कीर्ती श्रेष्ठ की मूल्य?

मूल्यं पुस्तकातच असतात असे नाही, वर्तनातही असतात. मूल्यं रुजली तरच ती वर्तनात येतात. शाळेत मूल्यं शिकवली जातात. रुजणं आणि रुजवणं हा ज्याचा त्याचा प्रांत. वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य शिकवलं जातं, पण एखादाच नरेंद्र दाभोलकर व त्यांच्यासारखे ते प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणतात.



“Values are Caught and not taught.”

हे खरे आहे. तरी जाणीवपूर्वक काही मूल्यं शिकवावी लागतात. रुजवावी लागतात. संस्कार रुजले तरच मूल्यं रुजतात. संस्कार न झालेल्या पिढीकडून संस्कार व मूल्यांची अपेक्षा कशी ठेवणार?

मूल्यं पुस्तकातच असतात असे नाही, वर्तनातही असतात. मूल्यं रुजली तरच ती वर्तनात येतात. शाळेत मूल्यं शिकवली जातात. रुजणं आणि रुजवणं हा ज्याचा त्याचा प्रांत. वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य शिकवलं जातं, पण एखादाच नरेंद्र दाभोलकर व त्यांच्यासारखे ते प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणतात.

इस्राएलचा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहिले असतानादेखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला.

कारण नदावने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धी या गोष्टींना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार यांना श्रेष्ठ मानत ‘योग्य’ गोष्ट केली.

‘एव्हरेस्टवरील चढाईच्या मार्गात त्याला दोन मृतदेह दिसले, की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. तो ज्या दोराच्या आधाराने चढत होता त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते आणि नंतर त्याला दिसला – तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. ते खाली कॅम्पमध्ये भेटलो होते आणि आता ते हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पाहात होते. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र नदाव दुर्लक्ष करू शकला नाही आणि त्याने वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली.

नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिनला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते. कारण त्याचे आणि स्वतःचे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधूनमधून त्याला शुद्ध यायची पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदावचा स्वतःचा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतःला बोटाना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला. तो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदावने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ यत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्पपर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.
जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्यव्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतःशीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदावने, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले.

एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे आणि दुसरीकडे दुसन्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षा पूर्ती या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतःचा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अति कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed.

आज भले नदावला सागरमाथा सर करता आला नसेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतःला ताठमानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबीयांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल.

आज सागरमाथा सर न करतासुद्धा, नदाव बन येहुदा सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला आहे, यात शंका नाही.

Author