जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
शिवराम वाशीकर यांनी नंतर प्रभातसाठी ‘ज्ञानेश्वर’, ‘गोपाळकृष्ण’, ‘संत सखू’, ‘रामशास्त्री’ या चित्रपटांच्या पटकथा व संवाद लिहिले. त्यांनी लिहिलेले बहुतेक चित्रपट धार्मिक आणि पौराणिक आहेत. चित्रपटासाठी लेखन करताना वाशीकर यांचा अभ्यास सखोल आणि चौफेर होता. चित्रपटाच्या संपूर्ण विषयाचाच ते अभ्यास करीत. त्यांची भाषा साधी पण ठाशीव होती. त्यांच्या पटकथेत संयत विनोदाचाही शिडकावा असे.
June 28, 2022
शेख, फैयाज
काही व्यक्तींच्या अंगी चतुरस्र गुण असूनही त्यांना त्यांच्या योग्यतेचे दान पदरी पडायला उशीर लागतो. ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज शेख या अशांपैकीच एक! उत्तम गाणे, रूपसंपदा, अभिनय हे सर्व असूनही त्यांच्या या गुणसंपन्नतेचे म्हणावे तितके चीज झाले नाही.
आपण उत्तम गायिका-अभिनेत्री असूनही बऱ्याचदा आपल्या वाटय़ाला बदलीच भूमिका आल्या, याबद्दलची खंत त्यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या प्रदीर्घ कलासेवेची उशिरा का होईना, यथोचित दखल घेतली गेली. सोलापूरमध्ये आपल्या नाटय़कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या फैय्याज यांनी ‘गीत गायिले आसवांनी’ या नाटय़संपदेचे भावंड असलेल्या विजयश्री प्रॉडक्शनच्या नाटकाद्वारे मुंबईच्या नाटय़सृष्टीत पदार्पण केले. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘मत्स्यगंधा’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘पेइंग गेस्ट’ ते अलीकडच्या ‘मित्र’पर्यंत त्यांनी निरनिराळ्या पिढीतल्या आणि वेगवेगळ्या स्कूल्सच्या लेखक-दिग्दर्शकांकडे वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. संगीत नाटके, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या नाटकांतून त्यांनी काम केल्याने त्यांच्यावर एकच एक असा कोणताच शिक्का बसला नाही. गाण्यातही त्यांनी गजल, ठुमरी, लावणी, नाटय़संगीत असा चौफेर प्रवास केला. गायिका बेगम अख्तर यांच्या गंडाबंद शागीर्द बनण्याची संधी त्यांना चालून आली होती. परंतु त्यावेळी त्यांची नाटय़-कारकीर्द ऐन बहरात असल्याने ती सोडून लखनौला बेगम अख्तरांकडे गाणे शिकायला जाणे त्यांना शक्य झाले नाही. मात्र जेव्हा जेव्हा त्या मुंबईत येत त्यावेळी फैय्याज यांना गाणे शिकवीत. ‘कटय़ार’मधील झरिना तसेच ‘वीज म्हणाली धरतीला’तील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली अमीट नाममुद्रा उमटवली होती. ‘गुंतता हृदय हे’मध्ये कल्याणी साकारणाऱ्या फैय्याज यांनी ‘महानंदा’ चित्रपटात मानूची भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत केली होती. यातून त्यांच्या अभिनयाची रेंज कळून येते. त्यांना डबिंग मास्टरही म्हटले जाई. ‘जाणता राजा’मध्ये त्यांनी गाणे व निवेदन केले आहे. दादा कोंडके यांच्या ‘विच्छा’मध्ये साडेसातशे प्रयोगांत त्यांनी गाणी गायिली. ‘महानंदा’, ‘पैंजण’, ‘वजीर’, ‘दायरे’, ‘एक उनाड दिवस’ असे चित्रपटही त्यांनी केले. सी. रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदनमोहन, एस. डी. व आर. डी. बर्मन यांसारख्या संगीतकारांकडेही त्या गाणी गायल्या. पं. सी. आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलेल्या फैय्याजना पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्यासोबत केलेल्या नाटकांमुळे त्यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळाले. पुलंबरोबरही त्यांनी ‘वटवट’मध्ये काम केले होते. या सगळ्या वाटचालीत त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. जुन्या-नव्या सर्वच पिढय़ांमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या फैय्याज अजातशत्रू राहिल्या. आजही त्या त्याच तडफेने कलाक्षेत्रात कार्यरत आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नाव फैयाज शेख पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरात सहजपणे सामावून जाईल, असे व्यक्तिमत्त्व. मोठे डोळे आणि चेहऱ्यावर कायमचे स्मित. गळा अतिशय सुरेल. गायक कलावंत म्हणूनच कारकीर्द गाजावयाची. पण कलावंत म्हणूनच सतत रंगभूमीवर उभे राहण्याचे भाग्य मिळाले. फैयाज हे नाव कुणाही मराठी माणसाने उच्चारले तरी डोळ्यासमोर ‘कटय़ार काळजात घुसली’ मधील झरीनाच उभी राहणार. या कलावतीला मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार घोषित होणे,
ही मराठी रंगभूमीसाठी आनंदाची बातमी ठरली. गद्य आणि संगीत नाटकांत तेवढय़ाच तडफेने भूमिका साकारणाऱ्या फैयाज यांची रंगभूमीवरील कारकीर्द साडेचार दशकांची आहे. १९६५ मध्ये त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आजही त्या रंगभूमीवर अधूनमधून दर्शन देत असतात. या काळात त्यांनी केलेल्या एकूण प्रयोगांची संख्या चार हजारांच्या घरात जाणारी आहे. दौरे आणि कार्यक्रमांनी न थकणाऱ्या मोजक्या कलावंतांपैकी त्या आहेत. कटय़ार काळजात घुसली, हे त्यांचे गाजलेले नाटक तसेच ‘तो मी नव्हेच’, ‘अश्रुंची झाली फुले’, ‘मत्स्यगंधा’, ‘संशयकल्लोळ’ या नाटकातील त्यांच्या भूमिका स्मरणात राहणाऱ्या ठरल्या. ‘महानंदा’ या चित्रपटातील त्यांची प्रमुख भूमिका रसिकांच्या मनात घर करून राहिली आहे. किनारा, वादळ वारं, पेइंग गेस्ट, थँक्यू मिस्टर ग्लाड, सूर राहू दे, मी मालक या देहाचा, अंधार माझा सोबती, गुंतता हृदय हे, भटाला दिली ओसरी, वीज म्हणाली धरतीला, मैत्र अशा नाटकांमधील तर बावनखणी, संत तुकाराम, पंडितराज जगन्नाथ, होनाजी बाळा, संत गोरा कुंभार या संगीत नाटकांतील त्यांचे काम रसिकांना भावले. बालगंधर्वासारख्या संगीत सम्राटाने रंगभूमीला जो अभिजाततेचा दर्जा दिला, तो टिकवून ठेवण्यासाठी आजही जे प्रयत्न होत आहेत, त्यामध्ये फैयाज यांचाही वाटा आहे. आपल्या गळ्याने रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. संगीत रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी केलेली कामगिरीही महत्त्वाचीच म्हटली पाहिजे. रंगभूमीवर स्त्रियांनी काम करण्यास समाजाने मान्यता देण्यास विसावे शतक उजाडावे लागले. कमलाबाई गोखले, कमळाबाई बडोदेकर यांच्यासारख्या कलावंतांनी रंगभूमीवर भूमिका करून जी सांस्कृतिक क्रांती केली, त्यामुळे तर नंतरच्या काळात महिलांना जीवनाच्या इतर प्रांतातही प्रवेश करणे सुलभ झाले. हिराबाई बडोदेकरांनी संगीत रंगभूमीवर संशयकल्लोळ या नाटकात पहिल्यांदा अभिजात संगीताचा आविष्कार केला. त्यानंतरच्या काळात स्त्रियांना संगीताच्या मैफलीत मध्यभागी बसून गायन सादर करण्याची समाजमान्यता मिळाली. हिराबाईंनी केलेल्या या क्रांतीला सगळ्याच कलावंतांनी सादर प्रणाम केला पाहिजे. फैयाज या अशा देदीप्यमान परंपरेशी आपले नाते सांगणाऱ्या कलावती आहेत. संगीत रंगभूमीवर काम करत असतानाच त्यांनी पाश्र्वगायनाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या आणि रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या वसंत सबनीसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ासाठी आणि ‘जाणता राजा’ या महानाटय़ासाठी फैयाज यांनी पाश्र्वगायन केले होते. पाठराखीण आणि घरकुल या मराठी आणि बावर्ची, प्रेमपर्वत, अचानक, रंगबिरंगी, आलाप, गुंबीश, कलयुग का कृष्ण, धरतीपुत्र यांसारख्या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गीतेही रसिकमान्य झाली. एचएमव्हीने त्यांनी गायलेल्या ‘हुस्नेगजल’ या ध्वनिमुद्रिकेलाही रसिकांनी पसंतीची पावती दिली. कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या ‘जोगिया’ या काव्यसंग्रहातील कवितांचे संगीतकार सी. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले वाचन तर रसिक आजही आठवतात. सोलापूरचे पंचवाडकरबुवा यांच्याकडे संगीताचे शिक्षण सुरू केल्यानंतर पं. सी. आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव कुळकर्णी, बेगम अख्तर यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे मिळाले. मराठी रंगभूमीवर आपल्या कलेने रसिकांना सतत आनंद देणाऱ्या या कलावतीचे मनापासून अभिनंदन!
------------------------------------------------------------------------------------------------------
ज्येष्ठ गायिका अभिनेत्री फैयाज
सांगलीचा मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार नुकताच ज्येष्ठ गायिका अभिनेत्री फैयाज यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्
ताने या गुणी अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध...
वीज म्हणाली धरतीला नाटकात जुलेखाची भूमिका करणा - या फैयाजबाईंच्या तोंडी एक गाणं होतं-
चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी...
मात्र या चार पक्षिणींमधली एक राजहंसी होती, तर दोघी हंसी होत्या, चौथीला मात्र आपण कोण तेच ठाऊक नव्हतं. ती तना-मनाने त्यांच्याबरोबर होती. पण तोपर्यंत तिला आपल्या अस्तित्त्वाची ओळखच झालेली नव्हती. ती स्वत:ला त्यांची सावलीच समजत असे. अन् एके दिवशी अकल्पित घडतं...
बाण आला तो कोठुनी, जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकिळा...
फैयाजबाईंची कथा यापेक्षा वेगळी नाही. फरक एवढाच होता की, गाण्यातल्या कोकिळेला स्वत:ची जात शेवटपर्यंत कळली नव्हती. फैयाजबाईंना मात्र आपली कोकिळेची जात कधीच कळली होती. पण त्यांच्या आजुबाजूला कावळ्यांचा जमाव एवढा मोठा होता की, त्यांनी त्या कोकिळेला ऐन उमेदीत स्वतंत्रपणे गाण्याचं-उडण्याचं स्वातंत्र्य कधी दिलंच नाही.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वषीर् फैयाजबाई मुंबईत आल्या. हैदराबादजवळ वरंगळला असलेली बाईंच्या वडिलांची चादरीची फॅक्टरी बंद पडली आणि कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्या सोलापूरहून मुंबईत आल्या. अभिनयाची उत्तम जाण आणि गाण्या-नृत्याची आवड हेच त्यांच्याजवळचं तेव्हा भांडवल होतं. त्या भांडवलावरतीच 'नाट्यसंपदा' या नाट्यसंस्थेने बाईंना पाचशे रुपयांच्या नोकरीवर बांधून घेतलं. बाई पगारातले चारशे रुपये गावी पाठवायच्या आणि शंभर रुपयात कसंबसं स्वत:चं भागवायच्या. बाईंची हीच नड 'नाट्यसंपदा'ने नेमकी हेरली आणि तब्बल पंधरा वर्ष बाईंना आपल्याच कंपूत अडकवून ठेवलं. मात्र, एवढ्या वर्षांत 'कट्यार काळजात घुसली'मधील झरिना, 'अश्रूंची झाली फुले'मधील नीलम अशा दोन-तीन महत्त्वाच्या भूमिका सोडल्या, तर बाईंना कुठल्याच फ्रेश भूमिका मिळाल्या नाहीत. पंधरा वर्षं त्यांना केवळ रिप्लेसमेंटच्या भूमिकाच दिल्या गेल्या.
मात्र, कोंबडं झाकलं, तरी सूर्य उगवायचा राहात नाही, याच न्यायाने फैयाजबाईंचा उदयकाळ व्हायचा राहिला नाही. त्यांच्या अभिनयगुणाची, गानकौशल्याची झलक दाखवण्यासाठी 'कट्यार'सारखं नाटक पुरेसं होतं. आणि बाईंनी या संधीचं सोनं केलं. यातल्या त्यांच्या झरिनाच्या भूमिकेचं आणि गाण्यांचं पं. रविशंकर, जयदेव, कुमार गंधर्व, सी. रामचंद अशा बड्या मंडळींनी दिलखुलास कौतुक केलं. अर्थात याचं श्रेय फैयाजबाईंनी कायम नाटकात खाँसाहेबांचं काम करणाऱ्या वसंतराव देशपांडे आणि नाटकाला संगीत देणाऱ्या पंडित जितेंद अभिषेकीबुवांनाच दिलं आहे. कारण त्यांच्यामुळेच ही नामवंत मंडळी नाटक बघायला आलेली होती.
पण या नाटकाने फैयाजबाईंचा जणू पुनर्जन्म झाला. तब्बल सतरा वर्षं या नाटकाचे अखंड प्रयोग सुरू होते. वसंतराव देशपांडेंचं निधन झालं, तेव्हाच त्याचे प्रयोग थांबले. पण तोपर्यंत मराठी व्यावसायिक रंगभूमीला आणि उतरती कळा लागलेल्या संगीत रंगभूमीला एक गुणवान गायक अभिनेत्री गवसली होती. त्यामुळेच नंतरच्या काळात फैयाजबाईंना त्यांच्या गाण्याचा कस लागेल, अशी वीज म्हणाली धरतीला, संत गोरा कुंभार, राजहंसी प्रीत अशी एकाहून एक सरस नाटकं मिळाली आणि बाईंनी वेळोवेळी आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं.
झरिनाच्या भूमिकेत त्यांनी दाखवलेल्या गाण्याच्या तयारीमुळे आणि त्यांच्या खास पत्तीदार आवाजामुळेच जयदेव, सी. रामचंद यांनी त्यांच्याकडून काही गाणी गाऊन घेतली. सी. रामचंदांनी तर ग. दि. माडगूळकरांना 'गीत गोपाल'ची निमिर्ती करायला सांगून त्यातही बाईंकडून काही गाणी गाऊन घेतली. परंतु गीत रामायणाच्या प्रभावळीत 'गीत गोपाल' झाकोळलं गेलं.
अर्थात, गाणं हे काही बाईंचं करियर नव्हतं. पण त्यांच्या विशिष्ट आवाजामुळे त्यांनी गाण्यातच करियर करावं, असं अनेकांना वाटायचं. त्यापैकीच एक म्हणजे ठुमरी-गझलसम्राज्ञी बेगम अख्तर. अख्तरीबाईंशी फैयाज यांची भेट वसंतराव देशपांडे यांनीच घडवली. मात्र या भेटीचं रूपांतर आपुलकीच्या नात्यात कधी झालं, ते फैयाज आणि अख्तरीबाईंनाही कळलं नाही. नंतर बेगम अख्तर जेव्हा जेव्हा मुंबईत येत, तेव्हा तेव्हा फैयाजबाईंना बोलावून घेत. आपल्या कार्यक्रमात त्यांना साथीला बसवत. आज फैयाजबाई बेगम अख्तर यांच्या गझला तेवढ्याच सशक्तपणे गातात, ते यामुळेच!
पण फैयाजबाईंनी आपलं गाणं आवडीच्या पातळीवरच ठेवलं. कारण एव्हाना नाटक, सिनेमा, दूरदर्शनमालिका अशा वेगवेगळ्या माध्यमांचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले होते. 'महानंदा' चित्रपटाच्या निमित्ताने बाईंच्या दमदार अभिनयाची चुणूक रसिकांना पाहायला मिळालीच. पण पुलं, श्रीराम लागू, विक्रम गोखले यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं.
त्याच लौकिकावर त्यांना नुकताच मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारामुळे बहुधा प्रथमच फैयाज यांच्या कर्तृत्वाची योग्य दखल घेतली गेलेली असावी. अन्यथा आजवर त्यांची वाटचाल एक होती पक्षिणी अशीच होती...
August 5, 2017
सर्वस्वी प्रतिकूल परिस्थीतीला तोंड देत विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी कारखान्या’ची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली आणि या कारखान्यातून साखर उत्पादन सुरू झाले. त्यावेळचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले. प्रवरानगराचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो. पहिली अकरा वर्षे विखे−पाटील यांच्या आग्रहामुळेच डॉ. धनंजयराव गाडगीळ कारखान्याचे अध्यक्ष झाले. तर ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून काम पहात असत.
April 27, 2022
त्यांची अनेक देवतांच्या गाण्यांची कॅसेटसू प्रसिद्ध झाली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत गंगू बाजारला जाते,औदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, बायको आली बदलून, अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या इत्यादी चित्रपटात गाणी लिहिली.
April 11, 2022
विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत प्रा. बी. टी. देशमुख यांचा पराभव झाल्याने, प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळीचा आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या संसदीय संघर्षांचाही पराभव झाला आहे. भाऊराव तुळशीरामजी उपाख्य बी. टी. देशमुख नावाची चळवळ १९६० साली अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आणि पाहता पाहता या चळवळीने राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात संचार सुरू केला.
विद्यार्थी असतानाच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बी. टी. सहभागी झाले. बी. टीं.च्या घरी अठराविश्वे दारिद्रय़ होते. पण, तरूण वयापासूनच परिस्थितीला शरण न जाता संघर्षरत राहण्याची बी.टीं.ची वृत्ती होती. शिक्षण आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अशा दोन्ही आघाडय़ांवर सक्रिय राहण्यासाठी पोट किमान भरलेले असावे, ही मूलभूत गरज होती आणि ती भागवण्यासाठी भाऊराव नावाचा हा युवक चक्क कंपोझिटरचे म्हणजे छापखान्यात अक्षरे जुळवण्याचे काम करत असे. कंपोझिटरची ही नोकरी करत करतच राज्यशास्त्र या विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. तो काळ शिक्षकी पेशासाठी कमी वेतन आणि प्रामाणिकपणे विद्यादानाचा होता. विद्यादान करणाऱ्यांना चरितार्थासाठी येणाऱ्या अडचणी स्वत: अनुभवताना बी. टीं. मधला चळवळ्या जागा झाला. त्यातूनच महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठी विदर्भभर आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नेतृत्वासाठी नैतिक पातळीवर असणारे स्वच्छ चारित्र्य त्यांच्याजवळ होतेच. त्यामुळे शिक्षक चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे आपसूकपणे चालत आले. नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाचे (नुटा) १९७३ पासून आजपर्यंत ते अध्यक्ष आहेत. सलग एखाद्या चळवळीचे ३७ वर्षे अध्यक्षपद भूषवले जाण्याचा हा विक्रमच असावा! ‘नुटा’चे अध्यक्षपद सांभाळत असतानाच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे अपरिहार्यपणे आले. चळवळी उभारतानाही विद्यादानाच्या व्रतापासून बी. टी. क्षणभरही ढळले नाहीत. प्राध्यापकपदाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होईपर्यंत म्हणजे ३०-३२ वर्षे बी.टी. नियमितपणे शिकवत असत. केवळ रस्त्यावर संघर्ष करून शिक्षकांचे प्रश्न सोडवता येणार नाही, म्हणून १९८० साली बी.टीं.नी विदर्भ पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेत प्रवेश केला. अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी बी.टीं.नी विधिमंडळात सर्व संसदीय अस्त्रांचा वापर केला. हे विद्यापीठ स्थापन झाल्यावर म्हणजे १९८६ मध्ये हा मतदारसंघ अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. या मतदारसंघातून सलग पाच वेळा बी.टी. विधान परिषदेवर विजयी झाले. ३० वर्षांच्या संसदीय जीवनात त्यांची प्रतिमा अभ्यासू आमदार म्हणून राहिली. शिष्टाचाराचा, वर्तनाचा कोणताही तोल ढळू न देणारा आणि तरी अत्यंत आक्रमक आमदार म्हणून बी. टी. देशमुख यांची कारकीर्द तेजस्वी राहिली, तशीच ती निष्कलंकही राहिली. याच संयत आक्रमकतेच्या जोरावर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यात बी.टीं.ना यश आले. एखाद्या विषयावर बी. टी. बोलायला लागले तर संपूर्ण सभागृहात पूर्ण शांतता असे. दहा-बारा वर्षांत बी.टी. आणि नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सभागृहात विदर्भाच्या अनुशेषाच्या निवारणासाठी जो ‘संसदीय संघर्ष’ उभारला गेला, त्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल. विदर्भाच्या विकासाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना देशमुख-गडकरी या दुकलीने अक्षरश: सळो की पळो करून सोडले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर गडकरी दिल्लीला गेले आणि विकासाच्या संसदीय लढाईची जबाबदारी एकटय़ा बी.टीं. वर आली. एकाच वेळी संसदीय आणि उच्च न्यायालय अशा दोन पातळ्यांवर एकहाती ही लढाई बी.टी. लढत होते. बी.टीं.च्या पराभवामुळे विधान परिषदेतील या लढाईचे नेतृत्वच संपले आहे, असे नव्हे तर या लढाईची धार अतिशय बोथट झाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील बी.टी. देशमुख यांच्या पराभवाचा अर्थ इतका असा व्यापक आहे आणि विदर्भाचे केवढे मोठे नुकसान झालेले आहे, हे स्पष्ट करणारा आहे. बी.टी. देशमुख तन आणि मनाने चळवळे आहेत. वयाच्या सत्तरीतही चैतन्याने फुललेलेच आहेत. ते हार मानणार नाहीत. आता पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरू करतील. त्यांच्या पुढच्या लढाईला शुभेच्छा!
August 5, 2017
कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कविवर्य राजा बढे
राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. मा.राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे मा. राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. मा.राजा बढे यांचे जन्म नागपूरचा. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र'मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले. १९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत ‘अंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं. बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली, तर ‘चांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली. मा.राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत. १९३५ ते १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे. मा.राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत मा.बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्या ‘विविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. मा.राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज ‘किती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. "गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली. शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे. मा.राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, हे माहित पण नसेल.
त्यांनी एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.
तेव्हा आणि आता...
एक राजा -
टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..
दुसरा राजा -
टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा..
आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..
ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
"आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!''
राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
राजा बढे यांचे कवितासंग्रह
‘हसले मनी चांदणे', ‘माझिया माहेरा जा', ‘क्रांतिमाला', ‘मखमल', ‘मंदिका'.
February 1, 2017
गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘गुलमोहर’, ‘मानिनी’, आणि ‘अडगुळे मडगुळे’ या चित्रपटांत तिने काम केले आहे.
June 25, 2022
रामदास बंडू आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री आहेत.
April 15, 2010
आज ११ नोव्हेंबर..आज यशवंत दत्त यांची पुण्यतिथी.
आई - वडील यांच्याकडून आलेला अभिनयाचा वारसा, उपजत अभिनयकौशल्य या बळावर यशवंत दत्त या माणसाने मराठी नाटक आणि चित्रपट यांत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठीनंतर त्याला हिंदीतही चांगली संधी चालून आली होती. नकला हा यशवंत दत्त यांचा स्थायीभाव होता. शाळेत असल्यापासून ते शिक्षकांच्या इतक्यात हुबेहूब नकला करत असत, अर्थात, पुढे नकला करण्याची सवय त्यांच्या कामी आली. "थंडर्स' नावाच्या ऑर्केस्ट्रात ते काम करत असत. निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. यशवंत दत्त या हरहुन्नरी अभिनेत्याची ती सुरवात होती. यशवंत दत्त यांच्या आई - वडिलांनी चित्रपटात व नाटकांत कामे केली होती. वडिलांनी तर "गरिबांचे राज्य' या नावाचा चित्रपट काढला होता; पण दुर्दैवाने या चित्रपटात त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. यशवंत दत्त यांना गरिबीचे चटके सोसावे लागले. आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे वडिलांचा यशवंत दत्त यांनी नाटक व चित्रपटसृष्टीत जाण्यास विरोध होता; पण अखेर त्यांनी यशवंत दत्त यांना परवानगी दिली आणि मार्गदर्शनही केले. घरच्या गरिबीवर मात करताना यशवंत दत्त यांनी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली, पानाच्या गादीवर काम केले, अखेर "फिलिप्स' मध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले. यशवंत दत्त यांनी आपल्या अभिनयक्षमतेच्या जोरावर या कंपनीला विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांतून विविध प्रकारची बक्षिसे मिळवली. यशवंत दत्त यांच्यामुळे फिलिप्स कंपनीचे नाव कलाक्षेत्रात गाजत होते. राज्य नाट्यस्पर्धेत "अडीच घरं वजिराला' हे नाटक पुणे केंद्रातून निवडले गेले, मग मुंबईच्या नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलवणी येऊ लागली. दत्ता भट यांच्यासारख्या नामवंत अभिनेत्याने त्यांना आपल्याबरोबर काम करण्यासाठी बोलावले. "गरिबी हटाव' या नाटकात यशवंत दत्त यांनी चुणूक दाखवून दिली. नंतर यशवंत दत्त यांची तीन नाटकं आली. यशवंत दत्त यांना नाव मिळवून दिले ते "नाथ हा माझा' या नाटकाने. या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका मस्त उभा केला, की लोकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हे नाटक अचानक बंद पडले, पुन्हा काही काळाने ते परतले ते "वेडा वृंदावन' या नाकातून. त्यानंतर सुरू झाला यशवंत दत्त यांचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास. "सुगंधी कट्टा', "दगा'मध्ये त्यांनी खलनायक, नायक रंगवला. मराठी चित्रपटसृष्टीला तेव्हा एका चांगल्या नायकाची गरज होती, ती पोकळी यशवंत दत्त यांनी भरून काढली. "भैरू पैलवान की जय', "दौलत', "फटाकडी', "आपली माणसं', "आयत्या बिळात नागोबा', "पैजेचा विडा' आदी चित्रपटांतून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. "शापित'मध्ये केलेल्या भूमिकेची दखल देशपातळीवर घेतली गेली.
चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळत असताना त्यांनी नाटक करणे सोडले नाही. प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे "नटसम्राट'मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. वसंत कानेटकर यांनी बाबा आमटे यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुध्दा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “सरकारनामा” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे. यशवंत दत्त यांनी "शापित" तसंच "संसार" या चित्रपटातून साकारलेल्या भुमिकांना "राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
नाटक, चित्रपट यामध्ये मग्न असलेल्या यशवंत दत्त यांच्यामध्ये एक हळुवार कवी लपलेला होता. यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे. मा.यशवंत दत्त यांचे ११ नोव्हेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 11, 2016
त्याचे वडिल सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे, देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला वेरोशिओ या प्रसिद्ध चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला, शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने वेरोशिओ कडे केला. याचवेळी त्याने स्वत: हुन इतर शाखांचाही अभ्यास चालु ठेवला. चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्र ही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लूव्र संग्रहालय येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसऱ्या चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणुन ओळखतात.
April 15, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti