मुलांचं शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकात बंदिस्त नको. पुस्तकांच्या शिक्षणाबरोबरच मुलांना जीवनाची ही तोंडओळख व्हायला हवी. मुलांच्या फक्त गुणांचं मोजमाप नको, तर त्यांच्या आयुष्याला काही सार्थकताही प्राप्त व्हायला हवी. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे, “शिक्षण म्हणजे काही तुमच्या मेंदूत कोंबलेल्या माहितीचा साठा नाही, जो पचवता न आल्यामुळे संपूर्ण आयुष्यभर तिथे धुडगूस घालत राहातो. आपल्याला हवं आहे आयुष्याची उभारणी करणारं, माणसाला घडवणारं, त्याच्या चारित्र्याचं संवर्धन करणारं, कल्पनांचं सात्मीकरण.
तुम्ही जर पाच कल्पना आत्मसात करून त्यांच्या आधारे तुमचं आयुष्य आणि चारित्र्य घडवलं असेल तर एखाद्या, संपूर्ण ग्रंथालय तोंडपाठ असणाऱ्या माणसापेक्षा तुमचं, शिक्षण अधिक ठरेल. आम्हाला असं शिक्षण हवं आहे ज्याच्यामुळे चारित्र्य घडतं, मन:शक्ती वाढते, प्रज्ञेचा परीघ वाढतो आणि माणूस स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकतो. ‘
आपण पुस्तकी शिक्षणालाच शिक्षण समजण्यात फार मोठी चूक करत आहोत. पालकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचं लक्ष केवळ अकॅडमिक्स वरच खेळलेलं असतं. मुलांना जर जीवनाचे विज्ञान समजलं नाही तर विज्ञानाचा अभ्यास करून काय उपयोग. आपण मुलांना इतिहास वाचायला आणि तोंडपाठ करायला लावतो पण आपण त्यांना इतिहास घडवायला शिकवत नाही. मूल पहिली दुसरी आणि तिसरी भाषा शिकला पण त्यांनी त्याची संवाद कौशल्यच विकसित झाली नाही तर काय करणार पुस्तकं. शिक्षण हा मुलांच्या विकासाचा एक पैलू आहे एकमेव नाही. पुस्तकी शिक्षणाची जीवनात मदत होऊ शकते, पण केवळ पुस्तकी शिक्षण म्हणजे जीवन नव्हे. आयुष्यात अजून बरंच काही असतं. अभ्यासात पहिला येणारा जीवनात पहिला येईलच असं नाही. मागच्या बाकावर बसणारे आयुष्यातही बॅकबेंचर राहातील असंही नाही. आपण बऱ्याच वेळेला पाहातो की, बहुधा जीवनाची सर्वसामान्य समज असलेले ९८% लोक आयुष्याची सर्वंकष समज असलेल्या ७२% लोकांबरोबर काम करत असतात.
मुलांना वाचनाची गोडी लावायला हवी, पण मुले जर पुस्तकात रमत नसतील तर पुस्तकाबाहेरच्या जगात त्यांना अवकाश द्या, संधी द्या, खेळू द्या, निसर्गाला समजू द्या, माणसांना समजू द्या. निरीक्षणाची संधी द्या, त्यातून खूप काही मुलं शिकतील. मुलांना केवळ धाक नको, तर त्यांच्या आवडीचं जे जे असेल ते करण्याचं स्वातंत्र्य द्या. मात्र स्वातंत्र्यावर अंकुश हवाच. स्वातंत्र्य स्वैराचारामध्ये बदलणार नाही, यासाठी मोठ्यांचं त्यांच्यावर लक्ष हवं.
मुलांनी पुस्तकातच रमावं, तास न् तास अभ्यासच करावा, हा आटापिटा नको. योग अभ्यास, व्यायाम, शिस्त, संस्कार याचं बीजारोपण बालवयात केलं की मोठेपणी व्यक्तिमत्त्वाचं झाड बहरतं.
आजच्या शिक्षणव्यवस्थेत श्रमप्रतिष्ठेला स्थानच नाही. घरी अभ्यास, शाळेत अभ्यास, मैदानाची कमतरता त्याच्यामुळे मुलांना श्रमप्रतिष्ठेपासून दूर राहावं लागत आहे. चायना मेड खेळण्यांच्या सहवासात मुलं वाढत आहेत. चांदोबा मासिक चांदोबाप्रमाणेच दूर गेलं आहे. हल्क, थॉर स्पायडरमॅन, कार्टून, पोकेमन, बेबलेड या आभासी दुनियेत मुलं स्वतःला झोकून देत आहेत. पूर्वीच्या काळी निदान घरात कानावर पडणारे श्लोक, अभंग, भक्तीगीते ही सुद्धा दुर्मिळ झाल्यामुळे वैचारिक खाद्यापासूनसुद्धा मुले दूर आहेत. घरातलं संस्कार केंद्र बंद झाल्यामुळे अनेक ठिकाणी शिबिर घेऊन त्यामध्ये त्याची फक्त झलक विद्यार्थ्यांना पाहायला मिळते; पण ती मूल्यं रुजतात का याचा विचार व्हायला हवा. लहानपणी पुस्तक वाचणं हा ठेवा असतो. पुस्तके व्यक्तिमत्त्व विकासाला अशा अनेक गोष्टी भरभरून देतात की, माणसाचं जीवन समृद्ध होतं.
पुस्तकात वाचलेलं जेव्हा जीवनात जगायला मिळतं तेव्हा आपल्याला जगण्यात, आस्वाद घेण्यात पुस्तकं साहाय्यभूत ठरली, हे नंतरच्या जीवनात कळतं. जाणीवपूर्वक काही गोष्टींची रुजवात मुलांच्यामध्ये करावीच लागेल. पुस्तक वाचलेल्या गोष्टींचे संदर्भ जेव्हा आयुष्यात दिसतात त्यामुळे त्याचे अर्थ कळायला लागतात. पुस्तकात शिकायचं असतं आणि पुस्तकाबाहेर जगायचं असतं.
