जाणिवा विकसन

जाणिवा ही अशी बाब आहे की, ती कळतं पण वळत नाही, अशा स्वरूपात असते. आपल्यामध्ये जाणिवा आहेत हेच मुळात ओळखायला हवं. जाणिवा योग्य दिशेने विकसित झाल्या तरच व्यक्तिमत्त्व बहरतं.



जाणिवा ही अशी बाब आहे की, ती कळतं पण वळत नाही, अशा स्वरूपात असते. आपल्यामध्ये जाणिवा आहेत हेच मुळात ओळखायला हवं. जाणिवा योग्य दिशेने विकसित झाल्या तरच व्यक्तिमत्त्व बहरतं.

एखाद्या धार्मिक कार्यक्रमात स्वतःच्या अस्तित्वाचे भान ही ज्यांना राहात नाही, अशी व्यक्ती काय कामाची. शिक्षणातून जाणिवा विकसित व्हायला हव्यात. सर्वसामान्यांच्या जाणिवा प्रफुल्लित करण्याचं काम अनेक जण करतात. लोकांमध्ये स्वच्छतेची जाणीव, वृक्षारोपणाची जाणीव, व्यसनमुक्तीची जाणीव, अंधश्रद्धेची जाणीव करत असतानाच अनेकांच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल होतो.

दुसऱ्यावर प्रेम, भक्ती करणारी माणसे स्वतःवर प्रेम का नाही करत? स्वतःला अपॉइंटमेंट द्यायला कधी शिकणार? अस्तित्व असेल तरच जीवन आहे. कडक उन्हात आपण संपणार आहोत, भुकेने आपण संपणार आहोत. सहा सहा तास उपाशी राहून लोक स्वतःला विसरून इतके तल्लीन कसे होतात? कर्मकांडात रमणं हीच लोकांना जीवनाची इतिकर्तव्यता वाटत आहे.

आपण असू तर जग असणार आहे, देव असणार आहे, श्रद्धा असणार आहे, म्हणून जगण्याची प्राथमिकता स्वतःचं अस्तित्व जपणे हीच असावी. स्वतःचे अस्तित्व जपलं गेलं तरच आपण दुसऱ्यासाठी काही करू शकतो.
स्वतःच ओढवून घेतलेली, न तपासलेली श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. अस्तित्व विसरले की माणसे स्वतःची राहात नाहीत, बेशिस्त होतात, हवं तसं वागतात. मानवी जीवन प्रवास शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःच्या अस्तित्वाचाच असतो.

अपघाताची कारणमीमांसा निरर्थक असते. प्राप्तपरिस्थितीत माणसांच्या काही अपरिहार्यता असतात.

कोरोनाच्या काळात असंख्य कुटुंब जेव्हा अनवाणी पायाने थकून रेल्वे रुळावर झोपतात, तेव्हा ती त्यांची अपरिहार्यता असते. नैराश्याने ग्रासलेल्या भक्तांना आपल्या गुरूचे दर्शन, आपल्या गुरूची वाणी कोणत्याही परिस्थितीत कितीही अडचणीत ऐकावीशी वाटते ती त्यांची अपरिहार्यता असते.
अनावश्यक इच्छा माणसांना संकटाच्या खाईत लोटतात. आपल्यामागे किती माणसे आहेत, किती भक्तगण आहेत, किती चाहते आहेत हे लोकांना कळावे यासाठी शक्ती प्रदर्शन. आज-काल प्रत्येकाला आपले अस्तित्व दाखवण्यासाठी आवश्यक वाटते, पण हे करत असताना आपल्या अनुयायांचा विचार करणे कर्मप्राप्त ठरते. नंतर लाखोंची मदत व उन्हात कार्यक्रम घेऊ नयेत या शासन निर्णयाला काही अर्थ नसतो. इथे अपघाती वळण आहे किंवा हे अपघाताचे ठिकाण आहे, असे बोर्ड नंतर लावून काय उपयोग !

देवदर्शनाच्या कार्यक्रमात भाविक चेंगराचेंगरीत मृत पावतात. गर्दी टाळायला हवी, ही जाणीवजागृती कधी येणार? जागृती आजही समाजात नाही. ती अशिक्षिताबरोबर सुशिक्षितामध्येही आवश्यक आहे.

सामाजिक अंतर ठेवणे, मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे याबाबतची जाणीवजागृती लोकांमध्ये रुजलीच नाही. आमच्याकडे जे रुचतं तेच रुजतं.

आपल्यामधल्या सुप्त शक्ती, जाणिवा याची जाणीव आम्हाला झाली तरीही आम्ही त्याच्या विकसनाबाबत कोणतेच प्रयत्न करत नाहीत किंवा समाजामध्ये त्याला पोषक वातावरण नसल्यामुळे जाणिवा विकसित न होता माणसं हवी तशी वागत राहातात. स्वतःतून स्वतःला उमलवणं माणसांनी शिकायला हवं.

अंधानुकरण करणे ज्या दिवशी थांबेल, त्या दिवसापासून माणसे स्वतःच्या विचार करतील व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करतील.

एखाद्या व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा त्यांचे प्राण वाचवण्याबद्दल लोक स्वतःला संपवत असतील तर ते कितपत योग्य आहे? एखाद्या अभिनेत्याला जर अपघात झाला तर त्याच्यासाठी पायघड्या घालणारे लोक स्वतःला संपवून घेतात.

एखाद्याला संपवायचे असेल तर आत्मघाती पथकात सामील होऊन स्वतःला संपवण्याइतपत माणसे जर बुद्धीचा वापर करत नसतील तर जगण्याचे प्रयोजन काय? हा प्रश्न माणसांनी स्वतःलाच विचारायला हवा.

प्राण देण्यासाठी अनेक जण सज्ज आहेत; पण आपल्या जाण्याने काय होईल, इतरांचाही विचार माणसांनी करायला हवा.

तंत्रज्ञानाच्या काळात माणसांच्या जाणिवा विकसित नाही झाल्या तर माणसे रोबोट होतील. यंत्रयुगात भावना बोथट होत चालल्या आहेतच. रोबोट ऑपरेशन करतील पण इमोशन संपवतील, हे आपल्याला परवडणार नाही. कारण येणाऱ्या काळात तंत्रज्ञानापेक्षाही उत्तम माणसे बनविणे हेच आपल्या शिक्षणाचा ध्येय असायला हवं. चांगलं शिक्षण चांगला संस्कार रुजवतात. रोबोट फक्त सोपस्कार पार पाडतात.

काही मूल्यं रुजायलाच व रुजवायलाच हवीत. मूल्यांचं पतन केवळ व्यक्तिगत पतन नसतं तर समाजपतनाची सुरुवात असते.

Author