ठाणे इथल्या सरस्वती स्कूल मराठी माध्यम पूर्व प्राथमिक विभागात मुलांना भरपूर मोकळीक दिली जाते. मूल आपल्या परिसराचं आकलन स्वतः करून घेतं, आपण त्यांना योग्य मुक्त अवकाश दिला पाहिजे, या सहजशिक्षण प्रक्रियेबद्दल शाळेत शिक्षक आणि घरी पालक आता सजग झाले आहेत. यासाठी गेले तीन वर्षे त्या विभागाच्या मुख्याध्यापिका रती भोसेकर आणि शिक्षक कार्यरत आहेत, तेव्हापासूनच पालकांचे ऑनलाइन वर्कशॉप सुरू आहेत. आता शाळेतही एक वेगळी खोली मुलांना मुक्तवावरासाठी ठेवली आहे. या खोलीत मुलांना आवडतात तशा वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या आकाराची रिकामी खोकी, दुपट्टे, डबे इत्यादी इत्यादी म्हणजे तयार खेळणी सोडून अनेक गोष्टी. शिक्षकांसाठीही व पालकांसाठी जाणीवजागृती सुरू आहे. त्यांनासुद्धा हा मुद्दा लक्षात आला, त्यामुळे काम सोपे व इंटरेस्टिंग झाले. नवीन पालकांसाठी शाळेत एक सेशन झाले होते. महिन्यातून एकदा सगळ्या पालकांसाठी एक झूम मीटिंगही ठेवली होती. यात सहजशिक्षणाबद्दल पुन्हा उजळणी, सहज शिक्षणाबद्दल पुन्हा उजळणी वजा सेशन घेतले होते. शाळेत या अनुषंगाने काय काय चालू आहे तेही पालकांना सांगितले होते, दाखवले होते. काही पालक व शिक्षकांनी आपले अनुभव कथन केले. एक पालक म्हणाले, “माझ्या मोठ्या मुलाने अशा गोष्टी केल्या नव्हत्या; पण आता धाकटी मुलगी वेगळ्या वेगळ्या गोष्टी करताना दिसते.” त्यांना जेव्हा विचारलं की, “मोठी मुलगी बऱ्याच गोष्टी करत असणारच. कारण असं करणं नैसर्गिक आहे, तुम्ही त्या दृष्टीने महत्त्व देऊन बघितलं नव्हतं. ते म्हणाले, “बरोबर आहे. आम्ही आता नवा सहजशिक्षणाचा चष्मा घातला आहे, त्यामुळे मूल दिसायला लागलं आहे.” मुलं ज्या गोष्टी बघतात, अनुभवतात, त्या आपापल्या पद्धतीने मांडून बघतात, त्याला आपण मुलांचं खेळणं असं नाव देतो. मुलांची ही नैसर्गिक आकलन प्रक्रिया असते. मूल हे निरीक्षण, अनुभव यांचे चित्र काढत असतात, शिकत असतात. मुलांना कोणत्याही सूचना न देता, दुरुस्त्या न सुचवता मुक्तपणे चित्र काढायला दिलं पाहिजे. या शाळेत शिक्षकांनी यासाठी खूप चांगलं वातावरण ठेवलं. शाळेच्या पालकांनाही हे समजलं आहे.अशी चित्रं व्हॉट्सअप ग्रुपवरही आदानप्रदान होतात.
मुलं स्वतः आकलन करून घेण्यासाठी सक्षम असतात, त्यांना शिकवण्याची नाही तर फक्त योग्य वातावरण द्यायची गरज असते हे सहजशिक्षणाचं मर्म आहे.
शाळेतून मुलासाठी काही उपक्रम ठरवले गेले व ते उपक्रम पालकांना समजावून दिले आणि पालक ते उपक्रम मुलांकडून करून घेतील असं ठरलं. यात मुलांचा मोबाईल किंवा कुठल्याही स्क्रीनशी रोजचा प्रत्येक संबंध येणार नव्हता. पण मुलाबरोबर काम मात्र होणार होतं, सहजशिक्षणाच्या दृष्टीने मूल समजून घेणे, सहजशिक्षण म्हणजे काय? मूल खेळते म्हणजे नक्की काय करते आणि त्याचे मुलाच्या आकलन प्रक्रियेत काय महत्त्व आहे. मूल चित्र काढते याचा अर्थ काय आणि त्याचं मुलांच्या आकलनप्रक्रियेत काय महत्त्व आहे. सहजशिक्षणात मोठ्यांची भूमिका काय? मूल समजून घेणे, निसर्गाने मुलांना सभोवतालचे जग समजून घेण्याची क्षमता उपजत दिली आहे. मूल आपली ज्ञानेंद्रिये वापरून अनुभव घेते, अनुकरण करते आणि यातून जगाचे आकलन होत जाते. आपण या दृष्टीने मुलाकडे क्वचितच बघतो, त्यामुळे मुलाला शिकवणे महत्त्वाचे वाटते. पण मूल जन्मल्यापासून शिकत असतेच, त्यामुळे सात-आठ वर्षांपर्यंत मुलांना शिकवू नये तर ते कसे शिकते हे बघावे. सहजशिक्षण म्हणजे अनुकरणातून, निरीक्षणातून आणि अनुभवातून प्रत्येक सजीव जगाचे आकलन करून घेत असतो, ही आकलनप्रक्रिया निसर्गनियमानुसार आपोआप होत असते. मुलांचे खेळणे, मुले आपले अनुभव निरीक्षणे पुन्हा आपल्या पद्धतीने मांडून बघतात, हा मनन करण्याचा एक प्रकार आहे, याला आपण मोठे मुलांचे खेळणे असे म्हणतो, यात मुले आजूबाजूला असतील त्या वस्तू वापरतात त्यांना आपण खेळणी असं नाव देतो, यातून मुलांचे आकलन बनत जाते. मुलांचे चित्र काढणे, जिथे चित्र काढणे सहज शक्य असते अशावेळी मुले आपले अनुभव, निरीक्षणे यांचे चित्र काढतात हा सुद्धा मननाचा भाग आहे, यातून सुद्धा मुलांच्या आकलनाची प्रक्रिया सुदृढ होते. सहजशिक्षणात मोठ्यांची भूमिका मुलांच्यासोबत राहाणे व योग्य अवकाश देणं हे आवश्यक ठरतं. प्रेम, विश्वास, सुरक्षितता आणि स्वातंत्र्य या गोष्टी मुलासाठी अत्यंत गरजेच्या आहेत.
शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; पण काही गोष्टी रुजविण्यासाठी सहेतुक शिक्षणही आवश्यक आहे.
