वाटतं. विद्यार्थ्यांचाही वावर केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित असू नये. अभ्यासक्रमाबाहेरच्या अनेक गोष्टींनीही व्यक्तिमत्त्व आकार घेत असतं. कोटा येथे एका महिन्यात २२ आत्महत्या होतात, हे भोवताली मायेचा वावर नसल्यामुळेच, एकटेपणा असह्य झाल्यामुळे व केवळ मनात स्पर्धेचाच वावर असल्यामुळे झालेही असेल. आता कोटामध्ये आई-वडिलांनी व आजी-आजोबांनी मुलांना एकटं वाटू नये म्हणून राहायला सुरू केले आहे. भावनिक पोषण नसेल तर व्यक्तिमत्त्व दुभंगतं.
अभ्यास करून गुण मिळतील पण अभ्यासाबरोबरच अनेक सद्गुण आपल्यात जोपासले जावेत, हेही महत्त्वाचे आहे. मानवाचा अवकाशातला वावर आज अनेक रहस्य उघडे करीत आहे. चंद्रांनी आमचं बालपण समृद्ध केलं, त्या चंद्राच्या कवितेमध्ये, सुरस कथा मध्येच आमचा वावर होता. आता प्रत्यक्ष वावर तिथे करता येण्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चंद्राचा अंतरंग कळायला मदत झाली. आभास आणि वास्तव यातील फरक लक्षात आला. चंद्र आहे साक्षीला म्हणून आम्ही केवळ आतापर्यंत प्रेम केलं; पण आता चंद्र आहे साक्षीला म्हणत चंद्राचं अंतरंग जाणून त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम त्याचा अभ्यास करणे शक्य झालं आहे. विज्ञानाचा वावर वैज्ञानिक दृष्टिकोनच रुजवितो. अंधश्रद्धेचा वावर जेवढा जास्त तेवढा वैज्ञानिक दृष्टिकोन दूर.
‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असे म्हटले गेले; पण आता रवीच्या अंतरंगात काय काय आहे ते वैज्ञानिकांनी शोधायचं ठरवलेलं दिसत आहे. चंद्र, सूर्य, तारे, अवकाश या आपल्या कवितेतल्या गोष्टीतल्या भाग होत्या. मनाचा वापर व वावर संयतपणे करण्याचं कौशल्य ज्याला जमलं तो जग जिंकेल. वावर मनाचाही असतो व शरीराचाही असतो. मन शरीरावर हावी होते, तेव्हा वासनेचा जन्म होतो. शरीर जेव्हा मनाला जिंकतं तेव्हा प्रेमाचा वावर सुरू होतो.
अनेक तत्त्ववेत्ते ज्यांचा वावर आमच्या जीवनात आजही आहे. मनाचा वावर सर्वत्र असतो. मुळात मन हे इतके चंचल आहे की, मनात येणाऱ्या गोष्टीही तितक्याच चंचल असतात. आपल्या मनाला संभ्रम पडतो की, आपला व मनाचा वावर नेमका कुठे आहे? मन एकीकडे आहे वाटत असतानाच, कधी दुसरीकडे जातं, समजत नाही.
झटक्यात मनाच्या हिंदोळ्याचा वावर इकडून-तिकडे झुलत असतो. मनाचा वावर शरीरातही असतो, शरीराबाहेरही असतो. माणूस प्रेमाचं नाटक करता करता, त्याचा वावर अचानक वासनेच्या प्रांतात कधी होतो हे त्यालाही कळत नाही. माणसातला राक्षस जागा कधी होईल सांगता येत नाही. अनिर्बंध वावर रोखण्यासाठी संयमाचा लगाम हवाच. वावर हा चांगल्यातून चांगल्याकडेच व्हायला हवा. मनाला वावर करण्याचे स्वातंत्र्य हवे.
संस्कारांचा योग्य वावर आजूबाजूला असेल तरच व्यक्तिमत्त्व घडते. घरात काही गोष्टींचा वावर आवश्यक आहे. भरल्या घरात प्रत्येकाचं असणं एक संस्कार देऊन जातं. माणसांचा वावर असतो तो संस्कारातून आलेला असतो आणि त्यामुळेच आपण आपल्यात मूल्ये रुजवून घेतो. अनुवंशिकता चांगली असेल तर आपणही चांगले होतो. प्राप्तपरिस्थितीत आपल्यावरही चांगल्या वातावरणाचा प्रभाव असेल तर परिणाम चांगला होऊ शकतो.
आपल्या गुणसूत्राचा वावर ठरवतो, आपण कोण होणार. बाह्य परिस्थितीतही कोणत्या गोष्टीचा वावर आपल्या आयुष्यात करून घ्यायचा, ह्याच्यावरसुद्धा व्यक्तिमत्त्वाचा विकास अवलंबून आहे. भवताल महत्त्वाचं आहे. अनेक दृश्य-अदृश्य गोष्टींचा वावर आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकाचे मूल्य वेगळे, संस्कार वेगळे, विकार वेगळे. आत्मा अदृश्य असला तरी तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतो. मागील पिढ्यांचा वावर आपल्यात शरीराने नसला तरी वारसारूपाने असतोच.
कोणत्या गोष्टीचा वावर होऊ द्यायचा व कोणत्या गोष्टीचा नाही हे आपल्या हातात जरी असलं तरी, काही गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. असंख्य विचार चांगले-वाईट, असंख्य स्वप्न यांचा वावर मानवाच्या आयुष्यात सतत चालू असतो. अनेक गोष्टींचा वावर, दुःखदायक असतो, अनेक गोष्टींचा वावर सुखावह असतो, अशा वेळेस जीवनात ही घडी अशीच राहू दे, असं वाटतं.
माणसे नाहीसे होतात पण त्यांच्या विचारांचा पगडा नकळत आपल्यामध्ये असतो. चांगल्या गोष्टींचा वावर असेल तर चांगलीच कृती घडते. विकृत गोष्टींचा वावर असेल तर विकृती निर्माण होते.
चांगल्या वाचनाच्या वापराने व्यक्तिमत्त्व परिपक्व होते. विचारांचा, आचारांचा वावर चांगला असेल, तर विवेकानंद निर्माण होतात. अतिरेकी संघटनांचा वापर व वावर असेल तर ओसामा बिन लादेनसारखे निर्माण होणार. अनेक गोष्टींचा वावर आपल्या हातात नाही; पण त्याचा वापर आपल्या हातात निश्चित आहे. चांगुलपणाचा वावर चांगली व्यक्ती निर्माण करते.
जसा वावर तसा संस्कार. कोणत्या गोष्टींचा वावर आपण होऊ देतो, याच्यावर आपल्या आयुष्याचा गुलमोहर होणार की निवडुंग होणार हे ठरतं.
कुटुंबात भावनेचं पालनपोषण नाही. माणसात घरांचा वावर कमी झाला. नाती समजावून सांगावी लागतात. मुले पोकळीत वाढत आहेत. घरात वावर आहे तो फक्त यंत्रांचा. यंत्राचा वावर असेल तर भावनाशून्य, कोरडी माणसे रोबोटसारखी होतील, हे थांबायला हवं.
दुःखाचा वावर असूनही यशोशिखराकडे जाण्यातच खरं कौशल्य आहे. प्रतिकूल परिस्थितीत, संघर्षाच्या मुशीतून अनेक महिला, पुरुष सामर्थ्यवान ठरले आहेत. भवतालचा वावर प्रतिकूल असला तरीही त्याच्यातून आरपार जाऊन, त्याला छेद देऊन यश गाठलंच पाहिजे, यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे.
लता, पु.ल., शेक्सपियर यांचा वावर आजही व्यक्तिमत्त्वाला आकार देतो. समृद्ध वारशाचा, संघर्षाचा वावरही आपल्याला कळत-नकळत घडवीत असतो. चंद्रावर माणसाने वावर करत दोन पावलांचे ठसे निर्माण केले, जे लाखो वर्ष आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वैभवाने मिरवतील. कारण चंद्रावर हवेचा वावर नाही. वावर अस्तित्व टिकवितो आणि मिटवितोही.
