जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
तब्बल सहा दशके वृत्तपत्रीय क्षेत्रात ‘चौफेर’ मुशाफिरी करणारा, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार असलेला एक लढवय्या, व्यासंगी, व्रतस्थ पत्रकार, एक तत्वचिंतक, मार्गदर्शक, पत्रकारितेच्या अथांग सागरातील दीपस्तंभ माधव गडकरी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ रोजी मुंबईत झाला.
एकविसाव्या वर्षांपासून आपल्या अमोघ वक्तृत्वाने राज्यात, देश-विदेशात अनेक उत्तमोत्तम भाषणांसह व्यासपीठ गाजवणारे फर्डे वक्ते, लिहावे कसे... बोलावे कसे.. याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजेच माधव गडकरी. अफाट ग्रंथसंपदा, अनेक संपादने, हजारो विषयांवरील अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण लेख, यामधून काय वेचायचे आणि कसे वेचायचे, असा प्रश्न पडावा, इतके विपुल लेखन माधव गडकरी यांनी केले आहे.
माधव गडकरी हे मूळचे निफाडचे. तेथे वडिलोपार्जित अशी ३०० एकर सुपीक जमीन होती. मात्र नियतीचे असे काही विचित्र फासे पडले, निफाड कायमचे दुरावले आणि त्यांच्या वडिलांनी मुंबईत येऊन शून्यातून विश्व निर्माण करून माधव गडकरी यांना वाढवले, शिकविले, मोठे केले.
माधव गडकरी यांचे लहानपण लॅमिंग्टनरोड वरील टोपीवाला चाळीत गेले. १९३२ मध्ये माधवराव ठाण्यास राहावयास आले. गोखले रोडवरील मारुती मंदिरासमोरील ‘सिद्धाश्रम’ या इमारतीत दोन वर्ष वास्तव्य. पुढे १९३४ मध्ये वडिलांनी राममारुती रोडवर एकमजली टुमदार घर बांधले. आजोबांचे ‘सीताराम’ हे नाव या घराला दिले. १९३४ ते १९५८ असे तब्बल चोवीस वर्षे माधव गडकरी यांचे वास्तव्य ठाणे येथे होते. याच कालखंडात माधवरांवाचे शिक्षण झाले. शालेय जीवनापासूनच माधव गडकरी संपादकीय भूमिकेत शिरलेले होते. निर्झर क्षितिज (१९४७) कडून निर्धार (१९५४) या साप्ताहिकापर्यंतचा प्रवास त्यांनी यशस्वीपणे केला.
माधव गडकरींच्या पत्रकारितेची बीजे ‘निर्धार’ या राजकीय साप्ताहिकाने पेरली. म्हणूनच ‘निर्धार ते लोकसत्ता’ माधव गडकरी यांचा वृत्तपत्रीय कारकिर्दीमधला प्रवास वाचनीय, अनुकरणीय आणि संस्मरणीय असा आहे. दा. भ. कर्णिक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे, पाडगावकर, मधू मंगेश कर्णिक, प्रभाकर अत्रे, नी. गो. पंडितराव अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सहवास माधव गडकरी यांना लाभला. त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.
ठाण्याचे नी. गो. पंडितराव यांनी माधवरावांना वक्तृत्वातील खुब्या शिकवल्या. सभेत बोलावे कसे, भाषण कसे असावे याचे जणू धडे दिले. माधवरावांचे पहिले जाहीर भाषण गावदेवी मैदानात झाले. ‘ज्यांचे पाठांतर खूप, वाचन भरपूर, अनुभव समृद्ध असतात, ते चांगले वक्ते सहजपणे होतात.’ असे माधव गडकरी नेहमी सांगत असत. मा.माधव गडकरी हे संपादकीय भूमिकेत शिरल्यानंतर वृत्तपत्रलेखनाद्वारे, स्तंभलेखनाद्वारे अनेक लोकाभिमुख, सामाजिक संस्थांचा, थोर व्यक्तींचा, स्थळांचा, प्रांतांचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि परदेशातील अनेक घटनांचा तपशील वाचकांना करून देताना त्यांची प्रामाणिक तळमळ, धावपळ अधोरेखित होते. मा.माधव गडकरी यांच्या बद्दल पु. ल. देशपांडे म्हणत असत, ‘आजवर महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक कारागिरांचे हात लागले, त्याच्या हातून घडलेल्या सांस्कृतिक जडावांची आणि ते जडाव घडविणाऱ्या त्या लोकोत्तर कारागिरांची आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची शब्दचित्रे माधवरावांनी काढली. गडकऱ्यांची लेखमाला प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांचा वाचकांशी सलोखा वाढला. कारण गडकऱ्यांचा मन:पिंड ज्या ज्या संस्कारांनी घडला त्यांच्याशी कृतज्ञ राहून, इमान ठेवून गडकऱ्यांनी अफाट लिहिले, मोकळ्या मनाने लिहिले.’
पत्रकारितेच्या निमित्ताने माधव गडकरी यांनी जवळजवळ सर्वच देशात उदंड भ्रमंती केली. जे काही अनुभवले ते सारे लेखांद्वारे, पुस्तकांद्वारे मांडले. जनमानसामध्ये उदंड आणि सार्थ विश्वास संपादन करून माधवरावांनी एक आदर्श निर्माण केला. समाजातील अनेक वंचितांना आपल्या लेखांच्या माध्यमातून भरघोस अशी मदत केली. तसेच समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर आणि भ्रष्टाचारावर प्रहारात्मक, परखडपणे लिखाण केले. एकीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माधवरावांची भाषणे गाजत असायची, तर दुसरीकडे त्यांची विविधांगी विषयांवरची पुस्तके, लेखसंग्रह सातत्याने प्रकाशित होत असायचे.
माधव गडकरी यांच्या एकूण संपादकीय कारिकर्दीचा, लेखनाचा वेळोवेळी गौरव झाला आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यात पद्मश्री, अनन्त हरी गद्रे पुरस्कार, भ्रमन्ती पुरस्कार, लोकश्री पुरस्कार, भारतकार हेगडे देसाई पुरस्कार, प्राचार्य अत्रे पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले होते. २००६ मध्ये ठाणे येथे संपन्न झालेल्या नवव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वरकरणी खूप कठोर आणि कडक स्वभावाचे वाटायचे. मात्र अंतरंगी ते अतिशय मृदू स्वभावाचे होते, कुटुंबवत्सल होते.
१ जून २००६ रोजी माधव गडकरी यांचे निधन झाले.
माधव गडकरी यांची साहित्यसंपदा
त्यांचे एकूण पस्तीसच्यावर ग्रंथ प्रकाशित आहेत. ‘चौफेर’ या त्यांच्या स्तंभलेखनाचे पाच खंड, ‘दृष्टीक्षेप’ या सदरांचे तीन खंड अभ्यासपूर्ण आहेत. व्यक्तिचित्रे प्रवासवर्णने गाजली आहेत. काही निवडक पुस्तके - ‘असा हा महाराष्ट्र’, ‘असा हा गोमंतक’, ‘मुंबई ते मास्को व्हाया लंडन’, ‘सोनार बंगला’, ‘सत्ता आणि लेखणी’, ‘हॅलो चार्लस’, ‘माओ नंतरचा चीन’, ‘कुसुमाग्रज गौरव’, ‘गुलमोहराची पाने’ इ.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.रामदास खरे/लोकमत
October 3, 2017
भारतीय एकात्मतेची पुष्टी करणारी विधायक अध्ययनदृष्टी, आंतरशाखीय अभ्यासपद्धती ही ढेरे यांच्या विचाराची, लेखनाची वैशिष्ट्ये होती. एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे त्यांनी सारे आयुष्य संशोधन, लेखन यांसाठी दिले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
July 21, 2021
‘वग’, ‘गौळणी’, ‘पदे’, ‘कटाव’, ‘सवालजवाब’ आणि तमाशाचा फड’ यासाठी ज्यांनी एक काळ गाजवला ते श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी तथा पठ्ठे बापूराव. पठ्ठे बापूरावांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी झाला. औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले.
January 30, 2010
‘पहाटगाणी’, ‘अक्षयगाणी’ ‘एक धागा सुखाचा’ ‘गीत रामायण’ ‘तो राजहंस एक’ आणि ‘शब्दस्वरांचे इंद्रधनुष्य’ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत.
July 4, 2022
ज्येष्ठ सारंगीवादक आणि हिंदूस्तानी शास्त्रीय गायक व संगीतकार उस्ताद सुलतान खान यांचा जन्म १५ एप्रिल १९४० रोजी जोधपूर येथे झाला.
सुप्रसिद्ध सारंगीवादक साबीर खान यांचे ते वडील आणि गुरू होत. वडील आणि सारंगीवादक गुलाब खान यांच्याकडेच सारंगीवादनाचे शिक्षण त्यांनी घेतले. सारंगीवादनात अनेक नवे प्रयोग करून उस्ताद सुलतान खान यांनी सारंगी या वाद्याला आणि सारंगवादनालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवून दिली. वडिलांकडे सारंगीवादनाचे सुरुवातीचे धडे गिरविल्यानंतर उस्ताद सुलतान खान यांनी इंदूर घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद अमीर खान यांच्याकडे गाण्याचे शिक्षणही घेतले. उस्ताद सुलतान खान यांनी वयाच्या ११व्या वर्षी ऑल इंडिया कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा आपल्या कलेची झलक दाखवली होती. तेव्हापासूनच त्यांनी आपले जीवन सारंगीवादनाला अर्पण केले होते. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पंडित रवी शंकर यांच्यासोबत अनेक कार्यक्रमही केले.
संगीत नाट्य अकादमी पारितोषिक, राष्ट्रपती पारितोषिक, महाराष्ट्र शासनाचा गोल्ड मेडलिस्ट ऍवॉर्ड, अमेरिकन ऍकॅडमी ऑफ आर्टिस्ट ऍवॉर्ड असे अनेक संगीत पुरस्कार त्यांच्या खात्यावर जमा आहेत. विशेष म्हणजे त्यांनी प्रिन्स चार्ल्स यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कला सादर केली होती.
पाकिजा चित्रपटातील गाण्यांमध्ये सारंगी वादनाने आपल्या चित्रपट संगीताच्या कारकीर्दीला प्रारंभ करणा-या सारंगी सम्राट उस्ताद सुलतान खान यांनी उमराव जान चित्रपटातील सादरीकरणाने आपल्या या कारकीर्दीवर कळस चढवला. सारंगी वादक म्हणून नाव प्रस्थापित झाल्यानंतर सुलतान खान यांनी हिंदी सिनेसृष्टीतही अनेक गाण्यांचे योगदान दिले. ‘पिया बसंती रे’ या गाण्याला त्यांचा आवाज होता. याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातले ‘अलबेला सजन आयो री..’ हे गाणे त्यांनी गायले होते. उस्ताद सुलतान खान यांचे सहा अल्बम प्रकाशित झाले असून त्यांच्या सारंगीची ४५ रेकॉर्डस् उपलब्ध आहेत. त्यांनी सुखशिंदर शिंदा आणि राम गोपाल वर्मा यांच्यासाठी अनेक गाण्यांना संगीत दिले आहे. अनेक तामिळ चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केले. ते इंदूर घराण्याचे गायक होते.
उस्ताद सुलतान खान यांना २०१० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच त्यांनी दोनवेळ संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार पटकाविला होता.
उस्ताद सुलतान खान यांचे निधन २७ नोव्हेंबर २०११ रोजी झाले. गुलाम अली यांनी एकदा म्हटले होते की, आम्ही कितीही चांगले गायलो तरी सुलतान खान एका सुरातच सर्वांना मागे टाकतात. शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ म्हणत की, अनेक सारंगीवादक आले व गेले; पण सुलतान खान जेव्हा सारंगी वाजवतात, तेव्हा गुंता उलगडत असल्याचे जाणवते. आमीर खान यांचे गाणे व सुलतान खान यांची सारंगी ऐकणे सारखेच आहे.
https://www.youtube.com/watch?v=7wYXEY4htDA
https://www.youtube.com/watch?v=plfCU6cz7_E
https://www.youtube.com/watch?v=3CNFvgrtOOU
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 20, 2019
बार्शीकर, नवनीतभाई
नवनीतभाई बार्शीकर यांच्या निधनाने नगर शहराच्या जडणघडणीचे वैभवशाली पर्वच काळाच्या पडद्याआड गेले. सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन पंचवीस-तीस वर्षे झाल्यानंतरही शहराच्या दैनंदिन व्यवहारात पदोपदी होणारा नामोल्लेख हीच त्यांच्यातील अस्सल नगरकराची खरी ओळख होती. राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण अशा सर्वच आघाडय़ांवर आपल्या कामाची पक्की मोहोर त्यांनी उमटवली. भाईंना नगर शहराची आणि नगर शहराला भाईंची ओळख चिकटली ती त्यामुळेच!
राज्याच्या राजकारणात वैशिष्टय़पूर्ण स्थान असलेल्या नगर जिल्हय़ाच्या लौकिकात मुळातच नगर शहराचे स्थान तसे दुय्यम आहे. सहकार, शेती, पाटपाण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागाचा जिल्हय़ात व राज्यातही वरचष्मा आहे. राज्याच्या पातळीवर त्याला धक्का देण्याचे काम नवनीतभाई बार्शीकर यांनी केले. नगर विकासाच्या जोरावर त्यांनी जिल्हा व राज्यातही नगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सधन घरात १३ जानेवारी १९२० ला नवनीतभाईंचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीत सहभागी झालेल्या भाईंनी त्या धकाधकीच्या काळातही शिक्षणाची आस सोडली नाही. पुण्यात फग्र्युसन कॉलेजमधून एम.ए. पूर्ण करून त्यांनी पुढे कायद्याचीही पदवी घेतली. भाईंना कुठल्याही स्वरूपाची राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. वडिलांचा देशसेवेचा वारसा मात्र त्यांना लाभला. याच प्रेरणेतून सन ४२ च्या चलेजाव आंदोलनात ते सहभागी झाले, त्यात त्यांना सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. उण्यापुऱ्या ४०-५० वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांना एकदाच आमदारकीची संधी मिळाली. त्याचेही त्यांनी सोने केले. १९७२ ते ७८ या काळात विविध कारणांनी विधानसभेत नगर शहराचे नाव कायम चर्चेत राहिले. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना भाईंनी राज्यात ठसा उमटवला. नगर शहरात त्यांनी उभ्या केलेल्या मूलभूत सोयीसुविधांचे पुढे राज्यात अनुकरण झाले. अगदी स्मशानभूमीचे उदाहरण घेतले तरी नगरचे अमरधाम पाहून त्या धर्तीवर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीची उभारणी झाली! तब्बल ५० वर्षे शहराच्या सार्वजनिक जीवनात नवनीतभाई बार्शीकर सर्वार्थाने केंद्रस्थानी राहिले. ४० वर्षे नगरचे नगरसेवक व त्यातील १८ वर्षे नगराध्यक्ष, वीस वर्षे अर्बन बँकेचे अध्यक्ष ही त्यांची कारकीर्द. विशेष म्हणजे पक्षीय राजकारणाच्या नादी न लागता अपक्ष म्हणूनच भाईंनी प्रदीर्घ काळ नगर शहरावर शब्दश: राज्य केले. त्यांचे हे स्थान हीच नगर शहराची स्वातंत्र्योत्तर काळातील खऱ्या अर्थाने जडणघडण आहे. त्यातूनच त्यांनी स्वत:ची ‘अस्सल नगरकर’ अशी ओळख निर्माण केली आणि नगर शहरालाही आधुनिकतेची नवी ओळख दिली. त्याच्या खुणा आजही शहरात जागोजागी शाबूत आहेत. त्यांची पदोपदी आठवण काढली जाते ती याच कारणामुळे! लोकनियुक्त नगराध्यक्ष, त्या काळात एकमेव अर्थसत्ता असलेल्या नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि आमदार अशा तीनही संस्थांचा कारभार एकाच वेळी ताब्यात ठेवूनही भाई ‘लार्जर दॅन लाईफ’ झाले नाही. महत्त्वाच्या तिन्ही संस्थांचे सर्वेसर्वा होते तरी त्यांच्या दृष्टीने संस्था मोठय़ा होत्या. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या निवृत्तीने नगर शहराच्या विकासाची परंपरा खंडित झाली, निधनाने या पर्वाचाच अस्त झाला!
August 5, 2017
सिडने शेल्डन हा अनेक यशस्वी नाटक, चित्रपट, लिहणारा सुप्रसिद्ध एक लेखक, निर्माता, दिग्दर्शक होता. त्याने आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कादंबर्याथ लिहुन अक्षरशः जगाला वेड लावले,
April 28, 2024
प्राच्यविद्यासंशोधक आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांनी मराठी भाषा व मराठी वाङ्मय यांच्या समृद्धीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महाराष्ट्र भाषासंवर्धक मंडळी स्थापन केली. तिचा उद्देश ऐतिहासिक, चरित्रात्मक, बोधपर व उपयुक्त विषयांवर ग्रंथनिर्मिती करावी असा होता.
June 4, 2022
एम्.ए./२५ वर्षं संगीत क्षेत्रात कार्यरत. हिंदुस्तानी संगीत व्हायोलीनवादक. भारत सरकारची संगीत साधनेसाठी शिष्यवृत्ती. सुरसिंगार संसदचा सूर-मणि पुरस्कार. पेंडसे म्युझिक अकादमी द्वारे संगीताचा प्रसार.
May 29, 2014
पद्मा खन्ना या ट्रेंड ड्रान्सर असून वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पंडीत बिरजू महाराज यांच्याकडे कथ्थकचे धडे गिरवले. त्यांचा जन्म १० मार्च १९४९ रोजी बनारस येथे झाला.अभिनेत्री पद्मिनी आणि वैजयंती माला यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. वयाच्या १२ व्या वर्षी त्या पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकल्या. १९६१ मध्ये 'भैय्या' या भोजपुरी सिनेमाद्वारे पद्मा यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरवात केली. १९७० मध्ये त्यांना बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळाली. 'जॉनी मेरा नाम' या सिनेमात त्यांनी कॅबरे डान्सरची भूमिका वठवली. त्यानंतर 'लोफर', 'जान-ए-बहार', 'पाकिजा', 'सौदागर', 'हेरा फेरी', 'यार मेरी जिंदगी', 'प्यार दिवाना', 'जोशिला', 'अनोखी अदा', 'रामपूर का लक्ष्मण' या सिनेमांमध्ये काम केले. पद्मा यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये कॅबरे डान्स केला. हिंदी सोबतच जवळजवळ १४ भोजपुरी सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला.याशिवाय १९७७ मध्ये 'घेर घेर माती ना चुली' या गुजराती आणि १९७८ मध्ये' आलेल्या जिन्द्रा यार दी' आणि' शेर पुत्तर' या पंजाबी सिनेमातही त्यांनी काम केले. १९८३ मध्ये आलेल्या 'देवता' या सिनेमातील 'खेळ कुणाला दैवाचा कळला' आणि १९८६ मध्ये 'माफिचा साक्षीदार'या सिनेमातील 'शमा ने जब आग. 'या गाण्यांमध्ये त्यांचा गेस्ट अपिअरन्स होता. १९८० च्या दशकात छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या 'रामायण' या मालिकेत पद्मा खन्ना यांनी राणी कैकयीची भूमिका साकारली.या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. २००४ मध्ये त्यांनी 'नाहीर हुताल जया' या भोजपूरी सिनेमाचे दिग्दर्शन केले. दिग्दर्शक जगदीश सिडना यांच्यासोबत पद्मा खन्ना विवाहबद्ध झाल्या.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लग्नानंतर मा.पद्मा खन्ना या युएसए मधील न्यू जर्सी येथे स्थायिक झाल्या आहेत. तेथे त्या डान्स अकॅडमी चालवतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/shared?ci=oHntWZBPB1Y
https://www.youtube.com/shared?ci=y40aBf3QxLA
March 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti