पुस्तकांच्या पलीकडे आपण जर डोकावून पाहिलं तर आपल्याला समाजात अशा अनेक घटना दिसतात, ज्या आपल्याला जीवनाचा वस्तुपाठ शिकवतात.
पुस्तकांच्या धड्यामधूनच आपल्याला धडा मिळतो असं नाही, तर प्रत्यक्ष जीवनात असे अनेक प्रसंग आहेत जे आपल्याला धडा शिकवतात. पुस्तकाबाहेर अवतीभवती आपल्याला अशा काही घटना दृष्टिक्षेपात येतात ज्या आपल्याला प्रेरणा देऊन जातात, आपल्यात नवचैतन्य जागवून जातात, नैराश्याचे मळभ झटकून टाकतात. नुसते डोळे उघडे ठेवून चालत नाही, तर निरीक्षण शक्ती आपल्याला जी दिली आहे तिचा वापर करून वैचारिक क्षेत्रात प्रवेश करता यायला हवा. विचार करता यायला हवा. आपल्यामधील वैचारिक दारिद्र्यच आपल्याला स्वतःतून उमलू देत नाही, स्वतःची उन्नती करू देत नाही. एखादी यशोगाथा झाली की ती इतिहासाचा भाग बनते; पण असं होता कामा नये. एका यशोगाथेतून दुसरी यशोगाथा जन्म घ्यायला हवी, तरच यशोगाथेची परंपरा चालू राहाते. प्रत्येकाच्या आयुष्यात नैराश्याचे मळभ येतातच; पण या नैराश्येच्या गर्तेत आपण संपलो असं माणसं समजू लागले तर ती पुन्हा उभारी घेत नाहीत. मग अवतीभवती अशा काही घटना मनातले मळभ झटकून टाकतात आणि आपणही का नाही उभारी घेऊ शकत? या विचाराने भारावून जातात.
अशीच एक कहाणी आहे, अॅसिड हल्ल्यातून बचावलेली अंध कफी दहावीमध्ये अव्वल आली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी होळीच्या भांडणाप्रसंगी शेजारच्यांनी केलेल्या अॅसिड हल्ल्याचा सामना तिला करावा लागला. कफीच्या वडिलांना धडा शिकवण्यासाठी कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर द्रव पदार्थ फेकून ते पळून गेले; पण तो द्रव पदार्थ होळीतल्या रंगांचा नव्हता तर ते होतं अॅसिड. फुलावर ॲसिड पडावं त्याप्रमाणे तिचा चेहरा काळा ठिक्कर पडला. सामान्य दुकानदार असणाऱ्या तिच्या वडिलांनी तिला जिल्ह्याच्या गावी आणलं व न्यायालयात झाडू मारण्याचं काम स्वीकारलं; पण न्यायालयात त्यांना न्याय मिळाला नाही. पोलीस यंत्रणांच्या मर्यादामुळे आणि कायद्यातील पळवाटामुळे अॅसिड फेकणारे दोनच वर्षात तुरुंगाबाहेर आले. अशातच तिचे वय आठ वर्षांचे जेव्हा झाले तेव्हां तिच्या वडिलांनी तिला पहिलीच्या वर्गात दाखल केले. पण तिला अभ्यासाचे गणित काही जमेना. कारण ती डोळसांच्या शाळेत होती. तोपर्यंत तिच्या वडिलांचे जवळजवळ वीस लाख रुपये खर्च झाले होते. कफी आठ वर्षांची झाली होती. ब्रेलचे उपकार जसे हेलन केलरच्या कामी आले तसेच अनेकांचे जीवन उजळून गेले. कफीची बोटं चांगली होती जरी हात जळाला होता. तिची बोटं एखाद्या सराईत बोटासारखी ब्रेल लिपीच्या कागदावर उठावाने उमटवलेल्या अक्षरावरून भराभर फिरू लागली. बोटातून स्पर्श शब्दरूप घेऊन मेंदूत विसावू लागले आणि शाळेनेही सर्व सहकार्य केले. अंधांनाही वापरता येऊ शकेल असा संगणक उपलब्ध तिला करून दिला. सीबीएससीचा अभ्यासक्रम अभ्यासताना विज्ञान, गणिताच्या काही संकल्पना समजून घेण्यासाठी अनेक शै.साधने वापरली. दृष्टी नसली तरी आयुष्यात दृष्टिकोन महत्त्वाचा असतो, हे तिने दाखवून दिले. काळोख असला तरीही दिवा लावण्यास कुठे प्रतिबंध आहे !
कफीने पेटवलेली ही ज्योत अनेकांच्या अंधाऱ्या मनात उजेड निर्माण करेल. चेहऱ्यावर डोळे नसल्यामुळे काय झालं? अंतरात्म्याच्या डोळ्यांनी खूप काही समजतं, खूप काही शिकता येतं हे तिनं दाखवून दिलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत चंदिगडमधील शाळेत अव्वल क्रमांक मिळवून ९५.२% गुण मिळवले. कफीचे वडील सचिवालयात कार्यालय सहाय्यक आहेत. भूगोल आवडता विषय असलेल्या कफीची सनदी अधिकारी होण्याची इच्छा आहे. लहानपणी शेजाऱ्यांनी द्वेषाने अॅसिड फेकले, त्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा भाजला होता. तब्बल सहा वर्षे तिला रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. या भीषण संकटाचा अभ्यासावर मात्र परिणाम तिने होऊ दिला नाही. ब्रेलच्या माध्यमातून तिने अध्ययन सुरू ठेवले. कफीने आपल्या पालकांचे आभार मानले. तसेच शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचाही तिने आवर्जून उल्लेख केला आहे.
अंध कफीने youtube तसेच इंटरनेटच्या मदतीने अभ्यास केला. या दोन माध्यमांचा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी बराच उपयोग झाल्याचे तिने नमूद केले आहे.
यशोगाथासुद्धा परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. यशाचे उदाहरण पुस्तकात वाचायला मिळतं, पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये असं उदाहरण सापडल्यावर विश्वासाचे दृढीकरण होतं.
अँसिड हल्ल्याने माणसाचं अस्तित्व संपून जातं. कारण माणसाला चेहरा राहात नाही. प्रत्येक माणसाला चेहरा ही त्याची ओळख असते. पण जेव्हा ही ओळखच पुसली जाते तेव्हा कर्तृत्वच चेहरा म्हणून पुढे येतो.
