जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
दत्ता वाळवेकर हे फक्त मराठी भावगीत गायक आणि संगीतकार नव्हते तर उत्तम समीक्षक, शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, सुलेखनकार, छायाचित्रकार सुध्दा होते.
त्यांचा जन्म ३० मार्च १९२८ रोजी बेळगाव येथे झाला. १९४८ च्या सुमारास मास्टर दत्ता या नावाने ते मेळयामध्ये काम करीत. बापूराव माने यांच्या बरोबर त्यांनी ’’युध्दाच्या सावल्या’’, ’’लग्नाची बेडी’’ अशा नाटकातून भूमिका केल्या. याच काळात त्यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व, सीताकांत लाड अशा मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला.
रविकिरण मंडळाच्या सदस्यांनी त्या काळात कविता गाण्यास सुरूवात केली होती. जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, गजानन वाटवे यांनी काव्यगायनास आरंभ केला. मास्टर दत्ता यांनी याच काळात भावगीत गायन सुरू केले. गजानन वाटवे यांना गुरू मानून त्यांनी विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम सादर केले. आकाशवाणीच्या पुणे, मुंबई केंद्रावर त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले.
दत्ता वाळवेकर यांनी गायलेल्या गीतांची पहिली ध्वनिमुद्रिका ‘रिगल’ कंपनीने १९४९ मध्ये काढलेली होती. अत्यंत शुध्द शब्दोच्चार आणि गोड आवाज ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. गीताचा अर्थ श्रोत्यांपर्यंत नेण्यासाठी ते भावपूर्ण उच्चार करीत. त्यांच्या अर्थवाही गाण्यामुळे श्रोते प्रभावित होत. करमणुकीचे कोणतेही साधन नसल्यामुळे जाहीर कार्यक्रम हेच लोकांना आवडत असत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा वेळी मा.वाटवे, मा.नावडीकर आणि मा.दत्ता वाळवेकर या त्रिकुटाने राज्यातील अनेक गावात आपल्या गाण्याने लोकांना मोहित केले.
नव्या पिढीमधील गायकांना दत्ता वाळवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन होत असे. त्यांनी ’’पुष्पविण कल्पतरू’’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले. ते श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केले. खत्री भाषेच्या अभ्यासावर त्यांनी लिहिलेले ’’क्षात्र बोली’’ हे पुस्तकही गाजले. १९७६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना खत्री भाषेवरील संशोधनासाठी पी. एच. डी. प्रदान केली.
पुणे साहित्य संमेलनात तसेच कराड नाट्य संमेलनात त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पुण्यात २००८ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात जीवनभर संगीत क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल विषेश गौरव करण्यात आला.
दत्ता वाळवेकर यांचे १६ मार्च २०१० रोजी निधन झाले.
दत्ता वाळवेकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली दुर्मिळ गीते, त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमांची दृक्-श्राव्य मुद्रणे, वेगवेगळ्या वाहिन्यांवर झालेल्या त्यांच्या मैफली, विविध ठिकाणी झालेल्या मुलाखती हे http://www.dattawalvekar.com या संकेतस्थळावर आपण बघू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दत्ता वाळवेकर यांची गाजलेली काही गाणी.
सांग पोरी सांग, हे काय गडे, गोपाल गोपाल नाचलो नानापरी गोपाल, माइया स्वप्नात आला सखा, काय झालं विचारू नका, जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे, का ठेविल्या इथे खुणा, आठविती मज पुन्हा पुन्हा, स्वप्नातल्या मिठीचे रोमांच अजुनी गात्री
https://youtu.be/4wePRfs_uqU
https://youtu.be/u4Jp5nUbQQc
https://youtu.be/QPAT236XS5k
March 18, 2017
मराठी विषयाचे प्राध्यापक असणार्या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत आपलं लेखन पोहोचवलं. “चित्रा” या साप्ताहिकाचे संपादक म्हणून ही अनंत काणेकरांनी काम पाहिलं.
April 4, 2019
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार चळवळ ज्या प्रामाणिक आणि निस्वार्थी पुढाऱ्यांच्या जीवावर फोफावली त्या पुढाऱ्यांमध्ये किसन तुळपुळे यांचा समावेश अपरिहार्यपणे करावा लागेल. किंबहुना त्यांच्या समावेशाशिवाय या पुढाऱ्यांच्या यादीला कुठेतरी अपूर्णपणा येईल. महात्मा गांधींनी १९४५ मध्ये अहमदाबादला जाऊन ‘मजदूर महाजन’ या कामगार संघटनेचे काम करण्याचा दिलेला सल्ला धुडकावणाऱ्या तुळपुळेंनी नंतर अहमदाबादमधील सूत गिरणी कामगारांसाठी ‘मिल मजदूर सभा’ स्थापन केली.
अर्थात कामगार हा त्यांचा प्राण होता आणि ‘मिल मजदूर सभा’ हा श्वास होता. पुण्यामध्ये १९२१ मध्ये जन्म झालेल्या किसन तुळपुळ्यांची मुंबई ही कर्मभूमी होती. १९४१ मध्ये मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्यांनी तयारी केली. त्याचबरोबर खडकीच्या दारूगोळा कारखान्यात त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.
जयप्रकाश नारायण, एसेम जोशी, साने गुरूजी, राम मनोहर लोहिया आदी स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत नेते त्याकाळातील तरूणांचे आदर्श होते. तुळपुळेही त्याला अपवाद नव्हतेच. या नेत्यांच्या ते संपर्कात आले. चळवळीसाठी काम करीत असतानाच त्यांना १९४३ मध्ये अटक होऊन दोन वर्षांची शिक्षा झाली. या दोन वर्षांचा अनुभव त्यांनी आपल्या ‘माझी जेलयात्रा’ या पुस्तिकेत नोंदवला आहे. तुरूंगातून सुटल्यावर ते मुंबईला कामगारांच्या चळवळीकडे आकर्षित झाले. साम्यवाद्यांच्या ‘गिरणी कामगार युनियन’मध्ये अनुभव घेतल्यावर ते ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’त गेले.
राजकीय मुद्दय़ांवर संघ फुटल्यावर ते साथी अशोक मेहतांबरोबर बाहेर पडले आणि ‘मिल मजदूर सभे’त गेले. या संघटनेचे ते पहिले खजिनदार होते. पण नंतर त्यांनी तब्बल २७ वर्षे या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. ही संघटना म्हणजे त्यांचा खरोखरच श्वास होता. दर बुधवारी या संघटनेच्या दादर येथील कार्यालयात जाऊन सहकाऱ्यांशी गप्पा मारल्याखेरीज त्यांना चैन पडत नसे. हा त्यांचा नेम शेवटपर्यंत होता. १९५८ मध्ये त्यांची निवड वेतन मंडळावर झाली. त्याचवर्षी अमेरिकेत झालेल्या ‘लीडर एक्स्चेंज’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली.
राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांच्याशी त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. १९६८ मध्ये तुळपुळ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘मिल मजदूर को-ऑप. क्रेडीट सोसायटी’ स्थापन करण्यात आली. कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यामध्ये या सोसायटीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भविष्य निर्वाह निधीच्या मध्यवर्ती मंडळावर नियुक्ती होताच त्यांनी कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची व्यवस्था केली. आणीबाणीच्या काळात त्यांना या मंडळावरून दूर करण्यात आले पण १९७७ नंतर पुन्हा त्याची नियुक्ती करण्यात आली. केवळ कामगारांच्या संघटनांमध्ये त्यांनी काम केले नाही तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.
कामगार आणि मालक यांच्यात नेहमी सौहार्दाचे वातावरण असले पाहिजे, न्याय्य मागण्यांसाठी मिल बंद करायची नाही तर ती सुरू ठेवून आपल्या मागण्यांसाठी लढा द्यायचा, यावर त्यांचा नेहमी भर असे. रेशम उद्योगातील कामगारांचा लढा लढताना ‘अशोक सिल्क मिल’ आणि एल्डी व्हेल्वेट अॅण्ड सिल्क मिल’ या दोन बंद गिरण्यांचा प्रश्न त्यांनी याच पद्धतीने लढवला. पाच वर्षे लढा दिल्यावर त्यांनी त्या पुन्हा सुरू केल्याच पण कामगारांची थकीत देणीही मिळवून दिली.
५५ वर्षे कामगार संघटनेत काम केल्यावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सल्लागाराची भूमिका स्वीकारली. किसन तुळपुळे यांनी कामगार चळवळीवर काही पुस्तकेही लिहिली आहेत. कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम करीत राहणाऱ्या तुळपुळ्यांची श्रीमंती ही त्यांच्या सहकाऱ्यांच्या संख्येत होती. त्यांचा साधेपणा सर्वानाच भावणारा होता.
सच्छिल, निस्वार्थी आणि प्रामाणिक असे दुर्मिळ गुण त्यांच्यात होते. कामगारांप्रती असलेली त्यांची तळमळ त्यांच्या सहकाऱ्यांना कायम लक्षात ठेवणारी आहे. मरगळलेल्या कामगार चळवळीला संजीवनी देण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड अखेर ५ सप्टेंबर रोजी विसावली.
August 5, 2017
अभिनेत्यासोबतच ‘महाभारत’, ‘तू तू मैं मैं’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, वागळे की दुनिया यांसारख्या मालिकांमध्ये सुमीत राघवन यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांच्या भूमिकेत आपल्याला दिसले होते. मराठी नाटकं, सिनेमांसोबतच हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये सुमीत राघवन यांनी स्वतःची वेगळी छाप सोडली आहे.
April 22, 2022
लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला.
सध्या मराठी चित्रपट सृष्टीतलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे.
पुणे जिल्ह्यातील, जातेडे गावाच्या, शेतकरी कुटुंबातील प्रवीण तरडे यांनी एमबीए आणि पुढे आयएलएस महाविद्यालयातून विधी शाखेची पदवी घेतली आणि पुढे एक नोकरी देखील सुरु केली. पण मुळचा कलोपासक प्रवीण तरडे तिथे रमलेच नाही. घरी, थिएटर किंवा चित्रपटसृष्टी संदर्भातली कोणतीही पार्श्वभूमी नसतांना देखील प्रवीण तरडे यांची आवड त्यांना आपोआप ह्या क्षेत्रात घेऊन आली. सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत.
प्रवीण तरडे यांचे लहानपणापासूनच, बोलणं खूप प्रभावी होतं. कॉलेज मध्ये असतांना १९९७ मध्ये प्रवीण तरडे यांनी पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पातळीवरच्या वक्तृत्त्व स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या प्रभावी वक्तृत्त्वाने नुसती ती स्पर्धा गाजवलीच नाही तर जिंकली सुद्धा, तेही राष्ट्रपतींच्या हातून प्रथम क्रमांक घेऊन! त्यांनी यशवंतराव मोहिते महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली. पुरुषोत्तममध्ये – लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी सर्व बक्षिसे घेऊन ते प्रसिद्धीच्या झोतात आले. पुढे त्यांनी अनेक एकांकिका केल्या. शिवाय अनेक events आणि अनेक मालिकांचं बहारदार लेखन केलं. पहिल्यांदा प्रवीण तरडे यांनी ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी लिहिलं. ह्या मालिकेसाठी प्रवीण तरडे यांनी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली! पुढे ‘पिंजरा’, ‘अनुपमा’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘तुझं माझं जमेना’, ‘असं हे कन्यादान’ अश्या अनेक यशस्वी मालिका प्रवीण तरडे यांनी लिहिल्या. अनेक चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’, ‘मुळशी पॅटर्न’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. मग चित्रपटाच्या लेखनाचं आणि दिग्दर्शनाचं – शिवधनुष्य त्यानं उचललं आणि पेललं देखिल! ‘देऊळबंद ‘ ह्या मराठी चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शन आणि आपल्या अभिनयानं त्यानं मराठी चित्रपट सृष्टीला ‘देऊळबंद’ सारखा सुपरहिट चित्रपट दिला. ‘स्टॅंडबाय’, ‘कुटुंब’, ‘अजिंक्य’, ‘पितृऋण’, ‘रेगे’, ‘सुरक्या’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ आणि ‘देऊळबंद २’ व ‘मुळशी पॅटर्न’ हे चित्रपट त्यांचे गाजले आहेत.
दरम्यान, प्रवीण तरडे यांनी पुण्यातील कलाकारांना घेऊन, ‘एक सूचक बाकी वाचक’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. ही संस्था पुस्तक वाचणाऱ्या हौशी लोकांसाठी आहे. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या ह्या संपूर्ण योगदानमुळे प्रवीण तरडे यांची ‘भरत नाट्य संशोधन मंदिराच्या’ नियामक मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली आहे. प्रवीण तरडे यांच्या प्राविण्यांचे कौतुकही वेळोवेळी झाले आहे.
प्रवीण तरडे यांना आत्तापर्यंत २५० च्या वर पारितोषिके, मिक्ता अवॉर्ड, संस्कृती कला दर्पण पुरस्कार आणि दोन वेळा मानाचा झी गौरव असे अवॉर्ड मिळाले आहेत, प्रवीण तरडे त्यांच्या यशाचं श्रेय आई-वडील, व पत्नी स्नेहल आणि त्याच्या मित्रपरिवारालाही आवर्जून देतात.
प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल या सुद्धा पुरुषोत्तम स्पर्धेत, सर्वोकृष्ट अभिनेत्री म्हणून दोनदा सन्मानित झाल्या आहे.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
November 11, 2021
ब्रूसलीच्या वडिलांनी ब्रूसलीच्या वयाच्या १८ वर्षी हाँगकाँग सोडण्याचा निर्णय घेतला. नाइलाजाने घेतलेला हा निर्णय मात्र ब्रूस लीचं आयुष्यच बदलवणारा ठरला. युनिव्हसिर्टी ऑफ वॉशिंग्टनमध्ये ड्रामा विषयात डिग्रीचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली. शिक्षणाची गाडी सुरू असतानाच त्याच्यातलं मार्शल आर्ट्स मात्र त्याला स्वस्थ बसू देईना. अमेरिकेतच त्याने मार्शल आर्ट्स शिकवायला सुरूवात केली, तेव्हा त्याचं वय होतं १८.
July 20, 2021
सत्य आणि अहिंसा या दोन चिरंतन तत्त्वांच्या अंमलबजावणीने ‘सर्वोदय’ होईल ही महात्मा गांधीजींची कृतिशील जीवननिष्ठा विनोबांच्या जीवनाचे शक्तिशाली अधिष्ठान होते.
September 11, 2021
हेमंत गोविंद यांना स्वत:च्या लहानपणापासून समाजातील गरीब तसंच उपेक्षित जनतेची सेवा करण्याचे ध्येय बाळगले होते. वडिलोपार्जित राजकारणाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे राजकारणात सुरूवातीची काही पाऊले टाकणे त्यांना फारसे जड गेले नसले, तरीदेखील गोरगरीबांच्या मनामध्ये विश्वासाची व प्रेमाची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी त्यांनी निश्चितपणे कष्ट केले आहेत. समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी त्यांची नेमणूक करण्यात आली, यावरून त्यांनी दुर्बल समाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान ध्यानात येते. फेब्रुवारी २००७ मध्ये ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत व जिल्हा परिषदेवर निवडून आले. ४ डिसेंबर २००७ रोजी झालेल्या पदाधिकारांच्या निवडणुकीत त्यांना सभापती समाजक्ल्याण समिती या पदावर काम करण्याची संधी मिळाली. या पदावर कार्यरत असताना त्यांनी ग्रामविकासाच्या अनेक योजना राबवल्या. लघुउद्योग योजनेस मदत म्हणून ७ लाखांवर अधिक खर्च करण्यात आला तर मागासवर्गीय महिला लाभार्थ्यांना शिलाई मशीन पुरविण्यासाठी २२ लाखांवर अधिक खर्च करण्यात आला. अनुदानित वस्तिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणे, तसेच त्यांना “नाईट ड्रेस” पुरविणे, वस्तीत जोडरस्ते बांधणे,सौरऊर्जा प्रकाश योजना राबविणे, महिला बचत गटांना साहाय्यक अनुदान, स्नानगृहे व शौचालय बांधणी, मागासवर्गीयांना घरे बांधणीसाठी किंवा दुरूस्तीसाठी अर्थसाहाय्य करणे अशा अनेक योजना सुरू करण्यात आल्या. इयत्ता ५ वी ते ९ वी च्या गरजू मुलांना सायकली पुरविण्यात आल्या, तर आर्थिक दृष्ट्या मागसांना घरघंटी पुरविण्यात आल्या आहेत त्यासोबतच अनेक कल्याणकारी कामे हेमंत गोविंद यांनी आजवर केली आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. त्यांचा जन्म ३ मार्च १९५५ रोजी झाला. महाविद्यालयीन काळापासूनच त्यांच्यातील तल्लख विनोदबुद्धीचा प्रत्यय परिचितांना येत होता. त्या काळात समाजातील भ्रष्टाचारावर विनोदाच्या माध्यमातून कोरडे ओढणारी त्यांची पथनाटय़े लोकांना हसवता हसवता अंतर्मुख करून गेली.
नंतर चंदीगढच्या ‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून ते रुजू झाले आणि राजकीय व सामाजिक विसंगतींवर बोट ठेवणारी त्यांची अर्कचित्रे व व्यंगचित्रे अत्यंत लोकप्रिय झाली. त्याच काळात ‘दूरदर्शन’ने त्यांचे लक्ष वेधून घेतले. व्यापक लोकसंपर्काची या माध्यमाची ताकद त्यांना खुणावत होती आणि या माध्यमातला ‘फ्लॉप शो’ हा त्यांचा पहिलावहिला कार्यक्रम आजही ‘हिट शो’ म्हणूनच गणला जातो. प्रमुख भूमिकेत भट्टींबरोबर त्यांची पत्नी सविता आणि दुसरे विनोदवीर विवेक शक अशी तीनच पात्रे असलेला हा अत्यंत कमी बजेटचा कार्यक्रम अवघ्या दहा भागांचा होता पण या कार्यक्रमाने समाजातील भ्रष्टाचार व वैगुण्यांवर हसवता हसवता असे मार्मिक भाष्य केले की आजही तो लोकांच्या लक्षात आहे. त्यानंतर ‘उल्टापुल्टा’ हा छोटय़ा तुकडय़ांचा कार्यक्रमही लोकप्रिय झाला होता.
विनोदाचा बादशाह ज्यांना म्हणता येईल अशा जसपाल भट्टी यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळी विनोदी होता, दररोजच्या घटनांवर मार्मिक टिप्पणी करणारा त्यांचा विनोद सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यातून, परिस्थितीतून आलेला होता. त्यामुळेच त्यांच्या ‘उल्टा पुल्टा’, ‘फ्लॉप शो’ या दूरदर्शनवरच्या दोन मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
कुठेतरी नोकरी करायची, पैसा मिळवायचा यात त्यांची भट्टी जमली नसावी बहुधा. सामान्यांच्या असहाय परिस्थितीची उपहासात्मक मांडणी करण्यावर त्यांचा भर होता. ‘जोक फॅक्टरी’ या स्टुडिओ सोबत ‘मॅड आर्ट’ही प्रशिक्षण संस्था ही स्थापन केली. मा.जसपाल भट्टी यांचे २५ ऑक्टोबर २०१२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
November 15, 2017
वरूण वेलणकर हे पुण्याचे रहिवासी असून व्हाईट कॉपर एन्टरटेंमेंट या मार्केटिंग क्षेत्रात जगप्रसिध्द असलेल्या कंपनीमध्ये ते मानाच्या हुद्यावर काम करीत आहेत. वरुण हे त्यांच्या उत्तम तंत्रशुध्दपणाबद्दल तसेच कोणत्याही गोष्टीची प्रभावी जाहिरात करण्यासाठी त्यांना अवगत असलेल्या मार्केटिंग कसबांसाठी प्रसिध्द आहेत. कोणत्याही खेळाचा मोठा एव्हेन्ट असो किंवा बाजारात नव्याने आलेल्या एखाद्या खाद्यपदार्थाची किंवा सौंदर्यप्रसाधनाची जहिरात अथवा प्रसिध्दी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या दिवशी फलके, बोर्ड, मोठे होर्डिंग्स, आकर्षकरित्या व सुबकपणे डिझाईन करणे (सजविणे) व कमीत कमी शब्दांत आपला संदेश जास्तीत जास्त कलात्मकतेने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे मोठ्या कल्पनाशक्तीचे काम असते.
August 16, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti