प्रिय फेसबुक
तुला फेस नसलेलं बुक म्हणावं का? कारण तुझा स्वतःचा असा फेस दिसतच नाही. अनेकांचे फेस तू जगाला दाखवतोस, खरे, खोटे. उठल्या उठल्या माणसं देवाआधी आता तुझं दर्शन घेऊ लागले आहेत. तुझ्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. घरातले जेव्हा फटकारतात, सभोवताली निराशा असते तेव्हा तूच गोंजारतोस. लाईकमुळे आत्मविश्वास येतो.
पण तू आणि तुझ्या भावंडाने समाज ढवळून काढला आहे. नातेवाईक, मित्र समोरासमोर जेवढे व्यक्त होत नाहीत, तेवढे तुझ्याजवळ मोकळे होतात. तू नातेवाईक, मित्र यांच्या संवादाची उणीव भरून काढतोस. जगातल्या कुठल्याही माणसाकडून प्रतिक्रियावर प्रतिसाद येतो. माणसे दूर आहेत असं वाटतच नाही; पण जवळची माणसं मात्र दूर वाटतात. संवाद होतो; पण घरातल्याशी नाही. जो व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी खूप महत्त्वाचा असतो.
तू माणसाला इतकं गुंतवतोस की घरातले संवाद बंद झाले. तू अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेस. तुझ्याशिवाय अनेक जण व्यक्त होऊ शकले नसते. तुझे आभार मानायला हवेत. फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावनांचा विचार आपण पोहचवतो. एखादं व्यक्तिमत्त्व कसं असतं याचा आरसा म्हणजे फेसबुक.
माणसांना अभिव्यक्त व्हायला आवडतं हे तुझ्याकडे पाहून कळतं. सामान्य माणूससुद्धा तत्त्ववेत्त्याप्रमाणे काहीतरी नावीन्यपूर्ण, विचार प्रवर्तक लिहू लागला. अनुवंशिकता, अनुभव, निरीक्षणशक्तीमुळे आलेला आशय व्यक्त होण्यासाठी वाणी किंवा लेखणी हवी.
कुवतीनुसार आतापर्यंत असं काहीतरी आशययुक्त व्यक्त करायला संधी नव्हती. विचारांचे तरंग उठायला, स्वतःला वेळ द्यावा लागतो. मन मोकळं करायला तुझ्याशिवाय आज जागाच उरली नाही. लोकांनी फक्त विचार करू नये, तर विचार व्यक्तही करावा यासाठीच फेसबुक.
विचार आणि अत्तर वेळेवर स्मृतीच्या कुपीत बंद करणं आवश्यक आहे. पण समाजात विचार करायला व विचार वाचायला वेळ कुणाकडे आहे. पोस्टआधी लाईक केल्या जातात, वाचून किंवा न वाचून. कॉमेंटसाठी तर तू स्टिकर, इमोजी उपलब्ध करून दिल्या आहेत.
काही का असेना तू व्यक्त होण्याची संधी देतोस. तुझ्यामुळे अनेक लोक लिहिती झाली. तू त्यांची वहीच आहेस. कवी, लेखक म्हणून अनेकांना ओळख मिळाली.
तोंडाला फेस येईपर्यंत लोक फेसबुक पाहातात. आपली पोस्ट आली किंवा नाही हे सारखं, सारखं बघतात. काही काम असलं तरी किंवा कोणाचा फोन असला तरी ते म्हणतात, माझ्या पोस्टला लाईक किती आले बघू दे. थांब, माझ्या लेकराला न्हाऊ घालू दे म्हणण्यासारखं.
तू अनेकांना फसवलं, हसवलं, गुंतवलं, काय काय नाही केलंस! आरशात जेवढा फेस लोक पाहात नाहीत तेवढा फेसबुकमध्ये पाहातात.
एरवी कोणासमोर लोकं मोकळी होणार नाहीत, पण तुझ्यासमोर लाईव्ह येऊन मोकळी होतात. या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात. लाईव्ह येण्यावर निर्बंध हवेत का? तुझ्यामुळे शुभेच्छा, गुड मॉर्निंगचे, वाढदिवसाचे मेसेजेस टाकता येतात. कुणाच्या गुड मॉर्निंगने दिवस चांगला जातो का?
वाढदिवसाला तर शुभेच्छांचा तसेच डीपी बदलला की असंख्य प्रतिक्रिया हजर. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं शक्तीप्रदर्शनच होय. एखाद्याला छान कॉमेंट टाकली किंवा स्टिकर टाकलं तर सेकंदाच्या आत तोंडावर धन्यवादची कॉमेंट येवून आदळते.
तुझ्या साक्षीने सगळं काही खरं, काही खोटं चाललेलं असतं. अनेकजण फेसबुक पाहात नाहीत. तुझ्या नादाला लागत नाहीत. काहीजणांना फेसबुक पाहाणं कमीपणाचं वाटतं.
लाईक द्या, लाईक मिळवा, कॉमेंट द्या, कॉमेंट घ्या असा एक वर्ग तयार होत आहे. तोलून-मापून प्रतिक्रिया देणारा.
फेसबुकमधील माणसे स्वतःचा फेस विसरत चालले आहेत. टाकलेल्या पोस्टला किती, केव्हा कशा कॉमेंट्स येतात त्याचंच चिंतन मग सुरू होतं. दुसरा विचारच माणसं करत नाहीत.
कॉमेंट कोणाकोणाच्या आले आहेत. इतरांच्या का नाही आल्या? जणू काही त्यांना दुसरे काही धंदे नाहीत. आपल्या सवडीनुसार फेसबुक पाहाणार. कोणी पाहाणारही नाही, पण कुणाकुणाच्या कॉमेंट का नाही आल्या? याचा विचार माणसे करत बसतात आणि अनेकांच्या मनात दिवस-रात्र शीतयुद्ध चालू असतं.
नको त्या गोष्टी व्हायरल होत आहेत आणि संस्कृती जतन करायचे असेल तर काहीही व्हायरल होऊन चालत नाही. घरात ज्यांना कोणी विचारत नाही अशांना तू प्रकाशझोतात आणलंस, विचारलंस, गोंजारलं, फुलवलं हे काही कमी तू नाही.
‘याची देही, याची डोळा’ माणसे स्वतःचे वैभव पाहू लागली. सारख्या सारख्या रोज पोस्ट टाकल्या की लोकांनाही कंटाळा येतो. रोज पोस्ट टाके त्याला कोण चांगलं म्हणे! प्रत्येक पोस्टचं आयुष्य असतं. तुझ्यामार्फत अनेकांचे मैत्रीचे प्रस्ताव येतात, पण’ ते जपून करावे लागतात.
एखाद्याची पोस्ट आवडली म्हणून लाईक करायला जावं तर पुढे चाळीस-पन्नास प्रतिक्रिया मारी लागतात. खरंच कधी कधी वाटतं, कॉमेंट छान असे लिहून आपण गुन्हा केला की काय लगेच त्याच्यावर धन्यवाद काय येतं व तुम्ही फॉलो करत असलेल्या पौष्टला हे पण फॉलो करत आहे असं पाहात राहावं लागतं. अनावश्यक युद्धामध्ये शास्त्रांचा भडिमार होतो. एकीकडून झाला की दुसरीकडून होतो. तसंच काहीतरी दिवसभर लुटूपुटूची लढाई फेसबुकवर चाललेली असते, कंटाळवाणी.
लाईक देण्यामध्ये पाहिलंय, नाही पाहिले तरी आवडलं असं बिनधास्त ठोकून द्यायचं. कॉमेंट घ्यायची म्हणजे पुस्तकाचे परीक्षण केल्याप्रमाणे त्याला सविस्तर अभिप्राय द्यावा लागतो.
घटनादुरुस्तीप्रमाणे तुझ्या संरचनेत बदल करावा लागेल. तू अनेकांच्या व्यक्तिमत्त्वांचा आरसा आहेस. अनेकांसाठी आशेचा किरण आहेस. लोकं नाव घेतील असं काही तर कर, नावं ठेवतील असं नको.
तुझाच फेस.
