जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत... त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं असलं तरीही विलक्षण चैतन्यमय भासतं.
विशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीत्यांनी पहिली मैफल गाजवली तेव्हाची आणि आताची त्यांचीगायनातली ऊर्जा, यात बिलकूल फरक पडलेला नाही. अगदी लहान वयातच आशाताईंच्या घरच्यांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं आणि आशाताई गाण्यातच अक्षरशः रुजल्या.
तेराव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल मारली; तर वयाच्या सतराव्या वर्षीच पं. भीमसेन जोशी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायनातील मान्यवरांनी आशाताईंच्या गाण्याला नावाजलं आणि त्यांना पुण्यात मानाचा 'बालगंधर्व पुरस्कार' बहाल केला.
१९७५ मध्ये लग्नानंतर मुंबईस स्थलांतर केल्यावर आशाताईंनी ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्याकडे गायनाचे शिक्षण चालू ठेवले. पुढच्या काळात त्या ग्वाल्हेर घराण्याचे समर्थ गायक पं. यशवंतबुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गायनकलेची आराधना करत होत्या.
आशाताईंनी वेगवेगळ्या संगीत घराण्यांना आपल्या गायनात समाविष्ट करून त्यातून आपले गाणे अधिक कसदार बनविले आहे. किराणा घराणे, ग्वाल्हेर घराणे व आग्रा घराणे यांच्या गायन शैलीची अनेक वैशिष्ट्ये आशाताईंच्या गायनात दिसून येतात. 'घेता किती घेशील दो करांनी' या न्यायाने माणिक वर्मा, पं. यशवंतबुवा जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. शंकरराव अभ्यंकर अशा विविध संगीत घराण्यातील गुरुंकडून गाण्याची तालीम घेतली. केवळ तालीम घेतली नाही, त्यात्या घराण्याची खासीयत आपल्या गळ्यात उतरवली आणि आपली अशी एक स्वतंत्र, काहीशी आक्रमक गायनशैली विकसित केली.
आशाताईंचं गाणं ऐकताना किराणा, ग्वाल्हेर व आग्रा घराण्याची गान वैशिष्ट्यं आढळून येतात, ती त्यामुळेच. त्यांनी गायलेल्या भावगीतांत याची उत्तम झलक पाहायला मिळते. विशेषतः 'घाई नको बाई अशी, आले रे बकुलफुला' हे गाणं ऐकताना याचं प्रत्यंतर येतं.
आशाताई पारंपरिक मराठी भावगीते, भजने व नाट्यगीतेही तितक्याच प्रभावीपणे सादर करतात. देशोदेशी त्यांचे कार्यक्रम होत असतात. आशाताईंनी संगीत दिग्दर्शन व संगीत रचनाही केल्या आहेत, तसेच अनेक बंदिशी रचल्या आहेत. 'संगीत आराधना' व 'संगीत कविराज जयदेव' यांसारख्या नव्या काळातील मराठी संगीतिकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. जाहीर कार्यक्रमांच्या जोडीला आशाताईंनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम, जसे, 'होली रंग रंगीले', 'सावन - रंग', 'ऋतु-रंग', 'रचनाकार को प्रणाम', सादर केले आहेत.
१९९४ पासून आपले पती श्री. माधव खाडिलकर यांच्या सहयोगाने आशाताईंनी ठाणे, मुंबई येथे 'उत्तुंग सांस्कृतिक परिवार' नामक सांस्कृतिक संस्था सुरू केली असून तिचा उद्देश संगीत, नृत्य, नाट्य व साहित्य विश्वातील नव्या दमाच्या प्रतिभेला आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. ह्या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांसाठी ही संस्था 'उत्तुंग पुरस्कार' जाहीर करते.
आजवर आशाताईंना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत माणिक वर्मा पुरस्कार, पं. कुमार गंधर्व पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ म.टा
काही गाणी आशा खाडिलकर यांची
घाई नको बाई अशी, आले रे बकुलफुला
वद जाऊ कुणाला शरण
जोहर मायबाप जोहर मायबाप
मजवरी तयाचे प्रेम खरे
अनंता तुला कोण पाहू शके
बलसागर तुम्ही
किती किती सांगू तुला
मर्म बंधातली ठेव ही
January 11, 2018
शून्यातून उद्योग सुरू करून त्यांनी गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.
November 2, 2021
१९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्र्यायहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले.
June 27, 2022
प्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.
July 7, 2022
स्वतंत्र भारताचा राज्य कारभार पाहण्यासाठी पंतप्रधान पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान झाले. त्यांच्याकडे गृहखाते, माहिती व नभोवाणी खाते, संस्थानांचा प्रश्न व निर्वासितांचे पुनर्वसन इ. खात्यांची जबाबदारी होती. सरदार पटेल यांनी तत्कालीन ५६५ संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून एकसंध भारत निर्माण केला.
October 31, 2021
हेमन्ता कुमार मुखोपाध्याय उर्फ हेमंत कुमार यांना संगीताचे औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. त्यांचा जन्म १६ जून १९२० रोजी झाला. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. गायनात गती असणाऱ्या हेमंत कुमार यांना साहित्यक्षेत्रात देखिल रस होता. १९३७ साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे ह्या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि त्यांच्या मधील कलाकार जन्मास आला.
वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 'निमोई संन्यासी' ह्या बंगाली चित्रपटासाठी तर 'ईरादा' ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन मा.हेमंत कुमार यांनी चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांनी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले.
स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी पूर्बोरंग ह्या बंगाली तर आनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले. नागिन चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शित केलेले त्यांची गाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कारदेखिल मिळाला. गायक म्हणून हेमंत कुमार यांनी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गाईली.
हेमंत कुमार यांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशेर नीचे ह्या चित्रपटाद्वारे चित्रपटनिर्मीती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स ह्या चित्रपट कंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद, कोहरा, खामोशी ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतील गाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शनाची जबाबदारी देखिल हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.
हेमंत कुमार यांनी गायलेली मराठी गाणी ही लोकप्रिय झाली. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, ’मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ ही हेमंत कुमार यांची मराठी गाणी खूपच गाजली. हेमंत कुमार यांचे १६ सप्टेंबर १९८९ यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
June 16, 2018
सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि कल्पक कर्णधार अशी असलेल्या कर्नल कोट्टारी कनकैया तथा सी.के. नायडू यांना सात कसोटीत ३५० धावाच करता आल्या तरी तब्बल सहा दशके त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट गाजवले.
November 1, 2019
केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू. त्या मुळे त्याला लहानपणापासून पासूनच कलेची आवड होती. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती. केदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात 'बॉम्ब-ए-मेरी-जान' या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर आलेल्या त्याच्या जवळजवळ सर्व नाटकांनी व्यावसायिक यश मिळवलं. या नाटकांमध्ये 'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' ह्यांचा समावेश होतो. त्याने मुख्यतः खळखळून हसवणारी विनोदी नाटकेच केली आहेत. दूरदर्शन मालिका आणि चित्रपट करतानाही त्याने हीच गोष्ट काटेकोरपणे पाळली आहे. त्यामुळे "केदार शिंदे=धमाल कॉमेडी" हे एक समीकरणच बनलंय.नाट्यसुष्ट्रीमध्ये भरघोस यश मिळवल्यानंतर त्याने पुढचं पाऊल टाकलं ते दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात. इथेही त्याने 'हाउसफुल्ल', 'हसा चटकफु', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'जगावेगळी', 'साहेब, बिवी आणि मी', 'घडलंय बिघडलंय' या झी मराठीवरील मालिकांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.
त्याचा पहिला चित्रपट 'अगं बाई... अरेच्या' म्हणजे मराठी चित्रपट सुष्ट्रीतील एकप्रकारची क्रांतीच होती. ह्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसुष्ट्रीत पहिल्यांदाच 'आईटेम साँगचा वापर करण्यात आला होता. ह्या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक फराह खान हिने केलं होतं, तर या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे नाचली होती. ह्या चित्रपटाने तुफान यश मिळवलं. ह्यानंतरही केदारने 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' यासारखे हिट चित्रपट दिले. त्याने २०१० मध्ये हिंदी चित्रपटसुष्ट्रीमध्येही पदार्पण केलं. त्याने तब्बू आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत असलेला 'तो बात पक्की' या चित्रपटच दिग्दर्शन केलं. परंतु या चित्रपटाला फारसं व्यावसायिक यश मिळाले नाही. केदार शिंदेने दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकाचा शुभारंभ ऑगस्ट मध्ये मुंबईत झाला. 'नाटक ना नाटक नु नाटक' असं या गुजराती नाटकाचे नाव असून 'द प्ले दॅट गोज राँग' या गाजलेल्या अमेरिकन नाटकाचा हा अधिकृत रिमेक आहे. बॉलिवूडस्टार शर्मन जोशीनं या नाटकाची निर्मिती केली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 17, 2018
प्रेमभावने बरोबरच स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचे प्रतिबिंब ज्यांच्या कवितेत दिसते त्या पद्मावती विष्णू गोळे या प्रसिद्ध कवयित्री होत्या. १० जुलै १९१३ मध्ये त्यांचा पटवर्धन घराण्यात जन्म झाला. एम. ए. पर्यन्त शिक्षण झाल्यावर त्या पुण्यालाच वास्तव्यास होत्या. ‘प्रीति प्रथावर’ हा १९४७ मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
February 4, 2010
अगं नाच नाच राधे, सत्यम् शिवम् सुंदरा, कुणीतरी येणार येणार ग, उठा उठा हो सकळीक " अशा असंख्य गाण्यांना आपल्या आवाजाने सरताज चढविणाऱ्या मराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचा जन्म ४ नोव्हेंबर रोजी झाला.
उत्तरा केळकर यांचे शास्त्रीय संगीताचे गुरू पं. फिरोज दस्तूर. व गाण्याचे गुरू श्रीकांतजी ठाकरे. ‘सत्यम शिवम सुंदरा’, ‘भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली’ असो, की बहिणाबाईंची – ‘माझी माय सरसोती’, ‘अरे संसार संसार’, ‘खोप्यामध्ये खोपा’ अशी असंख्य मराठी गाणी उत्तरा केळकर यांची गाजली. ज्या गाण्यांनी काही वर्षांपूर्वी गणेशोत्सव गाजवला आणि आज इतक्या वर्षांनंतरही ते गाणे ऐकू येते ते म्हणजे ‘अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग’ हे गाणे गायिका उत्तरा केळकर यांनीच गायले आहे. उत्तरा केळकर यांचे ‘बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला’ हे गाणेही लोकप्रिय आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच सुगम संगीत आणि लोकगीतातही आपली छाप पाडणाऱ्या उत्तरा केळकर यांनी छाप पाडली आहे.
हिंदी चित्रपटात त्या जास्ती गायल्या नाहीत, २०-२२ चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. बप्पी लाहिरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद-मिलिंद, राम-लक्ष्मण व काही इतर संगीतकारांकडेही हिंदी चित्रपटांसाठी गाण्याची संधी त्यांना मिळाली. १९८४ ते १९९८ पर्यंत त्या बप्पी लाहिरी यांच्या कार्यक्रमांत गात असत. टारझन, डान्स डान्स, सौ करोड, घर घर की कहानी, माँ कसम,अधिकार,काली गंगा,इन्सानियत के देवता अशा चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. फूल बने अंगारे, मधील गाणं ‘गोरी कबसे हुई जवान’ हे गाणं लतादीदींना वेळ नव्हता म्हणून त्यांनी शूटिंगपुरतं गायलं, पण त्यांचे हे गाणं चित्रपटाचे निर्माते के. सी. बोकाडिया यांना आवडलं त्यांनी गाणं चित्रपटात ठेवावं, म्हणून बप्पीजींना विनंती केली. पण बप्पीजींनी लतादीदींना शब्द दिला होता. म्हणून मग गाणं चित्रपटात नाही राहिलं, पण के. सी. बोकाडिया यांनी उत्तरा केळकर यांनी गायलेलं गाणं ‘फूल बने अंगारे’ चित्रपटाच्या रेडिओ पब्लिसिटीसाठी वापरलं. त्याखेरीज त्यांनी उरिया, बंगाली तेलगू चित्रपटात काही गाणी गायली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
November 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti