पुस्तकांच्या अलीकडे

आयुष्याच्या पूर्वार्धात ज्यांनी कष्ट केले, अभ्यास केला, शिस्त बाळगली त्यांच्या जीवनात यश पायघड्या घालतं. दुःखाचे, संघर्षाचे चटके बसलेल्यांनीही यशश्री खेचून आणलेली आहे. दुःख हा या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकालाच दुःखाला, संघर्षाला सामोरं जावंच लागतं. संघर्षाला सामोरे जाणारेच स्वतः स्वतःतून उमलतात. संघर्षाला हार मानणारे नैराश्याला व आत्महत्येला जवळ करतात.



आयुष्याच्या पूर्वार्धात ज्यांनी कष्ट केले, अभ्यास केला, शिस्त बाळगली त्यांच्या जीवनात यश पायघड्या घालतं. दुःखाचे, संघर्षाचे चटके बसलेल्यांनीही यशश्री खेचून आणलेली आहे. दुःख हा या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकालाच दुःखाला, संघर्षाला सामोरं जावंच लागतं. संघर्षाला सामोरे जाणारेच स्वतः स्वतःतून उमलतात. संघर्षाला हार मानणारे नैराश्याला व आत्महत्येला जवळ करतात.

जगात प्रत्येकाला रडतच यावं लागतं. आपल्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो. कोणाला दुःख होतं. जाणीव व्हायला लागली की दुःखाचा पारा आपोआप चढायला लागतो. आयुष्य म्हणजे जाणिवांचा व नेणिवांचा खेळ आहे. जाणिवा असणाऱ्यांना दुःखाचं बोट धरावंच लागतं. जाणिवा बोथट असणाऱ्यांना दुःख म्हणजे मनोरंजन वाटतं.

कॅमेराने दुःख टिपणे व व्हायरल करणे या श्रेय घेण्याच्या गोष्टी झाल्या आहेत. दुःख सांभाळलं की माणूस तावूनसुलाखून तयार होतो. दुःख, संघर्ष, दारिद्र्य नकोच असा एक तरुणवर्ग तयार होत आहे व व्यसनाधीन होत आहे.

नको त्या वयात, नको त्या गोष्टी काही मुले करत आहेत व नैराश्याच्या खाईत स्वतःला लोटत आहेत. मोबाईलच्या कुशीत झोपणारी मुले निष्क्रिय होत आहेत.

‘लहानपण देगा देवा’ ही अनुभूती प्रत्येकाला एका टप्प्यावर आवश्यक वाटते. लहानपण जसं जसं सरत जातं व आकलनाचा ग्राफ जसा जसा वाढत जातो तसं तसं दुःखाची जाणीव व्हायला लागते. जीवनात आनंद इंद्रधनुष्यासारखा मिळतोच, पण सोबत दुःखाला घ्यावंच लागतं.

सूर्योदय आणि सूर्यास्त जसं आपलं अस्तित्व दाखवून देतात, तसंच सुख आणि दुःखं आपलं अस्तित्व जाणून देतात.

काही मूल्यं अंगीकारायलाच हवीत, नाहीतर दर्दभरी दास्तान ठरलेली. काही पालक जेव्हा आपल्या पाल्याचा गृहपाठ, त्याला शिक्षा मिळू नये म्हणून करतात तेव्हा तात्पुरती वेळ निभावली जाते; पण पालक त्याला श्रमप्रतिष्ठा, संघर्ष यापासून दूर लोटतात. मुलांच्यासमोर शिक्षणासाठी नदी पार करून शिकायला जाणारे लालबहादूर यायला हवेत. दिव्याच्या खाली अभ्यास करणारे आगरकर, माशेलकर यायला हवेत. उंबरठ्याबाहेर राहूनही शिकणारे आंबेडकर यायला हवेत, स्वच्छतेसाठी गाडगेबाबा यायला हवेत. पूर्वी काही माणसं मूल्यांसाठी ओळखली जायची. आताची माणसं मुलांसाठी पालकांनी काय केलं यावरून ओळखली जातात.

मुलांना शाळेत ने-आण करणे, त्यांचे गृहपाठ करणे, मुलांचे लाड करणे, महागडी खेळणी आणून देणे. मुलांचा शब्द खाली न पडू देणारे पालक त्यांना कोणत्याच संघर्षाला तोंड देण्यास तयार करत नाहीत. समाजात राहिल्याने, वावरल्याने समायोजन म्हणजे काय ते मुलांना कळतं.

काही कुटुंबात मुलांना कोणतीच कामे करू दिली जात नाहीत, एक तर त्यांना जमत नाही म्हणून किंवा पालक स्वतःच सर्व कामे करतात, त्यामुळे कुटुंबात श्रमप्रतिष्ठा रूजतच नाही. हे एक मूल्य आहे याचा विसर अनेकांना पडतो. काही मूल्यं, कुटुंबात, काही शाळेत, काही समाजात रुजायलाच हवीत. आज मूल्यं पुस्तकात बंदिस्त झाली आहेत.

मुलं पुस्तकही पाहात नाहीत व पुस्तकांच्या पलीकडेही पाहात नाहीत. पुस्तकं पाहिली तरीही फक्त परीक्षेसाठीच पाहातात. वाचनच नाही त्यामुळे अवांतर वाचनाचा प्रश्नच येत नाही. पालकांनी मुलांचे पार्सल शाळेला पाठवणे यापेक्षा चांगल्या सवयी, चांगले संस्कार करणे तर त्यांच्या हातात आहे. वळण, शिस्त हा भाग कुटुंबातूनच सुरुवात होते व शाळेत ते वृद्धिंगत होतं.

आपल्या मुलांना सगळं जमायला हवं असा दृष्टिकोन पालकांचा असायला हवा. मुलांच्या अभ्यासाचं वेळापत्रक शाळा करते. पण मुलांच्या ध्यासांचं वेळापत्रक कुटुंबाला करायचं असतं. मुलांनी कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा व कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा, याचं बीज कुटुंबातच रोवलं जायला हवं.

बाहेर खाण्याचे प्रस्थ वाढल्यामुळे मुलांना पौष्टिक व सकस आहार मिळत नाही. चुकीचा व पौष्टिक नसलेला आहार अनेक मुले खात आहेत. कशामध्ये प्रोटीन आहे, कशामध्ये कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे याची जाणीव लहानपणापासून झाली तर भविष्यात होणाऱ्या आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. मुलांना शिकवणे याचबरोबर आरोग्याच्या सवयी लावणे ही खूप आवश्यक आहे. कुटुंबातच वागण्याचे, खाण्याचे पॅटर्न ठरत असतात, आयुष्यात पुढे तेच कायम राहातात.

प्रत्येक मुलांना कॅलरी कॉन्शस बनवणेसुद्धा पालकांचे कर्तव्य आहे. अनेक मुलांची आज स्थूलपणा ही समस्या आहे. सेलिब्रेशनच्या कल्पनाच मुळात मुलांच्यावर चुकून थोपविल्या जात आहेत. गोड खाणे, मनोरंजनासाठी अश्लील हावभावांची गाणी म्हणणे व त्यावर नृत्य करणे हे कुठेतरी थांबायला हवं. प्रत्येक आई कामाच्या धावपळीत आज श्यामची आई होऊ शकत नाही. कुटुंब, शाळा, समाज यांचीही काही जबाबदारी आहे. संघर्षातच माणसं घडली आहेत हा इतिहास आहे. संघर्ष झेलला की नंतरचा हर्ष आपला असतो. व्यक्तिमत्त्व हे तावूनसुलाखूनच घडतं, नुसतं सुखावून घडत नाही.

Author