जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अरुण शंकरराव सरनाईक (४ ऑक्टोबर, इ.स. १९३५[१] - १४ मार्च इ.स. १९९८) हा मराठी चित्रपट-अभिनेता होता. त्याने मराठी चित्रपट व नाटकांतून अभिनय केला. इ.स. १९६१ सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातील पूरक भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले.
हिंदुस्तानी संगीतातील ख्यातनाम गायक निवृत्तीबुवा सरनाईक त्याचे काका होते.
March 12, 2015
पं. अजय चक्रवर्ती यांच्या कन्या कौशिकी चक्रवर्ती. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९८० रोजी झाला. पतियाळा घराण्याचे गायक पंडित अजय चक्रवर्ती, आई चंदना चक्रवर्ती संगीत शिक्षक, घरातच गाणे, वयाच्या २ र्याी वर्षापासून तिने आपल्या वडिलांकडे संगीत शिकण्यास सुरूवात केली. ऋतुपर्ण घोष या रेनकोट, चोखेर बाली अश्या चित्रपटाचे प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाने केलेल्या प्रमुख नायिकेची ऑफर दिली होती.पण त्याला नकार देउन कौशिकी चक्रवर्ती ने शास्त्रीय संगीत शिकण्यास प्राधान्य दिले.
कौशिकी २००६ मधील त्यांच्या पहिल्या मैफलीच्या आठवणी सांगताना म्हणते, एक दिवस मी घरी असताना दूरध्वनी वाजला. मी तो घेतला. ‘मैं भीमसेन जोशी बोल रहा हूँ. इस साल हमारे यहाँ पूना आना पडेगा’ असा पलीकडून आवाज आला. पंडितजी मला दिसत नसले तरी मी जागेवरच उभी राहिले होते. कौशिकीसारख्या गायिकांच्या हातात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुरक्षित आहे, अशी खुद्द पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली पावती हे कौशिकीचे यश आहे. आज तिचे नाव या क्षेत्रातील तपस्या तसेच सौंदर्य या दोन्ही मुळे देशविदेशात गाजत आहे.
तिचे पती पार्थ देशीकान हे स्वतः उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या परंपरेतील उदयोन्मुख गायक असून त्यांनीही कौशिकीप्रमाणेच आपले सासरे पं.अजय चक्रवर्ती यांचेच शिष्यत्व पत्करले आहे. कौशिकीने देशात परदेशात अनेक मैफीली गाजवल्या आहेत. गाणारं सौंदर्यच हे! जे तिचे कार्यक्रम बघतात ते तिचे फॅन होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 16, 2017
बॉलीवूड मधील ट्रेजेडी किंग मुहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी मध्ये पेशावर येथे झाला.
हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहज़ीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार. पेशावरमधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते.
उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले. तिथे लष्करी कॅन्टीनमध्ये मॅनेजरचा साहाय्यक म्हणून केलेल्या नोकरीने त्यांना आपणही पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मिळवून दिला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी कॅन्टीनचे व्यवस्थापन बदलले आणि युसूफ खान जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परतले. नोकरी करावी की परंपरागत व्यवसाय, या द्विधा मन:स्थितीत दादर येथे एका परिचिताकडे निघालेल्या युसूफ खान यांना चर्चगेट स्थानकात डॉ. मसानी हे स्नेही भेटले. ख्यालीखुशालीच्या चौकशीत युसूफ नोकरीच्या शोधात असल्याचे समजल्यावर डॉ. मसानी यांनी त्यांना माहीम येथे सोबत येण्याची गळ घातली. युसूफही त्यांच्या आग्रहाखातर माहीम येथील बॉम्बे टॉकीज स्टुडिओत दाखल होऊन देविकाराणीसमोर उभे राहिले.
देविकाराणीने राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील प्रभुत्व या भांडवलावर युसूफ खान यांना महिना बाराशे रुपये पगारावर बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली. युसूफ आणि डॉ. मसानी या दोघांनाही हे अनपेक्षित होते. देविकाराणींच्या सूचनेवरूनच दिलीपकुमार या टोपण नावाने ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर त्यांचे १९४४ मध्ये पदार्पण झाले. १९४४ साली आलेल्या ‘ज्वार भाटा’ चित्रपटापासून दिलीप कुमार यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. मा.दिलीप कुमार यांनी त्यांच्या सहा दशकाच्या अभिनय कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. त्यातील ‘अंदाज’, आन, ‘देवदास’, ‘आजाद’, ‘मुगल-ए-आजम’ और सामाजिक विषयावर आधारित चित्रपट ‘गंगा जमुना’ यांसारख्या चित्रपटात अभिनय केला.
१९५७ मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार...' या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते. १९७६ मधील तिहेरी भूमिका असलेला ‘बैराग’ हा नायक म्हणून दिलीपकुमार यांचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर पाच वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या दिलीपकुमार यांनी मनोज कुमार यांच्या ‘क्रांति’ पासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
‘शक्ति’, ‘विधाता’, ‘मजदूर’, ‘दुनिया’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचे दर्शन घडवले. दिलीप कुमार यांनी १९९८ साली किला या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली. भारत सरकारने त्यांना पद्मभुषण, दादासाहेब फाळके, पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले. पाकिस्तान सरकारनेही त्यांना १९९७ साली सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशान-ए-इम्तियाजनेही सन्मानित केले गेले.
‘मुघल-ए-आझम’चे चित्रीकरण चालू असताना दिलीपकुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, सायरा बानूशी झालेला विवाह हे विधिलिखित होते. हे वैवाहिक जीवन प्रदीर्घ काळ टिकले, असा दिलीपकुमार यांचा विश्वास होता. दिलीपकुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांचेही लग्न त्या काळी गाजले. कारण लग्नाच्या वेळी दिलीपकुमार पेक्षा सायरा बानूचे वय खूपच कमी होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 28, 2019
१९८६ साली ‘नाम’ या चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है..’ या गाण्याच्या माध्यमातून पंकज उधास नावारूपाला आले. त्यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी झाला. आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जातात. त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले आहे. पंकज उदास यांनी एक से बढकर एक गझल देत रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारं काही विसरायला लावणा-या गझल आजही रसिकांच्या गुणगुणताना दिसतात. त्यांच्या या प्रयत्नांनी भारतातील गझल क्षेत्राला व गझल गायनालाच एक नवीन उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. भारतातील गझल गायनातील एक मोठे नाव म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. गझल गायन आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरविले आहे. पंकज उधास हे १९८६ साली लीला मुळगावकर यांच्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या ‘पीएटीयूटी’चे अध्यक्ष आहेत. संस्थेची स्थापना सेंट जॉर्ज रुग्णालय प्रादेशिक रक्तपेढीतील थॅलेसेमिया रोगापासून पीडित अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने झाली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=UUOn3IIy7G0
https://www.youtube.com/watch?v=5aJgC8eyCNI
May 17, 2017
वयाच्या आठव्या वर्षी सुरू झालेला टेबल टेनिसचा खेळ अगदी सहज सोपा करत कॉमन वेल्थ स्पर्धेत रौप्यपदक, साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक, दहा वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपचा विक्रम आणि अशा अनेक स्पर्धांत बाजी मारत ममता प्रभू या जिद्दी खेळाडूने टेबल टेनिसच्या खेळात आपला वेगळा दराराच निर्माण केला. तिच्या या खेळाचा सन्मान ‘शिवछत्रपती’ या मानाच्या पुरस्कार देऊन करण्यातदेखील आला.
October 26, 2018
१९७४ मध्ये जळगाव येथे भरलेल्या ज्योतिष संमेलनाचे क. वि. सोमणशास्त्री अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी दृकप्रत्यय गणिताच्या पंचांगाचे महत्त्व वर्णन केले.
April 7, 2022
सोनी टीव्हीवर गाजलेल्या ‘परवरिश’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वात गौतमी काम केले होते. सातत्याने हिंदीत काम करीत राहिल्याने आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये रस नाही, असा बहुधा लोकांचा समज झाला असावा. मला खरोखरच मराठी चित्रपटात काम करायचे आहे, असे गौतमीने एका मुलाखतीत सांगितले होते.
June 21, 2022
कला क्षेत्र व तंत्रज्ञानाच्या विश्वाकडे कल असणारी कल्पनाशक्ती यांचा सुरेख मिलाफ साधला की एका व्यावसायिक चित्रकाराचा जन्म होतो. हे चित्रकार आपली निर्माणशक्ती कागदावर उतरवून केवळ त्यांच्या वैयक्तिक संग्रही ठेवित नाहीत तर जाहिराती, डिझायनिंग, ग्राफिक्स, व एखाद्या कंपनीच्या वस्तूंचा खप वाढविण्याकरिता त्या शक्तीचा फलदायी उपयोग करतात. ग्राहकांना विशीष्ठ ब्रँडस् कडे चुंबकांप्रमाणे आकर्षित करण्यात अशा कलाकारांचा सिंहाचा वाटा असतो, व बाजारात अशा हाडाच्या कलाकारांना प्रचंड मागणी असते.
August 16, 2011
प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ पद्म पुरस्करांची खिरापत होत असल्याची टीका
ही सालाबादप्रमाणे करण्यात आली. मात्र, काही व्यक्तींना पद्म किताब जाहीर केल्याबद्दल कुणाचेच दुमत नव्हते. त्या म्हणजे शोभना रानडे!
गांधीवादी विचारांच्या प्रसारक, ज्येष्ठ सामाजिक कार्यर्कत्या, दूरदृष्टी असलेल्या गांधीवादी, लहान मुलांसाठी लाडकी आजी… अशा शोभनाताई. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महिला सबलीकरण, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि तरुण पिढीपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शोभनाताई. महिलांना स्वातंत्र्यच नव्हे तर स्वत:ची मतं मांडण्याचे अधिकारही मिळाले नव्हते, अशा काळात नाशिकमध्ये १९३५ साली काही मुलींनी ‘यापुढे आम्ही केवळ देशासाठीच जगणार’ अशी शपथ घेतली. पुढे हीच संस्था ‘हिंद सेविका संघ’ म्हणून नावारूपास आली. या मुलींमध्ये अवघ्या तेरा वर्षांची एक मुलगी म्हणजेच शोभना रानडे यांचाही समावेश होता.
July 27, 2011
तब्बल सहा दशके वृत्तपत्रीय क्षेत्रात ‘चौफेर’ मुशाफिरी करणारा, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार असलेला एक लढवय्या, व्यासंगी, व्रतस्थ पत्रकार, एक तत्वचिंतक, मार्गदर्शक, पत्रकारितेच्या अथांग सागरातील दीपस्तंभ माधव गडकरी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ रोजी मुंबईत झाला.
एकविसाव्या वर्षांपासून आपल्या अमोघ वक्तृत्वाने राज्यात, देश-विदेशात अनेक उत्तमोत्तम भाषणांसह व्यासपीठ गाजवणारे फर्डे वक्ते, लिहावे कसे... बोलावे कसे.. याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजेच माधव गडकरी. अफाट ग्रंथसंपदा, अनेक संपादने, हजारो विषयांवरील अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण लेख, यामधून काय वेचायचे आणि कसे वेचायचे, असा प्रश्न पडावा, इतके विपुल लेखन माधव गडकरी यांनी केले आहे.
माधव गडकरी हे मूळचे निफाडचे. तेथे वडिलोपार्जित अशी ३०० एकर सुपीक जमीन होती. मात्र नियतीचे असे काही विचित्र फासे पडले, निफाड कायमचे दुरावले आणि त्यांच्या वडिलांनी मुंबईत येऊन शून्यातून विश्व निर्माण करून माधव गडकरी यांना वाढवले, शिकविले, मोठे केले.
माधव गडकरी यांचे लहानपण लॅमिंग्टनरोड वरील टोपीवाला चाळीत गेले. १९३२ मध्ये माधवराव ठाण्यास राहावयास आले. गोखले रोडवरील मारुती मंदिरासमोरील ‘सिद्धाश्रम’ या इमारतीत दोन वर्ष वास्तव्य. पुढे १९३४ मध्ये वडिलांनी राममारुती रोडवर एकमजली टुमदार घर बांधले. आजोबांचे ‘सीताराम’ हे नाव या घराला दिले. १९३४ ते १९५८ असे तब्बल चोवीस वर्षे माधव गडकरी यांचे वास्तव्य ठाणे येथे होते. याच कालखंडात माधवरांवाचे शिक्षण झाले. शालेय जीवनापासूनच माधव गडकरी संपादकीय भूमिकेत शिरलेले होते. निर्झर क्षितिज (१९४७) कडून निर्धार (१९५४) या साप्ताहिकापर्यंतचा प्रवास त्यांनी यशस्वीपणे केला.
माधव गडकरींच्या पत्रकारितेची बीजे ‘निर्धार’ या राजकीय साप्ताहिकाने पेरली. म्हणूनच ‘निर्धार ते लोकसत्ता’ माधव गडकरी यांचा वृत्तपत्रीय कारकिर्दीमधला प्रवास वाचनीय, अनुकरणीय आणि संस्मरणीय असा आहे. दा. भ. कर्णिक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे, पाडगावकर, मधू मंगेश कर्णिक, प्रभाकर अत्रे, नी. गो. पंडितराव अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सहवास माधव गडकरी यांना लाभला. त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.
ठाण्याचे नी. गो. पंडितराव यांनी माधवरावांना वक्तृत्वातील खुब्या शिकवल्या. सभेत बोलावे कसे, भाषण कसे असावे याचे जणू धडे दिले. माधवरावांचे पहिले जाहीर भाषण गावदेवी मैदानात झाले. ‘ज्यांचे पाठांतर खूप, वाचन भरपूर, अनुभव समृद्ध असतात, ते चांगले वक्ते सहजपणे होतात.’ असे माधव गडकरी नेहमी सांगत असत. मा.माधव गडकरी हे संपादकीय भूमिकेत शिरल्यानंतर वृत्तपत्रलेखनाद्वारे, स्तंभलेखनाद्वारे अनेक लोकाभिमुख, सामाजिक संस्थांचा, थोर व्यक्तींचा, स्थळांचा, प्रांतांचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि परदेशातील अनेक घटनांचा तपशील वाचकांना करून देताना त्यांची प्रामाणिक तळमळ, धावपळ अधोरेखित होते. मा.माधव गडकरी यांच्या बद्दल पु. ल. देशपांडे म्हणत असत, ‘आजवर महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक कारागिरांचे हात लागले, त्याच्या हातून घडलेल्या सांस्कृतिक जडावांची आणि ते जडाव घडविणाऱ्या त्या लोकोत्तर कारागिरांची आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची शब्दचित्रे माधवरावांनी काढली. गडकऱ्यांची लेखमाला प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांचा वाचकांशी सलोखा वाढला. कारण गडकऱ्यांचा मन:पिंड ज्या ज्या संस्कारांनी घडला त्यांच्याशी कृतज्ञ राहून, इमान ठेवून गडकऱ्यांनी अफाट लिहिले, मोकळ्या मनाने लिहिले.’
पत्रकारितेच्या निमित्ताने माधव गडकरी यांनी जवळजवळ सर्वच देशात उदंड भ्रमंती केली. जे काही अनुभवले ते सारे लेखांद्वारे, पुस्तकांद्वारे मांडले. जनमानसामध्ये उदंड आणि सार्थ विश्वास संपादन करून माधवरावांनी एक आदर्श निर्माण केला. समाजातील अनेक वंचितांना आपल्या लेखांच्या माध्यमातून भरघोस अशी मदत केली. तसेच समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर आणि भ्रष्टाचारावर प्रहारात्मक, परखडपणे लिखाण केले. एकीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माधवरावांची भाषणे गाजत असायची, तर दुसरीकडे त्यांची विविधांगी विषयांवरची पुस्तके, लेखसंग्रह सातत्याने प्रकाशित होत असायचे.
माधव गडकरी यांच्या एकूण संपादकीय कारिकर्दीचा, लेखनाचा वेळोवेळी गौरव झाला आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यात पद्मश्री, अनन्त हरी गद्रे पुरस्कार, भ्रमन्ती पुरस्कार, लोकश्री पुरस्कार, भारतकार हेगडे देसाई पुरस्कार, प्राचार्य अत्रे पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले होते. २००६ मध्ये ठाणे येथे संपन्न झालेल्या नवव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वरकरणी खूप कठोर आणि कडक स्वभावाचे वाटायचे. मात्र अंतरंगी ते अतिशय मृदू स्वभावाचे होते, कुटुंबवत्सल होते.
१ जून २००६ रोजी माधव गडकरी यांचे निधन झाले.
माधव गडकरी यांची साहित्यसंपदा
त्यांचे एकूण पस्तीसच्यावर ग्रंथ प्रकाशित आहेत. ‘चौफेर’ या त्यांच्या स्तंभलेखनाचे पाच खंड, ‘दृष्टीक्षेप’ या सदरांचे तीन खंड अभ्यासपूर्ण आहेत. व्यक्तिचित्रे प्रवासवर्णने गाजली आहेत. काही निवडक पुस्तके - ‘असा हा महाराष्ट्र’, ‘असा हा गोमंतक’, ‘मुंबई ते मास्को व्हाया लंडन’, ‘सोनार बंगला’, ‘सत्ता आणि लेखणी’, ‘हॅलो चार्लस’, ‘माओ नंतरचा चीन’, ‘कुसुमाग्रज गौरव’, ‘गुलमोहराची पाने’ इ.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.रामदास खरे/लोकमत
October 3, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti