पानगळ

पानगळ म्हणजे आयुष्याची शेवट असे आपल्याला वाटते. पानगळ आपल्याला जाणीव करून देते शेवटच्या क्षणांची. पण पानगळ होणार म्हणून पानं फुलायची थोडीच थांबतात. विचारांची ही पानगळ असते. सुचतं तेव्हा खूप सुचतं. जेव्हा सुचतं तेव्हा निसर्गातील घटना, सौंदर्य विचार करायला भाग पाडतात. घटना दुःखद असो वा सुखद, मन संवेदनशील असेल तर विचारांचा उत्सव फुलतो. मन निर्विकार असेल तर विचारांची पानगळ ठरलेली असते.



निसर्गातील घटना पाहून आपल्याला त्यापासून काही शिकायला हवे. अनेक घटनांमधून जीवनानुभव मिळतो. अशीच एक घटना म्हणजे पानगळ.

पानगळ म्हणजे आयुष्याची शेवट असे आपल्याला वाटते. पानगळ आपल्याला जाणीव करून देते शेवटच्या क्षणांची. पण पानगळ होणार म्हणून पानं फुलायची थोडीच थांबतात. विचारांची ही पानगळ असते. सुचतं तेव्हा खूप सुचतं. जेव्हा सुचतं तेव्हा निसर्गातील घटना, सौंदर्य विचार करायला भाग पाडतात. घटना दुःखद असो वा सुखद, मन संवेदनशील असेल तर विचारांचा उत्सव फुलतो. मन निर्विकार असेल तर विचारांची पानगळ ठरलेली असते.

पानगळ असली तरी ‘आज फिर जिने की तमन्ना है.. आज फिर मरने का इरादा है’ हेच आठवतं. रिमझिम पावसाच्या सरीमध्ये मुक्तपणे भिजायचं आहे, पण ढगफुटी ही होणार आहे, अशी परिस्थिती जीवन जगताना येते. स्पंदनं अनुभवायची आहेत. मनातलं, पण न बोललेलं, लिहिलेलं, न जाणवलेलं, त्याचे अर्थ शोधायचं आहेत. खूप खूप काही करायचं आहे. निसर्गातल्या दवबिंदूसारखा दृष्टी आनंद सगळ्यांना द्यायचा आहे. आत्ताच मरणासन्न मृत्यूची आर्जवे कशाला करायची?

वेदनेचा अविष्कारसुद्धा सुंदर जगून, आनंदात परावर्तित करायचा असतो. काही गोष्टी आपल्या होऊ शकत नाही; पण आपण तर त्यांचे होऊ शकतो ना? चंद्र आपला होऊ शकत नाही; पण आपण तर चंद्राचे होऊ शकतो. आवाक्याबाहेरच्या गोष्टीवर प्रेम बसतं तेव्हा आपल्याला प्रेम करायला कुणी रोखू शकत नाही. सौंदर्य हे प्रेमासाठी असतं, आस्वादासाठी असतं. सौंदर्याचे हजारो उपासक असतात आणि मृत्यू आपल्या हातात नसतो; पण मृत्यू अटळ आहे हे समजल्यावर राहिलेला संकल्प पूर्ण करणे, आनंद जगून घेणे एवढेच आपल्या हातात असतं. प्रत्येकाची आशा वेगळी, निराशा वेगळी. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारे त्यावेळी त्या क्षणापुरते सुखीच असतात. दुःखाला आनंदात बुचकळायला हवं.

काही माणसं असली काय आणि नसली काय त्यांचं जाणं आणि अभिनय चटकाच लावतं. वेदना जेव्हा प्रेमाला हात घालते तेव्हा ती सुगंधी जखम करून जाते. जीवन संपत चाललं की जास्तच इच्छा निर्माण होतात. राहिलेल्या इच्छा, आकांक्षा व बकेट लिस्ट पूर्ण करायची असते. आज कुणीतरी यावेप्रमाणे, कुणीतरी येते, तिच्याशी आपली तार जुळते आणि मग जगण्याच्या आशा पल्लवित होतात. आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे; पण मृत्यूच्या करारपत्रावर आम्ही स्वाक्षऱ्या कधीच केलेल्या आहेत, याचीही अधूनमधून जाणीव होते.

अफवा या आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या असतात. मधे मधे स्कायलाब कोसळणार, ग्रह कोसळणार, जगबुडी होणार, अशा बातम्या, या सगळ्या खऱ्या ठरेपर्यंत अफवाच होत्या आणि अफवा आयुष्य उद्ध्वस्त करतात.

मृत्यूचं करारपत्र सेफ डिपॉझिटमध्ये टाकून किल्ली समुद्रात फेकून द्यायची, तरच जीवनाचा आनंद घेता येईल. दोन श्वासातला अंतर प्रत्येकाचे वेगळे आहे. पुढचा क्षण आपला नसतोच. पण तो जेव्हा येतो तेव्हा तो आपलाच असतो. जाणीव आहे तोपर्यंत आयुष्य आहे.

अनेकांनी आपल्या मृत्यूची लाईव्ह कॉमेंट्री केली आहे. सरदाना व डॉ.के.के. अग्रवाल यांचे शेवटचे व्हिडिओ जर पाहिले तर डोळ्यातून अश्रू येतील. आम्ही नसलो तरी शो मस्ट गो ऑन हे त्यांनी सांगितलं. आपल्या मृत्यूचा प्रत्येक क्षणाचा अहवाल ते देत होते. ते स्वतः आपल्या मृत्यूचं न्यूज बुलेटीन देत होते.

विशिष्ट परिस्थितीत मन कितीही श्रीमंत असलं तरीही शरीराने केलेला करार पाळावाच लागतो. शरीराच्या व्याधींचे ऐकावं लागतं, त्यानुसार वागावं लागतं. शरीराने हे राम म्हणले की मनालाही या जगाचा निरोप घ्यावा लागतो. मृत्यू दारात बसलेला आहे, तरीही आपण आपलं जगणं सोडायचं नाही, आपल्या आशा सोडायच्या नाहीत, शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःला, मनाला रमवायचं. येणारच आहे, इंद्रधनुष्य दिसणारच आहे, या आशेवरच जगायचे आहे.

जगण्यात अर्थ शोधायचा असतो. सगळेच अर्थ शब्दकोशात नसतात, अर्थ शब्दांच्यापलीकडे असतात, ते जगता यायला हवेत. मरने का इरादा असला तरीही ‘आज फिर जीने की तमन्ना है.’

पानगळ येणार असली तरी अंतिम क्षणापर्यंत बहरायचंच आहे, हे लक्षात ठेवले की आयुष्य जगायला सोपं आणि सुंदर जातं. पानगळ झाली तरी ती नव्या अंकुराला वाट करून देते. दुःखाचीही कधी ना कधी पानगळ होते, हे लक्षात ठेवायला हवे. नैराश्याचीही पानगळ अटळच असते. नवीन अंकुरासाठी वाटच पाहावी लागते.

Author