कोणी म्हणेल खुर्ची सारखी खुर्ची, त्यात सांगण्यासारखे काय असणार. राजकारणी लोक ज्या संदर्भात खुर्चीसाठी भांडतात ती खुर्ची ही नव्हे. माझ्या आयुष्यात मात्र एका खुर्चीने मला खूप आराम आणि प्रसिद्धी मिळवून दिली होती.
माझ्या नोकरीतील काही वर्षांच्या अनुभवानंतर मला एका विभागाचा मॅनेजर होण्याची संधी मिळाली. त्याबरोबर येणाऱ्या सुविधांमध्ये चाके असलेली, पुढेमागे रेलता येणारी, मागे डोक्याला आधार देणारी, एक गुबगुबीत खुर्ची पण मिळाली.
त्या खुर्चीत मागे रेलून बसल्यावर उगाचच जरा जास्त महत्वाचे काम करत असल्यासारखे वाटे. मात्र लवकरच त्या खुर्चीचे नाविन्य संपले पण एक दुसरीच समस्या हळू हळू चोरपाउलाने सुरू झाली. त्या महागड्या व्यवस्थापकीय खुर्चीत रोज बराच वेळ बसून सायंकाळी माझी कंबर व मान जड झाल्यासारखे वाटे. दिवसागणिक ही समस्या वाढत होती.
डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर समजले की मला ज्याप्रकारे माझ्या खुर्चीत बसावे लागत होते त्यामुळे पाठीच्या मणक्यांवर अयोग्य जोर पडत होता व तेच माझ्या पाठ आणि मानदुखीचे कारण होते.
खरी गम्मत पुढेच आहे. त्यानंतर जरा इकडे तिकडे बघितल्यावर माझ्या लक्षात आले की आमच्या कामगारांना ज्या प्रकारची खुर्ची दिली जाई ती अत्यंत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून डिझाईन केलेली आहे. प्रत्येकाच्या उंचीप्रमाणे त्या खुर्चीची बैठक वर खाली करायची सोय होती. शिवाय पाठीच्या खालच्या बाजूस योग्य आधार मिळेल असा एक पत्रा होता. पत्र्याच्या बैठकीला खूप भोके असत ज्यामुळे पार्श्वभाग उबत नसे. खाली दोन्ही पायांना विश्रांती मिळेल असा आधार असे. ती खुर्ची कुठेही गुबगुबीत नव्हती. थोडक्यात काय, ती खुर्ची फक्त दिसण्यासाठी बनविलेली शोभेची वस्तू नव्हती तर माणसाला विनात्रास बसण्यासाठी स्वस्त, कणखर आणि देखभाल न लागणारी खुर्ची होती.
मी त्या खुर्चीची मागणी केल्यावर मला समजाविण्यात आले की व्यवस्थापकाने कामगारासाठी असलेली खुर्ची वापरणे योग्य दिसणार नाही. मी स्वभावानुसार कुणाकडे फारसे लक्ष न देता, एक तशी खुर्ची मिळवून तिच्यावर बसू लागलो. सुरुवातीला काही कुत्सित टोमणे पण ऐकावे लागले.
आश्चर्य असे की माझ्या बसण्याच्या स्थितीत बदल झाल्याने काही दिवसातच माझा पाठीचा त्रास नाहीसा झाला. त्यानंतर माझ्या या खास खुर्चीमुळे माझी एक नवी ओळख निर्माण झाली. या साध्या खुर्चीमुळे कामगारांशी जवळीक साधणे अप्रत्यक्षपणे सोपे होई. हळूहळू तर मला माझ्या या स्वस्त आणि डामडौल नसलेल्या खुर्चीचा आणि स्वतःमधील धाडसाचा अभिमान वाटू लागला. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, हेच खरे !
पुढे जेव्हा जेव्हा माझ्या बदल्या झाल्या तेव्हा मी खास परवानगी काढून माझी ही खुर्ची माझ्याबरोबर नेत असे. अगदी वरिष्ठ व्यवस्थापक झाल्यावर सुद्धा माझी ही खुर्ची कायम होती. मुंबईला मुख्य कार्यालयात बदली झाल्यावर तर तेथील झगमगीत कचेरीमध्ये माझी खुर्ची हा एक कुतूहलाचा विषय बनला होता.
अखेरीस माझी बदली परदेशी झाल्यावर मी माझ्या लाडक्या खुर्चीला जड अंतःकरणाने निरोप दिला.
इति माझ्या आयुष्यातील खुर्ची महात्म्य !
विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/