जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
December 15, 2010
ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी धुळे येथे झाला. वडील आणि गायकनट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर चंद्रकांत कामत यांनी बालनट म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नाटक कंपनीच्या दौऱ्यांमध्येच त्यांनी तबलावादकांकडून तबल्याचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. १९५५ मध्ये आकाशवाणीमध्ये त्यांनी परीक्षा दिली आणि १९५६ पासून ते १९९१ अशी तब्बल पस्तीस वर्षे त्यांनी आकाशवाणीत तबलावादक म्हणून काम केले. आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केलेच; पण त्याचप्रमाणे कला जगतात मानाच्या असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये त्यांनी १९५४ पासून साथसंगत करण्यास सुरूवात केली आणि प्रदीर्घ काळ ती सुरू होती.
शास्त्रीय गायनापासून ते नृत्यापर्यंतच्या आणि संगीत नाटकांपासून ते अभंगवाणीतील ‘इंद्रायणी काठी’ सारख्या रचनेपर्यंतच्या अनेकविध कलाप्रकारांना समर्थपणे साथ देणारे ज्येष्ठ तबलावादक मा.चंद्रकांत कामत यांचा तबल्यावरील त्यांच्या विलक्षण हुकमतीमुळे कामत यांचा उल्लेख ‘अनुभवसिद्ध लययात्री’ असा करण्यात येत असे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव, सुधीर फडके यांचे ‘गीतरामायण’, गजानन वाटवे, बबनराव नावडीकर यांची भावगीते, सुलोचना चव्हाण यांची लावणी, बेगम अख्तर-गिरीजादेवी यांची ठुमरी अशा विविध कार्यक्रमांमध्ये मा.चंद्रकांत कामत यांची संगत विशेष रंगत आणीत असे. प्रत्येक कार्यक्रमाचा बाज आणि शैली लीलया पेलून ते तो कार्यक्रम जिवंत करीत. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले.
भारतातील अनेक मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी मा.कामत यांना मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘स्व. वसुंधरा पंडित पुरस्कार’ तर मिळाले, व पुणे महापालिकेकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला. चंद्रकांत कामत यांचे दोन्ही चिरंजीव भरत कामत आणि सुभाष कामत हे तबलावादनाचा वारसा सांभाळतात. चंद्रकांत कामत यांचे निधन २८ जून २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 26, 2018
दूरदर्शनच्या सरकारी काळया-पांढऱ्या पड्द्यावर १९७० च्या दशकात चैतन्य फुकले ते कमलेश्वर आणि तबस्सुम या द्वयीने.. कमलेश्वर यांनी दूरदर्शनला सामाजिक-वैचारिक परिमाण दिले, तर तबस्सुम यांनी पसत मनोरंजनाचे परिमाण.
January 6, 2022
आज २६ ऑक्टोबर आज आज संत नामदेव यांची जयंती.
संत नामदेव यांचा जन्म शिवाजी महाराजांच्याही जवळपास चारशे वर्षं आधी, २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिर झाली होती. दक्षिणेत त्याचा पायरव ऐकू येत होता. धर्माच्या नावाने हिंदू धर्म मार्तंड आणि मुस्लिम शासक बहुसंख्य भारतीयांना दुय्यम दर्जाचं जिणं जगण्यास भाग पाडत होते. त्याविरुद्ध संतपरंपरेनं मोठी क्रांती घडवली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या या क्रांतीचं नेतृत्व नामदेवांनी केलं.
ते एका शिंपी परिवारात जन्मले. त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावात किंवा पंढरपुरात झाला. वडील दामाशेटी. आई गोणाई. आऊबाई बहीण. अकराव्या वर्षी लग्न झालं ते राजाईंशी. नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल ही चार मुलं. लिंबाई मुलगी. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सुना. असा छान बहरलेला संसार त्यांनी केला. त्यांच्या देवपिसे होऊन केलेल्या भक्तीला सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर त्यांनी सगळ्यांना आपलं बनवलं. या सगळ्या परिवारानेच नामदेवांच्या प्रभावात अभंगरचना केली आहे.
अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. पांडुरंगच त्यांचं सर्वकाही होता. आई बाप सोयरा सखा गुरू देव स्वामी तोच होता. विठ्ठलाशी ते संवाद साधत. या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला, अशी स्रर्वात प्रसिद्ध कथा आहे. पुढे दगडाचा देव बोल नाही, अशी आपल्या अभंगातून ग्वाही देणा-या नामदेवांनी लहानपणीच अध्यात्मिक क्षेत्रात मोठाच अधिकार प्राप्त केला होता, एवढं मात्र यातून नक्कीच म्हणता येईल. पण नामदेवांची दुसरी कथा यापेक्षाही महत्त्वाची आहे. सुकी भाकरी पळवून नेणा-या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन जाणारे नामदेव, देवाला दूध पाजणा-या नामदेवांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते लहान वयातच सर्वांभूती भगवंत पाहू शकत होते, हे महत्त्वाचं. नामदेवांनी सत्य समजून घेण्यासाठी वेदज्ञ, शास्त्रज्ञांकडे हेलपाटे घातले. पण ज्ञातिहीन नामदेवांना कोण उभं करणार? त्यामुळे त्यांनी भक्तीतून म्हणजे थेट भगवंतालाच आधार मानून स्वतःच बुद्धीचा कस लावत विश्वाचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून ते लंगोटी नेसून चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करत सद्विचारांचा प्रसार करू लागले होते. ही वाट स्वतःच शोधायची होती. त्यातून साधनेची नवीनवी साधनं निर्माण होऊ लागली. श्रोत्यालाही सामावून घेणारी वारकरी सामूहिक कीर्तन भजनाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. त्यासाठी त्यांनी अभंग या छंदाची निर्मिती केली. अभंग हा छंद गाळला, तर मराठी वाङमयात काय उरतं, याचा विचार केलेला बरा.
नामदेवांनीच वारक-यांचा लाडका काल्याचा सोहळाही सुरू केला. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी नुकतीच भगवद्गीतेची गंगा मराठीत आणली होती. त्यातून नामदेवांना आपल्या कामासाठी तत्त्वज्ञानाचं अधिष्ठानच मिळालं होतं. कुशल संघटक असणा-या निवृत्तीनाथांना आणि नामदेवांना एकत्र यावसं वाटणं स्वाभाविकच होतं. त्यासाठी वयाने आणि कर्तृत्वाने ज्येष्ठ असून नामदेव स्वतः आळंदीला गेले. तिथे संत गोरा कुंभारांच्या नेतृत्वात झालेल्या संतसंमेलनांमधल्या चर्चांमधून नामदेवांना भगवद्कार्यासाठी अधिक ज्ञान मिळवण्याची गरज लक्षात आली. त्यासाठी त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून देवाच्या सगुण निर्गुण रूपाविषयी स्पष्टता मिळवली. याच देवळात कीर्तन करताना त्यांचा पुरोहितांनी केलेला अपमानही त्यांच्यासाठी विचारांचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल इतका ताकदीचा आहे, हे देखील लक्षात ठेवायला हवं.
नामदेव ज्ञानदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला येत होता. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. त्यातून कीर्तनाच्या रंगी नाचत देशभर ज्ञानदीप लावण्यासाठी दोघांच्याही प्रभावातली सगळी संतमंडळी एकत्र झाली. त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरू झाली. महाराष्ट्र पिंजून गुजरात, राजस्थान आणि पंजाबापर्यंत हे संत गेले. माणसाला माणूस बनवण्याची ही धडपड होती. नामदेव कीर्तन करत. चोखामेळ्यासारखे अस्पृश्यही टाळकरी बनून त्यांना साथ देत. जनाबाईंसारखी जातीने अतिशूद्र असणारी स्त्री कीर्तनाचं संचलन करत. ज्ञानदेव अभंग सूचवत. अशा जातीपातीच्या भिंती तुटत होत्या. गोरा कुंभार, सावता माळी, परिसा भागवत, चोखा महार आणि त्यांचा परिवार, जगन्मित्र नागा, नरहरी सोनार, दासी जनी सगळेच त्यात होते. पंजाबातून जाल्हण सुतारही पंढरपुरापर्यंत सोबत आले. हे संत म्हणजे टाळकुटे विरक्त नव्हते तर त्या त्या समाजांचे धार्मिक, वैचारिक आणि सामाजिक नेतेच होते. या ऐतिहासिक तीर्थयात्रेचं उद्यापन पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटावर झालं. स्पृश्य अस्पृश्य, उच्च नीच असे सगळे भेदाभेद सहभोजनात गळून पडले. धर्माच्या नावाखाली चालणा-या नीच जातिभेदांना दिलेला हा मोठा धक्का होता. पुढे नामदेवांनी पंढरपुरातल्या विठ्ठलमंदिराच्या दारात उभी केलेली चोखोबांसारख्या अस्पृश्याची समाधी त्यांच्या खंबीर क्रांतिकारत्वाचा पुरावाच आहे.
यानंतर लवकरच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्याचा अत्यंत हृदयद्रावक आंखो देखा हाल नामेदवांनी लिहून ठेवलाय. पुंडलिकापासून जनाबाईंपर्यंतच्या भक्तांचं चरित्र लिहून नामदेवांनी या क्रांतिकारक चळवळीचं मोठंच डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. ते महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचे चरित्रकार मानायला हवेत आणि ते आद्य आत्मचरित्रकारही आहेत. त्यांनी एक कोटी अभंग लिहिले, असं मानलं जातं. याचा अर्थ त्यांनी विपुल संख्येने साहित्यरचना केली असा घ्यायला हरकत नाही. त्यांच्या साहित्याची भाषा खूपच सोपी आहे. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, चांगदेव या त्यांच्या समकालीनांच्या तुलनेत आज आपल्याला त्यांची भाषा लगेच कळते. त्यांनी कायम अत्यंत सर्वसामान्यांसाठी लिहिलं. त्यात संवाद आणि नाट्य आहे. लोककलांचे विविध फॉर्म त्यांनी हाताळलेत. श्रीकृष्णाच्या लीला सांगताना त्यांनी मराठीतल्या पहिल्या बालकविताही लिहिल्यात.
मराठीतल्या गझलेची पहिलं पावलं शोधतानाही संशोधक त्यांच्यापर्यंत पोहोचतात, इतकं त्यांचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे. तरीही त्यांचं खूपच कमी साहित्य आज उपलब्ध आहे.
ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतरही नामदेवांनी तीर्थयात्रा करून रामेश्वरापासून मुलतानपर्यतचा भारत पालथा घातला. जिथे गेले तिथले बनले. लोकभाषांतून काव्य केलं. हिंदी साहित्याला नवं भान दिलं. त्यांच्या कामातूनच पुढे रामानंद, कबीर, नानक, दादू दयाळ, मीरा, नरसी मेहता, मलूकदास अशी संतांची मांदियाळी देशभर उभी राहिली. पंजाबात तर ते दोन दशकांहून अधिक काळ राहिले. तिथे त्यांनी केलेल्या मशागतीतून शीख धर्माचा वटवृक्ष उभा राहिलाय.
नारायण आणि नामदेव एकच आहे असं मानणा-या शीख परंपरेच्या गुरू ग्रंथसाहेबातही नामदेवांची ६१ पदं आहेत. नामदेवांचा देशभरावरचा प्रभाव आजही पाहता येतो. महाराष्ट्र आणि पंजाबाबरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत त्यांची मंदिरं आहेत. तामिळनाडूपासून जम्मूपर्यंतचे लाखो लोक त्यांचं नाव एकतर आडनाव म्हणून किंवा जातीची ओळख म्हणून अभिमानाने मिरवतात.
नामदेवांनी ३ जुलै १३५० रोजी अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला. त्यांची एक समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे. तर दुसरी पंजाबमधील घुमान येथे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट /सचिन परब
नामदेवांच्या काही रचना.
तू माझी माऊली मी ग तुझा.
भावे तुझे चरण.
काय सांगू देवा.
कासा देस प्राण.
October 26, 2016
गिरीजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारांनी आपले लेखन केले. त्यांची एकूण ७८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात ‘अनुराधा’ मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले.
November 1, 2019
भय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख. राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांचा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठा अनुयायी वर्ग होता. २०१६ मध्ये भय्यूजी महाराज यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा इंदूर येथे आश्रम असून, त्याच्या महाराष्ट्रातील अन्य शहरांतही शाखा आहेत.
June 26, 2021
संपदा जोगळेकर–कुलकर्णी अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका … तिची प्रतिभा छायाचित्रांतूनही जाणवते…
अभिनय, निवेदक, सूत्रसंचालिका, आयोजक, साहित्यिक, कथ्थक नृत्यांगणा, गायिका, दिग्दर्शिका, कार्यक्रमांसाठीच संशोधनपर लिखाण करणारी लेखिका अशा नानाविध रूपांतून सहज वावरणारी आणि प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी हरहुन्नरी कलावती म्हणजे संपदा जोगळेकर-कुलकुर्णी. ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाच्या पहिल्या संचात अंकुश चौधरी, संजय नार्केकर आणि भरत जाधक या कलावंतांसोबत संपदाने आपला विशेष ठसा उमटवला. ठाणे गौरव पुरस्कार, कलांगण पुरस्कार, अक्षरधारा पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार अशा बड्या पुरस्कारांनी गौरवलेली संपदा जोगळेकर-कुलकुर्णी हे एक वेगळं गुणी व्यक्तिमत्त्व.
२००८ साली संपदा लिखित ‘गुंथी’ या लघु कादंबरीच्या बातमीच्या निमित्ताने मी आणि संपदा भेटलो होतो. यानंतर विविध वृत्तपत्रांसाठीच्या लेखांकनासाठी आमची भेट होत होती. यानंतर नाटकांच्या निमित्ताने, अनेक संस्थांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आमची भेट होत होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात संपदाची वेगळी छाप असायची. या गाठीभेटी दरम्यान संपदातले विविध कलागुण समोर येत होते. संपदाने सौंदर्यशास्त्रातलं पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठातून घेऊन पुढे पुणे विद्यापीठातून पी.एचडी.चा तिचा अभ्यास सुरु आहे. कला सरगम या संस्थेच्या बालनाट्यातून तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला. मग एकांकिका, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा यात तिने यशाची मोहोर उमटवली. कथ्थक गुरु डॉ. राजकुमार केतकर यांच्याकडे १८ वर्षे तर पुढे दोन वर्षे डॉ. मंजिरी देव यांच्याकडे तिने कथ्थकचे धडे गिरवले.
‘आईचं घर उन्हाचं’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातून अभिनयाची सुरुवात केलेल्या संपदाने ‘घर तिघांचं हवं’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘तुंबाडचे खोत’ अशा अनेक नाटकांतून अभिनय सादर करत आपल्या अभिनयानं रसिकमन जिंकलं. तर ‘प्रेम भेट’, ‘पाऊलखुणा’, ‘दामिनी’ अशा पंधराहून अधिक मालिकांतून ती घराघरात पोहोचली. ‘उदय’, ‘शर्यत’ अशा सिनेमांतून तिने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. अभिनयाचं हे वेगळं क्षेत्र चोखाळत असतानाच ‘काचपाणी’ (कथासंग्रह), ‘बकुळ फुले’ (वैचारिक लेखसंग्रह), ‘गुंथी’ (लघु कादंबरी) यासाठीच तिने लिखाण केलं. अनेक कार्यक्रमांसाठी, मैफिलींसाठी सूत्रसंचालक, निवेदिका तसेच कार्यक्रमांसाठीच संशोधनपर लिखाणदेखील तिने एकीकडे सुरू ठेकलं होतं. गेल्या काही वर्षांत नाटकांत अभिनयासोबतच लिखाण आणि दिग्दर्शिकेच्या भूमिकेतूनही संपदाचा चेहरा पुढे आला.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या संपदाचं शूट अनेकदा करण्याची संधी मला मिळाली. संपदा नेहमीच फोटोतून समोर आली ती पारंपरिक वेशभूषेतून. मराठमोळ्या वेशभूषेतली, पारंपरिक पेहरावातली संपदा मी अनेकदा कॅमेराबद्ध केली होती. मात्र वैचारिक संपदाचं तिला शोभेल असं कॉर्पेरेट लूकमधलं शूट करण्याचं आम्ही ठरवलं. हा लूक तिच्यासाठी-फोटोच्या दृष्टीने नवा होता. हेच हेरून सुरुवातीला काही पारंपरिक वेशभूषेत तिचे फोटो टिपले. पंजाबी ड्रेसमध्ये संपदाचा हसरा, सोज्वळ चेहरा मी कॅमेराबद्ध केला. हे शूट आउटडोअर करण्यात आलं. यावेळी नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग शूटसाठी झाल्याने हे फोटो अधिक खुलले. यानंतर संपदाचे काही फोटो तिला मिळालेल्या पुरस्कारांसोबत आम्ही टिपले. यावेळी ‘ऑल दी बेस्ट’ची ट्रॉफी हातात घेऊन करण्यात आलेल्या शूटच्यावेळी संपदाचा चेहरा अधिक हसरा वाटत होता. जणू त्यावेळच्या आठवणी एकदम दाटून आल्या असाव्यात. तेव्हाच्या तिच्या भूमिकेबद्दल आणि एकूणच नाटकाबद्दलच्या गमती जमती संपदा सांगत होती. यानंतर सिंगल लाईट सिस्टममध्ये संपदाचे इनडोअर शूट आम्ही केलं. या लाइट सिस्टममुळे प्रकाशावर नियंत्रण मिळवणं, विशिष्ट ठिकाणी प्रकाशझोत टाकणं, त्याची तीव्रता कमी जास्त करणं हे यामुळे शक्य झालं होतं.
साधारणपणे दोन-अडीच तासांच्या शूटनंतर आम्ही कोर्पेरेट शूटकडे वळलो. लाल रंगाचा टीशर्ट त्यावर परिधान केलेला राखाडी रंगाचा ब्लेझर आणि ट्राऊझरमध्ये संपदाचा कॉर्पेरेट लूक अधिक खुलून दिसत होता. यात वैचारिक संपदा दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. एरवी हसऱ्या चेहऱ्याशी, सहज संवाद साधणारी संपदा मला गंभीर चेहऱ्याची, वैचारिक हवी होती. हा लूक संपदाला सांगितल्यानंतर तिने तसे हावभाव केलेही. मात्र यावेळी तिचं स्मितहास्य काही केल्या संपदाला लपवता आले नाही. संपदा जशी आहे तसेच तिचे हावभाव तिच्या चेहऱ्यावर आणि अर्थातच फोटोत येत होते. या पेहरावात तीच पहिल्यांदाच शूट झालं होत. सुरूवातीला या लूकमध्ये थोडीशी अस्वस्थ असलेली संपदानंतर सहज वावरत होती… आणि त्यामुळेच मला तिचे वेगळे फोटो टिपणं शक्य झालं.
अनेक वर्षांच्या ओळखीतून मला संपदातले विविध अंगभूत गुण अनुभवता आले. संपदा विविध क्षेत्रामध्ये सहज जरी वावरत असली तरीही तिचा मूळ स्वभाव अभ्यासू आहे. कोणत्या क्षेत्रात किती रमायचं, कधी एखादा विषय सुरू करायचा आणि कधी तो संपवायचा याचा अभ्यास तिने चांगलाच केलेला असतो. सध्या नाटकांत रमलेली संपदा येत्या काही काळात विविध क्षेत्रातही तितकीच सहज वावरताना दिसेल, हे नक्की.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
February 2, 2019
नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते, त्या विश्राम बेडेकरांचे हे वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु करताना देखील अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला. तरीही त्यांनी दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट यशस्वी झाले आहेत. चित्रपट तंत्राच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि आल्याआल्याच त्यांच्या हातून 'रणांगण' सारख्या उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती झाली. रणांगण नंतर त्यांनी केलेली अनेक नाटय रुपांतरे रंगभूमीवर आली. मात्र 'वाजे पाऊल आपुले' आणि 'टिळक आणि आगरकर' या रंगभूमीवर गाजलेल्या त्यांच्या अजोड कलाकृती. चरितार्थासाठी नाटक आणि चित्रपट हे क्षेत्र निवडले अणि तेथेही ते पटकथा लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरले. माझं बाळ, वासुदेव बळवंत, चूल आणि मूल या श्रेष्ठ पटकथा त्यांनी दिल्या. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ही त्यांची एक सर्वोत्तम कथा.
अर्थगर्भ आणि अजोड कलाकृती देऊन विश्राम बेडेकरांनी एक आदर्श उभा केला आहे. मराठी रंगभूमीवरील विख्यात नट चिंतामणराव कोल्हटकर व श्रेष्ठ गायक नट मास्टर दीनानाथ हयांनी सुरू केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ ह्या संस्थेच्या कृष्णार्जुन युद्ध ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपटव्यवसायात आले. तत्पूर्वी मास्टर दीनानाथांच्या ‘बलवत संगीत नाटक मंडळी’साठी ब्रह्मकुमारी हे नाटक त्यांनी लिहिले होते. ह्या नाटकातील ‘मी लोपले मधुमीलनात या’ हे पद अत्यंत लोकप्रिय ठरले. बलवंत पिक्चर्स ही संस्था बंद झाल्यानंतर, १९३५ साली बेडेकरांनी कृष्णार्जुन युध्दाचे आणखी एक सहदिग्दर्शक वा. ना. भट ह्यांच्या सहकार्याने ‘भट-बेडेकर प्रॉडक्शन्स’ ही चित्रसंस्था स्थापन केली. राम गणेश गडकरी आणि चि.वि. जोशी ह्यांच्या अनुक्रमे ‘ठकीचे लग्न ‘आणि ‘ सत्याचे प्रयोग’ ह्या विनोदी कथांवर त्यांनी बोलपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी बोलपट होत. त्यानंतर लक्ष्मीचे खेळ हा आणखी एक विनोदी बोलपट त्यांनी निर्माण केला. प्रभातच्या शेजारी ह्या गाजलेल्या चित्रपटाची पटकथा व संवादत्यांनीच लिहिले होते. तसेच रामशास्त्री बोलपटाचे निम्म्यापेक्षा अधिक भागाचे दिग्दर्शन व लेखनही त्यांनी केले.
१९४२ साली ‘न्यू हसं पिक्चर्स’ चा पहिला पाळणा हा तुफान विनोदी बोलपट त्यांनी दिग्दर्शित केला. ह्या चित्रपटाच्या कथा संवादांचेही लेखन केले. राजकमलच्या अमर भूपाळीची (१९५१) कथाही त्यांचीच. फिल्म डिव्हिजनसाठी लोकमान्य टिळक व विनोबा भावे ह्यांच्यावरील अनुबोधपटही त्यांनी तयार केले. चित्रपटमाध्यमाची अत्यंत मार्मिक जाण त्यांनी लिहिलेल्या नेमक्या, नीटस संवादातून जाणवते. १९५१ नंतर बेडेकर चित्रपटव्यवसायात फारसे वावरले नाहीत. १९५१ ते १९८१ह्या तीन दशकांत त्यांनी फक्त दिग्दर्शन केले आणि तेही अवघ्या सहा चित्रपटांचे. त्यात वासुदेव बळवंत आणि रुस्तुम सोहराब यांचा समावेश होतो. याच काळात त्यांनी प्रसिद्ध क्रांतिकारक भगतसिंग ह्यांच्यावरील चित्रपटाचे व ‘प्रभात’ साठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील चित्रपटाचे बरेचसे काम केले पण ते प्रयत्न अपूर्ण राहिले. ह्या काळात ते पुन्हा नाट्यलेखनाकडे वळले. त्यांनी नरो वा कुंजरो वा (१९६१),वाजे पाऊले आपुले (१९६७) टिळक आणि आगरकर(१९८०) ही नाटके लिहिली. तथापि रणांगण (१९३९) ह्या कांदबरीमुळे बेडेकरांची वाङ्मयीन कीर्ती अनेक अर्थानी मराठीत अपूर्व ठरली.
१९३८ साली बेडेकरांना सिनेमॅटोग्राफीच्या अभ्यासार्थ इंग्लंडला जाण्यासाठी एक निमसरकारी शिष्यवृत्ती मिळाली. तिथे त्यांनी फावल्या वेळात हस्ताक्षरतज्ञ म्हणून डिप्लोमा मिळवला. भारतात परत येताना बोटीवर काही निर्वासित जर्मन-ज्यू मंडळींचे जीवन त्यांना फार जवळून बघायला मिळाले. त्या अनुभवातून रणांगण या कादंबरीचा जन्म झाला. चक्रधर नावाचा एक मराठी तरुण आणि ज्यूद्वेष्ट्या नाझी हुकुमशाहीखाली जिचे जीवन अंतर्बाह्य उद्ध्वस्त झाले अशी एक जर्मन ज्यू तरुणी हॅर्टा ह्यांच्या असफल प्रेमाची ही कहाणी आहे. जेनोआहून निघालेल्या एका इटालियन बोटीवर त्या दोघांची भेट होते आणि दहा दिवसांच्या सागरी प्रवासात ती दोघे उत्कटपणे परस्परंच्या जवळ येतात. चक्रधर आधी एका प्रेमप्रकरणात फसलेला असतो, तर हॅर्टा आपला पराक्रम सोडून परागंदा होण्यापूर्वीच आपल्या जर्मन ख्रिश्चन प्रियकराला मुकलेली असते. चक्रधराला पाहून तिला अपल्या प्रियकराची आठवण येते आणि चक्रधरही तिच्या प्रेमाने भारावून जाऊन तिच्याशी विवाह करावयास तयार होतो. तथापि हॅर्टापाशी जर्मन पासपोर्ट असल्यामुळे तिला चक्रधराबरोबर मुंबईस उतरता येत नाही.
बोट चक्रधराला सोडून निघून जाते आणि विफल प्रेमाचा दुसरा आघात असह्य झालेली हॅर्टा हाँगकाँगपर्यंत गेल्यावर समुद्रात उडी मारून आत्महत्या करते. ह्या कांदबरीचा विषय, तीत असलेली विरोधवादाची पार्श्वभूमी, तिच्यातील सूक्ष्म, अभिजात कलात्मकता, तीतून व्यक्त झालेला संवेदनस्वभाव, तिची अनेकसंदर्भसूचकता हे सारेच मराठी कांदबरीत अपूर्व होते. मराठीतील मोजक्या, उत्कृष्ट कादंबऱ्यात बेडेकरांच्या रणांगणाची गणना केली जाते. १९८६ साली मा.विश्राम बेडेकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होते. मा.विश्राम बेडेकर यांचे निधन ३० ऑक्टोबर १९९८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 14, 2017
अवधूत गुप्ते यांची वेगळी अशी ओळख मराठी माणसाला करून द्यायची आवश्यकता नाही. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला. जय जय महाराष्ट्र माझा आणि बाई बाई मनमोराचा या दोन गाण्यांच्या नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले. त्यांची दाद द्यायची पद्धत, कौतुक करायची पद्धत काही वेगळीच होती. अंगावर काटा आला, मित्रा तोडलंस! जिंकलंस!, टांगा पलटी घोडे फरार या शब्दांत दिलेली दाद स्पर्धकांचाही हुरूप वाढवत असे. विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? असा थेट प्रश्न विचारत ते दिग्दर्शकाच्याही खुर्चीवर विराजमान झाला.
खुपते तिथे गुप्तेमुळे अवधूत गुप्तें मुलाखतकार ही झाले. मराठीतील आघाडीचे संगीतकार-गायक-निर्माते-दिग्दर्शक असा नावलौकिक असलेल्या अवधूत गुप्ते यांनी मराठी व हिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. त्यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही केले आहे. सागरिका म्युझिक कंपनीच्या पाऊस या अल्बमामार्फत गायक व संगीतकार म्हणून त्यांचे पदार्पण झाले. त्यानंतर वैशाली सामंत ह्यांच्या सोबत त्यांनी बनवलेला ऐका दाजीबा हा इंडिपॉप अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अवधूत गुप्ते यांची वेबसाइट www.avadhootgupte.com
February 20, 2017
आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते
जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते, चला बरे झाले;
आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते...जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, ... अशा अनेक कवितांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य गाजवणारे कवी म्हणजे नारायण सुर्वे. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. १९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीत एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा हा अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. गिरणी कामगारच असलेल्या काशीबाई सुर्वे यांनी या "बाळगलेल्या पोराला' स्वत:च्या मुलासारखे प्रेम दिले आणि "नारायण गंगाराम सुर्वे' हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्य्र, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून त्यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले. घरात अठराविश्वण दारिद्य्र असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. नारायण सुर्वे १९३६ मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि समोर मुंबईचा विशाल सागर.
मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी ते एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम् या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे "सुर्वे मास्तर' झाले. "कधी दोन घेत, कधी दोन देत' आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर घुमवला. त्यांची पहिली कविता १९५८ मध्ये "नवयुग' मासिकात प्रसिद्ध झाली. "डोंगरी शेत माझं गं....' हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली.
१९६२ मध्ये "ऐसा गा मी ब्रह्म' प्रकाशित झाला. त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले. गाजत रा हिले. "माझे विद्यापीठ', "जाहीरनामा', "पुन्हा एकदा कविता', "सनद' हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या, इस ल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्यार, अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. "मास्तर, तुमचंच नाव लिवा...', "असं पत्रात लिवा', "मर्ढेकर', "सर कर एकेक गड', "मनिऑर्डर', "मुंबईची लावणी', "गिरणीची लावणी' या त्यांच्या कविता हमखास पावती घेतात. श्री. सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वलरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही पुरस्कार केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणाऱ्या आकांक्षांचे चित्रण, पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आणि मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला आहे.
सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेच जण साम्यवादी पक्षात होते. डावी चळवळ जोरात होती. ती चळवळ हा त्यांचा मोठा आधार बनली. सुर्व्यांच्या वैचारिक प्र वासाची ही सुरवात होती. "माझ्या पहिल्या संपात मार्क्सआ मला असा भेटला,' असे सांगणाऱ्या सुर्व्यांची साम्यवादी, डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. कम्युनिस्ट चळवळीत ते "रेडगार्ड' बनले. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. आई-बापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके हिच् याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खारजवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला होता. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य श्री. सुर्वे यांनी केले आहे. जीवनात जे वास्तव अनुभवले, त्यांचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात. पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली. संत कबीरालाही त्याच्या आईनं नदीकाठी सोडलं. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला...त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही...असं सुर्वे म्हणत.
ज्यांना सुर्वे दिसू आले नाहीत, अशांसाठी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी एकदा सांगितले, "अरे, केशवसुत कशाला शोधताय? तुमचा केशवसुत परळ मध्येच राहतोय.' नारायण सुर्वे यांचा पद्मश्री, सोव्हिएत रशियाचं नेहरू ऍवॉर्ड, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, नरसिंह मेहता पुरस्कार, कराड साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, असे अनेक पुरस्कार देऊन गौरव झाला. नारायण सुर्वे यांचे १६ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti